Features

आठवणीतले बरवे !

मुंबईतली बहुसंख्य चित्रकार मंडळी ६ डिसेंबर हा दिवस सहसा विसरत नाहीत, कारण १९९५ साली याच दिवशी बरवे यांचं निधन झालं होतं. बहुसंख्य चित्रकार आणि चित्रकला क्षेत्रातली दिग्गज मंडळी या दिवशी चेंबूरच्या त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी किंवा सायन स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवर्जून उपस्थित राहिली होती. ज्यात त्यांचे मित्र प्रख्यात चित्रकार आणि कवी अरुण कोलटकर यांचाही समावेश होता.
आजच हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे आज १६ मार्च २०२३. आज चित्रकार बरवे यांचा जन्मदिवस. आज बरवे असते तर त्यांचा ८७ वा वाढदिवस साजरा झाला असता. पण तसे घडायचे नव्हते. बरवे यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या ‘डेस्टिनी’त ते नव्हतं. आज कलाक्षेत्र कुठल्या कुठं गेलं आहे. बरवे असताना ते कधीच जाणवलं नव्हतं. किंवा असा विचारही त्या काळात चित्रकार मंडळी करु शकत नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आज बरवे यांच्या चित्रांच्या किंमती देखील कोट्यवधींच्या घरात पोहोचल्या आहेत. अलीकडेच झालेल्या लिलावामध्ये बरवे यांच्या चित्राला विक्रमी किंमत आली आहे. आणि या किंमती पुढं वाढतंच जाणार आहेत. या साऱ्यावर विश्वास ठेवणं खरोखरच अवघड होतं आहे.
***
बरवे आणि माझ्या घरामध्ये केवळ एका डोंगराचं आणि रिफायनरीच्या रेल्वेलाईनचं अंतर होतं. ते कुर्ल्याच्या शिवसृष्टीमध्ये राहत असत आणि मी चुनाभट्टीच्या मोहन नगरमध्ये. मधे कसाईवाड्याचा डोंगर होता. कसाईवाड्याच्या डोंगराखालीच स्मशानभूमी होती. साहजिकच तो परिसर टाळून मी पुरव मार्गावरून व्हाया सिटीआय असा दूरचा प्रवास करीत बरवे यांच्याकडे जात असे.
खरं तर बरवे यांच्याशी परिचय झाला तो मी जेजेमध्ये शिकत असतानाच. तेव्हा देखील मी काहीना काही उपदव्याप करीत असे. जेजेत शिकत असतानाच मी ‘वेध’ नावाचं एक टंकलिखित अनियतकालिक सुरु केलं होतं. जेजेतले मित्र म्हणाले, एक अंक तू विव्हर्स सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन चित्रकार बरवे यांना दे ! बरवे यांचं नाव मी कॉलेजमध्ये असल्यापासून ऐकत होतो. मी कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्या ‘निळा ढग’ या चित्राला ‘ललित कला अकॅडमी’चं अवॉर्ड मिळालं होतं. मला आठवतं त्या निमित्तानं चित्रकार प्रभाकर कोलते यांनी बहुदा लोकसत्तेच्या रविवार पुरवणीत किंवा ग्रंथालीच्या पहिल्या अंकात त्यांच्यावर लेख लिहिला होता. दोन्हीही लेख वेगवेगळे होते, विस्मरणामुळं तपशिलात चूकभूल होऊ शकते. कारण तब्बल ४६ – ४७ वर्ष झाली आहेत त्याला. आणि ते सारं वाचून बरवे यांना भेटण्याची खूप उत्सुकता मनात निर्माण झाली होती.
साहजिकच विव्हर्समध्ये मी त्यांना भेटलोच. त्यांना अंक दिला. त्यांनी लागलीच खिशातून रुपया काढून मला दिला. अंकाची किंमत एक रुपया होती. मी तो घ्यायला नकार दिला तर ते म्हणाले असं नाही चालायचं. मी गपचूप तो रुपया खिशात ठेवला. खूप मोठ्या खिडक्या असलेल्या त्या विव्हर्स सर्व्हिस सेंटरच्या कार्यालयात किंचित काळोखच होता. एका मोठ्या खिडकी जवळ एक मांजर बसल्याचं मला आठवतंय. ( ती मांजर नंतर त्यांच्या एका चित्रात देखील दिसली होती ) बरवे यांनी अतिशय काळजीपूर्वक अंक हाती घेतला. शांतपणे त्यांनी तो पाहिला. चहा मागवला आणि मग ते बोलू लागले. ते काय बोलले त्यातला एकही शब्द मला आज आठवत नाही. पण त्यांचं तिथलं अस्तित्व हे भारावून टाकणारं होतं. तीच बरवे यांच्याशी झालेली पहिली भेट.

मला आठवतंय त्यावेळी मी प्रायोगिक रंगभूमी चळवळीत वावरत होतो. मला आठवतंय एकदा आमच्या ‘चल रे भोपळ्या’ किंवा ‘वासनाकांड’च्या प्रयोगाला रवींद्र नाट्यमंदिरात ते आले होते. सोबत दिलीप रानडे होते. अमोल त्यांच्याशी बोलत होता. पण मी काही त्यांच्याशी बोलायला गेलो नाही. आता त्यांनी विव्हर्स सर्व्हिस सेंटर मधली नोकरी सोडली होती. त्यानंतर अधनंमधनं ते जहांगीरमध्ये दिसू लागले होते. एल्फिस्टन कॉलेजच्या गल्लीतल्या एका कॅन्टीनमध्ये ते आपल्या मित्र परिवारासोबत बसत. हाय, हॅलो, नमस्कार वगैरे व्हायचं. पण प्रत्येक वेळी ते विचारायचे नाईक ना तुम्ही ! इतकंच.

८१ सालातली गोष्ट. मी कुठल्यातरी प्रदर्शना निमित्तानं जहांगीरमध्ये फिरत होतो. अचानक कुणीतरी मागे येऊन उभं राहिलं. पाहातो तर काय साक्षात बरवे. मी नमस्कार केला तर ते म्हणाले ‘नाईक ना तुम्ही ?’ मी होकार देताच म्हणाले ! अभिनंदन ! मला काही कळेचना. मी त्यांना विचारलं देखील. कशाबद्दल ? तर ते म्हणाले, ते नाही सांगणार. कळेलच तुम्हाला. आणि ते हसत हसत निघून देखील गेले. त्या वर्षीचा राज्य पुरस्कार मला मिळाला होता. आणि बरवे परीक्षक मंडळावर होते. खूप आनंद झाला होता त्यावेळी मला.

त्यानंतर पुन्हा भेट झाली तेव्हा मात्र त्यांनी काही नाव विचारलं नाही. पण म्हणाले घरी येत चला. कुठं राहता तुम्ही ? मी म्हटलं चुनाभट्टीला. तर ते हसले. म्हणाले जवळच आहे. जरूर घरी या. येण्याआधी फक्त फोन करा.

इथून माझ्या आयुष्यात बरवे एपिसोड सुरु झाला असं म्हणता येईल. पण ते सारंच मी आता काही लिहिणार नाहीये. कारण ‘चिन्ह’तर्फे बरवे यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित करण्याचं निश्चित झालं आहे. त्यासाठी मला बरंच काही लिहायचं देखील आहे. आणि माझा सारा आळशीपणा सोडून मी आवर्जून लिहिणार देखील आहे. ६ डिसेंबर २०२३ किंवा १६ मार्च २०२४ रोजी हा ग्रंथ प्रथम मराठीतून प्रसिद्ध होईल. आणि नंतर लगेचच तो इंग्रजीत देखील.

या ग्रंथात काय असणार आहे या विषयी मात्र मी आता काहीच सांगू इच्छित नाही. कारण या संदर्भातला  आधीचा अनुभव अतिशय वाईट आहे. त्यामुळं थोडीशी काळजी घेणं भाग आहे. एवढंच सांगेन की, ‘गायतोंडे’ ग्रंथा इतकीच त्या ग्रंथाची निर्मिती मूल्ये देखील श्रेष्ठ असतील याची खात्री बाळगा.

 ‘चिन्ह’च्या नेहमीच्या परंपरेप्रमाणं या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रकाशन पूर्व सवलत योजना वगैरे सर्व गोष्टींना फाटा देण्यात आला आहे. हा ग्रंथ थेट दिलेल्या तारखेला प्रसिद्धच होईल. या संदर्भातली सर्वच माहिती फेसबुकच्या याच Prabhakar Barwe पेजवरुन तसेच
www.chinh.in प्रसारित केली जाणार आहे. तुमच्याकडे जर बरवे यांच्या विषयी सांगण्यासारखे असेल किंवा बरवे यांचे दुर्मिळ फोटो वगैरे असतील तर आमच्याशी थेट संपर्क साधा.
बरवे यांच्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनेलवरील व्हिडीओ अवश्य पाहा. लिंक सोबत जोडली आहे.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.