Features

तेरी मेरी यारी !

दि ९ ऑक्टोबर रोजी प्रदीप राऊत यांचं निधन झालं. प्रदीप राऊत हे जेजेचे विद्यार्थी. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून जेजेला आलेले. राऊतांचं  काम खूप चांगलं होतं त्या मानाने त्यांना प्रसिद्धी कमी मिळाली. ते रूढार्थाने शिक्षक नव्हते पण अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचा कामाचा झपाटा खूप मोठा होता.  पण त्यांच्या अकाली निधनाने एक कुंचला आज थांबलाय. अमेरिकेतील चित्रकार, प्राध्यापक विलास टोणपे हे त्यांचे वर्गमित्र आणि बेस्ट फ्रेंड. प्रदीप राऊत आणि विलास टोणपे यांच्यामधला जिव्हाळा कौटुंबिक होता. प्रदीप राऊत यांच्या आठवणी, अमेरिकेत स्थायिक असलेले विलास टोणपे यांनी फोनवरून खास चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी सांगितल्या आहेत. 

प्रदीप आणि माझी ओळख १९८६ ची. आम्ही दोघांनी बीएफए ड्रॉईंग अँड पेंटिंगला ऍडमिशन घेतलेलं. तो यवतमाळचा आणि मी तर पक्का मुंबईकर. त्याची पहिली आठवण म्हणजे विदर्भातला असल्याने त्याला तिखट जेवण आवडायचं. मग तो कँटीनवाल्याला एखादा पदार्थ तिखट कर असे सांगण्यासाठी “और तेज करो” असे सांगायचा. त्याच्या या और तेजचं  मला जाम हसू यायचं. पण भाषा भिन्न असल्या तरी आमचे विचार कुठेतरी जुळत होते त्यातून मग आम्ही सच्चे दोस्त झालो. आमची मैत्री एवढी की दर वेळी मी अमेरिकेतून आलो की हमखास त्याला भेटायचोच. हे सत्र अगदी कोरोनाच्या आधीपर्यंत चालले. आमची शेवटची भेट झाली तेव्हा असं वाटलंच नाही की तो असा अचानक सोडून जाईल. 

विलास टोणपे यांच्या संग्रहातील प्रदीप राऊत यांचं पुरस्कारप्राप्त निसर्गचित्र.

प्रदीपची आणि माझी मैत्री फक्त कॉलेजपुरती नव्हती, सुरुवातीला जेव्हा मुंबईत प्रदीपच्या राहण्याची सोय नव्हती तेव्हा तो दोन वर्षे माझ्याच घरी राहिला होता. त्यामुळे तो माझ्या कुटुंबाचाच भाग झाला होता. प्रदीपची बहीणही मला राखी बांधायची. तो काळ आर्थिक चणचणीचा असला तरी मला मुंबईत हक्काचे घर होते. प्रदीप मात्र मुंबईत होस्टेलला राहायचा. कमी पैशात कॉलेजचा खर्च, जेवण भागवणे त्याला अवघड जायचे पण शिकण्याची जिद्द खूप मोठी होती. त्याचं  कामही अतिशय उत्कृष्ट होतं. लँडस्केप, फिगरेटीव्ह, ऍबस्ट्रॅक्ट अशा सगळ्या माध्यमात तो काम करायचा. त्याचं मला खूप मार्गदर्शन मिळालं. खरं सांगायचं तर आज मी माझ्या क्षेत्रात जे काही करतोय ते प्रदीपने कॉलेजच्या काळात केलेल्या मार्गदर्शनामुळेच. 

प्रदीप आणि मी दोघेही आर्थिकदृष्टया सामान्य घरातून आलेलो. त्यातल्या त्यात मला मुंबईत हक्कच घर होतं हीच काय ती जमेची बाजू. मी कुठेच जेवण नाही मिळालं तर रात्री घरी जाऊन जेवत असे पण प्रदीपला ही सोय नसायची मग पैसे वाचवण्यासाठी प्रदीप अनेक शक्कला लढवायचा .  त्यात त्याने मंत्रालयाचं कँटीन शोधून काढलं. तिथं कमी पैशात अनलिमिटेड जेवण मिळत असे. मग आम्ही दोघेही तिथे जेवायला जात असू. मला खरं तर भीती वाटायची की हे आपल्याला हाकलतात की काय पण प्रदीप म्हणायचा, “अरे जेव तू बिनधास्त कोणी काही विचारत नाही आपल्याला”. असे ते मजेचे दिवस. आम्ही अनेकदा रात्री फोर्ट भागात सिनेमा बघायला जायचो. आमच्याकडे तिकिटापुरते पैसे असायचे. उरलेल्या पैशात आम्ही एक तर बसने येऊ शकायचो किंवा वडापाव खाऊ शकायचो. मग आम्ही तिकिटातून उरलेल्या पैशाचा वडापाव खायचो आणि चालत घरी यायचो. 

विलास टोणपे यांच्या अमेरिकेतल्या घरातील प्रदीप राऊत यांचं चित्र.

प्रदीपची चित्रेही मी कायम संग्रही ठेवली आहेत. ते तो माझा मित्र आहे म्हणून नाही तर तो किती श्रेष्ठ दर्जाचा कलाकार आहे म्हणून. माझ्या वैयक्तिक संग्रहात अनेक देशी विदेशी चित्रकारांची चित्रे आहेत. पण माझा दिवाणखाना मात्र  मी प्रदीपच्या चित्रांनी सजवला आहे. 

कॉलेजमध्ये आर्थिक तंगी असो किंवा नसो, ते दिवस वेगाने निघून जातात. नियती आपल्या जिवलग मित्रांपासून आपल्याला वेगळं करते. प्रत्येकजण आपल्या ध्येयाप्रमाणे शहरे, देश बदलतो. मी ही कॉलेजनंतर अमेरिकेला गेलो. तरी पत्रातून, फोनमधून आम्ही संपर्कात होतो.  

कॉलेजच्या दिवसात आम्ही सोबत होतोच पुढेही ही मैत्री आम्ही दोघे दोन देशात असलो तरी टिकली. कॉलेज संपल्यानंतर मी अमेरिकेत पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढे तिथेच प्राध्यापक पदाची नोकरी स्वीकारली.  माझी खूप इच्छा होती की प्रदीपनेही अमेरिकेत यावे, माझ्या स्टुडिओत काम करावे, पण त्याला अमेरिकेची तशी ओढ कधीच नव्हती. तो भारतातच मस्त होता. मी अमेरिकेला एकदा तरी ये असं म्हटलं की तो कारणे द्यायचा.  मला प्रदीपला एकदा तरी अमेरिकेला न्यायचे होते, पण आता ते शक्य नाही याचे खूप वाईट वाटते. 

कोरोनामुळे गेली दोन तीन वर्ष मी भारतात येऊ शकलो नाही. त्यामुळे प्रदीपची भेट राहून गेली.  प्रदीप असा अकाली जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. आता जेव्हा मी भारतात येणार तेव्हा तो नसेल याचे दुःख आहे. तुला भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप ! 

(लेखातील सर्व फोटो विलास टोणपे यांच्याकडून साभार!)

****

– विलास टोणपे
(लेखक अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे मेथडिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये कलेचे प्राध्यापक आहेत. )

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.