Features

अक्षररचनेने व्यापले कर्णविश्व!

कर्णबधीर मुलांना नीट ऐकू येत नसल्यामुळे बोलायला शिकणंसुद्धा कठीण जातं. त्यामुळे त्यांची बुद्धी आणि विचारक्षमता सर्वसामान्य मुलांसारखी असूनही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चिन्मय जोशी या मुलाने त्याच्या याच समस्येवर मात केली, इतकंच नव्हे तर मोठा झाल्यावर त्याने डिझाईन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. कलेचा उपयोग करून त्याने आपल्यासारख्याच समस्यांशी झगडणाऱ्या लहान कर्णबधीर मुलांना कलेच्या माध्यमातून या समस्यांवर मात करण्याचा सुलभ मार्ग दाखवला. अशी ही अतिशय स्फूर्तिदायक कहाणी चिन्मय जोशीच्याच शब्दांत दोन भागांमध्ये प्रसिद्ध करत आहोत.

नमस्कार, मी चिन्मय कैलास जोशी. माझ्या लहानपणी ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या दुर्बलतेवर मात करण्याच्या माझ्या संघर्षाची कथा आणि मी प्रशिक्षित कलाकार झाल्यावर लहान शाळकरी मुलांना कशी मदत केली याची कहाणी मी सांगणार आहे.

मला लहानपणापासूनच चित्रकलेची खूप आवड होती. पुढे मोठा झाल्यावर मी मुंबईच्या रहेजा स्कुल ऑफ आर्ट मधून अप्लाईड आर्ट केलं आणि नंतर पुण्याच्या एम आय टी मधून ग्राफिक डिझाइन या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन २०१९ ला पूर्ण केलं. मी जन्मतः कर्णबधिर आहे. लहान असताना एका ENT डॉक्टरी सल्ल्याने दादरच्या विकास विद्यालय मध्ये प्रवेश घेतला. जी शाळा फक्त कर्णबधिर मुलांसाठी शिकवण्याचे कार्य करते तिथे मी आयुष्याच्या सुरुवातीची तीन वर्ष शिकत होतो. या शाळेतल्या शिक्षकांची तळमळ आणि मेहनत मला आजही आठवते.  माझ्या आई, बाबांनी तर माझ्याबरोबर जी शब्दोच्चारांसाठी दिवसरात्र मेहनत घेतली, तेही अगदी माझे मित्र बनुन, तेही आठवतंय, त्यातून मला हळूहळू छान बोलता यायला लागलं, श्रवणयंत्रानी व्यवस्थित ऐकू यायला लागलं. मग मी  ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. पुढे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण त्याच शाळेत झालं. पण विकास विद्यालय, ज्या शाळेनी मला कमी ऐकू येत होतं आणि त्यामुळे नीट बोलता येत नव्हतं, एवढं सोडलं तर मी अगदी इतर मुलांसारखाच आहे, हे अगदी त्या नकळत्या वयातही माझ्या मनावर ठसवलं, बोलण्यासाठी, शब्दोच्चारांसाठी मला मायेनी साथ केली. आज इतक्या वर्षांनंतरही म्हणूनच माझ्या बालपणीच्या या शाळेबरोबरचं माझं नातं आजही तितकंच घट्ट आहे. 

आज मी माझ्या विकास विद्यालयमध्ये मुद्दाम मुलांना भेटायला गेलो होतो. फक्त सामाजिक कार्य म्हणून नव्हे तर अशाच मुलांना शिकवण्याची प्रचंड आवड म्हणून मी यावर्षी एप्रिल महिन्यात त्या मुलांसाठी चित्रकलेचा दोन दिवसीय छंदवर्ग किंवा वर्कशॉप घेतलं होतं. वर्कशॉपमुळे मला या माझ्या बालमित्रांमधे लहानपणचा मी दिसतो आणि त्यामुळेच नकळत माझं एक आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर निर्माण झालं होतं.‌

आज तिथे गेल्या गेल्या पाचव्या इयत्तेतला चेतन नावाचा मुलगा भेटला. वर्गात मला बघून लगेच चित्रकलेची वही घेऊन धावतच आला. या मे महिन्याच्या सुट्टीत, ब्रश आणि रंग घेऊन त्याने जी मज्जा केली होती, तीच मज्जा दाखवायला उत्साहाने चेतन माझ्याकडे थावत आला होता. एप्रिल महिन्यात घेतलेल्या छंद वर्गात विविध अक्षरे कशी काढायची, हे मी मुलांना शिकवलं होतं. कशी काढायची म्हणण्यापेक्षाही अक्षररचना समजून घेऊन कशी काढावीत, हे मी मुलांना त्या छंदवर्गात शिकवलं होतं आणि हेच अगदी नेमकेपणाने समजून, चेतनने आपल्या ड्रॉईंगच्या वहीत अक्षरे चितारली होती. माझ्यासाठी हा खरच एक सुखद धक्काच होता. तीच अक्षरं त्याच्या वहीच्या कागदावर त प म न अ ब क ड या सुरात नाचत होती. विविध अक्षराच्या लयकारीमध्ये सामान्य मुलंच नव्हे तर कर्णबधिर मुलंसुद्धा आवडीने रमतात, याचा मला आज असा हा वेगळा अनुभव आला. 

या वर्गात मुलांना चित्रकला शिकवताना मी Graphic design मधील ‘अक्षररचना’ ही संकल्पना कर्णबधीर मुलांच्या क्रिएटिव्ह बाजूसाठी कशी उपयोगी पडेल याचा प्रामुख्याने विचार केला होता. यात एक अक्षर म्हणजे ॐ अक्षर काढण्यास सांगितले होते. वळणदार रेषा काढून वरती टिंब द्यायचे एवढंच, पण आज चेतन जेव्हा, ‘दादा, ॐ असा बरोबर काढला आहे ना’ असं विचारत होता. हे विचारताना त्याच्या तोंडून नकळत ॐकाराचा उच्चार होत होता. जे मुलांच्या स्पीच थेरपीसाठी उपयुक्त आहे. तसेच कर्णबधिर मुलांकडून अक्षरं  म्हणून घेणं  हे दिव्य काम या अक्षरलेखनातून अगदी सहज साध्य होणार होतं. ‘श्री’ हे अक्षर काढताना त्यानं मनातल्या मनात किती वेळा ‘श्री’ म्हटले असेल याची कल्पना एव्हाना मला आली होती. छंद वर्गात शिकवलेले अक्षर सुट्टीत घरी जाऊन परत काढून म्हणण्याचा हा चेतनचा प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचा बौद्धिक आणि मौखिक कलाविकासच आहे.

चेतनने काढलेली लयकारी अक्षरे

अगदी बालवयातच समजायला लागल्यावर चराचरातल्या नादब्रम्हाला पारखी झालेली मुलं. त्यांना चित्रकलेतून अक्षरओळख आणि त्याबरोबरच ही अक्षरचित्रे चितारताना, नैसर्गिकपणे त्यांच्या मनात गुंजणारा अक्षरांचा उच्चार हा सराव या वर्कशॉपमधे मी अगदी विचारपूर्वक ठरवून या मुलांकडून करुन घेतला होता. आजच्या प्रसंगामुळे अक्षररचनेचा प्रयोग कर्णबधिर मुलांसोबत करून पाहण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न खऱ्या अर्थानं यशस्वी झाला होता. 

लयदार आकारात चेतनने काढलेली अक्षरे

चेतनची ती चित्रकला वही, त्याने सुटीतल्या दोन महिन्यांत केलेला सराव आणि त्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद यामुळे मला या माझ्या बालमित्रांसाठी असेच चित्रकलेच्या माध्यमातून या पुढेही नवीन, नवीन प्रयोग करण्यासाठी नवी सकारात्मक उर्जा मिळाली. 

यापुढेही मी माझ्या या बालमित्रांबरोबर चित्रकलेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन संवाद‌ साधेन, असेच नवीन चित्र प्रयोग त्यांच्यासाठी तयार करुन त्यांना शिकवेन, जेव्हा त्या अनुभवांसह नक्की तुम्हाला चिन्हच्या माध्यमातून भेटायला येईनच.

*******

चिन्मय कैलास जोशी

लेखक व्हिज्युअल डिझायनर आणि ब्रँड डिझायनर आहेत.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.