Features

लढा अस्मितेचा, अस्तित्वाचा !

डॉ. स्मिता गीध या जेजे डी-नोव्हो चळवळीतील एक कार्यकर्त्या आहेत. त्या स्वतः जेजेच्याच माजी विद्यार्थिनी. साहजिकच जेजेवर त्यांचं निरतिशय प्रेम. त्या प्रेमापोटीच त्या कर्जतसारख्या दूरवरच्या ठिकाणी राहत असून देखील  डी-नोव्होसंदर्भातल्या प्रत्येक मीटिंग्जना मुंबईत अगदी वेळेवर उपस्थित राहतात. या निमित्तानं त्यांचं लिखाणही सुरु झालंय. त्यांचा पहिला लेख आपण गेल्याच आठवड्यात वाचला होता. आता हा दुसरा.. थेट चपराक देणारा !

औरंगाबाद शहराबद्दल मी अगदी लहानपणापासूनच ऐकत आले होते, तिथल्या अजिंठा, वेरूळ, बिबी का मकबरा, गेट्स, औरंगजेबचा महाल अशा ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती थोडी थोडी शालेय अभ्यासातून, इनामदार सरांकडून, आई-बाबांकडून ऐकून होते. अशात माझी एक मावस बहिण तिथल्या शासकीय आर्ट स्कूल मध्ये कमर्शियल आर्ट शिकायला गेली. हे निमित्त साधून दुसऱ्या मोठ्या बहिणीसोबत मी औरंगाबादला १९९१-९२ मध्ये प्रथमच गेले होते. अर्थात ही सगळी वारसा स्थळे बघता बघता भारावून जाणे स्वाभाविक होते. त्यांत भर पडली ती बहिण जिथे शिकत होती त्या औरंगजेबाने बांधलेल्या ‘किला-ए-अर्क’ या महालातील जनाना महालाची, १७व्या शतकातील औरंगजेबाच्या राण्यांचा महाल. त्यावेळी तिथे फाईन आर्ट, कमर्शियल आर्ट, टेक्सटाईल, फोटोग्राफी, प्रिंट मेकींग यांसारखे कोर्स त्या जवळ जवळ ३५० वर्षे जुन्या महालात चालू होते, याशिवाय तिथे एक छान तळघरही होते. अशा ऐतिहासिक परिसरात व त्या एवढ्या जुन्या महालात शिकायला मिळणे किती अभिमानाची गोष्ट आहे !
या नंतर औरंगाबादचा संबंध आला तो पुरातत्त्वशास्त्र शिकत असताना…
जनाना महाल (शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद)

एक मैत्रीण औरंगाबादहून पुण्यात शिकायला आलेली होती. नंतरच्या काळात या मैत्रिणीकडे व heritage listing सारख्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रोजेक्टच्या निमित्ताने औरंगाबाद शहराशी संबंध येत राहिला तो आजही आहे. तुम्ही म्हणाल जेजे विषयी मथळा देऊन ही औरंगाबादबद्दल काय बोलत बसलीय.. सांगते.. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक भेटीत औरंगाबादच्या त्या शासकीय आर्ट स्कूलमध्ये किला-ए-अर्कच्या परिसरात जाणे झाले. वास्तविक किती रॉयल गोष्ट होती ही. हो होती… असंच म्हणावं लागेल.

इ.स. १६९२ मध्ये औरंगजेबाने बांधलेल्या किला-ए-अर्क या महालात १९७१ मध्ये शासनाने चालू केलेलं हे आर्ट स्कूल २००४ सालापर्यंत चालू होते. इथून नवीन बांधकामाची गरज सांगत ही ऐतिहासिक वास्तू रिकामी करत किला-ए-अर्कच्याच परिसरातील मुघल गार्डनमध्ये नवीन इमारत बांधून कला महाविद्यालय हलविले गेले. वास्तविक वारसा स्थळ असल्याने किला-ए-अर्कच्या पूर्ण परिसराचे तेव्हाच जतन संवर्धन होणे गरजेचे होते साहजिकच असे काहीही झाले नाही. पुढील अनेक काळ या परिसरात कोणत्याही प्रकारचे जतन व संवर्धन न करता वास्तू मोडकळीला येईपर्यंत तशीच राहू दिली गेली. अफवा पसरवण्यात आल्या व तिथे जुगारी गर्दुल्ल्यांचा अड्डा होईपर्यंत वास्तू तशीच राहू दिली, आवारात गाई म्हशी बांधल्या गेल्या, परिसराचे अगदी खंडहर होऊ दिले. वास्तविक किला-ए-अर्कचा परिसर व कला महाविद्यालय दोन्हीही शासनाचेच.. त्यावेळी अगदी शासन व औरंगाबादकर व समस्त आजी-माजी विद्यार्थी कलाकारांनी ठरवलं असतं इमारत व परिसर जपणं फार कठीण नक्कीच नव्हतं.
ह्या किला-ए-अर्कच्या परिसराची थोडीफार तटबंदी राहिली होती तिच्यावर देखील अगदी अलीकडे…. ११ मे २०२२ ला औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने बुलडोझर फिरवायला कमी केले नाही (काय तर जवळच असलेल्या लेबर कॉलनीतल्या जुन्या घरांवर बुलडोझर फिरवतांना एवढी मोठी तटबंदी दिसली नाही. सब झूठ है ! आज प्रशासनाने अगदी तश्शीच तटबंदी बांधून दाखवावी). https://www.lokmattimes.com/aurangabad/historian-heritage-lovers-expressed-anguish-over-damage-of-fortification-wall/ , https://youtu.be/FWbd5zVAEGg , यावरूनच आपण समजून घ्यायला हवे आधी तटबंदी मग परिसरातल्या इमारतींवर एक एक करत बुलडोझर फिरवायला यांना वेळ लागणार नाही.
The enclosure of the Janana Mahal

बरे हे कला महाविद्यालय नवीन इमारतीत जाऊनही आज काही ह्या शासकीय कॉलेजची अवस्था फार चांगली नाहीय; मोजकेच शिक्षक, सुविधांची कमतरता अशा अनेक गोष्टी आहेतच… राज्याच्या पर्यटनाच्या राजधानीत जिथे अजिंठा वेरूळ सारखी युनेस्को दर्जा असलेली वारसा स्थळे आहेत त्या औरंगाबाद मध्ये “शासकीय” आर्ट स्कूलची ही गत आहे तर… तर इतर शासकीय आर्ट स्कूलबद्दल बोलायलाच नको.. कोणतेही राज्य विद्यापीठ केले किंवा झाले तर या “शासकीय” महाविद्यालयांचा दर्जा फक्त सुधारण्याचीच नाही तर तो टिकवून ठेवला जाईल याची हमी कोण देणार व घेणार ?

या सर्व धर्तीवर मुंबईतल्या १६५ वर्षे जुन्या जेजे आर्ट स्कूलची व परिसराची काय कहाणी असेल ?
मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेला जेजेचा परिसर… किती जणांचा डोळा असेल विचार न केलेलाच बरा !
Multi-cusped arches looking over to verandah
अहो २००६ मध्ये तत्कालीन कलासंचालकांनी प्रिंटींग टेक्नोलॉजी व आर्किटेक्चरच्या जुन्या इमारती पाडून तिथे आधुनिक टॉवर बांधण्याचे मनसुबे बांधले होते. अधिक माहितीसाठी हा टॉवरचा आराखडा तिथल्याच एका (फ्रॉड) शिक्षकाने बनवलेला होता. (हे सर्व ‘चिन्ह’च्या २००८च्या ‘कालाबाजार’ अंकात संपादक श्री. सतीश नाईक यांनी पुराव्यानिशी मांडलेले आहे).
आपल्याला माहितच आहे कला संचालनालय इतके वर्ष जेजेमध्येच आहे. पण एक योग्य कलासंचालक इतक्या वर्षांत शासनाने नियुक्त केलेला नाही. एकीकडे इतक्या वर्षांत विद्यार्थ्यांना आवश्यक तितके व उत्तम उच्च शिक्षित शिक्षकांची भर्ती करू न शकलेले प्रशासन, काळाप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरांवर अभ्यासक्रमात बदल तर सोडूनच द्या….
View of Janana mahal and the steped garden(Curzon Coll 1880, British Library-www.bl.uk)
मुंबईचे भूषण असलेल्या या आर्ट स्कूल मध्ये एकवेळ भारताच्या काना-कोपऱ्यातून प्रवेश मिळावा या हेतूने परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी येत होते. आता दुर्लक्ष व गलथानपणामुळे जेजे पूर्णतः डबघाईला आले आहे (आणले गेले आहे).

आता जेजेला डिनोव्हा दर्जा (स्वायत्त अनन्य अभिमत विद्यापीठ) प्राप्त झाला तर अशा या शासनातील व इतर काही लोकांना हे आवार हातातून निसटतेय याची जाणीव होऊन त्रास होतोय हे नक्की व त्याचेच हे परिणाम. आज गत बघा… प्रत्येक विभागात मोजकेच शिक्षक आहेत. अद्ययावत सुविधांबद्दल तर बोलायलाच नको. ती तर फक्त कागदावरच !

आज जेजेचे राज्यस्तरीय विद्यापीठ केले जावे अशी मागणी केली जात आहे. महत्त्वाचं नक्की काय आहे इथलं प्रत्यक्ष जेजेच्या आवारातलं ५-७ वर्षे राहून घेतलेलं शिक्षण की कुठेतरी तुमच्या शहरातल्या कोणत्यातरी भाड्याच्या गाळ्यात / घरात बसून घेतलेलं जेजेचा शिक्का असलेलं सर्टिफिकेट ?
शासकीय कला शिक्षणक्षेत्रात आधीच झालेला ऱ्हास त्यात ही भर. राज्यस्तरीय विद्यापीठाचा बोजा ?
Interior_Print Making Dept
अशाने जेजेमधल्या शिक्षणाचे महत्त्व ते काय राहणार ? शिवाय जेजेच्या ह्या हेरीटेज इमारतींचे निव्वळ शासकीय कामकाजासाठी वापर केला जाईल तो वेगळा. म्हणजे इथले कला शिक्षण तर कायमस्वरूपी संपुष्टातच येईल हे नक्की ! अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे जेजे कायम स्वरूपी राज्य शासनाचे असले आणि राहीले तरी त्या कॉलेजची व आवाराच्या निरंतर व सुयोग्य देखभालीसाठी, तिथल्या उत्तम व्यवस्थापनेसाठी, इथल्या विशेष नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी जेजे या संस्थेने स्वायत्त होणे नितांत गरजेचे झाले आहे (म्हणूनच तर गेल्या २०१७ पासून सद्य शिक्षणमंत्र्यांनी स्वतः या सगळ्या डिनोव्होच्या प्रक्रिया केल्या) आज अनेक खाजगी संस्था कला शिक्षणात येत आहेत त्यांच्याशी तुलना करता आज हेरीटेज असलेल्या या कलासंस्थेला पुढे भविष्यात अनेक (शे) वर्षे टिकवणे, तसेच येथील कला संस्कृतीच्या भरभराटीसाठी, जेजेवरील अतिरिक्त (येथील शिक्षणाशिवाय) भार कमी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

आज फक्त जेजे या आजी-माजी विद्यार्थ्यांनीच नाही तर प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने या लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे.. नाहीतर विरोधक औरंगाबादच्या आर्ट स्कूलसारखाच जेजेतही बुलडोझर चालवायला कमी करणारे नाहीत ! (PWD च्या कार्यालयाने तर आधीच जेजेच्या आवारात घुसखोरी केलेली आहे त्यांना जागा व्यापायला कितीसा वेळ जाणार).
ही कळकळ का ? तर….आज मी जी काही आहे त्याची पाळेमुळे जेजेत आहेत…

स्मिता सु. गीध

Varadah of Janana mahal

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.