Features

महाराजा ट्रेझर आणि गायतोंडे !

परवा सायंकाळी एनजीएमएमध्ये प्रवेश केला. तेव्हा पहिल्यांदा दृष्टीस पडलं ते चित्रकार गायतोंडे यांचं काहीसं ऑरेंज रंगातलं पेंटिंग. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर केशरी किंवा भगव्या रंगातलं पेंटिंग. ते पाहिलं आणि प्रवासाचा सारा शिणवटा क्षणार्धात नाहीसा झाला.त्या पेंटिंगच्या अवती भवती बऱ्यापैकी गर्दी होती. त्यामुळे त्यादिवशी तरी ते पेंटिंग शांतपणे पाहता आलं नाही. पण गायतोंडे यांची त्या प्रदर्शनातली दोन्ही चित्रं पाहायला मी एनजीएमएमध्ये पुन्हा नक्की जाणार आहे.

‘चिन्ह’ तर्फे २०१६ साली जेव्हा आम्ही गायतोंडे यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा हे पेंटिंग मिळावं म्हणून मी खूप प्रयत्न केले होते. २००४ सालच्या एअर इंडियाच्या कॅलेंडरवर हे पेंटिंग प्रकाशित झालं होतं. पाहिल्याबरोबर ते तेव्हाच मला आवडलं होतं. गायतोंडे यांच्यावरच पुस्तक जेव्हा प्रसिद्ध करु तेव्हा हे पेंटिंग आपण नक्की मिळवून ग्रंथात प्रसिद्ध करू असं मी ठरवलं देखील होतं. मी केलेल्या शॉर्टलिस्टमध्ये हे पेंटिंग पहिल्या नंबरावर होतं.

Painting by V S Gaitonde in ‘Maharaja’s Treasure’ exhibition at NGMA

पण अनेक वार प्रयत्न करुन देखील एअर इंडियापर्यंत मला पोहोचता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. मेल पाठवले, मेसेजेस पाठवले, एअर इंडियाशी संबंधित असलेल्या लोकांशी व्यक्तिशः बोललो. मेल – मेसेजेसना तर उत्तर आलंच नाही आणि ज्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी कुठलंही स्वारस्य त्यात दर्शवलं नाही. त्याचं खूप वाईट वाटलं. पण सरकारी पातळीवर असे अनुभव येणारच हे देखील मी गृहीत धरुन चाललो होतो. आणि ते तसेच आले देखील. त्यामुळे जमलं तर इंग्रजी ग्रंथासाठी ते वापरायचं असंच मी मनाशी पक्क ठरवलं होतं.

आणि परवा ते पेंटिंग अभावितपणे मला प्रत्यक्ष पाहावयास मिळालं. त्याचा आनंद खूप मोठा होता. तेच नाही तर त्याबरोबर गायतोंडे यांचं आणखीन एक दुर्मिळ पेंटिंग एनजीएमएच्या दुसऱ्या मजल्यावर मला पाहायला मिळालं. खरं तर मराठी ग्रंथ प्रकाशित करताना एअर इंडियानं प्रकाशित केलेल्या कॅलेंडरमधला प्रिंट स्कॅन करुन मी ग्रंथात छापू शकलो असतो. पण ते योग्य दिसलं नसतं आणि प्रिंट केलेलं पेंटिंग पुन्हा स्कॅन करुन छापल्यावर कितपत चांगलं आलं असतं याविषयी देखील माझ्या मनात शंका होती. त्यामुळे तो मोह मी कटाक्षानं टाळला. खरं तर या संदर्भात बऱ्याच कडवट गोष्टी मला ठाऊक आहेत. पण इतक्यात ते लिहिणे औचित्याचे ठरणार नाही. पण थांबलो तेच एका अर्थी बरं झालं. कसं ते पाहा.

V S Gaitonde, Untitled, Oil on canvas, 1970

गायतोंडे ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचं काम जोरात सुरु आहे. येत्या ०२ नोव्हेम्बर रोजी कुठल्याही परिस्थितीत हा ग्रंथ प्रसिद्ध करायचं आम्ही ठरवलं देखील आहे. आणि हे काम सुरु असताना एअर इंडियाचं हे प्रदर्शन सुरु झालं आहे. ज्यात मला गायतोंडे यांची दोन दुर्मिळ चित्रं सापडली आहेत. आता त्याच्या इमेजेस मिळवणं मला अधिक सोपं झालं आहे. कसा योग जुळून आलाय पाहा.

येत्या ०२ नोव्हेम्बर २०२३ पासूनच ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष सुरु होत आहे. सरकार ते कितपत साजरं करील याविषयी मला दाट शंका आहे. कारण येतं वर्ष हे निवडणुकीचं आहे. आणि त्यात काय होणार आहे हे ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी जेजेच्या संदर्भात एकदा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांची जेव्हा भेट घेतली होती तेव्हा या संदर्भातले पत्र त्यांच्या हवाली केलं होतं. जरुर करुया म्हणाले होते. उच्च व तंत्रशिक्षण सचिव विकास रस्तोगी यांच्याकडे लेखी प्रस्ताव द्या असेही त्यांनी सुचवले होते. तेही केले. पण आजतागायत त्या दोन्ही पत्रांना साधी पोच देखील आलेली नाही. त्यावरुन सरकार दरबारी चित्रकला आणि चित्रकार यांना किती महत्व आहे हे समजून घेता येईल.

चंद्रकांत दादांनी या प्रकल्पात अधिक स्वारस्य दाखवावं म्हणून ‘चित्रकार गायतोंडे हे अगदी कुमारवयीन काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देखील जात होते हे देखील मी त्यांना सांगून पाहिलं. अर्थात हे मी माझ्या मनचं किंवा खोटं देखील सांगितलं नव्हतं ही वस्तुस्थितीच होती. गायतोंडे यांचे बालमित्र शांतू आमोणकर यांनीच ते २००६ साली ‘चिन्ह’ला दिलेल्या मुलाखतीत ते नमूद केलं होतं. तेच मी त्यांना सांगितलं. वाटलं होतं हे सांगितल्यामुळे तरी ते आपल्या खात्यातर्फे काही तरी करतील. पण त्यांनी आजतागायत काहीही केलेलं नाही. असो ! आणि पुढलं वर्ष तर काय निवडणुकीचंच आहे त्यामुळे यातले काहीही होणार नाही हे निश्चित.

म्हणूनच ‘चिन्ह’नं हा ग्रंथ ०२ नोव्हेम्बर रोजी प्रकाशित करण्याचं नक्की केलं आहे. आणि संपूर्ण वर्षभर दर आठवड्याला गायतोंडे यांच्याविषयी ‘चिन्ह’ची वेबसाईट आणि समाजमाध्यमांवर काहींना काही लिहून ते साजरं करायचं असं आम्ही पक्क ठरवलं आहे. ही ‘चिन्ह’नं गायतोंडे यांना दिलेली मानवंदना असेल.

काम जोरात सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात डिझायनींगला सुरुवात होईल तर सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर छपाईला. आत्ता तरी हे शेड्युल पक्के आहे. याची वितरण व्यवस्था देखील नेहमीच्या पद्धतीनं न करता एका आंतरराष्ट्रीय वितरण व्यवस्थेमार्फतच केलं जाणार आहे. साहजिकच त्यामुळे प्रकाशन पूर्व सवलत योजना वगैरे कुठल्याच प्रकारच्या सवलत योजना राबवल्या जाणार नाहीत हे उघड आहे. पण कुणालाही ते पैसे भरुन २४ तासातच घरपोच मागवता येईल इतकी सोपी आणि सुटसुटीत योजना केली जाणार आहे. या संदर्भातले सर्व अपडेट्स ‘https://chinha.in/‘ या वेबसाईटवर दर आठवड्याला अपलोड केले जाणार आहेत. ज्यांना ते हवे असतील त्यांनी पुढील लिंकवर क्लीक करुन https://chat.whatsapp.com/L8dCxxAbOaDBjaT6qrg0SI ‘चिन्ह’च्या अपडेट्स ग्रुपमध्ये सहभागी व्हावं आणि ते मिळवावे असं कलारसिकांना आवाहन आहे.

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.