Features

सम… .. . !

आज भारतीय शास्त्रीय संगीतातील विख्यात गायक उस्ताद अमीर खान यांची पुण्यतिथी. सर्वच ललितकला या एकमेकांशी आस्वाद आणि साधना यांच्या धाग्याने गुंफलेल्या असतात. विष्णुपुराणात सांगितल्याप्रमाणे एखादी कला शिकायची असेल तर बाकीच्या ललित कलांचे शिक्षणही अपरिहार्य आहे. असेच काही कला आस्वादाचेही असते. जो संगीताचा आस्वाद उत्तम घेईल त्याला अमूर्त चित्रातील अनवट जागाही सापडतील. चित्रकार आणि शास्त्रीय गायक सुनील बोरगांवकरांनी उस्ताद अमीर खान यांचं संगीत आणि गायतोंडे यांची चित्रं यातील सौंदर्यस्थळे या लेखातून उलगडून दाखवली आहेत. “तुमचं ते शास्त्रीय संगीत कळत नाही बुवा”, किंवा चित्रकलेतील अमूर्तता दुर्बोध आहे असे म्हणणाऱ्यांची हा लेख नक्कीच प्रेरणादायक ठरेल.

माझ्या निवांत अस्ताव्यस्त खोलीतील एकांत अवकाशात उस्ताद आमिर खाॅंसाहेबांचा ‘मारवा’ दरवळत होता. ‘पिया मोरे आ’ च्या शुद्ध धैवतावर खाँसाहेबांनी आपल्या खर्जातल्या जव्हारीदार मखमली, निशब्द शांततेचा स्पर्श असलेल्या आवाजात ‘सम’ ठेवली आणि मला शांत,भव्य प्राचीन मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यासारखं वाटलं !
खाँसाहेबांनी त्यांच्या त्या धीरगंभीर अंदाजात विलक्षण ठहरावासह अमूर्त अवकाशावर विलंबित झुमऱ्यानं आखून दिलेलं ते १४ मात्रांचं आवर्तन पूर्ण करत नक्षत्रांसारख्या सुंदर स्वराकृतींची लयदार नक्षी कोरत शांतपणे ठेवलेली ती नादमय सम माझ्या आत दरवळत रेंगाळली अन् त्या क्षणात काळ-वेळ-अवकाश वगैरेतील भेद विरघळून गेला … फक्त स्तब्धता…तन्मय अस्तित्व उरलं ! कुठलाही अतीरंजीत आविर्भाव न घेता अतिशय अलगद आलेली, संपूर्णत्वाने न्हालेली ती नादयुक्त सम माझ्यासाठी अक्षर सौंदर्य क्षण घेऊन आली होती ! एक आवर्तन पूर्ण झालं होतं !

विलंबित झुमऱ्याच्या प्रत्येक आवर्तनानंतर येणारी सम मला प्रत्येक वेळी एक स्वतंत्र मैफलच पूर्ण झाल्यासारखा आनंद देत होती.

एका मात्रेमधील अमूर्त काळ अलगदपणे ओंजळीत घेऊन तो पुढच्या मात्रेवर समर्पयामि करत, मधल्या अवकाशात सांगितीक भाषेत सुंदर विचारशिल्प रचत, तालानं आखून दिलेलं आवर्तन पूर्ण करत समेवर येण्याचा अद्भुत अंतिम क्षण येतो… जसं झाडाचं पान त्याचं एक जीवन-आवर्तन पूर्ण करून हवेवर अलगद तरंगत, घरंगळत जमिनीवर नेमक्या ठरलेल्या ठिकाणी स्थिरावतं , ती त्याची ‘सम’ असते !… समेवर येणं म्हणजे संपूर्णत्वाचा स्पर्श असलेला, संतृप्तीचा गंध असलेला अद्भुत प्रशांत क्षण ! तिथेच त्या संपूर्ण, तृप्त क्षणाचा अंत्यसंस्कार अन् तिथेच पुनर्जन्म … संपूर्णत्वानंतर पुन्हा पूर्णाकडे सुरवात… पुन्हा नवं आवर्तन !

त्या आवर्तनातील तो सांगितीक विचार पूर्ण करत अचूक नेमका क्षण पकडून अलगद समेवर आल्यानंतरचा आणि मग तो नाद अवकाशात विरून गेल्यानंतरचा चित्त स्थिर करणारा शांत स्तब्ध क्षण…
चित्तं स्थिरं यस्य विनावलम्बं
स ब्रह्मतारान्तरनादरूप:॥
परम शांतीचा, पूर्णपणे एकवटलेल्या भानाचा तो अलौकिक क्षण श्वासांच्या आवाजाने नासवू नये…!

गायतोंडे सरांचं हे एक अप्रतिम चित्र !
हे चित्र…ही सुंदर दृश्य-मैफल नेमक्या समेवर येऊन पूर्ण होण्याचा दृश्यक्षणही असाच संपूर्णत्वाने युक्त, आणि प्रकाशमान आहे !
संपूर्ण चित्र अवकाश, त्यातील सारे अव्याख्येय सुंदर दृश्यक्षण, सारे सौंदर्यपूर्ण दृश्य विचार… या सर्वांसह या चित्रातील दृश्य मैफल पूर्णत्वास नेणारी ‘सम’ म्हणजे तो सुंदर पांढरा शुभ्र पॅच!

हे चित्र इतकं सुंदर आहे, दृष्टी फिरेल तीथे तीथे दृष्टी खिळवून ठेवणारे सौंदर्य क्षण,… कुठेही कितीही पाहिलं, कितीही आवर्तनं केली तरी दृष्टी पुन्हा पुन्हा त्याच पांढऱ्या शुभ्र समेवर येत राहते !

गायतोंडे सरांसारख्या सिद्धीप्राप्त चित्रकाराने चित्रात ठेवलेला तो पांढराशुभ्र पॅच या चित्रासाठी संपूर्णत्वाचा क्षण घेऊन येतो !
या पांढऱ्या पॅचमुळे समेच्या क्षणानंतर येणारी अनिर्वचनीय विलक्षण स्तब्धता, मौनावस्था या चित्रात उरते !
या चित्रात इतरत्र कुठेच न वापरलेल्या, इतरत्र कुठेच दर्शन न देणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या या एकमेव अखंड पॅचमुळे अनुभवास येणारा हा दृश्य अनुभव अद्भुत आणि थक्क करणारा आहे !
हा पांढरा शुभ्र पॅच लावता क्षणी चित्राला संपूर्णत्व प्राप्त झालंय असं जाणवतं !

कसलाही प्रयास न जाणवू देता, पराकोटीच्या सहजतेने समेवर येऊन विलक्षण स्तब्धतेचा अनुभव देणारे… आपल्याला पाहायला, ऐकायला शिकवणारे… त्यातील सम पकडायला शिकवणारे… यांच्या सम हेच !

काय या संतांचे मानूं उपकार |
मज निरंतर जागविती ||
अशीच काहीशी माझी भावना आहे !

उस्ताद आमिर खाँसाहेब, गायतोंडे सर या दोन्ही ऋषीतुल्य, सिद्धीप्राप्त कलावंतांपुढे नतमस्तक !

*****

– सुनील विनायक बोरगांवकर

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.