Features

‘स्मृतिरंग 75’ कला प्रदर्शनाची सांगता

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांचं  आयोजन विविध स्तरावर होत आहे. संस्कार भारती या संस्थेतर्फेही पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभर चित्रकला विषयक उपक्रमांचं  आयोजन करण्यात आलं होतं. संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड समितीच्या चित्रकला, हस्तकला, शिल्पकला विभागातर्फे स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीकारकांना चित्र माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. या चित्रांचं प्रदर्शनही पिंपरी चिंचवडच्या पीएनजी गॅलरी इथं आयोजित करण्यात आलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतात सर्वत्र विविध कार्यक्रम सुरु आहेत. संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड समितीच्या चित्रकला, हस्तकला, शिल्पकला विभाग प्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर व सचिव सौ. लीना आढाव यांनी पिंपरी चिंचवड परीसरातील  75 चित्रकारांनी,  क्रांतिकारकांना अभिवादन करावं  म्हणून त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमास ‘स्मृतिरंग 75’ असं साजेसं नांव देण्यात आलं.

मंगळवार दि.19 जुलै 2022 रोजी स्मृतीरंग 75 च्या पहिल्या प्रदर्शनाचं उदघाटन झालं. आजपर्यंत एकूण 30 प्रदर्शने झाली. प्रत्येक पुष्पात 4 किंवा 5 चित्रकारांच्या कलाकृतींचं प्रदर्शन करण्यात आलं. विद्यार्थी चित्रकार असतील तर कलाकृतींना जास्त जागा देण्यात आली.  सर्व चित्रकारांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोणत्याही एका क्रांतिकारकाच चित्र काढण्यास सांगण्यात आलं. प्रत्येक चित्रकाराच्या  5 ते 10 चित्रांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला होता. ‘स्मृतिरंग 75’ च्या एकूण 30 प्रदर्शनात 10 ते 75 या वयोगटातील स्त्री – पुरुष कलाकारांनी अतिशय उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. यात विद्यार्थी, हौशी चित्रकार, प्रतिथयश चित्रकार अशा सर्वच कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश होता. जलरंग, तैलरंग, ॲक्रेलिक, कोलाज, शिल्पे, डिजिटल आर्ट, मॉडर्न आर्ट, शिल्पे, नावांच्या पाट्या, शिल्पं , कातळ शिल्पं, सूतचित्रं, रेखाटनं , लघुचित्रं, मधुबनी चित्रं, वारली, असे पारंपारिक चित्रप्रकारही या प्रदर्शानांतून मांडण्यात आले होते. 

स्मृतीरंग 75 अंतर्गत झालेल्या एकूण 30 प्रदर्शनांतून 141 चित्रकारांनी आपला विक्रमी सहभाग नोंदविला आहे. 

स्मृतीरंग 75 च्या या 30 प्रदर्शनांचं उद्घाटन सुप्रसिध्द चित्रकांरांच्या हस्ते करण्यात आलं होतं. प्रत्येक प्रदर्शनाचं  उद्घाटन मंगळवारी तर समारोप रविवारी संध्याकाळी एका प्रात्यक्षिकानं  करण्यात आला. एकूण 20 प्रात्यक्षिकांचं  आयोजन करण्यात आलं होतं. यात – जलरंग, ऑईल कलर, ॲक्रेलिक रंग, फॅब्रिक पेंट, ड्राय पेस्टल, चारकोल, पेन्सिल, पेन, डिजिटल  पेंटींग या विविध माध्यमात व स्वत:च्या शैलीचे प्रात्यक्षिक सादर केले. विविध माध्यमातील भारतीय पारंपारिक चित्र प्रकार, व्यक्तीचित्रण, निसर्ग चित्रण, सुलेखन यांचा समावेश होता. अनेक ज्येष्ठ आणि  नवोदित चित्रकारांनी यांत आपले योगदान दिले. ही सर्व प्रात्यक्षिकं  म्हणजे पिंपरी चिंचवडच्या कला रसिकांसाठी  मोठी पर्वणीच होती.

पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी म्हणून प्रसिध्द आहेच. पण इथल्या कलाकारांसाठी या परिसरात अजून एकही कलादालन उपलब्ध नाही ही कला रसिकांची खंत आहे. कला रसिकांची ही तहान भागविण्याचे काम पी.एन्.गाडगीळ ॲन्ड सन्सचे चिंचवड गांवातील, चापेकर चौकातील कलादालन करीत आहे. हा उपक्रम सुनियोजित आणि दिमाखात पार पडला याचं  श्रेय पी. एन्. गाडगीळ ॲन्ड सन्स यांना जातं. या उपक्रमास आजवर अंदाजे 15 हजारांवर रसिकांनी भेट दिली. स्मृतीरंग 75 च्या या सलग 30 प्रदर्शनामुळे पिंपरी – चिंचवड परिसरांतील कला रसिकांना प्रदर्शने बघण्याची सवय लागली, आवड निर्माण झाली. व आगामी प्रदर्शनांबद्दल उत्सुकताही वाढली आहे. 

संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाने स्मृतीरंग 75 ही कला प्रदर्शन मालिका दिमाखात संपन्न झाली.

******

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.