Features

रवीन्द्रनाथ टागोर :एक बहुआयामी कला प्रवास : भाग-२

पल्लवी पंडित (कला इतिहास प्राध्यापक)

काव्य,नाट्य,कथा,कादंबरी,तत्वचिंतनात्मक लेखन,कला समीक्षा, भाषणे, संभाषणे, चर्चा, पत्रे, निबंध, प्रबंध, शालेय पाठ अशा साहित्याच्या सर्वच अंगांना रवींन्द्रनाथांच्या लेखणीचा परिसस्पर्श लाभला आहे. या लेखाच्या पहिल्या भागात आपण त्यांचे बालपण,तारुण्यातील जडणघडण आणि काव्यनिर्मितीबाबत जाणून घेतले. आता या भागात आपण त्यांची कथाकार, गायक, संगीतकार म्हणून त्यांची कारकिर्द जाणून घेणार आहोत. प्रयोगशीलता हा रवींद्रनाथांच्या साहित्य आणि कलासाधनेचा पाया होता. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनीशांतिनिकेतनया प्राचीन गुरुकुल व्यवस्थेचे  पुनरुज्जीवन करणाऱ्या सहशिक्षण व्यवस्थेचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर  विद्यापीठाची स्थापना केली. ‘विश्वभारतीहे जणू त्यांचे प्रत्यक्ष भूमीवर उतरलेले काव्यच होते. रवींद्रनाथांच्या आयुष्यातील स्थैर्याच्या काळातील साहित्य साधना आणि शांतिनिकेतन, विश्वभारती या अभिनव शैक्षणिक उपक्रमांची उभारणी याबाबत आपण या लेखात  जाणून घेणार आहोत.

रवींद्रनाथांनी फार कमी वयात काव्य निर्मितीला सुरुवात केली होती. परंतु आपण कथाकारही आहोत ही जाणीव मात्र त्यांना बरीच उशिरा झाली. रवींद्रांनी आपली पहिली खरीखुरी कथा किंवा लघुकथा लिहिली ती 1890 नंतर म्हणजे तिशी उलटल्यावर. त्याआधी त्यांनी बंगाली आणि अन्य भाषांतील अनेक कथा वाचल्या होत्या. काही स्वतःही लिहिल्या होत्या. नंतर मात्र सूर गवसल्यावर  त्यांनी कथानक, प्रधानकथा, नाट्यकथा, भावकथा, वातावरणकथा, प्रतीक कथा, स्वप्नकथा, लोककथा, इतिहास कथा, रूपक कथा असे कथांचे विविध प्रकार समर्थपणे हाताळले. या सर्व कथांमधील पुष्कळशा कथा त्यांनी 1891 ते 1895 या पाच वर्षात लिहिलेल्या आहेत. उरलेल्या कथा त्यांनी अंतराअंतराने लिहिल्या. मात्र 1917 मध्ये त्यांचे कथालेखन सुटलेच. बंगालीतपुष्पगुच्छया नावाने प्रसिद्ध झालेल्या तीन खंडात त्यांच्या बहुतेक कथा आल्या आहेत आणि त्यांची संख्या 84 आहे. ‘सप्तमी’, ‘काबुलीवाला’, ‘पोस्टमास्तर’, ‘एकरात्र’, ‘क्षुधीतपाषाणया त्यांच्या कथांतून आशय आविष्काराच्या वैविध्यात ते किती समृद्ध आणि तितकेच स्वतंत्र होते हे दिसून येते. मोपांसा आणि चेकॉव्ह या सारख्या समर्थ कथाकारांच्या कथा त्यांनी निश्चित वाचल्या असतील पण त्यांची किंवा अन्य कोणत्याही कथाकाराची तंत्र पद्धती त्यांनी स्वीकारलेली दिसत नाही. त्यांची कथा ही फक्त त्यांची स्वतःची आहे. ती पूर्णतः भारतीय आहे. तिच्यातील पात्रे, प्रसंग, वातावरण, निसर्ग, भावभावना, जीवन आणि आदर्श या प्रत्येकाला येथील मातीचा वास आहे. कथन, वर्णन, चित्रण, मनन, भाष्य, आदर्शभक्ती, काव्य, प्रतीक योजना, स्वभाव रेखाटन अशा किती तरी गोष्टी त्यांच्या कथेत एकाच वेळी असत. पण ती सारी इतकी एकजीव आणि एकरस झालेली असतात की कथेच्या प्रवाहात त्यांच्या वेगळेपणाची जाणीवही आपणाला होत नाही. रवींद्रनाथांनी कादंबरी लेखन सुरू करेपर्यंत बंकिमचंद्र यांनी या साहित्य प्रकाराला उच्च पातळीवर नेऊन ठेवले होते. बंगाली वाचक वर्ग त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबऱ्यांनी भारावून गेला होता. रवींद्रनाथ देखील त्यांच्या कादंबऱ्यांचे मोठे चाहते होते. त्यामुळेच प्रेरित होऊन आपणही कादंबरी लेखन करावे असे रवींद्रनाथांना वाटू लागले. 1883  मध्ये म्हणजे बाविसाव्या वर्षी त्यांनीबौ ठाकुगणीर हाटेआणि 26 व्या वर्षीराजश्रीही कादंबरी लिहिली. मात्र या दोन्ही कादंबऱ्यांवर सरळ सरळ बंकिमचंद्राचा प्रभाव दिसून येतो.

या नंतर काही वर्षांनी म्हणजेच इ..1903 मध्ये त्यांनीनष्ट नीडलिहिली. त्यांची वहिनी कादंबरी देवी यांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या भावनांना मुक्त वाट करून देण्यासाठी लिहिलेली ही लघुकादंबरी. ती लिहीत असताना त्यांच्यातील कादंबरीकार घडत गेला आणिचोखेर बाली‘ (1902) ‘नौका डुबी‘ (1906) या कादंबरीतून तो स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन घडवितो.

चोखेर बालीआणिनष्ट नीडमधून वास्तववादी पण सूक्ष्म आणि गूढ मानसिक आंदोलनांवर आधारित कलाकृती साकारल्यावर योगायोगांवर आधारितनौका डुबीही कादंबरी रवींद्रनाथांनी कशी काय लिहिलेली हा एक प्रश्नच आहे. पुढे 1910 मध्ये आलेली त्यांचीगोराम्हणजे जणू आधुनिक महाकाव्यच.नव्याने जागृत झालेला भारतवर्ष यात आहे. तर 1916 मध्ये लिहिलेलीघरे बाहिरेही बंगाली पार्श्वभूमीवर साकारलेली आणि स्वदेशी चळवळींच्या परिणामांची चिकित्सा करणारी कादंबरी आहे. 1930 मध्ये रवींद्र यांनीयोगायोगही तीन पिढ्यांची कथा सांगणारी कादंबरी लिहिलीमात्र यातील एकच भाग प्रसिद्ध झाला असून यातील कथा पूर्णतः कौटुंबिक आहे. 1930 मध्ये प्रकाशित झालेलीशेषेर कविताही गद्य आणि पद्य शैलीच्या मिश्रणातून साकारलेली आणि संस्कृतमधीलचम्पूदृश्यया अभिनव पद्धतीत लिहिलेली कादंबरी आहे. 1934 मध्ये रवींद्रनाथांनी त्यांची अखेरची कादंबरीचार अध्यायलिहिली. यात असहकाराच्या चळवळीनंतर बंगालमध्ये जी क्रांतिकारी चळवळीची लाट उसळली तिची मूल्ये आणि उद्दीष्टे तपासून पाहण्याचा प्रयत्न केला आहे.

जीवनात काय किंवा साहित्य प्रकारात काय, रवींद्रनाथ नेहमीच प्रयोगशील होते. त्यांची ही प्रयोगशीलता त्यांच्या प्रत्येक कादंबरीतून दिसून येते. या प्रयोगातून, कामाच्या व्यापातून स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी रवींद्रनाथ नाटकाकडे वळले. नाटक हा त्यांचा छंद होता. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात लहानमोठ्या अशा एकूण 34 नाट्यकृती निर्माण केल्या. ज्यांची नोंद उपलब्ध नाही अशाही आणखीन काही नाट्यकृती असू शकतील. या नाट्यकृतींमध्ये त्यांनी प्रहसन, संगीतिका, नाटक, एकांकिका, नृत्यनाट्य असे विविध प्रकार हाताळलेले दिसतात. यातील काही कृती सर्वस्वी नव्या आहेत, तर बऱ्याचशा त्यांच्या पूर्व लिखित कथांच्या, कादंबऱ्यांच्या आणि कवितांच्या नाट्यावृत्ती आहेत. कित्येक नाट्यकृतींच्या त्यांनी सुधारित आवृत्त्या काढल्या तर कित्येकांच्या संक्षिप्त आवृत्ती तयार केल्या. कुठे कथा आणि काव्य यांच्या संगमातून कलाकृती निर्माण केली आहे तर कुठे काव्य आणि संगीत यांच्या मिलनातून ती साकार झालेली दिसते.

केवळ नाटके लिहून रवींद्र थांबले नाहीत तर नट, नाटककार, दिग्दर्शक, नर्तक या इतर भूमिकाही त्यांनी लीलया पेलल्या. रवींद्रनाथांची नाटके निव्वळ वाचण्यासाठी नसून ती पाहिल्या किंवा ऐकल्याशिवाय त्यांचे खरे मर्म आपल्याला कळत नाही. या नाटकात त्यांनी अंत:संघर्षाला बाह्य संघर्षापेक्षा अधिक महत्व दिलेले दिसते. जणू भावनाट्य प्रकट करणे हेच त्यांचे खरे उद्दिष्ट! रवींद्रनाथांची मूळ प्रकृती गंभीर तत्त्वचिंतकाची. पण हे तत्त्वचिंतन काव्यात्मक आणि संगीतमय आहे याचा अनुभव आपल्याला त्यांच्यावाल्मिकी प्रतिभापासून थेटरक्त करबीआणिमुक्तधारापर्यंतच्या नाट्य कृतीतून घेता येतो. तरवैकुंठाची सभा’, ‘स्वर्गीय प्रहसन‘,’लक्ष्मीची परीक्षा‘,’चिरकुमार सभाया यांच्या नाट्यकृतीतून त्यांच्यातील विनोद दृष्टी आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांचे हे रूप आपल्याला जीवनातील खेळकरपणा, उपहास यांचे दर्शन घडविते तरडाक घरया नाट्यकृतीत  सृष्टीतील साऱ्या वस्तूमात्रांतील आणि जीवनमात्रांतील आनंदाशी समरस होण्याची, इथल्या पोरक्या, असहाय्य, मानवी जीवनाची आर्त, अनिवार उत्कंठा त्यांनी चित्रित केली आहे.

 ‘प्रकृतीर प्रतिशोध’, ‘राजा ओ राणी’, ‘चित्रा’, ‘फाल्गुनी’, ‘शारदोत्सव’, ‘अचलायतन’ ‘चित्रांगना’, ‘चांडालिका’, ‘श्यामा’ ‘शेषेर रात्री’, ‘विसर्जनही त्यांची काही प्रतीक नाट्य आणि नृत्य नाट्य आहेत. रवींद्रनाथांच्या प्रत्येक प्रतीक नाट्यात कुठला न कुठला खोल, सुक्ष्म अथवा भव्य तत्त्वसंकेत आढळतो. त्यांना आविष्कृत करायचे तत्त्व कधी निसर्ग आणि मानव आणि मानवेतर ,कधी नियती आणि मानव यांच्या गूढतर संबंधातून उगवलेले असते.

कर्णकुंती संवाद‘, ‘गांधारीर वेदनाआणिविदाय अभिशापअशा नाट्यसंवादांची रचना करताना पुराणातल्या या उपेक्षित व्यक्तींच्या स्वभाव रेषा अधिक स्पष्ट आणि ठसठशीत करण्यात त्यांनी असाधारण दक्षता घेतलेली दिसते आणि त्यांच्या जीवनातील भव्यता व कारुण्य साक्षात आपल्यापुढे उभे राहते.रवींद्रनाथांची नाटके काव्यात्मक तर आहेतच शिवाय ती आपल्याला तत्त्वचिंतन करायला लावणारी आहेत. त्यांचे नाटक ऋतूविलास दर्शविणारे असो किंवा ऐतिहासिक किंवा सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे असो त्यांची सारी धडपड अनंताचा आनंद प्राप्त करण्यासाठी असे. स्वतः रवींद्रनाथांनी आपल्या लेखामागे देखील हाच हेतू असल्याचे स्वतः म्हटले आहे.

 याशिवाय शिक्षणाशी संबंधितशिक्षणाची स्थित्यंतरेया त्यांच्या पहिल्याच महत्त्वपूर्ण प्रबंधात त्यांची शिक्षणासंबंधीची प्रयोगशील आणि प्रगतशील दृष्टी दिसून येते. मुलांचे निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जाणतेपणाने विकसित केल्याशिवाय त्याचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने फुलत नाही ही रवींद्रनाथांची धारणा होती. ‘शिक्षणाचा प्रश्नया त्यांच्या दुसऱ्या प्रबंधात त्यांनी गुरुकुलाची संकल्पना मांडली. ‘कवीची शाळाया निबंधात जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनापासून शाळा तुटून राहता कामा नये शिवाय आपल्या पूर्वकालीन तपोवनातल्याप्रमाणे मुलांनी आपल्या अभ्यासाबरोबर घरचीही कामे केली पाहिजेत पण याबाबत मुलांवर सक्ती होता कामा नये. मुले ही कामे स्वयंस्फुर्तीने आणि उत्साहाने करतील असे स्नेहाचे, उत्साहाचे आणि उद्योगाचे वातावरण त्याच्याभोवती ठेवायला हवे असे रवींद्रनाथ नमूद करतात.

रवींद्रनाथांनी मुलांना आनंदाची अनुभूती देतील अशा प्रकारची शालेय पुस्तके लिहिली. आपल्याकडील अशाप्रकारे छापलेली ही पहिलीच पाठ्यपुस्तके होती असे म्हटले तरी वावगे ठरू नये. या शिवाय त्यांच्या पत्र साहित्याला बंगाली साहित्यात आगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. आतापर्यंत त्यांच्या पत्राचे एकोणिस संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यात स्नेहपत्रे, प्रवास पत्रे, चर्चा पत्रे इत्यादी प्रकार आहेतया पत्रात त्यावेळच्या त्यांच्या मनोदशेचे दर्शन घडते. पत्रांना साहित्याची प्रतिष्ठा मिळवून देणारे ते बंगालीतले पहिले साहित्यकार.

रवींद्रनाथ आणि संगीत

  टागोरांच्या वाड्याची दारे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य या दोन्ही प्रकारच्या संगीतासाठी सदैव उघडी असत. रवींद्रनाथांनी पाश्चात्त्य संगीताचा थोडाफार अभ्यासही केला. या संगीताला स्वतःचे असे खास गुण आहेत हे त्यांना कळले पण संगीताने त्यांच्या हृदयाचा ठाव घेतला नाही. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच इंग्लंडला गेले असता डॉक्टर स्कॉट यांच्याकडे  राहात असतांना रवींद्रनाथांना मिस स्कॉट यांच्याकडून आयरिश संगीत अभ्यासायला मिळाले होते. शिवाय हर्बर्ट स्पेन्सरची संगीत मीमांसा त्यांनी अभ्यासली होती.

पुढे भारतात परतल्यावर रवींद्रनाथांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना जमीनदारीची व्यवस्था पाहण्यासाठी पूर्व बंगालच्या खेड्यात पाठवले होते तेव्हा बुद्धाचे दोहे, चर्या, वैष्णवांची पदे, तांत्रिकांची गीते, बाबुलांची भजने, कीर्तने आणि होडीवरील नावाड्यांच्या मटियाल्या वारंवार त्यांच्या कानी पडू लागल्या. या गीतांमध्ये हृदयाला भिडणारे असे काहीतरी आहे हे त्यांच्या ध्यानी आले. ही गीते म्हणतांना गाणारे जीव ओतून गातात. त्यातील आर्तता आपल्या कासावीस करते पण गातांना रागाच्या बाबतीत ते आग्रही न राहता भावनेच्या आवेगानुसार त्याला वळवतात. गायकांची ही पद्धत रवींद्रनाथांना खूपच आवडली. ‘ज्याप्रमाणे जुन्या संत कवींनी, बाबुलांनी आणि कीर्तनकारांनी या रागांचे मर्म जाणून भावनांच्या गरजेप्रमाणे नवीन राग निर्माण केले तसे आपणही का करू नये?’ हा विचार त्यांच्या मनात आला आणि तो अमलात आणण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम रागांना मुक्त केले आणि स्वतःच्या संगीत प्रेरणेनुसार त्यांना वळविले. या प्रयोगाला भारतीय संगीत परंपरेतून आलेलीध्रुपदपद्धती अधिक जवळ आहे हे त्यांच्या लक्षात आलेनिर्मितीचा पाया म्हणून ध्रुपद पद्धती त्यांनी स्वीकारली व ध्रुपद आणि जनपद संगीत यांच्या अपूर्व संयोगातून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.

प्रयोगशील रवींद्रनाथांनी हिंदुस्तानी संगीत म्हणजे मूळ भारतीय संगीताने सोवळेपणा न मानल्यामुळे निर्माण झालेले संगीत आहे हे ओळखले होते. ज्याप्रमाणे गौडसारंग, नटकेदार, पुरियाधनश्री, भैरवबहार, यामिनीबिलावल असे मिश्र राग जर प्रतिष्ठा पावू शकतात तर त्याच प्रमाणे दोन किंवा अधिक रागांच्या संयोग रचनेची प्रक्रिया आपण पुढे का चालवू नये? ते शास्त्रशुद्ध नाही असे का मानावे? असे त्यांना वाटू लागले व त्यांनी नव्या वीस रागिणी निर्माण केल्या आणि त्यांना लोकमान्यता मिळवून दिली.

पुढे जाऊन रवींद्रनाथांनी लोकसंगीत किंवा देशी संगीत शैलीत स्वरांपेक्षा शब्दावर अधिक भर दिला असून सार्वत्रिक मूलभावाऐवजी त्याच्या व्यक्तिविशिष्ट स्वभावाचे दर्शन घडवण्याकडे मुख्य लक्ष दिले जाते हे गुण विशेष ओळखले आणि देशी शैलीप्रमाणे एकाच रागाच्या वेगवेगळ्या वृत्ती आपले वैविध्य आणि सामर्थ्य स्पष्टपणे दर्शवतील अशी आपल्या गीतांची रचना केली. या पद्धतीत रागानुरूप योग्य शब्दांचा मेळ साधणे ही आवश्यक असते. बंगाली भाषेत पुन्हा कोणीही करू न धजलेली ही किमया रवीन्द्रनाथांनी करून दाखवली आणि त्याचबरोबर आपल्या संगीताला अज्ञात असलेलाकंपोजीशनहा प्रकार प्रचलित केला

रवींद्रनाथांनी ऋतुगीते, प्रीतिगीते, भक्तीगीते, श्रमगीते अशी एकूण दोन हजारावर गीते लिहिली. रवींद्रनाथ स्वर लेखनही करीत आणि गायनही करीत. राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात यांनी गायलेलेवंदे मातरम्‌निव्वळ अविस्मरणीय होते. शिवाय वयाच्या सत्तराव्या वर्षी स्वीडनला ध्वनिमुद्रित झालेले त्यांचे काव्यगायन जे ऐकतील त्यांना काव्यगायक म्हणून रवींद्रनाथांच्या प्रतिभेची निश्चित माहिती पटेल.

रवींद्रनाथ आणि शिक्षण

चाळीशी गाठण्यापूर्वीच रवींद्रनाथांनी अनेक क्षेत्रात स्वतःला प्रस्थापित केले होते परंतु त्यांच्या मनाची अवस्था त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना जमीनदारीची व्यवस्था पाहायला खेड्यात पाठवले तेव्हा देखील दीन, दुबळ्या, अज्ञानी वर्गाचे होणारे शोषण त्यांनी पाहिले आणि हा मोठा प्रश्न केवळ दानाने सुटणार नाही हे त्यांनी जाणले. शिवाय दुसरीकडे इंग्रज राज्यकर्ते देखील आपल्या लोकांचा पावलोपावली अपमान करतात आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे भारतीय इंग्रजांचे अंधानुकरण तर करतात शिवाय त्यांना आपली संस्कृती, भाषा, परंपरा यांचा विसर पडला एवढेच नव्हे तर त्याची त्यांना लाजही वाटते या गोष्टींचे शल्य रवींद्रनाथांना टोचत होते. आपल्या साहित्यातून या लोकांचा गमावलेला स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत करण्याचे ते प्रयत्न करीत होते. पण कुणीच ऐकत नव्हते. शेवटी ज्या तत्त्वांचा आणि कल्पनांचा आपण जीव तोडून पुरस्कार करीत आहोत त्या प्रत्यक्षात आणून दाखवल्या पाहिजेत असे त्यांनी ठरवले. पूर्वीची आपल्याकडील गुरुकुल परंपरा खंडित झाल्यामुळे आपण अधोगतीला पोहोचलो असा त्यांचा निष्कर्ष होता आणि या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे हा त्यावर इलाज. शिवाय त्यांच्या लहानपणी त्यांनी अनुभवलेली कैदखान्यासारखी शाळा आपल्या आणि इतरांच्या मुलांच्या नशिबी येणार का ? या प्रश्नाने ते अस्वस्थ आणि चिंतित होतेच. शेवटी सतत चालणाऱ्या चिंतनातून त्यांचा विचार निश्चित झाला आणि वडिलांच्या ध्यानभूमीत म्हणजे शांतिनिकेतन येथे पौष शुद्ध सप्तमी या महर्षिंच्या दीक्षादिनी म्हणजेच 22 डिसेंबर 1901 रोजी स्वतःची आणि इतर मुले घेऊन शाळेची सुरुवात केली.

निसर्गाच्या सानिध्यात मुलांचे खरे शिक्षण होते हे त्यांनी जाणले होते म्हणून ही जागा त्यांनी आपल्या शाळेकरीता निश्चित केली होती. शिवाय जीवनाचे ज्ञान मातृभाषेतून सहजतेने मिळते हे त्यांनी जाणले होते. मातृभाषाच बुद्धीचा आणि भावनांचा संगम घडवून आणण्यास पात्र आहे हे त्यांचे मानणे होते. या  शिवाय आणखीनही महत्त्वाचे सूत्र होते ते म्हणजे निकटचा गुरूशिष्य संबंध. आधुनिक विद्या आणि जुना आदर्श यांचा संयोग त्यांना या आपल्या आश्रमात साधायचा होता. त्यांना ब्रह्मोपासना हवी होती व त्यात विरक्ती नव्हे तर आनंदमयी अनुभूती त्यांना अपेक्षित होती. आपल्या आश्रमातील मुलांना निसर्गाचा, श्रमाचा, साहित्यकलांचा आनंद आणि नवनिर्माणाचा आनंद अनुभवता यायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.

खरेतर शांतिनिकेतन ही एक प्रयोगशाळाच होती. रवींद्रनाथांनी येथे सह शिक्षणाचा प्रयोग राबविला आणि तो यशस्वीही झाला. शांतिनिकेतन सुरू करून वीस वर्षे होत आली होती. या काळात त्यांनी केलेल्या प्रयोगांचे सुपरिणाम स्पष्टपणे दिसू लागले होते. त्यांनी लावले छोटेसे बीज बहरले होते. आणि रवींद्रनाथांनी 22 डिसेंबर 1921 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनीविश्वभारतीया संस्थेची स्थापना केली आणि आश्रम, त्याची मालमत्ता,पुस्तके सारे काही विश्वस्तांच्या हवाली केले. रवींद्रनाथांना आयुष्यात मिळालेल्या अनेक उपाधींमध्येविश्वकवीइतकीचगुरुदेवही मोलाची उपाधी आहे. ‘विश्वभारतीजणू हे त्यांचे प्रत्यक्ष भूमीवर उतरलेले काव्य आणि असे काव्य प्रत्यक्षात मूर्तिमंत करणारा रवींद्रनाथांसारखा कवी जगात एकच!

क्रमश:

(या लेखाचा पुढील भाग चिन्ह आर्ट न्यूजवर उद्या प्रसिद्ध होईल.)

(‘तत्रैवद्वैमासिकातून साभार  )

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.