Features

नितीन चंद्रकांत देसाई आणि त्यांचे चित्रपट – भाग १

नितीन चंद्रकांत देसाई, चित्रपट सृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न.दिग्दर्शकाच्या स्वप्नांना प्रत्यक्ष रूप देणारा हा किमयागार. त्यांचा आज वाढदिवस. पण तो अशा प्रकारे जयंती म्हणून साजरा करण्याची वेळ येईल असं कुणालाच वाटलं नसणार. या महान कला दिग्दर्शकाला आपण ‘चिन्ह आर्ट न्यूज’मधून लेखांच्या स्वरूपात आठवडाभर श्रद्धांजली वाहणार आहोत. या लेखमालिकेत पहिला लेख आहे नीतिन आरेकर यांचा. नीतिन आरेकर आणि नितीन देसाई यांची छान मैत्री होती. आरेकर आणि देसाई यांची ओळख ९०च्या दशकामधली. देसाई यांनी चित्रपट कला दिग्दर्शन करताना सूक्ष्म विचार करून काम केलं होतं. आणि या डिटेलिंगच्या वेडामधूनच देवदास, हम दिल दे चुके सनम, बालगंधर्व यासारखे अतिभव्य चित्रपट निर्माण झाले. आरेकरांच्या या पहिल्या लेखात वाचूया देसाई यांच्या सिनेमा कला दिग्दर्शनाविषयी.

नितीन चंद्रकांत देसाई या दशाक्षरी मंत्राने भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय चित्रपट व मालिका क्षेत्रांना गेली छत्तीस वर्षे व्यापून होती. आज सहा ऑगस्ट, दादांना (नितीन देसाई यांना सारे ‘दादा’ म्हणत) आज अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाली असती. या अद्भूत कलावंताने केवळ कलेचाच ध्यास अहर्निशपणे घेतला होता. ते कलेतच वावरत, कलेचंच बोलत, कलेतच झोपत, कलेतच स्वप्न बघत आणिकलेतच श्वास घेत व कलेचीच स्वप्ने बघत. ते मलाच नव्हे तर सर्वाना सांगत, तुम्ही माझ्याशी काहीही बोला, मला त्याचा अर्थ चित्राच्या रूपातच दिसतो. 

माझी व दादांची पहिली भेट 1989 मधे झाली होती. मी राजाबाई टॉवरमधील ग्रंथालयात अनेकदा अभ्यास करत बसे. तिथं आठवड्यातून दोन-तीन दिवस जाड मिशांचा एक सावळासा तरुण माझ्या शेजारी अभ्यास करत बसे. माझी आत्या सरोज पोतदार ही साहाय्यक ग्रंथपाल होती. ती त्या तरुणाला स्वत: पुस्तके आणून देत असे. एकदा मी तिला विचारल्यावर ती मला म्हणाली, “अरे हा नितीन देसाई. ‘भारत की खोज’चा साहाय्यक कलादिग्दर्शक. तो इथं बसून संशोधन करतोय.” तो तरुण लिहित नसे, तर त्याच्या जवळ एक मोठी चित्रकलेची वही असे, त्या वहीत तो निमुळत्या टोकदार पेन्सिलीने तो काहीतरी चितारीत असे. नंतर काही महिने तो गायब झाला. माझं शिक्षण संपलं, पण अधूनमधून राजाबाई टॉवरची ओढ तिथं नेत असे. त्याचवेळी चाणक्य मालिका सुरू झाली होती. त्यासाठीही अभ्यास करायला तो तरुण येत असे. नंतर माझं ग्रंथालयात येणं कमी झालं. त्या तरुणाची माझी गाठ पडणं बंद झालं. नंतर थेट 2009 साली आम्ही एन्.डी. स्टुडिओत भेटलो. 

पण त्यापूर्वी हा तरुण वेगानं मोठा होत गेलेला दिसला. दुरून त्याचं काम पाहात होतो. परिंदा, 1942- अ लव्ह स्टोरी, दिल से, लगान, मुन्नाभाई चित्रपट मालिका, स्वदेस, हम दिल दे चुके सनम, देवदास, आंबेडकर, गांधी- माय फादर, अफाट चित्रपटांची मौक्तिक माला त्यानं विणली होती. 

‘चाणक्य’ ही त्यानं स्वतंत्रपणे केलेली मालिका. परवा, दादांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी पद्मश्री मनोज जोशीबरोबर बोलत होतो, ज्येष्ठ दिग्दर्शक व सोनी-कलर्स सारख्या चॅनेल्सना उभं करणारा संजय उपाध्याय (संजय हा माझ्या महाविद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थी सहाध्यायी), किशोरजी धारिया असे होतो. मनोज व संजय हे चाणक्यपासून दादांचे मित्र. दादा कलादिग्दर्शक, संजय निर्मितीत व मनोज अभिनेता. काही कारणामुळे चाणक्यचे मुख्य कलादिग्दर्शक मालिका सोडून गेले. जाताना ते चंद्रप्रकाश द्विवेदींना म्हणाले आता नितीन काम करील. नितीन देसाईंना हे अमान्य होतं. आपल्या गुरूच्या जागी आपण कसं काम करायचं हा पेच होता त्यांच्यासमोर! पण मनोज व दादा आणि मनोजचा कॉमन मित्र आशुतोष आपटे या दोघांनी त्यांना समजावलं. मनोज म्हणाला, “अरे, तुझी करिअर सुरू होईल. तू ही संधी स्वीकार.” संजयचंही तेच मत. अखेर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली.

चाणक्यच्या सव्विसाव्या भागापासून (माझ्या आठवणीप्रमाणे) त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. मला चाणक्यचे सेट्स पाहाताना एक गोष्ट नेहमी जाणवायची ती म्हणजे या मालिकेतील गुरुकुलाची रचना. गुरुकुलांत उंचच उंच खांब होते, पण त्यावर मला छत दिसलं नाही. आकाश दिसे. मला वाटे, त्या खांबांनी ज्ञानाचं आकाश तोलून धरलंय. नुकताच प्रा. गंगाधर पाटील यांच्याकडून आदिबंधात्मक समीक्षा शिकलो होतो, प्रत्येक गोष्टीकडे त्या पद्धतीने पाहाण्याची सवय लागलेली. चाणक्यच्या सेटकडे पाहाताना ती नजर होती. दादांबरोबर दाट परिचय झाल्यानंतर मी त्यांना त्याबद्दल विचारलं, ते म्हणाले, “अरे, असा विचार मनात कधी आला नव्हता. अर्थात मोकळं आकाश दाखवण्याची कल्पना माझी नव्हती, ती नितीश रॉय यांची होती.” नितीश रॉय नाव उच्चारताना त्यांन डोळे मिटले व मनोमन त्यांना नमस्कार केला.

त्यांच्या कामाची दखल पहिल्यांदा घेतली गेली ती ‘परिंदा’मुळे. त्याआधी ‘भूकंप’ हा अधिकारी ब्रदर्सचा चित्रपट त्यांनी केला होता. पण परिंदामधे माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा बोटीतील प्रणय सुरू असताना त्यांना मशीनगनने मारलं जातं त्यावेळी मशिनगनमधल्या गोळ्या बोटीच्या भिंतीत घुसतात, त्यावरचं रेक्झिन फाटतं आणि आतला कापूस बाहेर येतो. यापूर्वी भारतीय चित्रपटांत, अशा पद्धतीनं इतकं खरं तयार केलं जात नव्हतं. बोटीचा सिक्वेन्स हा प्रत्यक्ष बोटीत नव्हता, तर तो एक सेट होता. अद्भूत काम होतं ते.

त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतला पहिला भव्य पीरियड चित्रपट आला- ‘1942- अ लव्ह स्टोरी’! आर्.डी. बर्मन आणि नितीन देसाई यांच्या कामगिरीने सजलेला तो चित्रपट होता. या चित्रपटाचा करार होण्याच्या वेळी अगदी नितीन देसाई खूप अस्वस्थ होते, चोप्रांच्या टीममधल्या काही जणांना ह्या पंचवीस वर्षाच्या मुलाला हा प्रोजेक्ट कसा झेपेल याची शंका होती. झोप येईना. पहाटे उठले आणि फिल्म सिटीमधल्या तळ्याच्या काठावर जाऊन बसले, इथं पाण्यात आपल्याला सेट कसा उभारता येईल त्यावर विचार करत बसले, ते त्या चित्रपटातलं एक लोकेशन होतं. दिवस कासराभर वर आला, तो त्यांच्या खांद्यावर हळूच एक हात पडला. त्यांनी मागे वळून पाहिलं, तर विधू विनोद चोप्रा होते. त्यांनी विचारलं, “क्या तू वही सोच रहा है जो मैं सोच रहा हूँ।“ दादांनी मान डोलावली. त्या क्षणी, दादांच्या हातात तो चित्रपट आला. या चित्रपटाच्या भव्यतेमुळे, सेट्समुळे दादांची सर्वत्र चहा झाली. ‘कुछ ना कहो’, हे गाणं अनिल कपूर आणि मनीषा कोईरालावर शूट झालं. तो सेट आठवून पहावा. पडद्याच्या मध्यातून दूरवरून कुठून तरी, कदाचित स्वर्गातून एक सजवलेला जिना खाली उतरत येतो व पडद्याच्या डावीकडे असाच अनंतात विलीन होताना जाणवतो. प्रेमाचा उद्भव कुठून होतो, कसा होतो, ते कसं विकसित पावतं… काहीही कळत नाही. ते थोडं थोडं अपूर्ण भासतं. प्रेम कधीही पूर्ण नसतं, सौंदर्य हे अपूर्णतेतच असतं- कवयित्री म्हणते ना- “गोडी अपूर्णतेची, लावील वेड जिवा”. बस ते असतं. तो स्वर्गीय जिना, त्या गाण्यातला फुलांनी बहरलेला झुला. दिग्दर्शकाच्या मनात असतं ते चित्रपटात येतं. पण, त्याच्या मनातलं अधिक सौंदर्यपूर्णतेने पडद्यावर कसं दिसेल हे जाणणारा कलादिग्दर्शक असेल तर ती कलाकृती परिपूर्णतेकडे प्रवास करते. येथे ते जाणवते. दादांना गप्पा मारताना मी एकदा माझ्या मनातला हा विचार सांगितला, तेव्हा त्यांनी पटकन हातावर टाळी दिली. म्हणाले, “त्या गाण्याच्या सेट डिझायनिंगच्या वेळी माझ्या मनात हाच विचार होता. विधू विनोदला मी काही बोललो नाही. त्याला काय हवं होतं ते समजून घेतलं आणि मग डिझाईन केलं. दिग्दर्शकाला जसं हवं तसं दिलं तर माझ्या कामाला काय अर्थ? दिग्दर्शकाला जे हवं त्यापेक्षा अधिक काही तरी मी देऊ शकलो, तर माझ्या कामाला अर्थ आहे.” याच चित्रपटातलं ‘रूठ ना जाना तुम तो कहूं तो’ ह्या गाण्यात त्यांनी राजाबाई टॉवरमधल्या ते अभ्यास करत असलेल्या वाचनालयाच्या भागाचा, तिथल्या जिन्याचा सौंदर्यपूर्ण वापर केलाय.

रुठ ना जाना.. गाण्यातील एक क्षणचित्र

‘मुन्नाभाई’ मालिकेतील मुन्नाभाईची व्यक्तिरेखा ही खूप स्पष्ट आणि ठसठशीत आहे. त्यामुळे त्यातील इमारती किंवा धोबीघाटाचे सेट्स, त्यातील घरं हे सारं दादांनी ते ठळक आणि ठसठशीत निवडलं होतं. ‘लगे रहो’ मधे मात्र जे ग्रंथालय निवडलं ते काहीसं अंधारं, धूसर दिसेल असं होतं. जेव्हा जेव्हा गांधीजी अवतीर्ण होतात, त्या त्या वेळी त्यांच्या अवतीभवतीचा परिसर हा पुरातन वाटावा असा त्यांनी तयार केलेला दिसतो.

त्यांना लाल रंग अतिशय आवडे. लाल रंग हा त्याला लाभलेल्या अर्थाइतकाच चित्रकलेतील धोकादायक रंग आहे. त्याचा नीट वापर करायला हवा. तो कॅमेरामधूनही डोळ्यांना बोचू शकतो. पण दादांना त्याचा वापर खूबीनं करता यायचा. ‘हम दिल दे चुके सनम’ किंवा ‘देवदास’मधली रंगसंगती बघा. यावेळेपर्यंत ते प्रॉडक्शन डिझायनर झाले होते. बाय द वे, ते भारतातले पहिले भारतीय प्रॉडक्शन डिझायनर. त्यामुळे ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’मधल्या बारीक सारीक दृश्य भागावर त्यांचं नियंत्रण असणं आवश्यक होतं. या अंगानं पाहिलं, तर ‘हम दिल…’ मधले राजस्थानमधले भव्य राजवाडे आणि त्याला अनुरूप असे मुंबईतल्या फिल्म सिटीमधले सेट्स यांची अफलातून सांगड त्यात घातलेली दिसते. भव्य व उंचच उंच भिंती, त्यातल्या तितक्याच भव्य खिडक्या आणि त्यावर असलेले लाल पडदे, हे डोळ्यांना अजिबात खुपत नाहीत, उलट ते अधिक राजेशाही वाटतात. आज एन्.डी. स्टुडिओमधे दादांनी प्रेम रतन धन पायोसाठी जो राजवाड्याचा सेट उभा केलाय त्यातही लाल रंगाचा सुंदर वापर केलाय. हा लाल रंग अत्युच्च अशी राजेशाही भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतो. 

‘देवदास’मधे पारोच्या हवेलीसमोर देवदास मृत्यूला सामोरा जात असतो, तो प्रसंग अफाट आहे, पण त्याचं सेट डिझायनिंगही तितकंच अफाट आहे. पुन्हा एकदा भिंतींना लाल रंग. त्या आधीची एक आठवण सांगतो. देवदास करण्यापूर्वी संजय लीला भन्साली हे दादांना सोबत घेऊन पूर्वतयारी म्हणून यापूर्वीचे विविध भाषांतले ‘देवदास’ चित्रपट पाहात बसले. त्यात दोन तीन दिवस सलग सर्व देवदास बघून झाल्यावर दादांनी त्यांच्याकडे पाहिलं, आता काय? भन्साली दादांना म्हणाले, “बघितलेस ना सर्व देवदास. आपल्याला यासारखं काहीही करायचं नाहीये. आपला देवदास भव्य असेल, अतिभव्य असेल!” दोघं मित्र अनेक वर्षं एकत्र काम करत होते. दादांनी पारोची हवेली बनवायला घेतली. ती प्रचंड मोठी झाली. मग भन्साली म्हणाले, “देवदासचं कुटुंब त्यांच्यापेक्षा श्रीमंत होतं.” दादांनी त्याहीपेक्षा मोठी हवेली बनवली. ठरलेल्या बजेटपेक्षा कितीतरी अधिक पटीने ते बजेट वाढलं. पण दोघांनीही त्याची पर्वा केली नाही. आता चंद्रमुखीचा कोठा बनवणं आलं, तोही अन्य हवेल्यांना साजेसा बनला. पारोचं सासर आणखी श्रीमंत, चौथा अतिभव्य महाल उभा राहिला. या सर्व ठिकाणी दादांनी ज्या रंगसंगतीचा वापर केलाय तो लाल रंगाच्या अवतीभवती जाणाराच आहे, पण तो एकमेकांना मारक नाही. प्रत्येक हवेलीत किंवा कोठीत असणारं फर्निचर जे आहे, ते वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याची कुठेही पुनरावृत्ती होत नाही. भन्सालींनी बजेटचा हात आखडता ठेवला नाही आणि दादांनीही त्या बजेटला पूरेपूर न्याय दिला. 

(पुढे चालू…)

*****

नीतिन दत्तात्रेय आरेकर

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.