Features

पावसाळी कलाप्रदर्शन : एक विचार !

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सध्या पावसाळी कला प्रदर्शन चालू आहे. या प्रदर्शनाचे यंदाचे हे ४२वे वर्ष आहे. या पावसाळी प्रदर्शनानं भारतीय चित्रकलेला अनेक नवीन कलावंत दिले आहेत. या प्रदर्शनाला सुमारे चार दशकं झाल्यानंतर त्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे असे अनेक कलावंतांना वाटतं. त्याचंच दर्शन घडवणारी ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया !

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सध्या मान्सून कला प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्रातील कलाशिक्षण घेणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना कलेचं व्यासपीठ मिळावं आणि आपली कलाशिक्षण प्रवासातली कलाकृती सादर करण्याची संधी मिळावी तसेच स्वतःला कलाजगतात नव्यानं वावरायचं आहे याचं स्वभान राखण्यासाठी हा जहांगीर कला दालनाचा मान्सून मंच आहे.

या मान्सून कला प्रदर्शनात प्रत्येक कलाकृती आणि त्या कलाकृतींचा विचार समजून घेत, मी कला प्रदर्शन पाहत होतो. साधारण कलाशिक्षण पद्धतीत विविध माध्यमं हाताळणं सुरू असतं. मूर्त /अमूर्त संकल्पनेत आजची कलाकार तरुण पिढी वावरत आहे. हे कला प्रदर्शन पाहण्याचा मुख्य हेतू हाच की महाराष्ट्रात आज अनेक कला महाविद्यालय आहेत त्यांची कला दिशा आणि दशा अनुभवणं.

मुळात कलाशिक्षण हे कला संस्कारावर अवलंबून असतं. कला महाविद्यालय शिक्षण, प्रशिक्षण हे तत्त्वतः कला शिक्षकांवर असतं. तसंच काही कलाविद्यार्थी हे कलात्मक बंडखोरी करीत धाडसानं कलाकृती करताना आपण पाहतो. अर्थात हे शिक्षण बहुदा अनुकरण,परिणाम यातून रचत जात असतं. विद्यार्थी दशेत वावरताना कला वर्ग शिक्षण आणि समूह कलाशिक्षण कलेतून स्वयं कला अनुभूती घेणं सुरू असतं.

चार / पाच वर्षांच्या कलाप्रशिक्षण काळात कलागुरु / जवळचा कलाकार मित्र / मैत्रीण भेटणं आणि कलेतून वाटचाल करणं सुरू राहतं. या कला काळात नामवंत चित्रकारांचा प्रभाव, गुरूंचा प्रभाव अथवा मित्रवर्गातील आदर या सर्व बाबीतून प्रवास करताना स्वतःचं मर्म चित्रात शोधणं आवश्यक असतं, अन्यथा कलाकार म्हणून घडताना हे धोके पत्करत जेव्हा कलाकृती मान्सून कला प्रदर्शनात येते तेव्हा बहुसंख्य नवोदित कलाकार साफ उघडे पडतात.

पारितोषिक मिळणं, भव्य कलाकृती मांडणं यात तंत्र, विचार वाचताना कलाकृती परिपक्वतेचा विचार असायला हवा. काही कलाकृतीत नामवंत कलाकारांची छाप दिसते. विविध माध्यमात काम करणं अधिक चांगलं असतं परंतु माध्यमांच्या परिसीमा गाठताना विचारांचा अभाव जाणवत राहतो.

समूहचित्र प्रदर्शन मांडणं आणि प्रदर्शित करणं हे कौशल्य पाहता प्रत्येक कलाकृती स्वतंत्र मांडणी आणि अवकाश याचं भान दिसत नाही. प्रकाशयोजना पाहता कलाकृती केंद्रित प्रकाश योजनेचा अभाव जाणवतो. काही कलाकृती या कला प्रदर्शनाला शोभा देत नाहीत. निव्वळ कला महाविद्यालय सहभाग म्हणून कलाकृती नसाव्यात असे वाटते. पण कलारसिकांशी संवाद साधणं, आपल्या कलाकृतीला रसिकांच्या माध्यमातून जाणून घेणं हे व्हायला हवं.

आपली कलाकृती विकली जाणे हे निकष लावून पुढे हे कलावंत वावरले तर.. हे कला विद्यार्थी तंत्र,माध्यमात अडकून पुढील प्रवास होणं धोक्याचं आहे..

पुढील मान्सून कला प्रदर्शनात नामवंत चित्रकारांशी कलादालनात  चर्चा / परिसंवाद / मेळे / कला व्याख्यानं / स्केचिंग क्लब / प्रात्यक्षिकं / पुस्तक प्रदर्शनं / फिल्म शो / आर्ट परफॉर्मन्स / कलारसिकांची मते / संवाद, कला समीक्षक विचार, एक सप्ताहाचे कला संमेलन भरवून, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना या कला प्रवाहाचे मार्गदर्शन होणे आवश्यक वाटते. असे अनेक कला प्रदर्शनाबरोबरचे सहकार्यक्रम आखले तर मान्सून कला प्रदर्शन हे नवकलेचा आदर आणि नव्या येणाऱ्या कलावंतांना मार्गदर्शक ठरू शकेल असं वाटतं. अन्यथा अनेक कलाप्रदर्शनातील हे एक पावसाळी ( वेळ भरू ) प्रदर्शन होत राहणार !

राज वसंत शिंगे

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.