Features

रवी परांजपे सिंहावलोकनी प्रदर्शनाचा गोडवा !

रवी परांजपे हे भारतीय दृश्यकलेतील एक महत्वाचं नाव. त्यांनी आपल्यामागे आपल्या चित्रांचा खूप मोठा खजिना रसिकांसाठी ठेवला आहे. साठ वर्षाच्या प्रचंड मोठ्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रे काढली. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रवी परांजपे फौंडेशनतर्फे सिंहावलोकनी प्रदर्शनाचं आयोजन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी इथं करण्यात आलं आहे. 

हे प्रदर्शन म्हणजे रवी परांजपे यांच्या चाहत्यांसाठी एक अमूल्य भेट आहे.  या प्रदर्शनाचे ढोबळमानानं दोन भाग पडतात. एक म्हणजे त्यांच्या कला शिक्षण काळातील चित्रं, आणि दुसरा म्हणजे व्यावसायिक कारकीर्द बहरात असतानाची चित्रं. रवी परांजपे यांनी १९५८ मध्ये आपल्या कला कारकिर्दीची सुरवात केली.परांजपे यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत कायम प्रयोगशीलतेला प्राधान्य दिलं. त्यामुळे शास्त्रशुद्ध पध्द्तीनं केलेलं चित्रण आणि प्रयोगशीलता यांचा सुरेख संगम त्यांच्या चित्रात दिसून येतो. 

या प्रदर्शनानिमित्त आम्ही रवींद्र परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांच्याशी विशेष संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली की,” रवी परांजपे यांचं तंत्रशुद्ध चित्रांवरील प्रभुत्व हे निर्विवाद होतं. विशेषतः मेमरी ड्रॉईंगमधील त्यांचं प्रभुत्व बघून ऑफिसमधील त्यांचे ज्येष्ठ सहकारी कायम थक्क होतं असत. रवी परांजपे यांना प्रयोगशीलता आवडत असे, त्यामुळे ते काम करताना नवीन आव्हानांच्या शोधात असत. कामातील सफाईदारपणा, चित्रांमधील मोहकता यामुळे सगळ्यांनाच त्यांचं काम आवडत असे. याच गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांनी भारतातील कामांबरोबर परदेशातही अनेक व्यावसायिक कामं केली.” 

स्मिता ताई पुढे सांगतात की, “रवी परांजपे हे सतत कामात व्यग्र असत. असं असलं तरी चित्रकलेबरोबरच त्यांना संगीत, साहित्य यांची देखील प्रचंड आवड होती. त्यामुळेच कुटुंबाबरोबर भटकंती करत असताना यासाठी आवर्जून वेळ काढत. रवी परांजपे यांना शास्त्रीय संगीताची आवड उपजतच होती, त्यामुळे शास्त्रीय संगीतामध्ये करियर घडवावे असाही विचार त्यांच्या मनात होता. पण संगीत की चित्रकला या द्वंदात चित्रकला जिंकली ! आणि परांजपे यांनी चित्रकलेत आपली दैदिप्यमान कारकीर्द घडवली. असं असलं तरी संगीताचा खूप मोठा प्रभाव परांजपे यांच्या चित्रांवर आहे. त्यांच्या चित्रातील सुमधुर गोडवा हा संगीताच्या प्रभावातून आला आहे असं म्हणता येईल.”

Brief biography of artist Ravi Paranjape

ललितकलांबद्दलचा असा सुसंवादी दृष्टीकोन आणि अनेक दशकांच्या सखोल चिंतनातून परांजपे यांनी स्वतःचं कला तत्वज्ञान विकसित केलं. या तत्वज्ञानाला त्यांनी ‘डिझाईन आधारित संस्कृती’ असं नाव दिल. हे तत्वज्ञान इच्छा, ज्ञान, उद्देश, जागरूकता, नीतिमत्ता, वचनबद्धता आणि परोपकार या सात सद्गुणांवर आधारित आहे. परांजपे यांच्या मते कला ही सौन्दर्याधारित असावी. कलाकाराने सौदर्यानुभूती आत्मसात करावी आणि ती कलाकृतीत उतरवावी. अगदी सोप्या शब्दात परांजपे यांचं तत्वज्ञान सांगायचं तर “आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे ! ” असंच म्हणता येईल. थोडक्यात आपल्या कलाकृतीतून आनंद निर्मिती करावी आणि ती जगभर वाटावी एवढं सुंदर हे तत्वज्ञान आहे. हा सौन्दर्य विचार रवी परांजपे यांनी आपल्या पुस्तकातूनही मांडला. ब्रश मायलेज हे त्यांचे आत्मचरित्र आणि शिखरे रंग – रेषांची, नील – धवल ध्वजाखाली  हे दोन लेख संग्रह वाचकांना प्रचंड आवडले. 

‘Design based culture’ – Ravi Paranjape’s Art Philosophy

रवी परांजपे यांच्या कलाविश्वातील भरीव आणि सातत्यपूर्ण योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.  ज्यात बॉम्बे आर्ट सोसायटीचा ‘रूपधर जीवनगौरव पुरस्कार’, पुणे प्राईड पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा ज्येष्ठ कलाकार पुरस्कार यांचा समावेश आहे. कम्युनिकेशन आर्टस् गिल्डचा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. 

परांजपे यांच्या कलाकृती पाहिल्यास निसर्ग आणि मानवनिर्मित परिसर, मग ते ग्रामीण असो वा शहरी असो, सौंदर्याचा अनुभव नक्कीच मिळतो. त्यांनी चित्रित केलेल्या यंत्राच्या जाहिरातींसारख्या रुक्ष विषयांमध्येही परांजपे सरांनी आपल्या कुंचल्याने अक्षरश: प्राण ओतले आहेत. बोटातली ही जादू वर्षनुवर्षाच्या तपश्चर्येचं फलित आहे.  रवी परांजपे यांनी प्रत्येक चित्र प्रकारात खूप मोठं काम करून ठेवलं आहे.  पोर्ट्रेट, लँडस्केप, स्टिल लाइफ, अ‍ॅबस्ट्रॅक्ट, इलस्ट्रेटिव्ह ड्रॉइंग, थ्रीडी आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह रेंडरिंग्ज, जाहिराती, कॅलेंडर, चित्रपट पोस्टर, पुस्तकांची मुखपृष्ठे या सारख्या असंख्य प्रकारात त्यांनी काम केलं.  एवढं मोठं काम एका प्रदर्शनात मांडणं हे सोपं काम नव्हतं. पण रवी परांजपे यांच्या शिष्यांनी हे शिवधनुष्य सहजपणे पेललं हेच हे प्रदर्शन पाहून दिसून येतं. रवी परांजपे यांची प्रत्येक कलाकृती या टीमनी  व्यवस्थित तळटीपांसह सादर केली आहे. त्यामुळेच रसिकांनी हे प्रदर्शन पाहण्याची संधी चुकवू नये. 

1998 साली रवी परांजपे फाऊंडेशन  ची स्थापना करून रवी परांजपे यांनी कलाविश्वासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून कला प्रसारासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.  तरुण कलाकारांसाठी या फौंडेशनच्या माध्यमातून गुणी जन कला पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 

हे प्रदर्शन 26 जून 2023 पर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. परांजपे यांचे पुरस्कार विजेते पुस्तक ‘ब्रश मायलेज’ आणि परांजपे यांच्या चित्रांनी सजलेल्या विविध वस्तू रसिकांना खरेदी कारण्यासाठी  या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. 

रवी परांजपे फौंडेशनसंबंधी अधिक जाणून घेण्यस्तही  www.raviparanjape.org या वेबसाईटला भेट द्या.

****** 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.