Features

जेजेतली रोजगार हमी योजना !

जेजेत ‘न्यूड’ क्लास आणि शिक्षकच बेपत्ता या लेखाच्या दुसऱ्या भागात वाचा जेजेत ‘रोजगार हमी योजना’ कशी राजरोसपणे सुरु आहे. शिक्षक शिकवायचं काम सोडून सगळे उद्योग करत आहेत, त्यामुळे हे विद्यार्थी ‘चिन्ह’कडेच आपली कैफियत मांडत आहेत. अनेक होतकरु आणि गरजू विद्यार्थ्यांना कार्यानुभवाच्या नावाखाली वेठीस धरून त्यांच्याकडून बाहेरची कामं तर करून घेतली जातातच पण मोबदला देखील व्यावसायिक पद्धतीनं दिला जात नाही असा आरोप संबंधितांकडून केला जातो. खरं खोटं कुणास ठाऊक ? पण ‘चिन्ह’आता माहितीच्या अधिकारात अर्ज करणार आहे तेव्हा सारे स्पष्ट होईलच. पण त्याआधी विद्यार्थ्यांनी एक अफलातून उपाय सुचवलाय ! कोणता ? ते वाचा या लेखात. ते चार शिक्षक कुठं गेले होते हे मात्र वाचा उद्याच्या लेखात.

हा लेख काल संध्याकाळी आम्ही सर्व प्रथम फेसबुकवर लावला आणि नंतर तो ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर देखील लावला. दोन्हीकडे तो प्रचंड वाचला गेला / जातोय. फेसबुकवर तर या लेखाला मिळणाऱ्या प्रतिसादाचा झपाटाच इतका मोठा होता की रात्री ८ – ९ वाजेपर्यंत तासाला एक हजार फेसबुक फ्रेंड्स या गतीने ती पोस्ट वाचली गेली. सकाळी देखील मोठ्या प्रमाणावर लेख वाचला जात होता. त्याला लाईक्स देखील खूप आल्या आणि कंमेंट्स देखील.

काही विद्यार्थ्यांचे देखील फोन आले. म्हणतं होते “सर, अगदी अचूक लिहिलंय तुम्ही. लिहिलंय त्यातला एकही शब्द खोटा नाही. बहुसंख्य शिक्षक नियमितपणे येतच नाहीत आणि आलेच तर दिवसभर टिकत देखील नाहीत. गाडी समोर पार्क करून निघून जातात. म्हणजे ते कॉलेजमध्ये आहेत असं वाटावं. संध्याकाळी पुरेशी बेगमी झाली तर गाडी न्यायला मात्र येतात. जे कायम स्वरुपी शिक्षकांचं तेच हंगामी किंवा कंत्राटी शिक्षकांचं देखील. त्यातले देखील बहुसंख्य शिक्षक वेळेवर येत नाहीत किंवा वारंवार गैरहजर राहतात. त्यांना खरं तर कोणाचीच भीती नाहीये. डीन सरांना तर कॉलेजची काहीच पडलेली नाहीये.”

“ज्यांच्या अखत्यारीत हे कॉलेज येतं ते कला संचालनालय याचं कॅम्पसमध्ये आहे. पण त्यातल्या प्रभारी संचालकांना देखील कोणीही हिंग लावून देखील विचारत नाही. आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतो आहे असं तुम्हाला वाटेल. पण तुम्ही आमच्या वरच्या अन्यायाला वाचा फोडता म्हणून आम्ही तुमच्याशी आमचं म्हणणं शेअर करतो. नाही तर हे सारं सांगायचं तरी कुणाला ? असा आम्हाला प्रश्न पडतो.”

“मागच्या वेळी तुम्ही अगदी पुराव्यानिशी या शिक्षकांच्या अनुपस्थिती बद्दल लिहिलं होतं. दुसऱ्याच दिवशी बायोमेट्रिक मशीन बसवलं गेलं. पण पंधरा वीस दिवसात ‘येरे माझ्या मागल्या’ सुरु झालं. इथं कोणालाच कसलीच शिस्त राहिलेली नाही. अधिकाऱ्यांची एक तऱ्हा तर शिक्षकांची दुसरी. आणि आता तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखील यात सामील झाले आहेत. त्यांनी तर दोन आठवड्यापूर्वी ऑनड्युटी स्पोर्ट्स डे देखील साजरा केला. कुठलीही पूर्वसूचना न देता दिवसभर ते कामापासून दूर राहिले. कला संचालक दिवसभर ठणाणा करीत राहिले. ‘चिन्ह’नं त्याच दिवशी संध्याकाळी सणसणीत बातमी देखील दिली. पण पुढं काय झालं ? काहीच नाही. इथं कुणाला काही पडलेलीच नाहीये.”

“केवढी मोठी स्वप्न घेऊन या कॉलेजमध्ये प्रवेश केला होता. परिस्थिती नव्हती पण आमच्यापैकी अनेक जण कर्ज काढून इथं शिकायला आले. पण आल्यावर काही दिवसात अक्षरशः भ्रम निरास झाला. केवळ मीच नाही माझ्या सारख्या अनेक जणांचं हेच मत आहे. इथं व्यवस्थापन नावाची चीजच अस्तित्वात नाहीये. आपण आपली नेमणूक इथं शिकवण्यासाठी झाली आहे. याची जाणीवच शिक्षकांना नाहीये असं कधी कधी आम्हाला वाटतं.”

“काही शिक्षक तर चक्क या कॉलेज मधल्या आपल्या नेमणुकीचा उपयोग टेबल स्पेस म्हणून करतात. वाटेल तेव्हा यायचं मस्टरवर सही केली तर केली नाही तर नाही कंपाउंडमध्ये गाडी पार्क करायची आणि टॅक्सीनं मंत्रालयात किंवा कामाच्या ठिकाणी जायचं. काम आटोपल्यावर निवांतपणे कॉलेजमध्ये यायचं पार्क केलेली गाडी घ्यायची आणि घरी निघून जायचं. कुणीही त्याबद्दल इथं कोणालाही विचारत देखील नाही. या नोकरीत राहून कोट्यवधी रुपयांची काम करतात ही शिक्षक मंडळी. डेडलाईन जवळ आली की कॉलेजमध्ये येत देखील नाहीत.”

“काय तर म्हणे विद्यार्थ्यांना कार्यानुभव मिळायला हवा म्हणून आम्ही हे सारं करतो. मुलांना अक्षरशः मजुरांसारखे राबवून घेतात. माती मळायला लावतात किंवा रंगाचे कोट द्यायला सांगतात. ही आमच्या जेजेतली रोजगार हमी योजनाच आहे. दिवसाला ५०० ते १००० रुपये दिले की काम भागतं. अनेक मुलांची घरची परिस्थिती बरी नसते अशाच मुलांना हे बरोबर पकडतात आणि कामाला जुंपतात. दादरला कबुतर खान्याजवळ रोजंदारी मिळावी म्हणून सकाळी जे मजूर बसलेले दिसतात त्यांच्यात आणि आमच्या या मुलांमध्ये काहीही फरक नाही.”

“दोन मुलांनी तर त्या शिक्षकांना अतिशय बाणेदार उत्तरं दिली होती ‘आमच्या आई वडिलांनी जेजेमध्ये आम्हाला शिकायला पाठवलंय ते चांगला मोठा चित्रकार व्हावं म्हणून, चांगली चित्रकला शिकता यावी म्हणून. ही भिंत रंगवायची किंवा कशावरही रंग फासायची दुय्यम दर्जाची काम करण्यासाठी आम्ही जेजेत आलो नाही.’ हे त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अगदी सडेतोड शब्दात ऐकवलं होतं तेव्हा कुठे त्यांनी त्यांचा नाद सोडला. पण बहुसंख्य मुलं यांच्या सापळ्यात अडकतात आणि खरोखरचं शिकायच्या दिवसांचं आणि शिक्षणाचं वाटोळं करून घेतात. एखाद्या मुकादमासारखं या शिक्षकांचं वर्तन असतं कुठलीही दयामाया ते बाळगत नाहीत.”

“मध्यंतरी साबळेसर कला संचालक झाले तेव्हा त्यांनी या बाहेरच्या कामासाठी खास जीआर पास करून घेतला जणू काही याच कामासाठी ते कला संचालक झाले असावेत. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काही शैक्षणिक योजना त्यांनी राबवलीये असं कधी आम्हाला दिसलंच नाही. आमच्या सारख्या बारावी शिकलेल्या , वयात आलेल्या तरुणांशी कसं बोलायचं ? कसं वागायचं याचं साधं सामान्यज्ञान देखील त्यांना नाही . कारण त्यांच्या शारीरिक उंचीपेक्षाही जास्त उंच असलेल्या आम्हा विद्यार्थ्यांचा उल्लेख ते सतत ‘बाळ’ ‘ बाळा’ असा करतात. जणू काही ते एखाद्या किंटर गार्डन किंवा मॉन्टेसरीला शिकवतायत. त्यांचं बाळ आणि बाळा ऐकलं का कधीकधी संताप अनावर होतो . पण काहीच करता येत नाही. तेव्हा मात्र अगदी हतबल वाटतं . तुम्ही सर आमची दुःख जाणता म्हणून तुमच्याशी मोकळेपणानं बोलतो. कधी कधी तर वाटतं कुठं झक मारली आणि या कॉलेजात प्रवेश घेतला . सर, आमचं सगळं भवितव्यच अंधकारमय वाटतंय . सांगा काय करायचं आम्ही ? कुठं दाद मागायची ? कुठं फिर्याद करायची ? सर, तुम्ही हे एव्हडं आमच्यासाठी करताय ? या वयात देखील आमच्यासाठी लेखणी झिजवताय आणि याची कुणालाच काही पडलेली नाहीए याचं दुःख अधिक आहे सर !”

“सर, तुमचं लिखाण वाचून वाचून डोक्यात एक आयडिया आली आहे. सांगू का ? वेडपट सारखी वाटली तर सोडून द्या. आवडली तर आम्हाला मदत करा. जेजेतले आम्ही ७-८ विद्यार्थी एकत्र आलो आहोत. किंबहुना तुमच्या लिखाणानेच आम्हाला एकत्र आणलं आहे. तुमचं लिखाण वाचून वाचून आमच्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आली आहे. ती जर सर्व विद्यार्थ्यांना पटली तर आम्ही सारे विद्यार्थी मुख्यमंत्री सरांना भेटणार आहोत. आमच्यातलाच एक विद्यार्थी ठाण्यातला आहे. तो या कामी पुढाकार घेणार आहे. आम्ही शिंदेसाहेबांना सरळ जाऊन सांगणार आहोत की आता डिनोव्हो हे होणारच आहे. आता कला संचालनालयाला कामच काय उरलंय ? पुढल्या वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालं की डिप्लोमा आर्ट स्कूलना जी शेवटची घरघर लागलेली आहे, ती सारी बंदच पडणार आहेत. अशा वेळी कला संचालनालयाला काय काम उरणार आहे ? डिनोव्होमुळे जेजे कला संचालनालयाच्या हातातून निसटलं आहे. डिप्लोमा कॉलेजेस बंद होणार असल्यामुळे तिथंही कला संचालनालयाला काहीच काम उरणार नाहीये. राज्य कला प्रदर्शन हे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे वर्ग करावं. ते तरी नीट आयोजित करतील आणि उरल्या एलिमेंटरी इंटरमीजिएन्ट ग्रेड परीक्षा त्या शालेय शिक्षण मंडळाकडे वर्ग कराव्यात. म्हणजे मग कला संचालनालयाकडे काहीच काम उरणार नाही. त्यामुळे ही जागा डिनोव्हो कॉलेजला द्यावी आणि कला संचालनालय हे त्यांच्या विक्रोळीच्या नव्या जागेत शिफ्ट करावं. हवं तर तिथं त्यांना पत्र्याची शेड बांधून द्यावी आणि तिथं सध्याचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा सर किंवा साबळेसरांच्या हाती त्या शेडचा पदभार द्यावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सरकारची काम करण्यासाठी खुली परवानगी द्यावी. मग साबळे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिजेल तेवढी काम करावी. संपूर्ण महाराष्ट्राचंच त्यांनी सुशोभीकरण करावं कुणी त्यांना विचारणार देखील नाही. सर कशी वाटली आयडिया ?”

मी अक्षरशः अवाक झालो होतो. तो विद्यार्थी असं काही सुचवेल याची मी कल्पना देखील केली नव्हती. पण त्यांनी जे सुचवलं त्यात तथ्य होतं. जे जसं घडलं ते तसं या लेखात मांडलं. खरं तर काल जेजे स्कूल ऑफ आर्ट च्या कॅम्पसमधून गायब झालेले शिक्षक आणि अधिकारी कुठं गेले होते ? आणि गेले होते तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे चार्ज दिला होता का ? नसेल दिला तर का नाही दिला ? समजा एखादी दुर्घटना घडली असती किंवा अपघात झाला असता तर किंवा मागे एकदा कसाब आणि त्याचे सहकारी जेजेमध्ये घुसले होते तसा एखादा प्रसंग घडला असता तर संस्थेची जबाबदारी कुणाची होती ? डीन साबळे यांची की आर्किटेकचे प्राचार्य राजीव मिश्रा यांची ? का कला संचालनालयाचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांची ? का ज्यांच्या हाती जेजेच्या कारभाराची सूत्र आहेत ते मंत्रालयातले उपसचिव सतीश तिडके यांची ?

महाराष्ट्राचे शिक्षण सचिव विकास रस्तोगी आता तरी या गंभीर घटनेची दखल घेणार आहेत का ?

*****

– सतीश नाईक
संपादक चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.