Features

जे जे जगी जगले तया माझे म्हणा करुणा करा… 

जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेला २००८ साली १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी दैनिक लोकसत्तामध्ये आठवडाभर एक लेखमाला लिहिली होती. या लेखमालेमध्ये सरकारच्या अनावस्थेमुळे जागतिक दर्जा प्राप्त जे जे स्कूल ऑफ आर्टची जी काही अवस्था झाली ती चित्रित करण्याचा प्रयत्न केला होता. हेतू हा होता की १५० वर्षानंतर तरी जे जे स्कूल ऑफ आर्टकडे सरकारचं लक्ष जावं आणि तिथलं व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टीनं काही कारवाई केली जावी. 

आज १४ वर्ष झाली या लेखमालेला… दुर्दैवानं कोणताही गुणात्मक फरक जेजेत झाल्याचं दृष्टीस पडत नाही किंबहुना काही बाबतीत परिस्थिती आणखीन आणखीन गंभीर झालेली दिसत आहे. एकाच गोष्टीचं समाधान आहे की जे जे स्कूल ऑफ आर्ट अजूनही त्याच ठिकाणी आहे. हा वृत्तपत्रांनी दिलेल्या प्रसिद्धीचा परिणाम आहे का आणखीन काही, हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं. आम्ही काही याचं श्रेय घेऊ इच्छित नाही. किंबहुना श्रेय वगैरे घेण्यासाठी ते लिहिलंच नव्हतं. ही जागतिक कीर्तीची संस्था वाचावी एवढीच त्यामागची भावना होती. लोकसत्तेकडून या लेखमालेचं मानधन देखील घेणं आम्ही नाकारलं होतं. यावरून जे जे स्कूल ऑफ आर्टविषयीच्या आमच्या भावना लक्षात याव्यात. 

आज १४ वर्षानंतर जे लिखाण आम्ही आजवर केलं ते पुन्हा एकदा प्रसिद्ध करावंसं वाटू लागलं आहे. कारण जेजेची ही सारी दुरावस्था डी-नोव्हो दर्जा मिळाल्यामुळं सुधारण्याची वेळ आली असतानाच नेमका जेजेशी (बहुतांशी) दुरान्वयानं देखील संबंध नसलेल्या पण कला क्षेत्रातल्याच लोकांकडून जेजेचं राज्यस्तरीय कला विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी पुढं आली आहे. खरं तर १९६५ साली महाराष्ट्र शासनाकडून कला संचालनालय स्थापन झालं ते चित्रकलेचा प्रसार व्हावा, कलावंतांना एक मोठं व्यासपीठ उभं राहावं यासाठीच. १९८५ सालापर्यंत सारं काही ठीक चाललं होतं, पण बाबुराव सडवेलकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण भारतात एकमेव असलेल्या या विभागाची अवनती होत गेली. तोपर्यंत भ्रष्टाचारापासून दूर असलेलं हे एकमेव खातं १९८५-८६ सालानंतर मात्र भ्रष्टाचारातच रुतून बसलं. त्याच्या सर्व कहाण्या वृत्तपत्रात वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच आम्ही आता वरचेवर प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे कदाचित जेजेला डी-नोव्हो का मिळावं ? का आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहोत ? या प्रश्नांची उत्तरं मिळावीत. आज आम्ही दि. १ मार्च २००८ रोजी लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला लेख पुन्हा प्रकाशित करीत आहोत. वाचा आणि तुमचं तुम्हीच ठरवा ! 

जे. जे. स्कूल ऑफ आर्टची स्थापना १८५७ साली झाली. त्या घटनेला नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापनाही त्याच वर्षी झाली. मुंबई विद्यापीठाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळा केंद्र सरकार आणि अन्य स्रोतांकडून मिळालेल्या ३५० कोटी रुपयांच्या निधीमधून संपूर्ण वर्षभर मोठ्या दणक्यात साजरा झाला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वाट्याला केंद्र सरकारच काय, पण राज्य सरकारकडूनसुद्धा फुटकी कवडीही मिळाली नाही. जेजेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळा शेवटच्या दिवशी जे. जे. स्कूलमध्ये साजरा होतोय, तोही जे. जे आर्ट आणि जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशन यासारख्या संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच. महाराष्ट्र शासनाकडून संपूर्णत: उपेक्षित राहिलेल्या, १९८५ सालापासून ना-लायक व्यक्तींच्या नेमणुकांनी संपूर्ण पोखरल्या गेलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आजच्या भयावह अवस्थेचा समाचार घेतलाय याच संस्थेचे माजी विद्यार्थी आणि चित्रकार सतीश नाईक यांनी.
(दै. लोकसत्तेने दिलेला इंट्रो )

वाटा, वाटा हत्तीवरून साखर वाटा…
घोड्यावरून पेढे वाटा…
बैलावरून बत्तासे वाटा…
आनंदोत्सव साजरा करा
तंत्रशिक्षण खात्याला अखेर जाग आली म्हणून जल्लोष करा…
जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या दीडशेव्या वर्षांच्या शेवटच्या दिवसाला का होईना तंत्रशिक्षण खात्याला करावसं वाटलं म्हणून अगदी गुढ्या तोरणं उभारा…

१८५७ साली जे. जे. स्कूलची स्थापना झाली. त्याच वर्षी मुंबई विद्यापीठाचीही स्थापना झाली. मुंबई विद्यापीठाचं दीडशेवं वर्ष केंद्राकडून मिळालेल्या ३५० कोटी रुपयांच्या वर्षावात मोठ्या झोकात साजरं झालं. त्याला अगदी राष्ट्रपतीसुद्धा आले आणि जे जे स्कूलचं दीडशेवं वर्ष मात्र जेजेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून साजरं केलं, तर त्याला तंत्रशिक्षणमंत्री जाऊद्यात त्यांच्या खात्यातला एखादा डेस्क ऑफिसर सुद्धा नाही फिरकला. मुंबई विद्यापीठाच्या दीडशेव्या वर्षी मुंबई विद्यापीठाचा इतिहास सांगणारं, त्या वास्तूतील सौंदर्यस्थळं छायाचित्रांद्वारे उलगडून दाखवणारं एक प्रचंड आकाराचं जाडजूड, कॉफी टेबल पुस्तक निघालं (किंमत रु. २०००/-) आणि ज्या वास्तूने भारतात कलाप्रसाराचं अजोड कार्य केलं, जिने एकट्याने आज लिलावात विक्रीचे नवे नवे उच्चांक गाठणाऱ्या भारतीय चित्रकारांच्या पिढ्याच्या पिढ्या घडविल्या. ती वास्तू मात्र आपल्या दीडशेव्या वर्षी अंधारात तोंड खुपसून कुढत राहिली आहे.

पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना याची जरासुद्धा लाज का वाटू नये ? एके काळी यशाच्या सुवर्ण शिखरावर असलेल्या संस्थेची कलेविषयी असलेल्या उदासीनतेमुळे महाराष्ट्र शासनाने काय दशा करून टाकली आहे, हे पाहावयाचं असेल तर आजपासून येत्या १० मार्चपर्यंत जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये भरलेल्या जे जे स्कूलच्या गेल्या दीडशे वर्षांतल्या माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला प्रत्येक महाराष्ट्रीय सुजाण नागरिकाने आवर्जून भेट द्यायला हवी. जेजेमध्ये एके काळी कलाशिक्षणाचं कार्य कसं चालायचं ? आणि १९८५ सालापासून सातत्याने चुकीच्या माणसाच्या नेमणुका करून महाराष्ट्र शासनाने त्या वैभवाचं कसं वैराण वाळवंट करून टाकलं आहे. हे सारे कुणालाही तेथे एकाच दृष्टिक्षेपात पाहावयास मिळेल. जिथल्या शिक्षण- संस्काराने आबालाल रहिमान, पिठावाला, धुरंधर, सातवळेकर, त्रिंदाद, हळदणकर, चुड़ेकर, तासकर, चिमुलकर, विनायक मसोजी, भोसुले,. देऊसकर, चावडा, हेब्बर, पळशीकर, सडवेलकर, रझा, सूझा, गायतोंडे, धोंड़, सोलेगावकर, गोंधळेकर, लक्ष्मण पै, मोहन सामंत, अंबादास, भास्कर कुळकर्णी, पानसरे, करमरकर, म्हात्रे, तालीम, बी. प्रभा, एम. एस. जोशी, अंबूताई धुरंधर, सोनावडेकर, बरवे, कोलते यांच्यासारखे भारतीय चित्रकलेच्या इतिहासात ज्यांचं कर्तृत्व मोठ्या गौरवानं नोंदवलं गेलं आहे असे चित्रकार घडवले त्या साऱ्यांच्या अगदी ऐन विशीतल्या विद्यार्थिदशेतल्या कलाकृती तिथल्या भिंतीभिंतीवर आपणास पाहावयास मिळतील. उद्या काय होईल याची काहीच शाश्वती नाही. आजच्या राज्यकर्त्यांची ही उदासीनता अशीच राहिली तर हे सारं वैभव. आणखी काही वर्षांनी नष्ट झालेलं असेल. आज १५० व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी का होईना (लाज़े-काजेस्तव) समारंभ होतोय. १९८५ सालापासून ज्या प्रकारच्या नेमणुका या कलासंस्थेवर लादल्या गेल्या त्या पाहता १७५ वं किंवा २०० वं वर्ष साजरं करायला ही संस्था जिवंत तरी राहील का, याविषयी मनात शंका आहे. किंबहुना तोपर्यंत ही संस्था आणि ही जेजे नामक संस्कृती तग धरून राहील का याची काहीच खात्री नाहीये, इतकी या संस्थेची संबंधितांनी वाताहत केली आहे. म्हणूनच शेवटची म्हणून का होईना या संस्थेला भेट द्या. जसं नौदल सप्ताहात युद्धनौकेवर थेट कुठेही जाता येतं तसं या १० दिवसांत जेजे नामक संस्कृती आतून – बाहेरून कुठेही जाऊन थेट पाहता येईल.

वेळोवेळी झालेल्या टिकेमुळे म्हणा किंवा उपरती झाल्यामुळे म्हणा तंत्रशिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कलासंचालनालयाच्या प्रभारी कलासंचालकपदी डॉ. रवींद्र बाळापुरे यांची आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी विजय महाजन यांची निवड केली आहे. त्यांचं त्यांच्या क्षेत्रातलं आजवरचं कर्तृत्व पाहता त्यांच्या नियुक्तीचं स्वागतच करावयास हवं. पण आजवर उभे राहिलेले झारीतले शुक्राचार्य त्यांना धडपणे काम करून देणार आहेत काय? या शुक्राचार्यांना साथ मिळत्येय ती मंत्रालयातल्या तंत्रशिक्षण खात्यातल्या काही अधिकाऱ्यांची आणि तिथल्याच अत्यंत कनिष्ट पातळीवरच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांची त्यांचा बंदोबस्त कोण करणार? संबंधित मंत्री असलेल्या वळसे-पाटील यांना जेजे आणि कलासंचालनालयात चांगलं काही घडवायची (मनापासून) इच्छा असेल तर या अधिकाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याचे काम प्रथम करावे लागेल.

ताजा कलम : महाराष्ट्रातल्या सुमारे २५० कलामहाविद्यालयातले चित्रकलेचे विद्यार्थी कधी नव्हे ते लपून छपून वृत्तपत्र वाचताना अथवा अस्मादिकांच्या लेखांच्या झेरॉक्स – वाचताना दिसू लागल्याच्या बातम्या आल्या आहेत. चित्रकलेचे विद्यार्थी असूनही अचानकपणे हे वृत्तपत्रे कसे काय वाचू लागले ? आणि ते वाचतात तरी काय याविषयी सर्वच्या सर्व कलामहाविद्यालयांच्या शिक्षकांच्या मनात किंवा शिक्षक कम् प्राचार्यांच्या मनातही कुतूहल जागृत झाले अन् तेही (मुलांकडूनच उसने घेऊन) वाचू लागले आहेत. (आपली मुलं वाचू लागली म्हणून संबंधित विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांत तसेच त्यांना शिक्षकांच्या किंवा शिक्षण कम् प्राचार्यांच्या माता-पित्यांत हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.) सर्व शिक्षण साक्षरता प्रसाराच्या कार्यात आम्ही दिलेल्या या अल्प-स्वल्प योगदानाची सेवा शासन रुजू करून घेईल काय ? काहीच नाही. तर निदान विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या पदी तरी आमची नियुक्ती करील काय ?

गायतोंडे यांचं भलं- थोरलं चित्र त्यांनी करवतीने कराकरा कापलं ! कोणी, केव्हा कुठे, कसे ? त्याची चित्त-चक्षुचमत्कारिक चित्तरकथा वाचा उद्याच्या मुंबई वृत्तांतमध्ये.

१५०वं वर्ष साजरं झालं तेव्हा जेजेत एक सोहळा झाला, या सोहळ्याचे व्हिडीयोज ज्यात प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते ( जे जेजेचेच माजी विद्यार्थी आहेत आणि तिथंच त्यांनी सुमारे वीस एक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवलं देखील ) यांचं संपूर्ण भाषण आहे. त्याची लिंक पुढे देत आहोत. क्लिक करा आणि चित्रकार प्रभाकर कोलते यांनी हे शालजोडीतले हाणले आहेत त्याचा आस्वाद घ्या !
[wdo_ult_video wdo_video_url=”https://www.youtube.com/watch?v=ttsjhYb4KoU&t=1s”]

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.