Features

सचिव साहेब या प्रश्नांची उत्तरं द्याल?

१९ ऑक्टोबरला जेजेत जो समारंभ झाला त्यानं कलाशिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. उदाहरणार्थ जेजेचं सारं झालं. पण कला संचालनालयाचं काय? अनुदानित विनाअनुदानित कला महाविद्यालयांचं काय? कला संचालनालयाच्याच अखत्यारीत येणाऱ्या या प्रश्नांची सोडवणूक कला संचालनालय कधीच करू शकलं नाही. आणि आता कला संचालनालय ज्यांच्या अखत्यारीत येतं ते महाराष्ट्राचे शिक्षण सचिव मात्र आता म्हणू लागलेत की चित्रकला हा विषय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा. तुम्हाला नाही वाटत ही त्यांची विधानं परस्पर विरोधी आहेत म्हणून.  

शिमगा गेला तरी कवित्व संपत नाही असं म्हणतात. जेजेच्या संदर्भात हे उदाहरण अगदी चपखलपणे लागू पडतं. डिनोव्हो दर्जा जाहीर करण्यासंदर्भात जो कार्यक्रम १९ ऑक्टोबर रोजी जेजेमध्ये पार पडला. त्या कार्यक्रमात शिक्षण सचिव श्री विकास रस्तोगी यांनी केलेलं भाषण अतिशय लक्षणीय होतं. श्री रस्तोगी यांच्या सोबत एक दोन वेळा संवाद साधण्याचा प्रसंग डिनोव्हो आंदोलनाच्या वेळी आला होता. सर्व साधारणपणे भारतीय प्रशासनिक सेवेतले (आयएएस) अधिकारी ज्या पद्धतीनं समोर बसलेल्या व्यक्तीला आपल्या मनात काय चाललं आहे याचा थांगपत्ता देखील लागू न देता ज्या पद्धतीनं शांतपणे काम करतात तीच पद्धती श्री विकास रस्तोगी यांनी शिक्षण सचिव पदाचा कारभार चालवताना स्वीकारली असल्याची प्रचिती आपल्याला लगेचच येते.

पण त्या दिवशीचं भाषण मात्र याला अपवाद ठरावं. एक तर समारंभ अतिशय सुविहितपणे आयोजित करण्यात आला होता. जेजेचं मूळचं सौन्दर्य सजावटीमुळं अतिशय खुलून आलं होतं. आणि आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केल्यामुळं जेजेचं आवार त्या दिवशी अत्यंत फुलून गेलं होतं. सारंच वातावरण अगदी आनंदी होतं. त्यातच समारंभाचे प्रमुख अतिथी श्री धर्मेंद्र प्रधान यांनी औपचारिकपणाचा बुरखा चक्क बाजूला काढून ठेवल्यामुळं वातावरण अतिशय सुखद झालं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर किंवा महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर इत्यादी मंडळी अत्यंत सहजपणे वावरत असल्यामुळं व्यासपीठावरच नव्हे तर प्रेक्षागृहात देखील मोकळं वातावरण तयार झालं होतं. या मोकळ्या वातावरणाच्याच परिणामामुळं बहुदा यांनी आपला नेमस्तपणा सोडून विकास रस्तोगी आपल्या भाषणात काही महत्वाचे मुद्दे मांडले असावेत. त्यातला एक मुद्दा मला अतिशय भावला आणि प्रत्यक्षातला विरोधाभास देखील दाखवून गेला.

असं कोणतं विधान केलं त्यांनी? तर ते म्हणाले ‘राज्यानं आता चित्रकला शिक्षण हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’ खूप टाळ्या मिळाल्या या त्यांच्या विधानाला. माहोलच तसा सकारात्मक होता त्या दिवशी. त्यामुळे कलाशिक्षणाशी संबंधित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या खास.

मला मात्र विकास रस्तोगी यांचं हे विधान ऐकताच खरोखरच हसू फुटलं. का ते जरा सविस्तरच सांगतो. १९६५ च्या सुमारास शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात कला संचालनालयाची स्थापना झाली. साहित्य, चित्रपट, संगीत, नाटक यांच्या प्रमाणेच चित्रकलेचादेखील प्रसार व्हावा, प्रचार व्हावा या हेतूनं ही कला संचालनालयाची स्थापना केली गेली. केवढा तरी प्रगत दृष्टिकोन होता या मागे. कला संचालनालय स्थापन झालं ते भारतातील सर्व राज्यात एकमेव होतं. आज बरोब्बर ५८ सालांनंतर देखील संपूर्ण भारतातील सर्व राज्यात ते एकमेवच आहे. केवढी दूरदृष्टी होती या निर्णयामागं.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ७६ वर्षात भारतातील एकही राज्य असा दृष्टीकोन असलेला निर्णय घेऊ शकलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच जेजेतलं शिक्षण महत्वाचं ठरलं. अन्य राज्यांना ते वाकुल्या दाखवू लागलं ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी आणि पहिले कला संचालक दादा आडारकर यांच्या मनात नक्कीच त्यावेळी स्वतंत्र कला विद्यापीठाची संकल्पना आकार घेत असणार. पण उगाच धाडस नको म्हणून कदाचित त्यांनी कला संचालनालयाचं प्रारूप स्थापन केलं असणार. नंतरची पिढी त्यात भर घालील आणि कला विद्यापीठ स्थापन करील असाही विचार त्यांनी केला असणार.

बाबुराव सडवेलकर कला संचालक असेपर्यंत सारे काही सुरळीत चालले होते. बाबुरावांच्या नंतर प्रभारी कला संचालक प्रा शांतीनाथ आरवाडे यांनीदेखील आधीच्या कला संचालकांचं कामकाज पुढं चालवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत महाराष्ट्रात सत्ता पालट झाला होता. आधीच्या राज्यकर्त्यांची जागा नव्या राज्यकर्त्यांनी घेतली होती. नव्या राज्यकर्त्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणं कामकाजाला सुरुवात केली आणि तिथंच कला संचालनालयाच्या कारभाराला नाट लागला. ज्यांची शिपाई होण्याचीदेखील लायकी नव्हती असे लोकं कला संचालक म्हणून नेमले गेले आणि महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचा खेळखंडोबा होण्यास सुरुवात झाली. आजतागायत मागील पानावरुन पुढल्या पानावर अशा पद्धतीनं तेच सारं सुरळीतपणे चालू आहे.

मी आता पुन्हापुन्हा त्याचा उच्चार करू इच्छित नाही. याविषयी मी सातत्यानं लिहिलं आहे. ‘चिन्ह’चा ३५० पानी ‘कालाबाजार’ विशेषांकदेखील काढला आहे. ज्यांना तो वाचायचा असेल त्यांनी ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर जरूर वाचावा. या साऱ्या अनागोंदी कारभारात १६६ वर्षाच्या जे जे स्कूल ऑफ आर्टचीदेखील वाताहत झाली. त्यावर प्रचंड टीका आणि लोकजागृती केल्यांनतर आता कुठे शासनाला जाग आली आणि जेजेला डिनोव्हो दर्जा जाहीर केला गेला.

ही अशी सारी भयानक पार्श्वभूमी असताना राज्याचे शिक्षण सचिव चित्रकला शिक्षण हा विषय मुख्य प्रवाहात आणण्याच्या गोष्टी करतायेत. त्यांचे हेतू उदात्त आहेत यात शंकाच नाही. पण हे सर्व करायला त्यांना कुणी अडवलं होतं? त्यांना म्हणजे वैयक्तिक अर्थानं मी म्हणत नाही पण आजवर भारतीय प्रशासनिक सेवेतील ज्या ज्या अधिकाऱ्यांनी शिक्षण सचिव पदाचा कारभार चालवला त्यांची ही जबाबदारी नव्हती? त्यांना कुणी अडवलं होतं? ठीक आहे त्यांना ही दूरदृष्टी नव्हती असं आपण क्षणभरासाठी समजू. पण मग गेल्या पंचवीस-तीस वर्षात कला संचालनालय आणि जेजे यांच्या कारभारात जे जे गैरप्रकार झाले त्यावर हे सारे अधिकारी मूग गिळून का गप्प बसले? या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्यापाशी?

जेजेतल्या एका अधिकाऱ्यानं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकात भेसळ केली. काय झाली कारवाई त्याच्यावर? जेजेतल्याच दुसऱ्या अधिकाऱ्यानं कोट्यावधी रुपये किंमतीची दीडशे दुर्मिळ चित्रं जाळून टाकली. काय झाली कारवाई त्यावर? काहींनी तर जेजेच्या सीट्स विकायला काढल्या. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले. काय झाली कारवाई त्यावर? एक शिक्षक तर जेजेच्याच नोकरीत असताना शस्त्रास्त्र विक्रीचं काम करायचा. काय झाली कारवाई त्याच्यावर? दुसरा शिक्षक तर जेजेत फोन करून मुख्यमंत्र्यांच्या आवाजात ऑर्डर द्यायचा. काय झाली कारवाई त्याच्यावर? कला संचालनालयातल्या एका अधिकाऱ्यानं तर जातीचा खोटा दाखला दाखवून महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाची वाताहत केली. काय झाली कारवाई त्यावर?

जेजेला दीडशे वर्ष पूर्ण झाली तेव्हा लाखो रुपये खर्चून जेजेमध्ये कॉम्प्युटर लॅब सुरु केली गेली. गेल्याच वर्षी ती विनावापरामुळं मोडकळीला काढली गेली. काय झाली कारवाई त्यावर? एका विद्यार्थिनीला मनस्ताप दिल्यामुळं शिवसेवा महिला आघाडीच्या महिलांनी जेजेतल्या एका कंत्राटी शिक्षकाला उघडंनागडं करून बडवलं. काय झाली कारवाई त्यावर? जेजेतले एक अधिकारी आणि काही शिक्षक शिक्षण देण्याचं काम सोडून कोट्यवधी रुपयांची धंदेवाईक कामं करत आहेत. काय झाली कारवाई त्यांच्यावर? जेजेमधलं फर्लांग दीड फर्लांग लांबीचं गटार बांधण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च झाले. केली कारवाई त्यांच्यावर? २५०-३०० विद्यार्थिनी जिथं शिकतात त्या जेजेमध्ये विद्यार्थीनींसाठी साधं प्रसाधनगृह नसल्यामुळं विद्यार्थी संपावर गेले. केली कारवाई संबंधितांवर? अनुदानित कला महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांना एरियर्सचे पैसे मिळू नये म्हणून मंत्रालयातल्या ज्या अधिकाऱ्यानं अडवणूक केली आणि संभाजीनगरात तोडपाणी करून घेतलं. ‘चिन्ह’नंच बातमी प्रसिद्ध केली. केली तुम्ही संबंधितांवर कारवाई?

उच्च व तंत्र शिक्षण विभागातला एक अधिकारी कला संचालनालयाची गाडी घेऊन धुळ्याला गेला किंवा धुळ्याहून आला. ही बातमीदेखील ‘चिन्ह’नं प्रकाशित केली. काय केलीत तुम्ही त्याच्यावर कारवाई? सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे १६६ वर्षाच्या जेजेच्या इतिहासात जेजेची मान्यता काढून घ्यायची वेळ ज्यानं यूजीसीवर आणली त्या अधिकाऱ्यांवर केली काही कारवाई? प्रश्न विचारत बसलो तर चांगलं ५०० पानांचं जाडजूड पुस्तक तयार होईल, पण प्रश्न संपणार नाहीत. त्यामुळे आता आवरतं घेतो. पण दोन गोष्टी मात्र जाताजाता सांगितल्याशिवाय मात्र राहवत नाही. बिल न भरल्यामुळं अनेक वर्ष जेजेचे दूरध्वनी एमटीएनएलनं  कापले होते. किंवा बिलच न भरल्यानं बेस्टनं विजेचा पुरवठा तोडला होता. इतकी भयंकर परिस्थिती जेजेवर कुणी आणली? झाली त्यांच्यावर कारवाई? जेजेपासून दोन किलोमीटर अंतरावर मंत्रालय आहे. याच मंत्रालयात शिक्षण सचिव बसतात. जेजे आणि कला संचालनालयाचे डेस्क याच मंत्रालयात बसतं. त्यांचं हे काम नव्हतं?

शिक्षण सचिव महाशय अलीकडचा सर्वात भयंकर प्रकार सांगतो. पावणेदोनशे अध्यापक – प्राध्यापकांच्या पदांपैकी निम्मी पदं लोकसेवा आयोगातर्फे भरायची आणि निम्मी पदं डिनोव्होतर्फ़े भरावयाची असा निर्णय शिक्षणमंत्री चंद्रकांतदादांनी घेतला असताना त्या मीटिंगचे मिनिट्स फिरवले कुणी? कुणी दाखवली एवढी हिंमत? तुम्हीदेखील त्या मीटिंगला उपस्थित होता ना? मग तुम्ही का नाही हे थांबवलंत सारं? समजा लोकसेवा आयोगातर्फे ही पदं भरली गेली आणि गेल्या पंधरावीस वर्षात जी वशिल्याची धेंडं येऊन ज्यांनी जेजे आणि कला संचालनालयाच्या कारभाराचा अक्षरशः बट्याबोळ केला त्यांनाच आता निवडलं जाणार नाही कशावरून? आधीच्यांनी जे धिंडवडे काढले ते पुरेसे नाहीत का? आणि आता तर तुम्ही जाहीरपणे चित्रकला हा विषय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे असं सांगताय. हे परस्परविरोधी वागणं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मला कल्पना आहे की जेजेला डिनोव्हो दर्जा मिळण्यामागं तुमचा वाटा खूप मोठा आहे. तुमचं श्रेय मी अगदी मनापासून मानतो. पण मग मी जे वर प्रश्न उपस्थित केले आहेत त्याचं काय? त्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? कुणीतरी कधीतरी ती द्यायलाच पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला?

सतीश नाईक 

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.