Features

‘नग्नता’ म्युझियम एक्स्पोमधली की मनातली ?

२०१२ मध्ये ‘चिन्ह’चा ‘नग्नता विशेषांक’ प्रकाशित झाला त्याला आता १० वर्ष होऊन गेली. दर चार वर्षाला पिढी बदलते असं म्हणतात. त्यानुसार दहा वर्षाचा काळ खूप मोठा झाला. असं असलं तरी समाज आजही नग्नतेबद्दल दांभिक आहे असंच दिसून येतं. असं म्हणतात समाज जसा असतो राज्यकर्तेही त्या समाजाचा आरसा असतो. त्याप्रमाणे आपला समाज दांभिक आहे त्यामुळे नेतेही तसेच असणार ना ?

‘नग्नता’ हा विषय ‘चिन्ह’च्या व्यासपीठावर चर्चेत आणण्याला निमित्त आहे दिल्लीच्या म्युझियम एक्स्पोचं. खरं तर विद्यमान सरकारला आपल्या इतिहास आणि संस्कृती याबद्दल भलतंच प्रेम आहे. हे भलतंच यासाठी की सुरुवातीला हे सगळं खूप चांगलं सुरु होतं पण नंतर नंतर याची दिशा अशी काही भरकटत गेली की सध्या सुरु असलेल्या एक्स्पोचं पार हसं झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो (IME) 2023 चे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी एक्स्पोच्या शुभंकराचे अनावरणही केलं. नवा शुभंकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या लोगोपासून प्रेरित आहे जो सिंधू सरस्वती सभ्यतेतील ‘डान्सिंग गर्ल’ नावाचा कांस्य पुतळा आहे. इंटरनॅशनल म्युझियम एक्स्पोचा शुभंकर हा चेन्नापट्टणम कला शैलीतील लाकडापासून बनवलेल्या डान्सिंग गर्लची समकालीन आवृत्ती आहे.

कुठल्याही इव्हेंटसाठी शुभंकर म्हणजे मॅस्कॉट तयार करण्याची प्रथा फार जुनी आहे. पण हा जो प्रस्तुत मॅस्कॉट आहे तो आपल्या संस्कृतीप्रेमाच्या दिशेविषयी भयंकर काही सुचवू पाहतो आहे. मुळात इतिहास आणि संस्कृतीप्रेमाची दिशाच भरकटली आहे हे यातून स्पष्ट दिसते. मोहोंजोदारो येथील मूळ ‘डान्सिंग गर्ल’ आणि ही मॅस्कॉट म्हणून तयार केलेली डान्सिंग गर्ल यातील फरक बरंच काही आडून आडून सुचवतोय. विचारी, विवेकी लोकांना हे बदल खटकल्यावाचून राहणार नाहीत. आणि यात तुम्हाला काही खटकलं नसेल तर आपली कला संस्कृती भयंकराच्या दारात आहे हे निश्चित आहे असं समजावं.

हा मॅस्कॉट बघून मला काही प्रश्न पडले ते इथे मी क्रमवार मांडत आहे. हे प्रश्न कला, इतिहास आणि संस्कृती यांची चाहती म्हणून मी मांडत आहे,

१. मूळ मोहोंजोदारोची डान्सिंग गर्ल ही नग्न असताना तिला हे असे कपडे चढवून सरकारला नेमकं काय झाकायचं आहे ? भारतातली अगणित मंदिरं, ऐतिहासिक वारसा स्थळावरची हजारो शिल्पं नग्न आणि कुठलीही झाकपाक नसलेली असताना या मॅस्कॉटला ‘समकालीन रूप’ असं गोंडस नाव देऊन हे विकृत स्वरूप का देण्यात आलं ? की हळूहळू देशभर विखुरलेल्या अगणित शिल्पांना कपडे चढवण्याचा सरकारचा मानस आहे ? जिथं तिथं भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणारं सरकार नग्नतेला अश्लील मानण्याच्या व्हिक्टोरियन मानसिकतेला मुख्य प्रवाहात कधी पासून स्थान द्यायला लागलं?

२. मोहोंजोदारोची ही डान्सिंग गर्ल फेअर अँड लव्हली क्रीम वापरल्यासारखी का दिसू लागली आहे ? समकालीन रूप या गोंडस नावाखाली तिचा बदललेला त्वचा रंग काय सुचवू पाहत आहे ? भारतातल्या असंख्य स्त्रिया सावळेपणाच्या न्यूनगंडापायी त्रस्त असताना डान्सिंग गर्लचं हे समकालीन शुभंकर रूप फेअर अँड लव्हलीचं ब्रँड एम्बॅसेडर का बनलं आहे? एकवेळ सरकारी बाबूचं समजू शकतो पण हे मॅस्कॉट तयार करणारा कलाकार पण रंगांचं प्रतीकात्मक आणि भौगोलिक महत्व न समजण्याइतका अज्ञानी आहे का?

३. मूळ डान्सिंग गर्ल ही जेमतेम सव्वा चार इंच उंचीमध्ये घडवलेली आहे. तिची भौतिक उंची जरी कमी असली तरी ४००० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती तात्विकदृष्टया केवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचली होती त्याचं ते एक मागं उरलेलं उदाहरणच आहे. ताठ, ऐटीत एक हात कमरेवर ठेऊन हनुवटी काहीशी उंचावून जगाकडे बघणारी ही अनावृत्त ललना स्त्रीचं त्या काळातील पुढारलेलं रूप आणि समाजातील निर्भय स्थान दर्शवते. असं असताना आजची ही शुभंकर रूपातील ६ फुटी (त्यापेक्षा उंचीने जास्तच) समकालीन डान्सिंग गर्ल अशी आत्मविश्वास हरवलेली का आहे ? की आपलाच आपल्या खऱ्या आणि भव्य संस्कृतीवरचा विश्वास हरवला आहे ? हल्ली इतिहास पुनर्लेखनाची जी लाट आली आहे त्यानुसार आता ऐतिहासिक कलाकृतीही नव्या बिभत्स रूपात प्रदर्शित केल्या जाणार आहेत का ?

४. भारताचा गौरवशाली इतिहास, आक्रमकांना इथल्या स्थानिक नेत्यांनी, जनतेनी दिलेला कडवा प्रतिकार, इथली संस्कृती जपण्यासाठी केलेले प्रयत्न नव्यानं मांडण्यासाठी सरकार अगदी क्रमिक पाठ्यपुस्तकातही बदल करत आहे. पण जेव्हा विषय संस्कृतीचा येतो तेव्हा स्त्रीनं कायम झाकलेलं राहावं पर्यायानं पुरुषसत्ताक समाजाच्या नियमांच्या अधीन राहावं यासाठी असे भ्रष्ट शुभंकर तयार करण्याची योजना जाणीवपूर्वक तयार करण्यात येत आहे का ?

Artwork by Ponnappa

हे सगळे प्रश्न हा मॅस्कॉट बघून मला पडले. शेवटी असाच निष्कर्ष मी काढेन की स्त्री ही आदिम काळातच स्वतंत्र होती, काळ जसा पुढे गेला तसं तंत्रज्ञान आधुनिक झालं पण समाजाची मानसिकता मात्र मध्ययुगीन गोंधळातून बाहेर पडायला जाणीवपूर्वक तयार नाही.

(सर्व छायाचित्रे इंटरनेटच्या सौजन्याने. )

******

– कनक वाईकर,
चिन्ह आर्ट न्यूज

मोहोंजोदारो गर्ल आणि नवीन मॅस्कॉट यावर इंटरनेटवरही प्रचंड वादावादी सुरु आहे. ‘द वायर’ या पोर्टलवर हा विषय मांडणाऱ्या लेखाची लिंक.

https://thewire.in/the-arts/mohenjodaro-dancing-girl-museum-mascot

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.