Features

पुनर्जन्म जे जे स्कूल ऑफ आर्टचा!

१६६ वर्षाचं जे जे स्कूल ऑफ आर्ट इतिहासजमा करण्याची संपूर्ण तयारी झाली होती. जेजे आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील अध्यापकांच्या सुमारे १८० पदांपैकी १४८ रिक्त ठेवली गेली आणि उर्वरित कायमस्वरूपी शिक्षकांची भूतसंवर्गात गणना करायची तयारीदेखील पूर्णत्वाला गेली असतानाच जेजेच्या पुण्याईनं डिनोव्होचा प्रस्ताव केंद्र सरकारनं मार्गी लावला. कसा झाला हा प्रवास? त्या संदर्भातल्याच या काही आठवणी. 

जे जे स्कूल ऑफ आर्टला दीडशे वर्ष पूर्ण झाली २००८ साली. त्याच वर्षी मुंबई विद्यापीठालादेखील दीडशे वर्ष पूर्ण झाली होती. एकाच वर्षी या मुंबईतल्या दोन शिक्षणसंस्थाची निर्मिती झाली. साहजिकच त्या संदर्भात झालेले जाहीर कार्यक्रम एकमेकांना जवळजवळ लागूनच झाले. जे जे स्कूल ऑफ आर्टचा कार्यक्रम जेजेच्या निसर्गरम्य परिसरात साजरा झाला, तर मुंबई विद्यापीठाचा कार्यक्रम बहुदा दीक्षांत सभागृहात किंवा मुंबई विद्यापीठाच्या सुंदर लॉनवर झाला असावा.

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमाला बहुदा राष्ट्रपतींची उपस्थिती होती. त्यामुळेच तो कार्यक्रम अत्यंत शाही स्वरूपात साजरा झाला. समाजातली सर्व क्षेत्रातली नामवंत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. बहुतेक सर्वच मंत्री या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. स्मरणिका, सजावट, प्रकाशन या सर्वच बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमानं इतिहास घडवला. राजाभाई टॉवरला त्या दिवशी रात्री केलेली रोषणाई केवळ अभूतपूर्व अशीच होती. आजही त्या रोषणाईचा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला फोटो आठवतो आहे.

आणि इकडं जेजेमध्ये मात्र जेजेच्याच आजी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतच दीडशे वर्ष सोहळा संपन्न झाला. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री होते दिलीप वळसे पाटील. पण ते या एवढ्या महत्वाच्या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेवर नाव असूनसुद्धा फिरकलेदेखील नाहीत आणि मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमाला मात्र सर्व सरकारी लवाजम्यासकट उपस्थित राहिले होते. आहे की नाही गंमत! नऊ वर्ष शिक्षणमंत्रीपद भूषवताना श्री वळसे पाटील यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टला कशी वागणूक दिली याचा हा एक उत्तम नमुना आहे. हेच नव्हे तर कला संचालनालयातर्फे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्यालादेखील ते असेच दरवर्षी अनुपस्थित राहिले किंवा उपस्थित राहिलेच तर हमखास कार्यक्रम संपण्याआधीच निघून गेले. जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा कला संचालनालयानं त्यांचं काय घोडं मारलं होतं कुणास ठाऊक? हा प्रकार त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सर्रास केला.

पहिल्याच दिवशी जवळजवळ वीस ट्रक इतका कचरा आणि डबर कॅम्पसमधून बाहेर पडलं. दुसऱ्या दिवशी कॅम्पसमधून बाहेर पडणाऱ्या ट्रकची संख्या अक्षरशः दुप्पट झाली. किती तरी अनावश्यक बांधकाम या कॅम्पसमध्ये तयार झालं होतं ते सारं आता तोडून टाकलं गेलं आहे. मध्यंतरी सरकारनं काही बेंगरूळ प्रकल्प राबवण्याचा इथं प्रयत्न केला होता. त्या निमित्तानं झालेली बांधकामंदेखील या सफाई मोहिमेत रफादफा केली गेली आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जेजेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला आहे. आखीवरेखीव रस्ते आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ, त्यातली बरीचशी हिरवळ तर गेल्या दोन दिवसातच पसरण्यात आली आहे. सत्तरच्या दशकात जेजेचा परिसर जसा सुंदर दिसत होता. तसा आता दिसू लागला आहे. अर्थात हे सारं मी फोटो पाहून सांगतो आहे. स्कूल ऑफ आर्टच्या लॉनवरची एक अनावश्यक भिंत मात्र या सगळ्या पडझडीतून वाचली आहे. पण येत्या काही दिवसातच तिचीपण योग्य तो वासलात लावली जाईल अशी चिन्हं आहेत.

गंमत कशी असते पाहा! तेच दिलीप वळसे पाटील हे आज महाराष्ट्राच्या टिबल इंजिन मंत्रिमंडळात आहेत. पण आज जेजेमध्ये इतका मोठा समारंभ चालू असताना मात्र ते अर्थातच नक्कीच ते अनुपस्थित असणार आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना आज मानाचं स्थान आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, शालेय शिक्षण आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मात्र जेजेमधल्या या महत्वाच्या कार्यक्रमाला आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. ही अतिशय मोठी घटना आहे असं माझं मत आहे. ज्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला २००८ साली उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना उपस्थित राहावयास संकोच व लाज वाटत होती, त्याच शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमास आज २०२३ साली मात्र राज्य मंत्रिमंडळातले सर्वोच्च पदं भूषविणारे सर्वच्या सर्व मंत्री उपस्थित राहतात याला मी काव्यगत न्याय मिळाला असं म्हणतो.

या विधानासंदर्भात आज तरी मी अधिक काही बोलू इच्छित नाही. कारण त्यामुळे निष्कारण आजच्या चांगल्या दिवशी कडवटपणा निर्माण होईल. कारण या संदर्भात आतापर्यंत मी इतकी कडवट टीका केली आहे, इतकी जहाल भाषा वापरली आहे की पुन्हा त्यावर जर मी टीका करू लागलो तर त्या साऱ्याची पुनरावृत्ती होईल की काय अशी माझ्या मनात भीती आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसोबत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या साऱ्याच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील दिग्गजांनी पुन्हा एकदा जे जे स्कूल ऑफ आर्टला प्रकाशझोतात आणून ठेवलं आहे यात शंकाच नाही. कोणे एके काळी जेजेतील समारंभाला खूप मोठी शासकीय परंपरा होती. सरकारातली दिग्गज मंडळी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत होती. जे जे स्कूल ऑफ आर्टला १२५ वर्ष पूर्ण झाली त्या वर्षी मी जेजेत शिकत होतो. त्या वेळच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आवर्जून उपस्थित राहिले होते. बाबासाहेबांनी आपल्या भाषणानं तो सोहळा गाजवला होता.

त्यानंतर मात्र एकूण राजकारणाचा आणि जे जे स्कूल ऑफ आर्टचादेखील दर्जा खालावत गेला. वर ज्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचा उल्लेख केला आहे त्यांच्या काळात तर तो पार रसातळातलाच गेला. १५० वर्ष पूर्ण झाली त्याच्या समारोहात तर दस्तुरखुद्द उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीच अनुपस्थित राहिले. त्यामुळे अन्य कुणी येण्याची शक्यताच नव्हती. या साऱ्याचा उद्वेग येऊन मी सरकारवर प्रचंड टीका करत सुटलो. महत्वाच्या सर्वच वृत्तपत्रांनी माझ्या बातम्या किंवा मी दिलेले लेख सातत्यानं प्रसिद्ध केले. एक प्रकारे लेखणीच्या साहाय्यानं मी केलेला तो निषेधच होता.

त्यातूनही मला जे अपेक्षित होतं ते साधलं जाईना तेव्हा मात्र पदरचे पैसे खर्च करून २००८ साली मी ‘चिन्ह’चा तब्बल साडेतीनशे पानांचा ‘कालाबाजार’ विशेष अंक प्रसिद्ध केला. पुढं कधीतरी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे दिसले असताना त्यांना मी सहज म्हणून हात केला त्यावर त्यांनीही लांबून हात हलवला आणि म्हणाले ‘नाईक, माझ्याकडे अंक आलाय आणि त्यासाठी जे काही करायला पाहिजे ते मी नक्की करतोय’ त्या उद्गारांचा मला त्यावेळी अर्थ लागला नाही, वाटलं कुणी तरी त्यांना कुठला तरी अंक दिला असेल आणि त्या संदर्भात ते आपल्याला काही तरी सांगत आहेत. असं वाटल्यामुळं साहजिकच २०१६ किंवा २०१७ साली घडलेली गोष्ट मी विसरून देखील गेलो. त्यानंतर २०२२ साली आशुतोष आपटे यानं मला डिनोव्होच्या आंदोलनात खेचलं आणि त्या नंतर डिनोव्होशी संबंधित सर्वांशीच आमच्या भेटीगाठी सुरु झाल्या. अशाच एका भेटीगाठीमध्ये डिनोव्होशी संबंधित एका अध्यापकानं जेव्हा माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संदर्भात किस्सा सांगितला तेव्हा विनोद तावडे यांच्या त्या विधानाचा मला अर्थ लागला.

तो किस्सा असा: एकदा मंत्रालयासमोरच्या यशवंतराव चव्हाण सेन्टरमध्ये तेव्हाचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गाठ महाराष्ट्र टाइम्सचे दिवंगत पत्रकार सुहास फडके यांच्याशी पडली. सुहास फडके हे माझे जवळचे मित्र. अनेक चित्रकारांशीदेखील त्यांची मैत्री. त्यांनी बोलताबोलता जेजेतल्या भोंगळ कारभाराविषयी तावडे यांना काही सांगितलं. तावडे म्हणाले मला त्याची सर्व माहिती द्या. सुहास फडके यांनी तातडीनं जेजेतल्या काही शिक्षकांना फोन केला. सुदैवानं त्या शिक्षकांकडे ‘कालाबाजार’ अंकाची प्रत होती. लागलीच ती हस्तगत करून त्यांनी ती प्रत विनोद तावडे यांच्याकडे सुपूर्द केली. आणि मग तावडे यांनी सचिव पातळीवर मिटींगा घेऊन या प्रश्नांकडे संबंधितांचं लक्ष वेधलं. मंत्रालयातील अनेक सचिवांनी नानाविध उपाय योजना सुचवल्या. त्यावेळी केंद्रातही भाजप सरकार असल्यामुळं केंद्रातल्या शिक्षणाशी संबंधित मंडळींचा सल्ला घेतला त्यातूनच ‘डिनोव्हो’चा प्रस्ताव पुढं आला. केंद्रीय पातळीवरदेखील खूप चर्चा झाली आणि या प्रस्ताव अंतिम स्वरूपात सादर झाला. हा सर्व किस्सा डिनोव्हो संदर्भातल्या आम्हा जेजेच्या माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीमध्ये एका अध्यापकानं सांगितला तेव्हा कुठं तो मला पहिल्यांदा कळला. आणि तेव्हाच मला विनोद तावडे यांनी काढलेल्या त्या वाक्याचादेखील संदर्भ लागला. हे सारं कथन करण्यामागे श्रेय घेण्याचा कोणताही उद्देश नाही. जे जसं घडलं, पाहिलं, अनुभवलं तेच मी माझ्या लिखाणातून सांगतोय. जेजेला डिनोव्हो लागू होण्यामागे ‘चिन्ह’चा आणि माझा खारीचा वाटा निश्चितपणे आहे. हेदेखील मी इथं नमूद करण्याची नम्रपणे संधी घेतो आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नये.

दरम्यानच्या काळात मंत्रिमंडळ बदललं होतं. देवेंद्र फडणवीस जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. वाटलं होतं की आता जेजेचाच माजी विद्यार्थी मुख्यमंत्री झाला आहे तर जेजेचा प्रश्न त्वरित सुटेल पण दुर्दैवानं तसं झालं नाही. मधेच खुसपट काढून स्वतंत्र कला विद्यापीठाचा प्रस्ताव पुढं रेटण्याचा प्रयत्न झाला. त्याला माझा विरोध नव्हताच. महाराष्ट्र शासनानं १९६५ साली कला विद्यापीठ सदृश्य जे ‘कला संचालनालय’ स्थापन केलं तेच आपल्याला धड चालवता येत नाही असे आपण कला विद्यापीठ कुठल्या तोंडानं काढणार? एव्हढाच माझा आणि आशुतोष आपटे याचा सरकारला खडा सवाल होता. साहजिकच डिनोव्होचा प्रस्ताव बारगळणार की काय अशी भीती आम्हाला वाटू लागली. पण अचानक महाराष्ट्रातल्या राजकारणानं कूस बदलली आणि उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता डिनोव्हो बारगळणार असेच आम्हाला वाटू लागले पण इथं जेजेची पुण्याई कामी आली. जयंत पाटील उठले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. राजीनामा देण्याआधी जेजेच्या प्रस्तावाला मान्यता द्या अन्यथा आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं त्यांनी ठासून बजावलं आणि उद्धव ठाकरे यांनी डिनोव्होच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

या साऱ्या प्रकरणामुळं विनाकारण वेळ वाया गेला. पण चंद्रकांत (दादा) पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा कारभार हाती घेताच अवघ्या तीन-चार दिवसातच डिनोव्होची फाईल हातावेगळी केली आणि डिनोव्होचा मार्ग सुकर केला. डिनोव्होच्या संदर्भात मोठी कामगिरी बजावली त्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नंतरचा सर्व प्रवास सोपा करून टाकला म्हणूनच जेजेला आजचा हा दिवस दिसला. या संदर्भात अनेकांनी मदतीचे हात पुढं केले त्यामुळेच तर हे काम सोपं होत गेलं. त्यांच्याविषयीदेखील लिहायचं आहे आणि पुढं ते मी लिहिणारच आहे. तूर्त इतकंच.

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

आजच्या भव्य कार्यक्रमाची नवीन कार्यक्रमपत्रिका.

कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६.०० वाजता   

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.