Features

शि. द. फडणीस  ९७

शि.द. फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रा राजेंद्र जोशी यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट त्यांच्या  परवानगीने ‘चिन्ह’ च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी २९ जुलै रोजी ९८ व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने लेखिका चित्रा राजेंद्र जोशी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिलेला शुभेच्छा संदेश आणि त्यासोबत दिलेल्या शि.द.फडणीस यांच्या ‘ रेषाटन’ या आत्मचरित्रातील काही भाग सोशलमिडीयावर खूप लोकप्रिय ठरला आहे. चित्रा राजेंद्र जोशी यांच्या परवानगीने त्यांची ही फेसबुक पोस्ट ‘चिन्ह’ च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

आपल्या खेळकर – खोडकर व्यंगचित्रांनी, त्यातल्या निर्विष – अर्थपूर्ण विनोदांनी, भाषेचे सर्व अडथळे दूर सारून,निव्वळ हसायला लावणाऱ्या शि. द. फडणीस यांचा आज ९७ वा वाढदिवस आहे. ९८व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

यानिमित्ताने त्यांच्या ‘रेषाटन’ या आत्मचरित्रातील काही भाग देण्याचा मोह होत आहे.

आपल्या चित्र सुचण्या-काढण्याविषयी त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. खरंतर ते मूळ आणि सलग वाचावे असेच आहे. त्यातला काही भाग…

ते म्हणतात

“एक सनातन प्रश्न, कल्पना सुचते कशी? आणखी गमतीदार प्रश्न म्हणजे कल्पना कोण देतं? तयार चित्रकल्पना पुरवणारं कसलंही ‘दुकान’ अद्याप तरी उपलब्ध नाही. खरंतर माझ्याभोवती असणारी अगणित माणसं व घटना ही नित्य कल्पनांची उधळण करत असतात. त्यामानाने फारच थोड्या माझ्या हाताशी लागतात. विचार व कृती यातल्या विसंगती, अहंकार, ढोंग हा सारा कच्चा माल. हास्यचित्राला तो भरपूर मिळतो. अनेकदा तो छोट्याशा बीजरूपात असतो. सूक्ष्म असतो. हास्यचित्रकाराच्या बहिर्गोल भिंगातून ही बीजं मोठी दिसतात. तीच योग्य रचनेत चित्ररूपात मांडली की हास्यचित्र तयार होतं.”

“कल्पनांचा, सृजनाचा हा जो प्रवास आहे तो अबोध मनातला. साहित्य, चित्र, संगीत, नृत्य, काव्य अशा कोणत्याही कलाकृतीचा प्रवास याच मार्गाने होत असतो. चित्राचा प्रत्यक्ष कागदावरचा प्रवास हा जागृत मनःस्थितीतला. चित्र रेखाटनाच्या वेळी तुमचं रेखाटन कौशल्य हाताशी असतं जे तुम्ही कलाशिक्षणातून मिळवलेलं असतं. हास्यचित्र हे विचारातील विसंगतीवर बोट ठेवतं. म्हणजे काय होतं? जे प्रस्थापित आहे, रुळलेलं आहे त्याला छेद देणारं दृश्य म्हणजे चमत्कृती. अशा वेळी काय होतं? सारासार विचारापासून दूर गेलेली घटना ही हास्यचित्राचा विषय होते. हास्यचित्राचं जवळचं नातं विद्वत्तेपेक्षा शहाणपणाशी (विजड्म) आहे. हास्यचित्र अनेकदा योग्य विचार सांगणारा, किंवा माणसाच्या उणिवा दाखवणारा आविष्कार असतो. राजकीय टीकाचित्रांत तो प्रहार करतो. काही हास्यचित्रं कवितेच्या अंगाने जाणारी निर्मळ, स्मित हास्य जपणारी असतात. काही हास्यचित्रं अंतर्यामी गंभीर. काही दोन स्तरांवर संवाद करणारी. शैक्षणिक भूमिकेत असणारी हास्यचित्रं गमतीदार पद्धतीने पण क्लिष्ट संकल्पना सुबोध करतात. रूक्ष विषयात थोडी हिरवळ आणतात. काही हास्यचित्रं निखळ आनंद देणारी. खळाळून हास्याची उधळण करणारी. त्यांचं मोलही वेगळं व मोठं असतं. ही चित्रं उदासीन व काळवंडलेल्या मनात प्रकाश आणतात. ताणविरहित आनंदी जीवनाची एक सर घडवून आणतात. ती मनाचं, पर्यायाने शरीराचंही आरोग्य ठणठणीत ठेवतात असा वैद्यकशास्त्राचा निष्कर्ष आहे. ही निर्विष हास्यचित्रं कोणताही संदेश देत नसतात. तशी अपेक्षाही नसते. हास्यचित्र पाहताच खळाळून हसण्याची दाद मिळणं इथेच त्या चित्राचं सार्थक व सफलता असते.”

शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या फडणीस सरांकडे बघताना याची प्रचिती येते. त्यांच्या चित्रांमध्ये तोच-तोचपणा नाही. याविषयी ते लिहितात,

“नवीन निर्माण करायचं तर प्रस्थापित, रुळलेलं, साचेबंद अशा साऱ्या कल्पनांशी संघर्ष करत वाट काढावी लागते. अनेक नवीन चित्रकल्पना मी पूर्ण केल्या. वर्षं लोटली. तशी एक वेगळाच प्रश्न मला सतावू लागला. अनेकदा मी चित्रकल्पनांचे पर्याय शोधू लागतो. अनेक कच्ची रेखाटनं झाल्यावर असं आढळतं की मी पूर्वी केलेल्या चित्रकल्पनाच पुन्हा वेषांतर करून माझ्यापुढे आलेल्या आहेत. हे लक्षात येताच त्यांना डावलून नव्याचा शोध सुरू होतो.”

“प्रत्येक वेळी सर्वस्वी नवं व चाकोरीबाहेरचं चित्र निर्माण होणं अतिशय कठीण असतं. मात्र अशी नवीन चित्रकल्पना जेव्हा तयार होते तेव्हा मला स्वतःलाही क्षणभर दचकायला होतं. त्याचं वेगळेपण हे प्रथम परकं वाटतं. हा अनुभव मी मोहिनीच्या १९५२च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे वेळी घेतला. बस-स्टॉपवरचा तो व ती, उंदीर व मांजरांचे प्रिंट्स असलेले कपडे. रंगांचे फ्लॅट पॅचेस. हे चित्र दिवाळी अंकाचं कव्हरचित्र ? मला व संपादक अनंत अंतरकरांना हे सर्व जोखमीचं वाटलं. पण वाचकांना वाटलं नाही. त्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं.”

‘हसरी गॅलरी’ ह्या चित्र-प्रदर्शनाच्या माध्यमातून, ‘चित्रहास’सारख्या प्रात्यक्षिक देणाऱ्या कार्यक्रमांतून व्यंगचित्रांकडे बघण्याचा निखळ, निकोप दृष्टीकोन त्यांनी रुजवला.

ज्या काळात त्यांनी व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली त्याविषयी ते लिहितात,

“त्या वेळी विद्यार्थी मित्रांमध्ये सहज संवाद व्हायचा, “अरे, व्यंगचित्र एकदम सोपं. समोरच्या माणसाचं प्रमाणबद्ध रेषेत पोर्ट्रेट काढायला लाग. जमलं तर व्यक्तिचित्र नाही जमलं तर व्यंगचित्र नक्कीच होईल!” यावर हशा. अशा भावनेतूनच व्यंगचित्रकलेकडे पाहत होतो. कला म्हणून कोणतीही अपेक्षा त्या वेळी मनात नव्हती. आज थोडी करमणूक होतेय. पाहू या गंमत. नंतर ही वाट सोडून द्यायची आहे, एवढीच माफक समजूत. या गोष्टीला आता साठ वर्षं उलटून गेली. या हास्यचित्रकलेची विविध रूपं अजून संपत नाहीत. त्यातल्या खोलीचा तळ दिसत नाही. माझ्यातल्या सृजनशक्तीला सतत आव्हान देत हे चित्र हसतं आहे. प्रत्येक चित्रागणिक मला व रसिकांना आनंद देणारी विलक्षण कला, असं त्याचं स्वरूप माझ्यापुढे आहे. चित्रकलेतील या शाखेकडे मी याअगोदरच यायला हवं होतं असं आता वाटतं. पण व्यंगचित्रकलेच्या औपचारिक शिक्षणाची सोय कलामहाविद्यालयात नव्हती व आजही नाही. मी निसर्गचित्रं केली. स्केचेस केली. पोर्ट्रेट्स केली. वास्तव शैलीतील रेखाटनांतून कथाचित्रं व पुस्तकांची मुखपृष्ठं केली. कोथरूडच्या हसरी गॅलरी प्रदर्शनात अशा चित्रांचं एक स्वतंत्र पॅनेल ठेवलं होतं. त्या पॅनेलचं शीर्षक होतं, हास्यचित्राची वाट चित्रकलेतून जाते’. आता हे शीर्षक बदलावंही वाटतं, ‘ही वाट नवकलेतूनही जाते’. हास्यचित्राला कोणताही पंथ, शैली, प्रकार याचं वावडं नाही. विश्वातील कोणताही विषय हास्यचित्राला वर्ज्य नाही.”

फडणीससर, जीवेत् शरद: शतम् !!!

सृजनाचा हा स्त्रोत त्यांच्यामार्फत पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोचून फुलत बहरत राहो ही आजच्या दिवशी प्रार्थना!

हे पुस्तक २०११ साली लिहिलेलं, म्हणजे आता २०२२ साली फडणीसांच्या  कारकिर्दीला सत्तर वर्षं उलटून गेली. या क्षेत्रातील त्यांचे अनुभव ‘रेषाटन’ या पुस्तकात मुळातून वाचण्यासारखे आहेत. माझ्यासारख्या वाचनप्रेमी, चित्रप्रेमींना यातून चित्रकलेविषयी नवी जाण मिळते. मला खात्री आहे की चित्रकला विद्यार्थी, शिक्षक अशांसाठीदेखील हे लेखन बहुमोलाचं आहे.

(चित्रा राजेंद्र जोशी यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार)

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.