Features

कलाशिक्षण, मिठबावकर सर आणि मी

नव्या वर्षाच्या अखेरीला जो व्हिडीओ आम्ही ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर टाकला तो कलाक्षेत्रात अतिशय स्फोटक ठरला आहे . इतका की तो प्रचंड पाहिला तर जातोयच , पण अनेक नवे नवे प्रश्न देखील उपस्थित करतोय. ‘ चिन्ह’ कडे मोठ्या प्रमाणावर मेसेजेस येताहेत . बहुसंख्य मेसेजेसमध्ये आभार मानलेले असतात की ‘ चिन्ह’नं आवाज उठवला हे चांगलं केलं वगैरे . पण शिरीष मिठबावकरांकडे मात्र फोनवर फोन येतायत , ज्यांनी ते बिचारे भांबावून गेलेत . खरं तर मोठ्या दुखण्यातून अलीकडेच ते पूर्णतः बरे झालेयत . त्यांना वारंवार फोन करुन त्रास देणे योग्य नव्हे . पण बहुसंख्य पालकांना ते ठाऊक नसतं. कसं असणार ? ते बिचारे विचारतात ‘ मुलाला / मुलीला या लाईनला पाठवू का नको ? आर्ट स्कूलला प्रवेश घेतलाय खरा पण ‘चिन्ह’चे सारे व्हिडीओ ऐकून काय करायचं ते कळेनासं झालंय. वगैरे ! बिचारे मिठबावकर सर प्रत्येक फोन अटेंड करतात. हाडाचे शिक्षक असल्यानं प्रत्येकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांची ही धावपळ, ओढाताण पाहून त्यांची बिचारी बायको देखील वैतागते. ‘ आता रिटायर झालात ना ? का उगाच त्रास करुन घेताय या वयात म्हणून त्यांना दम भरते. पण नेहेमी प्रमाणेच मिठबावकर सर हास्यविनोद करुन तिची समजूत काढतात आणि नव्या फोनकडे वळतात.

सर सांगत होते. तो व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जेजेतले माजी शिक्षक , रहेजा स्कूल मधले माजी सहकारी , महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या कला महाविद्यालयातले आजी माजी शिक्षक, आजी माजी विद्यार्थीं ,त्यांचे पालक आणि मुख्य म्हणजे कला संचालनालयातले आजी माजी अधिकारी साऱ्यांचेच सतत फोन येतायत . मोठया प्रमाणावर प्रत्येक जण प्रश्न विचारतायत त्यांची उत्तरं देताना तुला सांगतो सतीश अक्षरशः नाकीनऊ येतात रे. इतकी या क्षेत्रात भयंकर अनागोंदी माजली आहे .

काही काही तर , काही नव्हे बरेचसे या क्षेत्रातले लोक तर मी ‘ चिन्ह ‘ बरोबर व्हिडीओ का करतो असे प्रश्न देखील विचारतात .मी ‘ चिन्ह ‘ बरोबर व्हिडीओ करु नये असं त्यांचं सांगणं असतं . मग मी त्यांना हसत हसत सांगतो की आम्ही दोघं गाववाले आहोत, अस्सल मालवणकर आहोत. म्हणून आमचं जमतं वगैरे तर ते त्यांना पटत नाही . मग त्यांना मला अगदी स्पष्ट शब्दात सांगावं लागतं की १९७६ सालापासून आमची मैत्री आहे . कला शिक्षण क्षेत्रातली प्रत्येक बरी वाईट गोष्ट गेली तब्बल ४६ -४७ वर्षं मी त्याच्यासोबत शेअर करीत आलो आहे किंवा तो माझ्याशी शेअर करीत आला आहे . वृत्तपत्रात किंवा ‘चिन्ह’ मध्ये बातमी देताना किंवा लेख छापताना तो माझं मत देखील विचारात घेतो. अनेक गोष्टीवर आम्ही चर्चा करतो . एकमेकांचं मत जाणून घेतो. पाचव्या वेतन आयोगाच्या लढ्यात त्यानं मला खूप मदत केली . अनेक पत्रकार – संपादकांशी परिचय करुन दिले . त्यामुळे माध्यमांमध्ये आमच्या लढ्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि सरकारवर खूप दबाव आला . त्या लढ्यामुळे तर आम्ही जास्त जवळ आलो .आमची इतक्या वर्षाची जरी मैत्री असली तरी वेळप्रसंगी त्यानं माझ्यावर ‘चिन्ह’मधून टीका करायला देखील कमी केलं नाही.

व्यक्तिगत काहीही स्वार्थ नसताना चित्रकार आणि एका चित्रकलाविषयक वेबसाईटचा संपादक म्हणून तो हे जे काही करतो आहे ते निव्वळ कलेसाठी किंवा कलाशिक्षणाच्या भल्यासाठी करतो आहे तर मी त्यात सहभागी होऊ नये या साठी तुमचा आग्रह का ? असं अखेरीस मला त्यांना विचारावं लागलं .तुम्ही काही करताय का या संदर्भात ? करा , आणि मला बोलवा ! मी येईन तुमच्या सोबत . बोलावता ? माझ्या या प्रश्नावर त्यांच्यापाशी काही उत्तर अर्थातच नसतं . बहुसंख्य जणांचं म्हणणं असं असतं की ‘ आता काय आमची दोनच वर्ष राहिली’ ! किंवा ‘ दीडच वर्ष राहिलं आहे , किंवा ‘ आता लवकरच सेवानिवृत्त होणार , आपल्याला काय त्याचं ! ‘ शेवटी मला त्यांना सांगावं लागतं की ‘ कलाशिक्षणाशी तसा दुरान्वयाने संबंध नसताना केवळ सामाजिक बांधिलकीपोटी ज्या क्षेत्रातून आपण आलो ते क्षेत्र सुधारण्यासाठी तो स्वतःचा पैसा खर्च करुन जर काही करत असेल तर तुमचा त्याला विरोध का ? या प्रश्नावर त्यांच्याकडे अर्थातच काहीही उत्तर नसतं . हे सारं शिरीष हास्य विनोद मी नानाविध नकला करुन सांगत असतो .

मी त्याचा ‘ कलाशिक्षण तज्ञ्’ म्हणून जो जाहीर उल्लेख करतो त्यावरच्या कला शिक्षकांच्या कुत्सित कमेंट्स देखील शिरीष मला हसत हसत सांगत असतो . मग मी त्याला सांगतो की जे कुणी अशा कमेंट्स करतात त्यांना मला फोन करायला सांग . तो संबंधितांना हसत हसत माझा निरोप देतो पण मला काही अजुन एकही फोन आलेला नाही . जेजे मधून बाहेर पडल्या पडल्या शिरीष बांद्रा स्कूल ऑफ आर्ट मध्ये लागला . कला शिक्षक हा पेशा त्यानं आपणहून निवडला आणि तो आयुष्यभर इमाने इतबारे निभावला देखील . पाचव्या वेतन आयोगाच्या लढ्यात त्याने जे काही केलं त्याला तोड नव्हती . त्यावेळी तो कोपरखैराणेत राहायचा . तिथून तो रोज सकाळी मंत्रालयात जायचा . मंत्रालयातली कामं आटोपून दुपारी वेळेवर वांद्र्याला कॉलेजला जायचा . ते आटोपलं की जेजेआईट्स वगैरेची काम आटोपून रात्री झोपायला घरी जायचा . दुसऱ्या दिवशी पुन्हा रोज़चा दिनक्रम . अशी त्या आंदोलनात त्यानं आयुष्याची पाच सहा वर्ष खर्च केली .(आणि उगाचच आजारपण देखील ओढवून घेतलं असं आपलं माझं मत आहे.) या काळात त्याचा सरकारी नियमांचा , वकिली काव्याचा ,मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी वापरायच्या भाषेचा आणि कला शिक्षणातील दुबळ्या बाबींचा इतका अभ्यास झाला की झोपेतून उठवून जरी त्याला कुणी विचारलं तरी तो त्या प्रश्नांची फाडफाड उत्तरं द्यायला तयार असायचा .

केवळ शिरीष मुळेच ‘ कला शिक्षण महाचर्चेचा कार्यक्रम ‘ आम्ही यशस्वी पद्धतीनं सादर करू शकलो . नंतरचे सारेच कार्यक्रम करताना मी शिरिषचा सल्ला प्रत्येक टप्प्यावर घेत होतो. त्याच्या इतका अनुभवी,जाणकार, अभ्यासू आणि कुठल्याही  नकारात्मक गोष्टीची सावली देखील आपल्यावर पडू न देणारा  कला शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रात आहे तरी कोण दुसरा ? असेल तर त्याच्या सोबत  देखील ‘ चिन्ह’चे भविष्यातले कार्यक्रम सादर करायला मला निश्चित आवडेल .

आता त्याच कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रसारित करायचा आमचा विचार आहे . त्यात असंख्य फटाके फुटणारच आहेत पण म्हणून ते फोडणाऱ्यांना त्यासाठी जबाबदार धरु नका, ज्यांनी  मुळातच हा दारुगोळा जमा केला त्यांना यासाठी जबाबदार धरा . खरे आरोपी ते आहेत . आम्ही फक्त पुढल्या पिढीसाठी माचिसच्या काड्या पेटवतोय .

****

– सतीश नाईक 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.