Features

महाराष्ट्राची व्यक्तिचित्रण परंपरा

पुण्यातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सुदर्शन कला दालनाने पुण्यात महाराष्ट्राच्या व्यक्तिचित्रण कला परंपरेचं दर्शन घडवणार एक अभिनव प्रदर्शन आपल्या कला दालनात भरवलं आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातल्या दिग्गज कलावंतांची व्यक्तिचित्र प्रदर्शित करण्यात आली आहेत. दि १७ सप्टेंबर रोजी या प्रदर्शनाचं उदघाटन झालं. येत्या आठवड्यात हे प्रदर्शन कला रसिकांना पाहावयास मिळेल.

प्रदर्शनात उपस्थित रसिक आणि सुहास बहुळकर

दि १७ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या हस्ते ‘व्यक्ती- चित्र- पट’ या आगळ्या वेगळ्या पोर्ट्रेट प्रदर्शनाचे उदघाटन सुदर्शन कला दालन, पुणे येथे झाले. कुठलाही व्यावसायिक नफा तोटा याचा विचार न करता सुदर्शन कला दालनातर्फे अत्यंत दर्जेदार चित्र प्रदर्शने नेहमीच आयोजित करण्यात येतात. या प्रदर्शनात सुहास बहुळकर यांचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे प्रमोद काळे यांचे पोट्रेट चितारून सुहास बहुळकरांनी प्रदर्शनाची सुरुवात केली.

व्यंकटेश माडगूळकरांनी केलेलं विद्याधर पुंडलिक यांचे पोर्ट्रेट

या प्रदर्शनाची संकल्पना खरे तर डॉ.नितीन हडप यांची. महाराष्ट्राला व्यक्तिचित्रण परंपरेचा मोठा इतिहास आहे. हा इतिहास आणि दिग्गजांची कामे नव्या पिढीपर्यंत पोचावी यासाठी डॉ.नितीन हडप यांनी हे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले. चित्रकला क्षेत्रातील त्यांच्या ओळखीमुळे त्यांच्या अनेक चित्रकार मित्रांनी आपल्या संग्रहातील चित्रे दिली.  सुदर्शन कला दालनातर्फे अनेक चित्रकारांची प्रदर्शने होत असतात. कोरोना काळानंतर सुदर्शन कला दालनाने मंगेश नारायणराव काळे, चारुदत्त पांडे या चित्रकारांची प्रदर्शने आयोजित केली होती. त्यांना कला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

गोपाळ देऊस्कर यांनी केलेलं व्यक्तिचित्र

प्रदर्शनाची कल्पना निश्चित होताच डॉ.नितीन हडप आणि प्रमोद काळे यांनी पोर्ट्रेट गोळा करायला सुरुवात केली. पोर्ट्रेट मिळवताना काय अनुभव आले असे विचारल्यावर प्रमोद काळे म्हणाले, “जुन्या चित्रकारांची चित्रे ज्या रसिकांच्या संग्रहात होती त्यांच्याकडून मिळवून देण्यासाठी आम्हाला आम्हाला सुहास बहुळकर यांनी खूप मदत केली. हळदणकर, सरदेसाई, पळशीकर यांच्यासारख्या महत्वाच्या चित्रकारांची चित्रे बहुळकरांच्या मदतीमुळे मिळाली. प्रतिमा वैद्य या दीनानाथ दलालांच्या कन्या. त्यांच्या संग्रहात असलेलं दलालांनी केलेलं पोर्ट्रेटही आम्हाला बहुळकरांनी मिळवून दिलं.

शंकरराव भिडे यांनी सावरकरांचं केलेलं पोर्ट्रेट

व्यंकटेश माडगूळकर हे मोठे लेखक पण ते चित्रकारही होते. विद्याधर पुंडलिक यांचं व्यंकटेश माडगूळकरांनी केलेलं पोर्ट्रेट आम्हाला पुंडलिकांच्या कुटुंबीयांनी दिलं. शंकरराव भिडे हे पुण्यातले प्रसिद्ध चित्रकार होते. त्यांच्या मुलाने शंकररावांनी काढलेलं बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्ण पदक मिळालेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पोर्ट्रेट आम्हाला प्रदर्शनासाठी दिलं. त्याच बरोबर एम. व्ही. धुरंधर यांचंही पोट्रेट भिड्यानी केलं होत ते देखील प्रदर्शनासाठी उपलब्ध झालं. हा एक मोठा खजिनाच आम्हाला मिळाला.

एस. एन. पंडित यांनी रवी परांजपे यांचं केलेलं पोर्ट्रेट.

वा. ना. भट हे पुण्यातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध फोटोग्राफर त्यांनी शंकरराव भिड्यांचा पोर्ट्रेट फोटो काढला होता. तोही त्यांनी आम्हाला प्रदर्शनासाठी कुठलेही आढेवेढे न घेता दिला. पुण्यातील मुकुंद केळकरांनी दिनकर केळकर आणि त्यांच्या पत्नीचे व्यक्तीचित्र केले होते. तेही या प्रदर्शनासाठी उपलब्ध झाले. असे सर्व सकारात्मक अनुभवच आम्हाला मिळाले आहेत. एक दोन लोकांनी मात्र पोट्रेट्स देण्यासाठी नकार दिला. अर्थात असे अनुभव येतच असतात. विशेषतः लोकमान्य टिळकांचं पोर्ट्रेट मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो पण संग्राहकाने ते देण्यास नकार दिला, ही गोष्ट राहून गेली याचे आम्हाला वाईट वाटते. खरं तर टिळकांचा पगडीविरहित एकमेव पोर्ट्रेट फोटो त्याकाळातले प्रख्यात छायाचित्रकार कीर्तिकर यांनी काढला होता, तो या प्रदर्शनासाठी मिळवला असता तर प्रदर्शनाचं मूल्य खूपच वाढलं असत. असो ”

दिनकर केळकर आणि त्यांच्या पत्नीचे व्यक्तिचित्र

 

सरदेसाई यांनी केलेलं व्यक्तिचित्र

सुहास बहुळकरांनी विद्यार्थी दशेत केलेले व्यंगचित्रकार शि. द. फडणीसांचे पोर्ट्रेट मिळवून दिले. अशा प्रकारे जवळपास ४६ पोट्रेट्स आम्हाला मिळाली. प्रदर्शनाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दत्तात्रय कांबळे, रामकृष्ण कांबळे आणि योगेश कांबळे या तीन पिढ्यातील चित्रकारांनी काढलेली पोर्ट्रेट्सही या प्रदर्शनात पाहायला मिळतील. ग. ना जाधव, श्रीकान्त जाधव यांनी केलेली पोट्रेट्सही या प्रदर्शनात आहेत. प्रभाकर कोलते यांनी त्यांच्या मित्राचं केलेलं पोर्ट्रेटही या प्रदर्शनात पाहायला मिळेल.

प्रभाकर कोलते यांनी चितारलेलं पोर्ट्रेट.

सुहास बहुळकरांना या प्रदर्शनाविषयी मत विचारल असता ते म्हणाले, “हा एक वेगळा आणि छान प्रयत्न होता. महाराष्ट्रात फक्त व्यक्तिचित्रणाची प्रदर्शनं फार झालेली नाहीत. तेव्हा महाराष्ट्र कल्चरल सेंटर असं काही प्रदर्शन करत आहे हे बघून मला आनंदच झाला आणि मी लगेच होकार दिला. मी माझ्या संग्रहातली चित्रेही या उपक्रमासाठी दिली. विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे जुन्या जाणत्या लोकांचे काम पाहायला मिळेल. या प्रदर्शनात सर्वच महत्वाच्या चित्रकारांची पोर्ट्रेट समाविष्ट करता आली नसली तरी काळाचा एक पट या प्रदर्शनातून रसिकांना निश्चितपणे पाहायला मिळेल. प्रमोद काळे यांचे पोर्ट्रेट करणे हा एक छान अनुभव होता. या प्रदर्शनाच्या उदघाटनाला मुंबई, अहमदनगर, अंबरनाथ, वाई सारख्या ठिकाणावरूनही कला रसिक आवर्जून उपस्थित होते. प्रदर्शनाला प्रचंड गर्दी होती अनेक लोक बाहेरही उभे होते. विशेषतः माझ्या शाळेचे वर्गमित्रही याप्रसंगी उपस्थित होते हे बघून मला विशेष आनंद झाला. ”

विकास कदम यांनी केलेल व्यक्तिचित्र

याप्रसंगी उदघाटनपर भाषण करताना “प्रत्येक चित्र काढताना त्या चित्राचा ही एक इतिहास असतो, त्याचे लेखन चित्रकारांनी जरूर करावे” असे मत बहुळकरांनी मांडले. एकूण या प्रदर्शनाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राजहंस प्रकाशनाचे संपादक सदानंद बोरसे, विनोद गुरुजी यांच्यासारख्या मान्यवरांची या उदघाटनाला उपस्थिती होती. आगामी काळात सुहास बहुळकरांच्या पोट्रेट्सचे प्रदर्शन सुदर्शन कला दालनात होणार आहे. यामध्ये बहुळकरांनी केलेली पोट्रेट्स, त्याचबरोबर विधानभवन, पार्लमेंट हाऊस, एशियाटिक सोसायटी, रिझर्व्ह बँक यांच्यासाठी केलेल्या पोर्ट्रेट्सची रफ स्केचेस आपण या प्रदर्शनात पाहणार आहोत. या प्रदर्शनामध्येच सुहास बहुळ कर लिखित “बॉम्बे रिव्हायवल स्कूल” या तीनशे पानी सचित्र पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

सदर प्रदर्शन २५ सप्टेंबरपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.

*****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.