Features

नग्नता : बदलतोय तर समाज (भाग ३)

पॅरिसच्या लुव्रमधील सगळ्यात  न्याय्य गोष्ट म्हणजे नग्न पुतळे फक्त स्त्रियांचे नाहीत तर पुरूषांचेही आहेत. आपल्याकडे नग्न म्हटलं की फक्त स्त्रियाच चितारतात वा बनवतात. मात्र इथे हा संकेत झुगारून सुंदर पुरूषांच्या शरीरांचा  वेध घेतला आहे.  हे एवढं सुंदर काम करणारे सगळे  शिल्पकार पुरूष आहेत. त्यात एकही बाई नाही. म्हणजे असं म्हणता आलं असतं की पुरूषांना बायकांतलं सौंदर्य  दिसतं तसं बायकांना पुरूषांतलं  दिसतं.  इथे मात्र सगळे पुरूषच शिल्पकार आहेत आणि त्यांना सगळ्याच  देहातील सौंदर्य लक्षात आलंय. सगळंच कौतुकास्पद !! इथे  जमलेले मुख्यत्वे  शौकीन होते, आंबटशौकीन नाहीत. खरं तर नग्नता ही इतर कुठे दिसत नाही अशी परिस्थिती नाही.  किंवा त्यात काही अगदी कौतुकाने बघण्यासारखं असतं, असा विचारही नाही.  नग्नतेचं भांडवल करावं असंही काही नाही. 

जेव्हा पॅरीसला जाऊ तेव्हा काय काय करायचं याची माझी यादी मनातल्या मनात तर केव्हापासूनच तयार होती. त्यात दोनच गोष्टी महत्त्वाच्या  होत्या. एक मोनालिसा आणि दुसरं आयफेल टॉवर.  त्यातलं आयफेल टॉवर हे एका प्रदर्शनाच्या  (युनिवर्सल एक्झिबिशन)  निमित्ताने 1889 मधे बनवलेलं आणि मोनालिसा आकारास आली 1503 मधे . आयफेल टॉवर हे गुस्ताव आयफेल याची निर्मिती आणि मोनालिसा लिओनार्डो द व्हिन्सीची. दोन्ही अशा काळात बनवलेलं जेव्हा विचारांचं स्वातंत्र्य होतं. कला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य होतं. जगातल्या अनेक कौतुकास्पद कलाकृती जगप्रसिद्ध  लुव्र संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.  खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कलाकृतींचा संग्रह केलेला आहे.   तिथे जायला मिळणं हे  माझ्यासाठी मोठं भाग्य होतं.  मला पेंटींगमधे जास्त रस असल्याने, प्रथम मी मोनालिसाला भेटायचं ठरवलं. जरा गर्दीच होती. कितीतरी लोकं या संग्रहालयाला भेट देण्यासाठी सा-या जगातून येत असतात. मी पॅरीसला गेले  तेव्हा सप्टेंबरचा शेवटचा आठवडा होता त्यामुळे मला गर्दी वाटली तरी  आत जाण्यासाठी तिकीट लगेच मिळालं.  आलेले  लोक दोन विभागाना जास्त भेट देत असतात – एक  पेंटिंग विभाग आणि दुसरा शिल्प विभाग. 

गंमतीची गोष्ट म्हणजे कितीही नग्न माणसांची चित्र असली तरी माणसं आधी मोनालिसा बघायला  धावतात  आणि तिथे बराच वेळ घालवतात. बरेच फोटो घेतात आणि  त्यानंतर मग इतर चित्र बघायला जातात. तिच्यासाठी एक अख्खी भिंत  दिलेली होती.  तिच्या बरोब्बर समोरच्या भिंतीवर मात्र बरीच चित्र होती.  खरं तर मला सगळीच चित्रं  आवडत होती. सगळ्या चित्रकारांनी ती कष्ट करून काढलेली होती  आणि ती त्या संग्रहालयात होती याचाच अर्थ त्यांना  मोठं मूल्य ही  होतंच. माझ्या लक्षात आलं की काही लोकं चित्रांचं अगदी बारकाईने निरीक्षण करत होती. आपापल्या दृष्टीकोनातून त्यांनी पाहिलेलं जग त्यांनी रंगवलं होतं. ते सगळं छानच होतं की. फक्त रंगाच्या फरांट्यांबरोबर  त्यांची नजरही शोधण्याचा प्रयत्न केला की झालं.  तरी कुणीही नग्न चित्रांसमोर जास्त वेळ थांबत नव्हतं. जे थांबत होते त्यांना आकर्षण होतं  त्यातल्या रंगांचं, शरीराच्या सौंदर्याचं, चेह-यावरील हावभावांचं, चित्रातील उजेड आणि अंधार यांच्या खेळाचं  आणि ते चितारणा-या चित्रकाराच्या कुंचल्याचं.  दर्दी  प्रेक्षकांना आकर्षण  होतं  ते रंगाच्या  नयनरम्य खेळाचं.  त्यांच्या  लाघवी नृत्याचं. 

व्हिनस दि मिलो

 शिल्प विभाग हा देखील तितकाच आकर्षक आहे. कितीतरी शिल्प आहेत इथे.  त्यातही प्रसिध्द शिल्पांसमोर सर्वात जास्त गर्दी दिसते. जिथे जिथे शिल्पाला वस्त्रे दाखवली आहेत तिथे त्याचं इतकं तपशीलवार दर्शन घडतं की तेही कौतुकास्पद आहे.  व्हीनस द मिलो, समोथ्रेस , डायना ऑफ वर्साय, स्पार्ताकस, मरणारा गुलाम अशी अनेक अत्यंत सुंदर शिल्पं इथे आहेत.  डेविडच्या  शिल्पासमोर  एक लहान मुलगा वर नजर करायला तयार  नव्हता आणि त्याचे बहुधा पालक  त्याला तिकडे बघण्यासाठी त्याला समजावत होते.  गंमत म्हणजे तो नक्क्की  भारतीय असावा असं मला वाटलं आणि तसंच होतं ते कारण त्यांची भाषा. शिवाय सुरूवातीला  त्यातली आई सुध्दा जराशी नजर चुकवत पाहात होती. चित्र आणि शिल्प यात फरक आहे. चित्रात  ती व्यक्ती  एका  कॅनव्हासवर रंगवलेली आहे व त्यातून आपण कल्पना करायची आहे.  आणि शिल्प बघताना मात्र  कल्पना करायची गरजच नाहीये  कारण  व्यक्ती आपल्यासमोर ठाकलेली आहे.  अगदी  तिच्या योग्य त्या मोजमापासह ! तरीही चित्रांप्रमाणेच शिल्प बघतानाही नग्न शिल्प आहे म्हणून कुणी त्यासमोर जास्त वेळ रेंगाळतंय  असं लक्षात आलं नाही. बघताना मनात येतं ते हे की बनवणा-याने किती हुबेहुब छबी बनवली आहे.  यात जीव असता तर हे जिवंतच आहे. कसं जमलं असेल ? हा दगड फोडून हे शिल्प बनवताना शिल्पकाराने ही मोजमापं अगदी बरोब्बर कशी जमवली असतील ? एखादाही दगड फुकट गेला नसेल ? किती एकाग्रता असेल त्याची ? किती दिवस / महिने लागले असतील ? त्याचं मॉडेल एक चित्ताने व तेही नग्न कसं बसलं असेल इतका वेळ ? त्यावेळच्या समाजाला हे  मान्य होतं म्हणायचं. नाही तर इतकी शिल्प कशी निर्माण झाली असती ? इतकी  चित्र कशी बनली असती ? कितीतरी प्रश्न येतात मनात. 

डाईंग स्लेव्ह

बहुतेकशा  पुतळ्यांचे केस कुरळे आहेत – बाई असो वा पुरूष. आणि मला सगळ्यात न्याय्य वाटलेली गोष्ट म्हणजे नग्न पुतळे फक्त स्त्रियांचे नाहीत तर पुरूषांचेही आहेत. आपल्याकडे नग्न म्हटलं की फक्त स्त्रियाच चितारतात वा बनवतात. हा मला कायम अन्याय वाटलाय. मात्र इथे हा संकेत झुगारून सुंदर पुरूषांच्या शरीरांचा  वेध घेतलेला दिसतो. मला ते शिल्पकारांचं कौतुक वाटतं ज्यांच्या हे लक्षात आलं.  आणि त्यातही हे सगळे शिल्पकार पुरूष आहेत. त्यात एकही बाई माझ्या लक्षात आलेली नाही. म्हणजे असं म्हणता आलं असतं की पुरूषांना बायकांतलं सौंदर्य  दिसतं तसं बायकांना पुरूषांतलं  दिसतं.  इथे मात्र सगळे पुरूषच शिल्पकार आहेत आणि त्यांना सगळ्याच  देहातील सौदर्य लक्षात आलंय. सगळंच कौतुकास्पद !! इथे  जमलेले मुख्यत्वे  शौकीन होते, आंबटशौकीन नाहीत. खरं तर नग्नता ही इतर कुठे दिसत नाही अशी परिस्थिती नाही.  किंवा त्यात काही अगदी कौतुकाने बघण्यासारखं असतं, असा विचारही नाही.  नग्नतेचं भांडवल करावं असंही काही नाही.  म्हणून तर रोममधे गेल्यावर रस्त्यांवर सुध्दा अनेक नग्न शिल्प दिसतात.  फक्त रोममधेच नाही तर इतरही अनेक देशात दिसतात आणि ती रोजच्या जगण्याचा भाग झालेली असतात. म्हणून तर झेक रिपब्लीक  मधील चेस्की क्रुमोलाव या जुन्या शहराच्या बाहेत पडताना एका लहान मुलाचं नग्न दगडी शिल्प तेही त्याच्या लहान सोनेरी अवयवासह पाहताना देखील त्याचं कौतुक वाटलं. कुणी फारसं लक्ष दिलंही नाही त्याच्याकडे.  शेवटी सगळीकडे दिसणा-या नग्न शिल्पांकडे कोण बघणार रोज? 

ते सगळं आपल्या वा आपल्यासारख्या संस्कृतीच्या देशातील लोकांच्या  लक्षात येतं असं मला वाटलं. त्यामुळेच आमच्या घराजवळच  ‘न्यूड  फूड  कॅफे’  अशी एका रेस्टॉरंटच्या नावाची पाटी पाहिली, तेव्हा जरा आश्चर्य वाटलं . एवढच नव्हे तर काही दिवसातच अनेक माणसं तिथे जाता येताना दिसली तेव्हा बरं वाटलं. वाटलं ‘बदलतोय  तर समाज’ !! 

समाप्त. 

******

– मंगल गोगटे
लेखिका या अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांची अनेक एकल प्रदर्शने झाली आहेत.
मंगल गोगटे यांच्या वेबसाईटची लिंक: http://www.mangalgogte.com/index.html

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.