Features

जेजेतला ‘न्यूड’ क्लास आणि शिक्षकच बेपत्ता…

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चा कारभार त्यावर इतकी चहूकडून टीका होत असताना देखील सुधारताना काही दिसत नाही. उलट आणखीन आणखीन बिघडत जातानाच दिसतो आहे. अगदी आजचंच उदाहरण घ्या. आज फाईन आर्ट विभागाच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूड मॉडेल बसवण्यात आलं आहे. पहिल्यांदाच त्या विद्यार्थ्यांना न्यूडवर काम करता येणार आहे.

मॉडेलही चांगलं नेहमीच्यातलं नाहीय. नेहमीच्यातलं म्हणजे पन्नाशी साठी उलटलेल्या वृद्ध स्त्रियांपैकी नव्हे तर तिशी पस्तिशीची तरुणी या विद्यार्थ्यांना मॉडेल म्हणून लाभली आहे. आणि ते मॉडेल देखील नेहमीच्या मॉडेलपेक्षा वेगळं आहे कदाचित ती तरुणी अभारतीय असावी. म्हणजे अशा मॉडेल्सच्या स्किनचा अभ्यास करायला अतिशय अवघड. त्यातली तरलता समजवायला कुणीतरी चांगला अनुभवी शिक्षक शिकवायला पाहिजे. म्हणजे त्यातून विद्यार्थ्यांना खूप काही शिकता येऊ शकतं.

पण गंमत म्हणजे आज दिवसभरात या वर्गाला शिकवणारे दोन्हीही शिक्षक गायब आहेत. वर्ग शिक्षक शशिकांत काकडे गेले अनेक दिवस वारंवार रजा घेतात अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. जी गोष्ट काकडे सरांची तीच गोष्ट विजय सकपाळ सरांची. ते देखील आज गायब आहेत. तेही असेच वारंवार रजा घेतात अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. खरं तर असं पहिल्यांदाच न्यूड मॉडेल बसलं असेल तर शिक्षकांनी आवर्जून त्या वर्गात उपस्थित राहणं आवश्यक आहे. पण हे दोन्हीही शिक्षक अत्यंत बेजाबदारपणे आज रजेवर राहिले आहेत.

खरं तर न्यूड बसलं असताना त्याचं चित्रं रेखाटणं हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय अवघड काम असतं. कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी स्त्री मॉडेल असं नग्नावस्थेत समोर बसलेलं असतं. त्या मॉडेलची नजर चुकवत, इतकंच नाही तर आजूबाजूच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना एकमेकांची नजर चुकवत आठवडाभर अभ्यास करायचा असतो. संपूर्ण वर्ग बाहेरुन बंद केलेला असतो. येजा देखील करता येत नाही.

अशा वेळी तिथं जबाबदार वर्गशिक्षक राहणं अत्यंत आवश्यक असतं. कारण कोणत्याही अप्रिय घटना तिथे घडू शकतात. ‘चिन्ह’च्या ‘नग्नता’ विशेष अंकात चित्रकार सुहास बहुळकर यांनी न्यूड क्लास मध्ये काय काय घडू शकतं याची एकाहून एक भन्नाट उदाहरणं दिली आहेत. पण जेजेमध्ये वाचन संस्कृतीच अस्तित्वात नसल्यामुळं वाचतंय कोण ? आणि कशाला ? साहजिकच वर्गशिक्षक अनुपस्थित राहिले तर त्यात नवल नाही. पण दोन्हीच्या दोन्ही शिक्षकांनी इतका महत्वाचा अभ्यासाचा भाग चालू असताना गैरहजर राहणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पण त्याचं गांभीर्य दाखवून द्यायला निदान अधिष्ठात्यानं तरी कॉलजमध्ये उपस्थित राहायला पाहिजे. पण आज दिवसभर अधिष्ठाता विश्वनाथ साबळे हे देखील गायब आहेत. अधिष्ठात्यानी निदान ज्येष्ठ शिक्षकाकडे चार्ज देऊन रजेवर जायला पाहिजे पण तो देखील दिला गेलेला नाही असे कळते आहे. बरं या संदर्भात कोणी दाद मागायची ठरवली आणि कॅम्पसमध्ये असलेल्या कला संचालकांच्या कार्यालयात दाद मागायची ठरवली तर कला संचालक राजीव मिश्रा हे देखील आज अनुपस्थित आहेत. त्यांनी तरी निदान इतक्या महत्वाच्या जागेवर काम करत असताना कुणाकडे तरी चार्ज देऊन जावं तर त्यांनीही कुणाकडे चार्ज दिलेला नाही असे देखील कळते आहे. कोरोना कालखंडात बहुदा चार्ज देण्याचा नियम निकालात काढला असावा अशी चर्चा जेजे परिसरात चालली असल्याचे देखील कळते आहे. खरं तर राजीव मिश्रा आणि विश्वनाथ साबळे हे परस्पर विरोधी गटातले ओळखले जातात असे असताना ते चौघेच्या चौघे कुठल्या बरं अशा महत्वाच्या कामात गुंतले आहेत अशी चर्चा आज जेजे कॅम्पसमध्ये दिवसभर चालली होती.

या घटनेचे आणखीनही काही पैलू आहेत. ज्यांच्या विषयी ‘चिन्ह’च्या ‘न्यूड’च्या अंकात चित्रकार सुहास बहुळकर यांनी अतिशय संवेदनशीलपणे लिहिलं होतं. कुणाच्या ध्यानीमनीही येणार नाहीत अशा गोष्टी तिथं घडत असतात. उदाहरणार्थ न्यूड मॉडेल समोर पाहिल्यावर असंख्य मुली अस्वस्थ होतात. कधी कधी तर भोवळ येऊन देखील पडतात. प्रख्यात अभिनेत्री हेमांगी कवी ही जेजेचीच विद्यार्थिनी. ‘चिन्ह’तर्फे लवकरच प्रसिद्ध होऊ घातलेल्या ‘जेजे जगी जगले’ या ग्रंथात हेमांगीनं आपल्या जेजेत शिकतांनाच्या रम्य आठवणी ‘चिन्ह’ला सांगितल्या आहेत. त्यात ती म्हणते..
‘वीणा नावाची आमच्या वर्गात एक मुलगी होती, ती मात्र न्यूडच्या वर्गात पहिल्या दिवशी चक्कर येऊन पडली होती. तिला ते सहनच झालं नाही की एक बाई अंगावरचे कपडे असं सगळ्यांसमोर उतरवते आहे. पुढचे आठ दिवस ती कॉलेजातही आली नाही. आम्हाला हे फ़ारच शॉकिंग झालं. तिच्या घरच्यांनी सांगीतलं की आमच्या मुलीला आवडत नाही तर आम्ही नाही तिला असं काही शिकायला येऊ देणार, हे फ़ारच थोर होतं. पण मग मला वाटतं शिक्षकांनी तिच्या घरच्यांना समजावलं असावं कारण ती पुन्हा यायला लागली कॉलेजात.’ 

यावरून न्यूड क्लासचं, तिथल्या वातावरणाचं महत्व कुठल्याही संवेदनशील माणसाच्या लक्षात येऊ शकतं. पण ते जेजेतल्या शिक्षकांच्या लक्षात येऊ नये ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. या सर्व घटनेतली एक भयंकर गोष्ट म्हणजे जे मॉडेल वर्गावर बसवलं गेलं आहे ते म्हणे बॅंगलोरहून इकडं येतं. त्यामुळे त्या मॉडेलची येण्याजाण्याची आणि राहण्याची व्यवस्था कॉलेजला करावी लागते. इतकंच नाही तर तिला चांगलं मानधन देखील द्यावं लागतं. एरवी जेजेत स्थानिक मॉडेल जेव्हा न्यूड म्हणून बसतात तेव्हा त्यांना दिवसभराचे १२०० रुपये इतकं मानधन दिलं जातं. पण या बँगलोरच्या मॉडेलला देण्यासाठी मात्र शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गणी काढायला लावतात. आणि ती वर्गणी देखील थोडी थोडकी नसते तर  प्रत्येक विद्यार्थ्यांमागे १००० रुपये गोळा केले जातात. म्हणजे वर्गात ५० विद्यार्थी असतील तर ५०,००० झाले हे पैसे देखील, केंद्र सरकारचे रोख रकमे संदर्भातले आदेश झुगारून जेजेतल्या ‘नेहमीच्या प्रथेप्रमाणं’ रोखीनं जमा केले जातात. या संदर्भात एका विद्यार्थ्यानं अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला जेजेतले मास्तर आम्हाला सांगत होते की ‘डिनोव्हो’ आल्यावर म्हणे तुमची फी वाढणार, तुमचे सगळेच खर्च वाढणार, मग हे काय चाललंय ? डिनोव्होच्या आधी ही विद्यार्थ्यांची ही लुबाडणूक कशासाठी ? तीनशे रनिंग फुटांचं गटार बांधायला यांच्याकडे दीड कोटी खर्च करायला आहेत. आणि मॉडेलसाठी मात्र आम्ही वर्गणी काढायची ? त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अतिशय रास्त आहे, असं नाही का वाटत तुम्हाला ?

बाय द वे, ते शिक्षक आणि अधिकारी आज  कुठे गेले होते ठाऊक आहे ? ते आज नाही उद्या सांगणार आहोत. अवश्य वाचा.

– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.