Features

रंग लागो यार फकिरी में

विदर्भातील ज्येष्ठ आणि नामवंत चित्रकार अरुण मोरघडे यांचे नुकतेच निधन झाले. १४ ऑगस्ट १९२७ ला त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर आपले संपूर्ण जीवन त्यांनी चित्रकलेला वाहून घेतले. मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही शैलीत त्यांनी चित्रे काढली आहेत. आदिवासी जीवनाचे घटक त्यांच्या अनेक मूर्त शैलीतील चित्रांमधून विशेषत्वाने आढळून येतात. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी जानेवारी – फेब्रुवारी – मार्च २०२० च्या अंकात अरुण मोरघडे यांच्या कारकिर्दीवर सुभाष तुलसीता यांनी लेख लिहिला होता. अरुण मोरघडे यांच्या चित्रकला कारकिर्दीची ओळख करून देणारा हा लेख खास ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या वाचकांसाठी. 

अरुण मोरघडे यांचा ६५ वा वाढदिवस होता. एका हिंदी वर्तमानपत्रात मी बातमी वाचली. मी पर्णचित्राचं एक शुभेच्छापत्र तयार केलं एक वटवृक्ष दाखवला. त्यात ६४ अस्ताला जातोय व ६५ चा उदय होतोय, असं त्यांना पाठवलं. काही दिवसांतच त्यांचं एक पोस्टकार्ड आलं. तुमचं शुभेच्छापत्र खूप आवडलं. तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही येता की मी येऊ ? अरुण मोरघडे चित्रकार , कैलाश टॉकिजच्या मागे, जागनाथ बुधवारी, नागपूर व सोबत एक सुंदरसं रेखाचित्र. एवढ्या मोठ्या चित्रकारानं लगेच उत्तर दिलं व भेटायची इच्छा व्यक्त केली. मी तर पार हवेतच गेलो.  

माझा एक मित्र शिल्पकारीच्या शिक्षणातून नुकताच बाहेर पडलेला. नाव कौशल तो व मी सायकलने बजाजनगर ते जागनाथ बुधवारी दि . १५-०९ – १९९१ ला रवाना झालो. घर लवकरच सापडलं ते आपल्या स्टुडिओत चित्र रंगवत बसले होते. स्टुडिओ घराजवळच एका शक्तिशाली देवाच्या डोक्यावर एक अवलिया चित्रकार आपली रंगधुनी जमवताना आम्ही पहिल्यांदाच पाहात होतो. या गोष्टीला झालीत २९ वर्ष. 

आता त्यांचं वय आहे फक्त ९४ वर्ष २९ वर्षांपूर्वी मी त्यांची आर्ट ऑफ लिव्हिंग पाहिली होती, अगदी एवढ्या तीन दशकांनंतरही काहीही बदल नाही. 

विपरीत परिस्थितीतही, आपली एकाग्रता कशी कायम ठेवावी, कौटुंबिक संकटाच्या काळात आर्थिक विपन्नावस्थेत कधीही न डगमगता आपल्या कलेशी इमान राखून, विविध रंगांशी खेळून जीवनात येणाऱ्या अनेकानेक ग्रे शेड्सना आपल्या ब्रशच्या फटकाऱ्यानं कसं रंगमय करायचं हे मोरघडे सरांकडून शिकावं. त्यांच्यावर कुठेही लिहून आलं – छापून आलं – सत्कार झाला तर अगदी लहान मुलांसारखं  निरागसतेनं आनंदून सर्व मित्रांना, शिष्यांना पुन्हा पुन्हा त्या पेपरचं कात्रण दाखवावं ते मोरघडे सरांनीच. 

सच्च्या कलावंताचं आयुष्य खडतर असतं. दुःखाचे योग त्याच्या पाचविला पुजलेले असतात. यांच्या आयुष्यात सुख म्हणजे प्रखर उन्हाळ्यात सापडणारं वाळवंटातलं पाणी. मोरघडे सरांचं आयुष्य हे सहा तास लांबींच्या दीर्घ चित्रपटातही मावणार नाही असं. नियती त्यांना काळा रंग फासायच्या तयारीतच राहायची. 

त्यांचं लग्न अगदी लहानपणीच झालेलं. पत्नी कौशल्याबाई – गौर वर्णीय, छोट्या बांध्याच्या हसरा चेहरा. शिक्षणाचा वा कलेचा गंध नसला तरी त्या सतत आपल्या रंगदेवतेच्या पाठीशी त्यांच्या कलेत कुठेही बाधा येऊ नये म्हणून झटत. सरांच्या आयुष्यात ४५ व्या वर्षी एक तरुणी आली नाव गीता गाडे. ती त्यांच्या रंगकलेवर फिदा झाली. अडीअडचणीत मदत करू लागली. सरांच्या विविध रंगांच्या पॅलेटमध्ये प्रणयाचा रंगही सजू लागला. पेंटिंगमध्ये आणखी निखार येऊ लागला. 

इकडे कौशल्याबाईंना त्यांच्या पॅलेटमध्ये व चित्रांमध्ये ग्रे छटा दिसू लागली. नवा बदल जाणवायला लागला होता हा बदल जर आपल्या रंगदेवतेच्या आयुष्यात नवी झळाळी देत असेल तर तो बदल स्वीकारायचा असा निर्णय कौशल्याबाईंनी घेतला. भला मोठा दिलदारपणा. सवत घरात आणली. त्यांचं लग्नच लावून दिलं. 

आता सरांच्या ब्रशचे फटकारे नव्या उमेदीने स्पंदित होऊ लागले. प्रत्येक फटका मधुर नादमय जाणवू लागला गरिबी मात्र पाठ सोडायला तयार नव्हती. तीसुद्धा कौशल्या – पूजा यांच्यासोबतच नांदत होती. कौशल्या बाईंना आता दोन – दोन सवती. एक गीता व दुसरी गरिबी त्यांच्या पोटची एक मुलगी व सवतीच्या दोन मुलींचा सांभाळ. मिळकत नियमित व निश्चित अशी नव्हती त्यामुळे संपन्नतेचा रंग त्यांच्या पॅलेटमध्ये कधी चढलाच नाही. म्हणतात ना की, नियतीने एखाद्याची परीक्षा घेण्याचे ठरविले की संकटांची मालिकाच सुरू होते. तिने डाव साधला. दिवाळीच्या दिवशीच त्यांच्या आयुष्यात अंधार दाटून आला. 

गीताचे साडीच्या पदराला दिवा लागल्यामुळे जळून निधन झाले. सर सैरभैर झाले. कौशल्याबाई पुन्हा एकदा आपल्या रंगदेवतेच्या मागे खंबीरपणे उभ्या झाल्या. आपलं सारं मातृत्व त्यांनी सवतीच्या दोन छोट्या बछड्यांना बहाल केलं. आता काळवंडलेल्या पॅलेटला पूर्वरूप येऊ लागले सुबत्तेचा रंग मात्र रुसूनच होता. जीवनाची फरफट सुरूच होती. रंगफकिराच्या कलाप्रवासात मात्र ग्रे छटा कधीच बाधा बनू शकली नाही.  व्यक्तिचित्रणात सरांचा हातखंडा होता. चेहऱ्याचा आतून शोध घेऊन तो कॅनव्हासवर किंवा कागदावर चितारणं म्हणजे यांच्या दाये हात का खेल, सामान्य माणसांसोबतच अतिसामान्य माणसांची व्यक्तिचित्रं त्यांना ख्याती देऊ लागली. गो . नी . दांडेकर, गंगाधर गाडगीळ, कवी अनिल डॉ . भाऊसाहेब कोलते, डॉ . वसंतराव देशपांडे, डॉ . श्रीराम लागू, नरहर कुरुंदकर, दादा धर्माधिकारी, मधुकर केचे, डॉ भालचंद्र फडके, राम शेवाळकर, म.ना. लोही, वसंतराव धोत्रे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सय्यद रजा, के.एच. आरा, याकुबभाई मलक, बापुसाहेब आठवले, विनायक मसोजी अशी ही यादी आणखी लांब होऊ शकते. व्यक्तिचित्रणाव्यतिरिक्त रेखाचित्र हा एक वेगळा अभ्यासाचा विषय. जीवनाचे एवढे वैविध्य पैलू दाखवणारी रेखाचित्रं माझ्या तरी पाहण्यात आली नाहीत. ते आपल्या रेखाचित्रांमध्ये एकीकडे स्त्रीच्या वेदना घालमेल मांडतात तर दुसरीकडे नारीच्या उत्तुंग भरारीच्या अभिलाषा मांडतात. नारीतला अनुराग – आसक्ती – अगतिकपणा – सामाजिक भय – बंदिस्तपणा – घायाळ मन – उद्ध्वस्त जीवन – आक्रंदन रेखाटतात. तसेच स्त्रीशक्तीचं रूपही त्यांच्या रेखाचित्रांमध्ये दिसतं. स्त्रीमधील वीरांगना तर वेळप्रसंगी ती दाखवत असलेली आपलं क्रोधरूप दिसतं अगदी चंडिका बनून तसेच तिचं सौंदर्यरूप – शृंगार – उन्माद – रूपगर्वित रूपक व लज्जाभाव हे सारं त्यांच्या रेखाचित्रात उतरतं. 

 डॉ . भारती सुदामे यांनी आपला प्रबंध ‘हिंदी और मराठी मनोवैज्ञानिक उपन्यासोंका अनुशीलन’च्या एका परिशिष्टात मोरघडे सरांच्या निवडक १५ रेखाचित्रांचा अभ्यास केला आहे . त्या म्हणतात या रेखाकृतींच्या प्रत्येक भागावर भाष्य करता येईल . त्यांच्या प्रत्येक रेखाकृतीत एक विशिष्ट अर्थ दडलेला आहे या रेखाकृतीमध्ये मनोवैज्ञानिक सृष्टीत सापडणारी विखंडता, हीनता, प्रभुत्वभावना, कामवासना, परिवर्तनाची भावना, सगळ्या गोष्टी सापडतात. 

सरांना आदिवासींचा विशेष लळा. त्यांचं जीवन, त्यांचं राहणीमान, त्यांची संस्कृती, त्यांचा पेहराव, त्यांचे दागिने यांचा सारा अभ्यास करण्याकरिता त्यांनी बस्तर, जगदलपूर, मेळघाट, पचमढी, भामरागड इत्यादी आदिवासी ठिकाणांना भेटी दिल्या. सोबत जनवादी साहित्याचे अभ्यासक प्रा . या . वा. वडस्कर असायचे. 

नंतर ‘ बस्तर एक हाट ‘ या शीर्षकाने त्यांनी आदिवासींना आपल्या चित्रांमध्ये साकार केले. 

अमूर्त चित्रांमध्येही त्यांनी हात आजमावला, ‘ वेदनेचे रंग ‘ नावाचे त्यांचे अमूर्त चित्रांचे प्रदर्शनही चांगलेच गाजले. आपल्या विविध रंगी अर्थात उदासी, दुःख, वेदनामय असलेल्या आयुष्यपटाची गोधडी या रंगफकिराने चितारली. 

सरांचं जुनं कवेलूंचं घर मला नेहमी रंगऋषीचा महाल वाटायचं . मात्र पावसाला सुरुवात झाली की कौशल्या आई व कलाश्री त्यांची छोटी लेक घरातील छोटी – मोठी भांडी शोधायला धावायच्या. कुठे कुठे लावायची? प्रत्येक वेळेस नवीन स्थान निवडायचं गळणारं पाणी. त्या वेळेस ‘ अरुण ‘ नावाच्या या रंगफकिराचं तेज गळून पडायचं. सर सैरभैर व्हायचे. त्यांच्या चेहऱ्यावरील अगतिकता मला स्पष्टपणे दिसायची. उभ्या आयुष्यात आपल्या आधारस्तंभाला व चिमण्या – पाखरांना आपण एक सुरक्षित छत देऊ शकलो नाही ही बोच त्यांना आतून सलायची. भांड्यात कोसळणारी प्रत्येक धार त्यांना आतून आणखी ओलचिंब करून जायची तो ओलावा मला त्यांच्या डोळ्यांत दिसायचा. (तो मलाही भेदरवून स्पर्श करायचा.) त्याला त्यांनी डोळ्यांच्या बाहेर येऊ दिलं नाही.

मातीच्या कुडाची एक जाडी भिंत आता आधार सोडायला लागली होती – भेगा जागोजागी स्पष्टपणे चिडवू लागल्या होत्या. एकदा मी सरांना म्हटलं सर या भिंतीला रंगवून टाका आणखी काही काळ तग धरून राहील. ते विमनस्कतेने हसले म्हणाले, ‘ आणि तरीही पडली तर ?? 

मी म्हटलं: 

हो जायेगा अमर, 

हर खंड रेखाओं में बसा हुआ 

रंगो में रचा हुआ… 

त्याच वेळेस त्या भीतिदायक भिंतीवर मी हिंदीत कविता लिहिली. यातील या शेवटच्या ओळी. 

अचानक नियतीनं त्यांच्या दिशेनं कूस बदलली. शहरालगत असलेल्या वडिलोपार्जित जमिनीचा सौदा झाला. काही वाटा यांना मिळाला. सर्वप्रथम त्यांनी जुनं घर तोडून त्या ठिकाणी सिमेंट – क्राँक्रिटचं घर बांधायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या सहचारिणी व आता मोठ्या झालेल्या पिलांना न गळणार कायमचं छत दिलं. मी म्हटलं गुरुजी, आता पावसाळ्यात भांडीकुंडी शोधावी लागणार नाही. ते खुदकन हसले अगदी तळातून त्यांच्या त्या हसण्याने मीसुद्धा मोहरलो अगदी तळातून. 

२००७ घर बांधून पूर्ण झालं परंपरेनुसार वास्तुशांती – पूजापाठ झाली. दिवसभराचा त्राण ताण आनंदात कुणालाच जाणवला नाही. नीजानिज झाली. कौशल्या आईंना मध्यरात्री खोकल्याची उबळ आली नि त्यांचा श्वास थांबला. नेहमीसाठी पुन्हा नियतीने आपला क्रूर खेळ सरांसोबत खेळला होता. या कणखर अवलियाला मी पहिल्यांदा कोसळताना पाहात होतो. वर्षानुवर्षे साठून राहिलेला तळातला ओलावा आता मात्र बांध फुटल्यागत बाहेर आला. 

रंगपॅलेट पार धुऊन निघाली – ब्रश थांबला. हा रंगऋषी पूर्णपणे उदासला. काळ्या रंगाव्यतिरिक्त कुठलाच रंग त्यांना दिसेनासा झाला . मला मूड शोधायची गरज नाही म्हणत झपाटल्यागत रंगांशी खेळणारा रंगफकीर आता आपल्या शिष्यांकरिता – स्नेहीजनांकरिता ‘ फिकर ‘ वाढवणारा झाला . मी फोन करून विचारायचो , सर कामाला सुरुवात केली का ? सर म्हणायचे नाही . हिंमत होत नाही ब्रश पकडायची . मूड बिलकूल लागत नाही मला मूडचा रोग नाही म्हणणारे सर जेव्हा खचून असे म्हणायचे तेव्हा त्यांच्यासोबत मीसुद्धा खचतोय असं मला वाटायचं . त्यांच्या त्या धबधब्यासारख्या कोसळणाऱ्या उत्साहात मी भिजत आलोय आणि आता हा धबधबा जवळपास आटल्यागत झाला होता.

 एखाद्या देवाच्या डोक्यावर एखाद्या माणसानं वावर केल्याचं कुणी कधी ऐकलं किंवा पाहिलं नसेल. मोरघडे सरांचा स्टुडिओच मारुतीच्या देवळावर होता . कित्येक वर्षं हा देव त्यांच्यावर कधी कोपला नाही . त्यांनी कधी स्टुडिओच्या पायऱ्या चढता – उतरताना त्या देवाला खूश ठेवण्यासाठी नमस्कार केला नाही . ना त्या देवाच्या दारात ते कधी गेले तरीही तो दगडी देव कोपलाच . 

आपल्या स्टुडिओत उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी घडवल्या आमच्या मैफिली तिथेच रंगायच्या . खूप आठवणी तिथल्या कौशल्या आई गेल्यानंतर तो स्टुडिओ ओकाबोका झाला . जेव्हा संपादक कवी- लेखक पुष्पेंद्र फाल्गुन यांना त्यांच्या ‘ फाल्गुन विश्व ‘ मासिकाचा ‘ मोरघडे विशेषांक काढायचा होता तेव्हा त्यांचा फोटो शूट करण्याकरिता मी, संगीता महाजन यांना तेथे घेऊन गेलो , तेव्हा त्या स्टुडिओची दशा पाहिल्यावर अक्षरश : मी पाणावलो एक उद्ध्वस्त कलामंदिर मी पाहात होतो . एवढ्यातच कळलं की , ती जागा त्यांनी तेथल्या धार्मिक विश्वस्त संस्थेला परत केली . तेथला मारुतीरायाही उदासला असावा . 

सुभाष तुलसीता आणि अरुण मोरघडे.

अरुण मोरघडे सरांवर डॉ . प्रा . रत्नाकर भेलकर सरांनी संपादित केलेलं ‘ रंगधून साज व गाज ‘ , नंतर मी पत्रकार संजय मेश्राम आम्ही संपादित केलेलं ‘ संगती रंगाची ‘ हे पुस्तक व अलीकडे चित्रकार प्रदीप पवार यांनी अगदी कलात्मक सौंदर्यदृष्टी ठेवून साकारलेलं अभ्यसनीय ‘कलात्मक रेखाचित्र’ हे पुस्तक प्रकाशित झालंय. 

युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांच्यासोबत अरुण मोरघडे.

२०१८ ला अरुण मोरघडे , दीनानाथ पडोळे व नाना मिसाळ या तिघांनी मिळून तिघांच्या आद्यक्षरावरून अनादी ‘ हे चित्रप्रदर्शन भरवलं आणि इथूनच सर पुन्हा रंग ब्रश – कॅनव्हासकडे वळले . अनादी ‘ चित्रप्रदर्शन म्युझियमच्या ( अजब बंगला ) तात्पुरत्या कलादालनात भरलं. रंग – रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला . चर्चा ऐकून युवा चित्रकार व कला संग्राहक मिलिंद लिंबेकर तेथे पोहचले . सरांची चित्रं बघून ते अचंबित झाले . त्यांनी सरांचं मोल ओळखलं. चित्र खरेदी केलीत व पुन्हा नवीन चित्र मालिका बनवण्याची विनंती करून ती करण्याची तयारी दर्शवली. 

आता सरांचा उत्साह पुन्हा धबधब्यासारखा बरसतोय . रोज पाच तास रंगकार्य करतात . मोठ्या साईजची १०० चित्रं तयार करायची आहेत म्हणतात . 

चित्रकार प्रभाकर पाटील व चित्रकार प्रा . विकास जोशी, विवेक जठार, संदीप डोंगरे आदींच्या सहकार्याने सरांच्या पेंटिग्सना या वर्षी मुंबईच्या जगविख्यात जहांगीर आर्ट गॅलरीत स्थान मिळाले. महाराष्ट्र शासनाने त्यांना रोख एक लाख, शाल व श्रीफळ देऊन कलामहर्षी म्हणून सन्मान केला . वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकार अरुण मोरघडेंचा कलाप्रवास नव्या अरुणोदयामुळे पुन्हा तेजोमय झाला . शुभेच्छा सर ! अनंत शुभेच्छा !!

*****

सुभाष तुलसीता 

  ९३७१५९९९२३

(हा लेख युगवाणी नियतकालिकामधून साभार)

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.