Features

मंतरलेले दिवस – ‘ किल्ला’

रत्नागिरीतल्या त्या बालपणातल्या दिवसांत दिवाळीची सुट्टी लागण्याचा कालखंड व त्यानंतर किल्ला बनवणे हा उपक्रम यांना काही विषेश महत्व आहे! एकतर आमच्या बिल्डिंगमध्ये रहाणारी सगळीच मुलं डोक्याने हुशार असल्याने फार अभ्यासाचं टेन्शन वैगरे न घेता ( त्या काळच्या मार्कांच्या तुलनेत… ) भरपूर मार्कांनी पास होत. सहामाहीचे रिझल्ट जनरली दिवाळी आधीच्या शनिवारी सकाळच्या वेळी लागत व मुलं अकराला आपापल्या घरी सुट्टी लागल्याची बातमी आनंदाने सांगत सांगत घरी दप्तरं भिरकाऊन देत, ‘ संपली शाळा…आई आता किल्ला…! ‘ एवढीच काय ती आरोळी आईच्या कानात शिरे व आईच्या डोळ्यासमोर पुढचं सारं चित्र उभं राही.

आता सर्व मुलांची कोपरा सभा बिल्डिंगच्या मागे भरे! कुणी काय काम करायचं याची वाटणी सर्वात मोठी मुलं करुन देत. माझ्यासारख्या चित्रकलेत बऱ्या मुलाकडे किल्ल्याचा आराखडा बनवायचं काम असे. इयत्ता चौथीच्या जपून ठेवलेल्या पुस्तकातले चित्र पाहून मी त्रिमित किल्ला कसा दिसेल याचं प्लॅनिंग करुन द्यायचो…मग मूळ बांधकामाला सुरवात होई. एरियातले मोठमोठे जांभे दगड जमा केले जात. दणकट मुलांकडे मोठे दगड उचलून ढकलत नियोजित किल्ला स्थानाकडे आणायची जबाबदारी असे. काही जण मुलींसमोर शक्तीप्रदर्शनाची ही संधी सोडत नसत. यात दगड हाताला लागुन कापणे रक्त येणे ही युद्घ खूणच असे! ‘म्हाराजांच्या कामामंदी रगत सांडलया! ‘ वगैरे टाईप भाव चेहऱ्यावर वागवतच तो पोरगा भाव खात घरी जाई व आईकडून हळद वैगरे लाऊन घेऊन चिंधी बांधुन परत किल्यावर हलक्या कामांस हजर होई!

जनरली लहान मुलांना व मुलींना लहान दगड, खापऱ्या , फुटकी कौलं ( रत्नागिरीत या मातीच्या गोल कौलांना नळे म्हणत) माती गोणत्यात भरुन वाहून आणायचं काम असे. काहीजण बांधाचे लावलेले दगडही उचलून आणत. नंतर त्यावरुन मोठ्यांची हमरीतुमरी होत असे तो भाग निराळा! ही हमरी तुमरी म्हणजे चक्क कित्येक वर्षांचे राहीलेले हिशोब पूर्ण करायची संधी असे! ही म्हातारी व प्रौढ माणसं गडग्याच्या तुच्छ दगडावरुन भांडताहेत व लहान मुलं मात्र एकदिलाने किल्ला बांधत आहेत असा मोठा विहंगम प्रसंग असे!

 कुणी मोठ्या दोणीत नळाचं आलेलं पाणी भरत असे तर कुणी आपापल्या घरुन जेवणाची पातेली व भांडी आणून ते पाणी किल्ल्याच्या ठिकाणावर वाहून आणत असे. मोठे दगड एकावर एक रचले जात…मग मला विचारलं जाई. कुठला काढून कुठे लावला तर शेप बरोबर येईल हे सांगायचं काम दगड रचण्याच्या कामाबरोबरच माझ्याकडे असे. मला महारांजांचा विशेष नगररचनाकार वैगरे झाल्याचा फिल येई! न जाणो कुठल्या तरी मागच्या जन्मात या आत्म्याकडून ते ही पुण्य कार्य झालं असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही!  किमान त्या वेळी तरी मला तसं वाटे हे ही खरं. त्या बनणाऱ्या किल्ल्याचा आर्किटेक्ट त्या काळी बरेचदा मी असे हे मला नीट आठवतं.

एकदा का किल्ल्याचा मुळ ढाचा तयार झाला की मग मातीची मळणी सुरु होई… आमच्या वयाच्या मानाने बऱ्यापैकी अवाढाव्य अशा त्या किल्ल्याला मातीही तितकीच लागे! खाचखळगे लहान दगडांनी वर घट्ट माती लाऊन नीट सांधले जात. मग त्यावर थोडं पाणी शिंपून आम्ही त्या पहिल्या दिवसाचं काम संपवून हातपाय धुवून घरी जायचो! लष्कराच्या भाकऱ्या बडवून घरी भाकरतुकडा मोडायला जायची ही जुनी सवय मला तेव्हापासूनच लागलेली आहे एकंदरीत!

रात्री परत उद्या काय कामं करायची याची उजळणी व्हायची मनातल्या मनात… प्रत्येकाच्या मनात एकेक निरनिराळा किल्ला तयार होत असे. पण समोर दिसणारा तो आमचा किल्ला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नीट आकार घेऊ लागे…दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी जी जाग यायची तीच मुळी कालच्या अचानक केलेल्या अंगमेहनतीने अंग भरुन आल्याची खात्री पटत… कुणीही याला अपवाद नसे! कुणाची कंबर दुखत असे तर कुणाचे हात भरुन आलेले असत. रविवारचा चित्रहार संपला तरी आमची स्वारी काही अंथरुणातून बाहेर पडायला तयार नसे! शेवटी आई म्हणायची “ तुझे आवडते पोहे व चहा तयार आहे उठ!” पोहे किंवा उप्पीट… लहानपणी हे दोनच पदार्थ नाश्त्यात सर्रास असत! इडली, डोशाची चैन नव्हतीच…पिझ्झा,  बर्गर हे तर कुणाला माहीतच नव्हते! मग अचानक आपल्याला सडकून भूक लागली आहे हे जाणवून आम्ही अंथरुण टाकून देत पळत प्रातर्विधींना पळत असू ! दात घासता घासता परत मनातल्या मनात त्या दिवशीच्या कामांची उजळणी होई… 

 त्या काळी एकच दुरदर्शन नावाचं सुरेख चॅनल लागत असे व त्यावर सुरेख कार्यक्रमांची रविवारी रेलचेल असे. हे आजच्या रिमोट हातात पकडून बराच वेळ चॅनल सर्फ करत वाया घालवणाऱ्या पिढीला सांगूनही खरं वाटणार नाही ! ते सुरेख कार्यक्रम पहात पहात चहा नाश्ता झाला की साधारण दहासाडेदहाला आमची गॅंग परत किल्ल्यावर जमत असे!

आज कामांच्या वाटणीत ‘रिफाईन टच’ आलेला असे. प्रत्येकाच्या वकुबानुसार कुणी माती मळायचं तर कुणी लिंपायचं काम हाती घेई… ! काहीजण अंघोळ करुन चांगल्या कपड्यात देखरेखीला आल्यासारखे येत. मग बाकीचे त्यांचा शेलक्या शब्दांत चांगला समाचार घेत! ती मुलं निमूट घरी जाऊन कपडे बदलून कामगार वेशात ( जुन्या भोकं वाल्या चड्डी बनियन मध्ये ) कामावर रुजू होत!

साधारण दिडला परत सगळ्यांच्या आयांचे आवाज येत. दुपारच्या जेवणाची हाक असे. आम्ही छान गरम पाण्याने आंघोळ करुन मगच जेवायला बसत असू ! मग जेवताना बाबांना किल्ल्याविषयीची इत्यंभूत माहिती सांगताना किती भारी वाटायचं! बाबाही एकदम जॅाली होते आमचे… “खेळू नकोस, अभ्यास कर किंवा चित्र काढत बसू नको” हे सल्ले त्यांनी आम्हाला कधीच दिले नाहीत. “तुमचं तुम्हाला समजतं” असं ते म्हणत! आमचं लहानपण सुंदर बनवण्यात आईबाबांचा खुपच मोठा वाटा आहे! आमच्या आजुबाजुच्या मुलांचेही आईवडिल खूपच सपोर्टिव्ह होते हे ही मला नीट आठवतं. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होती ती… कधीही कसल्या वस्तू नसण्याचं दु:ख नाही की कमीपणा उणेपणाची जाणीव नाही. जे आहे त्यात सुरेख जगायची कला त्या पिढीला साध्य झालेली होती. आयुष्यात वस्तू  व पैशांची वखवख फारच नंतर आली या देशात! आज बरेच लोक पैसा व वस्तू म्हणजेच समृद्धी व यश मानतात. अतिशय मूर्खपणाचा हा विचार लहान मुलांवरही बिंबवला जात आहे. पैसा एका मर्यादेत गरजेचा नक्की असतो पण त्याचा हव्यास माणसाचा आनंद हिरावून घेतो हे ही आपण आजुबाजुला हल्ली सतत पहातो! अति सर्वत्र वर्जयेत् हेच खरं…

माशांचं जेवण अंगावर आलेलं असे… जेऊन दुपारी मस्त ताणून  दिलं की चार साडेचारला जाग येई! मग परत चहा टाकून आम्ही पोरं पोरं किल्ल्याकडे जमत असू… हळूहळू  चर्चा सुरु होत. डिटेलिंग कसं करायचं हे ठरत असे…माती मळून ती हळूहळू आधी रचलेल्या दगडांवर लिंपून किल्ल्याचा मूळ  आकार तयार होई. मग वरच्या तटबंदीचा विचार सुरु व्हायचा… किल्ल्याच्या वर बुरुजाकडे जाण्याच्या वाटेवरच्या पायऱ्या कुठुन कुठवर सरळ येणार व कुठे वळणार, कुठे बुरुजमाची येणार वगैरे सर्वांना समजावलं जाई…बारीक सारिक कामं पूर्ण होत होत साडेसात आठ पर्यंत सारा किल्ला मातीने लिंपून तयार होत असे!

रात्री परत हातपाय धुवून डिटेलिंगच्या चर्चा झडत व आमची स्वारी घरचं जेवायला परतत असे! भरपुर कष्टानंतरची कामगारांची निद्रा सुखाची का असते हे समजायला माणसाने लहानपणी तरी किल्ला करणं अत्यावश्यक आहे! आजकाल बैठं काम करत जगणाऱ्या  माणसांना यातलं अफाट सुख नाही समजणार कदाचित पण स्वानुभवाने सांगतो… दगड मातीत उघड्या पायांनी वावरण्यात व किल्ला बनवताना वयाच्या मानाने अफाट कष्ट त्या तीनचार दिवसात घेताना आम्हाला अपार आनंद मिळत होता. ती मजा आज बेचव बर्गर चघळत, कोक पिणाऱ्या व स्विगीवर पदार्थ ॲार्डर करणाऱ्या मुलांना कधीच नाही समजणार! मी त्यासाठीच कदाचित हे लिहित आहे. एकदा तरी आपल्या लहान मुलांबरोबर किल्ला बनवा! त्यांना मित्र जमवून  किल्ला बनवायला सांगा… त्यांची मैत्रीही घट्ट होईल व बालपणही सुरेख होईल.

 नंतरच्या दिवशी त्या किल्यावर पायऱ्या, भुयार, बुरुज खालचा रस्ता कारंज्यासाठी खड्डा… असे अनेकविध कार्यक्रम धडाक्यात सुरु होत. त्यात लहान मुलं व मुली माती आणून ती मळणे व दादा लोकांना ती घमेल्यात घालून  देण्याचे काम करत. मोठी मुलं त्या मातीचे रस्ते बुरुज वगैरे आकार बनवत. बुरुजाला शक्यतो मातीचे भाजलेले नळे कुणाच्यातरी पडक्या घरावरुन गुपचुप उतरवून आणलेले असत. मधली आडवी भिंत शक्यतो पेढ्यांच्या पुठ्ठ्याच्या बॅाक्समध्ये माती लिंपून ती वाळवुन तयार होत असे. कारंज्याला प्लास्टिक शीटस्, व सलाईनच्या नळीसाठी कुणाच्यातरी सरकारी इस्पितळात नर्स असलेल्या मामींचे पाय पकडावे लागत. मग ते महत्वाचं साहित्य आमच्यापर्यंत येई. वर कुठेतरी झाडावर टांगलेल्या पत्र्याच्या डालड्याच्या डब्यातुन ती नळी जमिनीतून लपवून कारंज्याच्या खड्ड्यात आणलेली असे. वर पॅालिथिन बॅगचा थर असे ज्याने ते पाणी जमिनीत न मुरता बाहेर काढता येई. खूप डोकं लावायचं काम होतं ते त्या दिवसांतील आमच्या स्किल व अकलेच्या मानाने! पण त्या डिटेलिंगला आपण स्वत:ची बुद्धी प्रूव्ह केल्याची झिंग असे. 

बाबा जेव्हा पूर्ण होत आलेला किल्ला पहायला येत तेव्हा ते साजरं रुप पाहून खूश होत. मग त्यांना लाडीगोडी लाऊन काही पैसे घेऊन चुना पुड्या व खडू तसेच लाल रंगाची काव व मोहरी यांची तजवीज आम्ही करत असू! हीच काय ती तेव्हाची आमची खेळण्याची साधनं होती. आयुष्य सुंदर होतं ते त्या काळच्या स्वत:कडून असलेल्या या लहान लहान अपेक्षांमध्ये! आपल्याला सुरेख किल्ला बनवता आला याचं कौतुक मोठ्यांनी करावं व स्वतःहून बक्षिस म्हणून पैसे काढून द्यावेत यातच आम्हाला अमाप आनंद होत असे!

एकदा का मोहरी पेरली की मग वर गडद लाल रंगाच्या कावेने तो संपूर्ण किल्ला शिंपला जाई… ती सुकल्यावर चुन्याच्या पांढऱ्या  रंगाने ब्रशने तटांवर व बुरुजांवर उभ्या आडव्या अल्टरनेट रेषांचं डिझाईन करुन तटांवर ब्रिकवर्कचं काम असल्याचा फिल आणणारं डिटेलिंग सुरु होई! यात मला फार आनंद मिळत असे. काहीदा इतरही मुलं यात मदत करत पण शक्यतो मी हा पार्ट एकटा करणं पसंत करे. एकतर यात कलाकारी लागत असे व ते माझं अतिशय प्रिय असं काम होतं. रस्त्यांवर आडवे पट्टे ओढुन डिव्हायडर बनवणं हे ही असंच एक आवडतं काम. याने हळूहळू किल्ल्याला तो पूर्णत्वाचा फिल येत असे. लहान झुडुपं व बांधावर उगवलेली हिरवळ ( मॅास) खरवडून काढून आणून  ती किल्ल्याच्या काही भागांवर लावणे हे ही असेच एक स्किलफुल काम! अशा  प्रकारे सर्वांगाने तो किल्ला नटत असे.

यानंतरचा भाग म्हणजे किल्ल्यावर उभे करायचे मावळे व प्राणी. रस्त्यांवरचे दिवे व इतर वस्तुंची सजावट. यात आम्ही प्लास्टिकची खेळणी शक्यतो न वापरता चित्र काढून रंगवुन ती पुठ्ठ्यांवर चिकटवून नंतर मागे नारळाच्या पात्यांचे हिर किंवा जाड काठ्या लाऊन ते किल्ल्यावर मातीत खुपसून उभे करत असू. त्याने जास्त रियलिस्टिक फिल येत असे आणि पैसे वाचत हा भाग निराळा. त्या काळी आईबाबांकडुन अखंड वीस रुपये घेऊन त्यात किल्ल्याला लागणाऱ्या वस्तू आणणे व त्यात भागवणे हा एक मोठा टास्कही होता. जास्त मागितले असते तर मिळाले नसते असं नाही पण पुरवून वापरणे ही कला त्याच रत्नागिरीतल्या दिवसांत शिकलो. आजही तेच साथ देतं…उधळ माधळ रक्तातच आली नाही कारण ते बालपणीचे दिवसच तसे होते. किल्ला बनवणं हा नुसता खेळ किंवा कलेचं प्रदर्शन बनून न रहाता तो सांघिक कृतीचा भाग बनत असे. एकमेकांच्या सहयोगाने एखादं टास्क कसं पूर्ण करावं याची ती कला ही एक सुरवात होती. टिम वर्कचा तो एक आदर्श वस्तूपाठच होता.

आम्ही दर वर्षी किल्ल्यासमोर एक वैज्ञानिक देखावाही करत असू! म्हणजे अवकाशात भारताने उपग्रह सोडला त्या दिवसांत आम्ही भारताचं अवकाश यान असलेलं रॅाकेट बेस स्टेशनवरुन उड्डाण करत अवकाशात झेप घेत आहे असा देखावा किल्ल्यासमोर केलेला…पुलंच्या ‘पानवाल्या’ त लिहिल्यासारखी स्थल काल विचार यांच्या पलिकडली ती कला होती. म्हणजे असं बघा… शिवाजी महाराजांचा तो ऐतिहासिक किल्ला त्यावर जुन्या काळचे मावळे, घोडे, माणसं व हत्ती, वाघांसारखे प्राणी, समोर आधुनिक रस्ते त्यावर आधुनिक मोटारी, समोर अवकाशात सोडला जाणारा उपग्रह असा तो अजब देखावा बनत असे! अहाहा… काय वर्णावे महाराजा! 

दिवाळीत आमचा किल्ला पहायला आजुबाजुच्या मोठ्यांना खास आमंत्रण असे. खूप कुठून कुठून आमच्या किल्ल्याची माहीती समजून लोकं तो पहायला येत व त्यासाठी बक्षिस म्हणून पैसे देत. आमचा तो ‘ किल्ला फंड’ होता. त्यात आम्ही तोवर झालेले खर्च भागवत असू. खूप कौतुकही होई. मी पुढे कलाकार बनायचं ठरवण्यात त्या कौतुकाचाही खूप मोठा वाटा होताच!

बरं… हे सर्व वाचल्यावर जर आपल्यालाही मुलांबरोबर किल्ला करायची उर्मी आली तर यंदा जरुर करा. यंदाची दिवाळी उत्तम गोष्टींनी साजरी करा…त्यात सुख समाधान तर आहेच पण परत लहानपण जगून पाहिल्याची भावनाही येईल. माणूस दोनदा ‘जगतो’ असं मला वाटतं! एकदा जेव्हा तो खरंच लहान असतो तेव्हा… व नंतर तो ते लहानपण मोठेपणी परत जगून पहातो तेव्हा! आनंद दिल्याने वाढतो म्हणून मी आज हे माझे लहानपणचे स्वच्छंद दिवस लिहिले. यात मला पुन:स्मरणाचा आनंद तर मिळालाच शिवाय एक प्रकारचं देणं दिल्याचं समाधानही लाभलं.

आपण किती व कुठे धावत सुटलो आहेत याचं भान बाळगणं गरजेचं असतं. ‘हाव’ ही त्या धावेमागचं खरं कारण असतं! हाव कधीच सरत नाही. सतत धावण्यापेक्षा कधीतरी संथ आयुष्याची सुरेख लय शोधावी. कधीतरी शांत बसून ते जीवन परत आठवावं यातच खरी मजा आहे. जगणं ही एक कला आहे. पैशात ही कला कधीच मोजली जात नाही. 

मित्रहो… परत एकदा नक्की ‘जगून’ पहाच! ही दीपावली आपल्या सर्वांना मंगलमय ठरो हीच सदिच्छा!

– संजय सुरेश कुलकर्णी

******

सर्व फोटो इंटरनेटवरून साभार.

मंतरलेले दिवस या लेखाचा पहिला भाग वाचा.

‘मंतरलेले दिवस!’

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.