Features

जिगरबाज दानिश !

दानिश सिद्दीकी या प्रेस फोटोग्राफरचा मृत्यू गेल्या वर्षी अफगाणिस्तानात झाला. तालिबान्यांनी तो घडवून आणला. यंदाचं पुलित्झर अवॉर्ड दानिशलाच जाहीर झालं, पण ते स्वीकारण्यासाठी मात्र तो या जगात नव्हता. त्याच्याच आठवणी जागवल्या आहेत मुंबईतले आणखीन एक प्रेस फोटोग्राफर घनःश्याम भडेकर यांनी.

मुंबईत आमच्या बरोबरीनं वृत्तछायाचित्रकाराचं काम करणारा दानिश सिद्दीकी हा ३८ वर्षीय तरुण अफगाणिस्तानच्या हिंसाग्रस्त कंधार भागात झालेल्या रक्तरंजित संघर्षात तालिबानी सैनिकांकडून मारला गेला या वृत्ताने सर्वांना धक्काच बसला.

दानिश हा रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचा मुंबईतील मुख्य छायाचित्रकार होता. तो मुंबईत स्थायिक झाला होता. भारतातील रॉयटर्स पिक्चर्सच्या मल्टिमीडिया टिमचा तो प्रमुख होता.

रोहिंग्या निर्वासितांवरच्या संकटाच्या वृत्तांकनासाठी केलेल्या फिचर फोटोग्राफी श्रेणीत २०१८ साली त्याला छायाचित्रणातील सर्वोकृष्ठ पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.
दानिशनं दिल्लीमध्ये अर्थशास्त्र विषयाची पदवी घेतली होती. २००७ साली जनसंपर्क विषयात त्यानं पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यानं पत्रकारितेला सुरुवात केली ती एका वृत्तवाहिनीवर प्रतिनिधी म्हणून. नंतर तो फोटो जर्नालिस्ट झाला. २०१० साली त्यानं रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली. दानिश अफगाणिस्तान सैन्यासोबत पाकिस्तान सीमेलगत बोल्डक भागात अफगाण – तालिबान संघर्षाचे वार्तांकन आणि छायाचित्रण करण्यासाठी गेला होता. सध्या हा भाग तालिबानच्या ताब्यात आहे.

अफगाण सैन्य आणि दानिश एका कस्टम पोस्टपासून काही अंतरावर होते. अफगाण सैन्य दोन तुकड्यामध्ये विभागले गेले. या दरम्यान अफगाणी सैन्यातले काही कमांडर आणि सैनिक दानिश  याच्यापासून वेगळे झाले. त्याचवेळी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात दानिश ठार झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी शेजारच्या मशिदीमध्ये नेण्यात आले. हे जेव्हा तालिबान्यांना समजलं तेव्हा त्यांनी मशिदीवरही हल्ला केला. काही जण असंही सांगतात की तालिबान्यांनी जेव्हा दानिशला  पकडलं तेव्हा तो जिवंत होता. त्याची चौकशी करण्यात आली. ओळख पटल्यानंतर आधी डोक्यावर वार केले मग गोळ्यांनी शरीराची चाळण केली.

त्यानंतर तालिबाननं एक निवेदन प्रसिध्द करुन दानिशच्या मृत्यूला आपण जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. तालिबानचा प्रवक्ता म्हणतो की भारतीय पत्रकाराच्या मृत्यूबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आहोत. या भागात रिपोर्टिंगसाठी येणाऱ्या कुणाही पत्रकारांनी आम्हाला पूर्वसूचना द्यावी म्हणजे आम्ही त्यांची काळजी घेऊ.

अफगाणिस्तानच्या विशेष पथकासोबत सुमारे आठवडाभर दानिश हा कंदहार प्रांतात होता. तेथून तो संघर्षाचे फोटो आणि बातम्या पाठवत होता. यापूर्वीही त्याच्यावर हवाई हल्ला झाला होता त्यात तो थोडक्यात बचावला होता.

दानिशला फोटोग्राफीची खूप आवड होती. मोहरम सणाच्या दिवशी तो रजा घेऊन मोहरम कव्हर करण्यासाठी अमरोहाला  गेला होता. तेथे त्याची भेट रॉयटर्सच्या मुख्य फोटोग्राफरशी झाली. दानिशचे फोटो पाहून त्याला नोकरीची ऑफर देण्यात आली. त्यानं दिल्लीतील हिंसाचार, शेतकरी आंदोलन, कोरोना बाधित रुग्णांचे झालेले हाल इत्यादी महत्वाच्या घटना कॅमेरात  कैद केल्या.

कोरोना काळात काढलेल्या छायाचित्रासाठी दानिशला दुसऱ्यांदा पुलित्झर पुरस्कार घोषित करण्यात आला, पण तो स्विकारण्यास तो या जगात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. दानिशनं काढलेल्या छायाचित्रातून कोरोना काळात रुग्णालयात काय अवस्था होती याची दाहक कल्पना येते.

दानिशचे वडील प्राध्यापक अख्तर सिद्धीकी आणि आई शाहीदा यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात तालिबान विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भारताचे सरन्यायाधीश  एन. व्ही. रमन यांनी शोध आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील कार्याबद्दल दानिश याला मरणोत्तर रेड इंक ‘जर्नालिस्ट ऑफ दि इयर’ हा पुरस्कार दिला. त्याची पत्नी फ्रेडरिक सिद्दिकी यांनी तो स्वीकारला.

घनःश्याम भडेकर
वृत्तपत्र छायाचित्रकार

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.