Features

ओळख ‘गायतोंडे’ या नावाची!

चिन्हतर्फे २ नोव्हेंबर २०२३ ते २ नोव्हेंबर २०२४ हे संपूर्ण वर्ष गायतोंडे जन्मशताब्दी वर्षम्हणून साजरं केलं जाणार आहे. चिन्हचा एकूणच आवाका छोटा असल्यामुळं या जन्मशताब्दी वर्षात एखादं मोठं प्रदर्शन किंवा एखादी मोठी स्पर्धा अथवा एखादा मोठा इव्हेंट अशा पद्धतीनं काहीही साजरं होण्याची कुठलीच शक्यता नाही. पण चिन्हच्या गायतोंडेया बहुचर्चित ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती मात्र याच जन्मशताब्दी वर्षात चिन्हप्रकाशित करणार आहे. हा इंग्रजी ग्रंथ जगभरातल्या सर्वच देशात उपलब्ध करून दिला जाणार आहे. याखेरीज चिन्हच्या वेबसाईटवर दर आठवड्याला गायतोंडे यांच्या संदर्भात काहीना काही वाचनीय मजकूर आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याचाच हा दुसरा भाग.

———-

सत्तरच्या दशकातली गोष्ट. नुकताच मी एसएससी झालो होतो आणि जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला होता. जे जे स्कूल ऑफ आर्टची इमारत तेव्हा अगदी चित्रातल्यासारखी वाटत असे. आता त्या परिसराची पार रया गेली आहे. पण तेव्हा मात्र त्या परिसराविषयी भयंकर अभिमान मनात दाटून यायचा की आपण या विलक्षण अशा सुंदर वास्तूत शिकतो वगैरे.

प्रत्यक्ष वास्तूत प्रवेश केल्यावर मात्र एका कुठल्यातरी अद्भुत दुनियेत प्रवेश करतोय की काय असे विचार मनाला चाटून जात असत. इतकं ते मंत्रमुग्ध करणारं वातावरण असे. रावबहादूर म्हात्रे यांचं ‘मंदिराकडे’ हे शिल्प तेव्हादेखील येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करायचं. त्या शिल्पात अशी जादू जमून आली आहे की आजही इतक्या वर्षांनंतरदेखील ते शिल्प येणाऱ्याजाणाऱ्यांना अक्षरशः खिळवून ठेवतं.

आणि मग हळूहळू भिंतीवरील पेंटिंग्ज नजरेस पडायची. कॅमेऱ्यात जो आऊट ऑफ फोकस वगैरे जो प्रकार असतो तसाच काहीसा तो अनुभव असायचा. भिंतीवरचं एक एक पेंटिंग नजरेसमोर अलगद उलगडत जायचं. जेजेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांची ती चित्रं होती. त्या काळात जेजेच्या भिंतींवर ती सर्व क्रमवार लावून ठेवलेली असायची. ती चित्रंच विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जायची. ती पाहिली रे पाहिली की आपण असंच काही तरी भन्नाट काम करायला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असायचं.

कोण नव्हतं त्या चित्रांमध्ये? जेजेमध्ये शिकलेले आणि नंतर नावारूपाला आलेल्या साऱ्याच चित्रकारांच्या कलाकृती त्यात होत्या. जेजेत प्रवेश केल्याकेल्या ‘मंदिराकडे’ शिल्प पाहिल्यानंतर नजर थेट वळायची ती सॉलोमन साहेबांच्या पोर्ट्रेटकडे. भोसुले मास्तरांचं ते पोर्ट्रेट होतं. तैलरंगांची सारीच्या सारी गुणवैशिष्ट्ये भोसुले मास्तरांनी त्या पोर्ट्रेटमध्ये एकवटली होती. आज इतक्या वर्षांनंतरदेखील ते चित्र जणू काही कालपरवाच काढलं आहे इतकं ताजं आणि टवटवीत दिसतं. त्यांच्या शेजारी होतं पळशीकर सरांचं पोर्ट्रेट. त्याच्याच शेजारी बाबुराव सडवेलकर सरांचं पोर्ट्रेट. मध्येच रझा यांचं पेंटिंग. त्यांच्या शेजारी मोहन सामंत. तिथंच कुठंतरी बहुदा दोन बाय दोन आकाराचं एक छोटंसं पेंटिंग मी जेजेत प्रवेश घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून माझं लक्ष वेधून घेत असे.

हळूहळू त्या सर्व चित्रांबरोबर संवाद होऊ लागला. हळूहळू कुणी ही चित्रं काढली आहेत याविषयी मला उत्सुकता वाटू लागली. आता मी धडाधड चित्रकारांची नावं सांगतो पण तेव्हा मात्र मी अगदी अनभिज्ञ होतो. एके दिवशी मात्र मला वाटू लागलं की ही चित्रं कुणी काढली आहेत हे आपण समजून घ्यायलाच पाहिजे आहे. मग मी सुरुवात केली ती मला आवडणाऱ्या छोट्या चौकोनी पेंटिंगपासूनच. जवळ जाऊन ते चित्र पाहिलं तर त्यावर सही होती ‘गायतोंडे’ अशी. ‘गायतोंडे’ या नावाशी माझी जानपेहचान झाली ती अशी. आणि नंतर मग येताजाता ते चित्र पाहण्याचा नादच लागला म्हणा ना.

ते चित्र का कुणास ठाऊक मला अतिशय आवडून गेलं होतं. आपण आता जी काही पेंटिंग करू ती  अशीच भन्नाट असायला हवी असं मला मनोमन वाटू लागलं. चित्राच्या खाली असलेल्या गायतोंडे यांच्या त्या देवनागरीमधल्या किंवा मराठीतल्या त्या चित्रावरच्या सहीचादेखील माझ्यावर इतका प्रभाव पडला की मीदेखील माझी सही तशाच पद्धतीनं करू लागलो. चित्रांवरदेखील आणि प्रत्यक्ष व्यवहारातदेखील. मी मराठीत सही करतो याचं अनेकांना कुतूहल वाटतं. पण त्याची सुरुवात झाली ती ही अशी.

गायतोंडे यांच्याविषयी कसं जाणून घ्यायचं हा माझ्यापुढं मोठा प्रश्न होता. शिक्षकांशी काही फारसा संवाद होत नसे. कारण तो सारा संक्रमणावस्थेचा काळ होता. बरेच जुने शिक्षक नोकऱ्या सोडून गेले होते. नवीन आले होते त्यांच्याविषयी फारशी माहिती नव्हतीच. त्यामुळे माझी ही अडचण माझी मीच सोडवली. वाचनाचा अफाट नाद होता. त्यामुळे जेजेच्या लायब्ररीत जाऊन मी ललित कला अकादमीचे अंक चाळत अथवा वाचत असे. त्या काळात अकादमीचे अंक अतिशय सुरेख पद्धतीनं काढले जात त्यात मला गायतोंडे यांच्यावरचा एक लेख मिळाला. बहुदा करुणाकर किंवा रिचर्ड बार्थोलोमी यांचा तो लेख असावा. आणि त्या लेखासोबत गायतोंडे यांची काही पेंटिंग्जदेखील छापली होती. हीच ‘वासुदेव संतू गायतोंडे’ या चित्रकाराची आणि माझी पहिली ओळख. आज तब्बल ४८-४९ वर्ष झाली त्या सगळ्या प्रसंगांना. ‘गायतोंडे’ नामक चित्रकाराविषयीचं आकर्षण उत्तरोत्तर वाढतच गेलं. त्यांच्यावर काढलेल्या ‘चिन्ह’च्या तीन अंकांमुळे किंवा ‘गायतोंडे’ या ग्रंथामुळे ‘Gaitonde’ असा शब्द तुम्ही नुसता गुगल केलात तरी गायतोंडे यांच्यावरील लेख आणि चित्रांच्या इमेजेस सोबत माझीही माहिती आणि माझंही काम आपोआप गुगलवर दिसू लागतं. हे चूक आहे की बरोबर हे काही मला आता सांगता येणार नाही. पण या साऱ्या मागचा घटनाक्रम मात्र पुढील संपूर्ण वर्षभर कथन करायचा मी निश्चय केला आहे हे नक्की.

 

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.