Features

जेजेतल्या विद्यार्थी मित्रांसाठी…

‘कलावेध’ बद्दल जी लेखमाला ‘चिन्ह’च्या वेबसाइटवर प्रकाशित होत आहे. तीच जशीच्या तशी आम्ही फेसबुकवर देखील प्रसारित करीत आहोत. त्याचप्रमाणे  इंस्टाग्रामवर देखील बायोमध्ये त्याच्या लिंक देत आहोत. जेणेकरुन जास्तीत जास्त कला विद्यार्थी तसेच रसिक आणि जागृत वाचकांपर्यन्त देखील ती पोहोचावी. या साऱ्या मागे हा एकच उद्देश आहे की, या संदर्भात जनजागृती व्हावी, सरकारवर दबाव यावा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न जे गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्यांचा निचरा व्हावा, त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे. 

पण इंस्टाग्रामवर सदर पोस्ट प्रकाशित होताच जेजेच्या एका विद्यार्थिनीने (आपण टेक्सटाईल डिझाइनर (?) असल्याचे तिने म्हटले आहे .आता ती शिकते आहे तर डिझाइनर कधी झाली कुणास ठाऊक ? ) पुढं तिनं ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चं देखील नाव दिलं आहे. म्हणजे बहुदा ती ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ची विद्यार्थिनी असावी.असो. आपल्या नावापुढे तिनं काय लिहावं, काय नाही हा तिचा प्रश्न आहे. तरीपण मग मी हे का लिहितो आहे तर ते अशासाठी की,सदर विद्यार्थिनीनं ‘चिन्ह’वर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याकडे आम्ही सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण नंतर तिनं चक्क शिव्या द्यावयास सुरुवात केली. तिच्या शिव्या इंग्रजीत असल्या तरी शिव्या त्या शिव्याच.
 हल्ली अशा प्रकारे जाहीरपणे शिव्या कोण देतं ? एक तर समाजातल्या अगदी खालच्या स्तरातल्या व्यक्ती किंवा दुसरे राजकारणी अथवा एखाद्या पक्षाशी संबंधित नेते वा कार्यकर्ते ( त्यांचं दर्शन आपल्याला रोजच अगदी आपल्या दिवाणखान्यात वृत्त वाहिन्यांमधून होतंच असतं. ) आणि या मुलीच्या इंस्टाग्रामवरच्या पोस्ट पाहिल्या तर ती वर उल्लेखलेल्या पहिल्या स्तरातली काही वाटत नाही. मग बहुदा दुसरं कारण असावं का ? म्हणजे राजकारणी घर वगैरे तर तशीही माहिती तिच्या अकाउंटवर नाही. बरं जेजेमध्ये कुणाला विचारावं तर जेजेमध्ये आता परिचयाचे कुणी राहिलेलेच नाहीत. माझ्या परिचयातील जेजेतला शेवटचा मालुसरा म्हणजे माझा जेजेतला वर्गमित्र चित्रकार अनिल नाईक. तो सुमारे सात आठ वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाला. त्यामुळं हे सारं विचारायचं कुणाला ? म्हणून आपला अंदाज बांधला. असो.
प्रथम ती मुलगी लहान असल्यामुळं तिच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष केलं, पण आता ती मुलगी लिहू देखील लागली आहे आणि कंमेंट्स देखील पास करु लागली आहे. तिच्या बरोबर आणखीन काही मुलं यात उतरली आहेत. त्यांच्या या कमेंट्सचे नमुने सोबत देत आहोत. म्हणजे आम्ही उत्तर द्यायला का प्रवृत्त झालो ते कळून येईल.
कमेंट्स :
: Artist skills Nasnar kadachit mhnun reporting madhe Ale pn tyat pn ghar ghuti. Nigale skills..!!! Keep going (kadhitri savta ya. Ani photos click Kara chori karaychi band Kara )😂😂😂
: Hello sir, Is it genuine! Art news portal or special news reporting team for specificcollege? #missinformationartnewsportal?
 : Chalu dya tumchi non creativity
: Who are you to us?? Why should we give shitt to you?? There are our official head authority to whom we are answerable. So you coward ……!!!stop pointing and mind your own work.
: Stop talking shit you man. If u real don’t know wht is reality of our student and there perspective to the competition .. and do find  any new job if possible stop talking rubbish.
: Best use of “prashna chinha ?” kuthehi lava kahihi liha 😂🙌
: Hey should we ask (THE TIME’ OF INDIA) for any kind of recruitment for you !! 😂
काय बोलायचं यावर. पण तिचं आणि तिच्या अन्य वर्ग मित्रांचं वय आणि त्यांचा एकूण वकूब पाहून आम्ही त्यांना माफ करतो. म्हणूनच त्यांची नावं इथं दिलेली नाहीत.
त्या मुलीनं किंवा तिच्या वर्ग मित्रांनी फक्त एवढंच करावं, आपलं सामान्यज्ञान थोडं वाढवावं. मात्र त्या साठी त्यांना थोडं वाचन करावं लागेल. अगदी सोपी गोष्ट आहे सर्व प्रथम त्यांनी SATISH NAIK तसेच CHINHA ही दोन नावं गुगल करावीत. अगदी भरपूर शेकडो पर्याय उपलब्ध होतील. त्यातली फक्त वैयक्तिक माहिती वाचली तरी खूप गोष्टींचा उलगडा होईल. गुगलवर खूपच माहिती उपलब्ध असल्यामुळं वाचायला त्रास होत असल्यास इंग्रजी वा मराठी विकिपीडिया किंवा थिंक महाराष्ट्र सारख्या वेबसाईट वाचल्या तरी चालतील. फेसबुकवर तर २००८ सालापासून ‘चिन्ह’चं अकाउंट आहेच. तेही वाचायला हरकत नाही. ते वाचल्या नंतर ‘चिन्ह’चे जुने अंक वाचायची उत्सुकता झाली तर दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संदर्भ विभागात जाऊन ‘चिन्ह’चे १९८६ पासूनचे अंक पाहावेत. (PLEASE NOTE ). ( अंक चित्रकलेचे असले तरी ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या लायब्ररीत ते उपलब्ध नसल्यामुळं तिथं मुळीच जाऊ नये.) किमानपक्षी २००८ सालचा कालाबाजार अंक अवश्य वाचावा त्यातून ‘चिन्ह’ने नक्की जेजे आणि चित्रकलेसाठी काय केलं आहे त्याची माहिती तुम्हाला होऊ शकेल. हा अंक अवश्य वाचा, कारण यात १९८५ साला नंतर जेजेचं व्यवस्थापन पद्धतशीरपणे काही नीच मनोवृत्तीच्या माणसांनी कसं कोसळत आणलं त्याचं नावानिशीवार चित्रण केलं आहे. चुकीच्या उमेदवारांच्या नेमणुका कशा भ्रष्टाचाराने केल्या ज्याचा सर्वात जास्त त्रास तुमच्या पिढीला भोगावं लागतो आहे ते आम्ही स्पष्टपणे नावानिशी दाखवून दिलं आहे.
टेक्सटाईल डिझाइनर म्हणवणारी ही मुलगी जेजेच्या ज्या वर्गात शिकते आहे त्याच्या शेजारच्या वर्गात बसून ७० च्या दशकात मी इंटेरियर डेकोरेशनचं शिक्षण घेतलं आहे. ते घेत असताना तिथल्या शिक्षकानं दिलेल्या अन्यायकारक वर्तणुकीबाबत आमच्याच वर्गानं ७० च्या दशकातला पहिला संप केला होता. नंतर फिल्म डिव्हिजनचा आर्ट डिरेक्टर झालेल्या विजय पुपाला यानं त्या संपाचं नेतृत्व केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या संपाच्या बाजूने एक प्रचंड मोठी लेखमाला मार्मिकच्या चार पाच अंकात प्रसिद्ध केली होती. त्या शिक्षकांचं नाव आता मी घेणार नाही, कारण अलीकडेच त्यांचं निधन झालं. आणि या संपानंतर बाळासाहेब ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आले आणि ‘स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘अप्लाइड आर्ट’च्या संपाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. हे सारं लिहीत बसलो तर खूप मोठा लेख होईल म्हणून इथंच थांबतो.
ज्या कॉलेजमध्ये आयुष्यातली साडेसात वर्ष काढली त्या कॉलेजचं प्रचंड मोठं ऋण माझ्यावर आहे असं मी समजतो आणि म्हणून १९८२ पासून ‘लोकसत्ता’मध्ये कॉलेजच्या संदर्भात बातम्या द्यायला सुरुवात केली. बाई गं तू आता मला सांगते आहेस ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये जा म्हणून, पण तुझ्या सारखाच पेंटिंगच्या ऍडव्हान्स मध्ये शिकत असताना मी थेट इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूह जॉईन केला. (दोन वर्षाच्या इंटेरियर नंतर मी चार वर्षाचा फाईन आर्टचा कोर्स केला ) तो देखील मी नोकरी मागायला गेलो नव्हतो. त्यांनी मला बोलावून घेतलं होतं.
 कॉलेजमधून बाहेर पडल्या नंतर माझ्या चित्रांना लागोपाठ दोन वर्ष राज्य पुरस्कार मिळाले होते. तेव्हा तू आणि तुझ्या मित्रांनी जी काही मुक्ताफळं उधळली आहेत ती तुमची तुम्हालाच लखलाभ होवोत. मला तू खूप तरुण समजते आहेस त्याबद्दल तुझे आणि तुझ्या मित्रांचे मनापासून आभार. पण मी ६८ वर्षाचा आहे. आणि माझ्या अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या आहेत. मला कसले तुम्ही सल्ले देताय ‘पेप्रात जा म्हणून’ ? हल्ली वृत्तपत्र व्यवसायाचं स्वरुप बदललं आहे. पेड न्यूजला महत्व आलं आहे. कले विषयीच्या बातम्या कुणीही प्रसिद्ध करत नाहीत म्हणूनच मला ६५ व्या वर्षी लाखो रुपये खर्च करुन ‘चिन्ह आर्ट न्यूज’ काढावं आणि चालवावं लागतं आहे. आम्ही दिलेल्या जेजेच्या बातम्यांमुळेच तुम्ही मुलं सुखानं शिकताय एवढं लक्षात ठेवा. अन्यथा जेजे, कला संचालनालय आणि तंत्र शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सारं विकून खाल्लं असतं. हे लक्षात ठेवा. या संदर्भात आम्ही जे डोंगराएवढं काम करुन ठेवलं आहे ते जाणून घ्या. माझी खात्री आहे नंतर मग आम्हाला असले फोकनाड सल्ले देण्याची तुमची हिंमत होणार नाही.
जाताजाता शेवटचंच. २०१० च्या दशकात ‘चिन्ह’नं पुढाकार घेतला नसता आणि बातम्या छापून आणल्या नसत्या तर आज तुम्हाला नाक मुठीत धरुन देवनारच्या डम्पिंग ग्राउंड शेजारी असलेल्या खाटीकखान्या जवळच्या जागेत शिकायला जावं लागलं असतं. तुम्ही ज्या जागेत शिकत आहात त्या जागेवर टॉवर बांधायची आणि जेजेची मूळ इमारत विकायची तयारी झाली होती. डीन बंगलो तर हातातून जवळ जवळ गेलाच होता. ‘चिन्ह’नं बातम्यांची मोहीम उघडली आणि तेव्हाच्या राज्यकर्त्याना सळो की पळो करुन सोडलं ही वस्तुस्थिती आहे. मी या साऱ्याचं  श्रेय घेत नाही. सर्व मोठ्या वृत्तपत्रांच्या संपादकांच्या सहकार्यामुळं हे होऊ शकलं. हे नम्रपणे नमूद करु इच्छितो .
कृपया या साऱ्याची माहिती करुन घ्या. किमानपक्षी ‘चिन्ह’चा काळाबाजार अंक तरी वाचा. अंक उपलब्ध नसतील तर मला कळवा. ज्यांना ज्यांना अंक हवा आहे त्या सर्वांसाठीच मी १०० प्रती विनामूल्य देईन त्यासाठी कुणालाही माझ्या घरी पाठवा. माझं हे जे काही एक हाती आंदोलन चाललं आहे त्याच्या मागे अनेक अज्ञात कला शिक्षक आणि चित्रकार आहेत, मी एकटा नाही हे कृपया लक्षात घ्या. आणि हे जे काही चाललं आहे ते ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ सारखी मातृसंस्था वाचवण्यासाठीच चाललं आहे हे कधीही विसरु नका. तुम्ही उद्या पदवी मिळाली का निघून जाल. कॉलेजकडे फिरकणार देखील नाहीत. पण आम्ही गेली चाळीस वर्ष एखाद्या नागासारखं फणा काढून कॉलेजवर लक्ष ठेऊन आहोत. त्याचं मोल लक्षात ठेवा.
*****
– सतीश नाईक 
संपादक चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.