Features

यांना निलंबितच करा…

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या संदर्भात आम्ही लिहीत असलेल्या लेखांना / पोस्टना फेसबुक फ्रेंड्सचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर सदर लेखन मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं आहे. ज्यांना ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ विषयी फारशी माहिती नसते असे वाचक मात्र या पोस्टनी अतिशय अस्वस्थ होतात. ‘काय सारखं जेजे – जेजे चालवलंय’ असंही ते त्राग्यानं म्हणतात. अशाना कधीतरी उत्तर द्यायचंच होतं ते आज देतो.

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ ही एका अर्थानं महाराष्ट्रतल्या कला शिक्षण संस्थांची मातृसंस्था आहे. इतकंच नाहीतर तिचा भारतातील अन्य राज्यातल्या कला शिक्षणावर देखील मोठा प्रभाव आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली त्याच्या आधीच मुंबईत ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ची स्थापना झाली होती. यावरुन मी काय म्हणतो आहे ते लक्षात येऊ शकेल.

केवळ भारतातल्याच नाहीतर तर संपूर्ण आशियातल्या कला शिक्षण पद्धतीवर जेजेचा प्रभाव खूप काळ टिकून होता. १९८५ सालानंतर मात्र त्याला दृष्ट लागली आणि सरकारच्या दुर्लक्षामुळं या संस्थेचं जवळ जवळ मातेरं झालं. राज्यकर्त्यांना या संस्थेचं महत्व कधी कळलंच नाही हेच आमचं दुर्दैव आहे. त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळं आणि भ्रष्ट आचरण करुन केलेल्या शिक्षक – अधिकारी भरतीमुळं जेजेवर आणि पर्यायानं कला संचालनालयावर आज ही अवस्था ओढवली आहे.

माझ्यासारखे जेजेचे असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात किंवा ज्या क्षेत्रात त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं त्याचं सारं श्रेय जेजेच्या वास्तूला किंवा त्या परिसराला देतात. ( त्यांच्या या संस्थेबाबतच्या उत्कट भावना ‘जेजे जगी जगले’…या ‘चिन्ह’च्या आगामी ग्रंथात मोठ्या प्रमाणावर प्रकट झाल्या आहेत. ) आणि म्हणूनच जेजे संस्कृती नष्ट झाली तर महाराष्ट्राच्या कला क्षेत्राची पूर्णतः वाताहत होईल या भयानंच आम्ही सतत जेजे संदर्भातल्या बातम्या देत असतो. वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांना ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चं नाव देखील धड लिहिता येत नाही. सतत ते जेजेचा उच्चार ‘आर्टस् आर्ट्स’ असा करीत असतात म्हणून त्यांच्याकडून काही होईल अशी अपेक्षा देखील आम्ही आता सोडली आहे. आणि ‘चिन्ह’च्या वेबसाईटद्वारे जेजेची संपूर्ण साफसफाई व्हावी यावरच लक्ष केंद्रित केलं आहे. आणि म्हणून आम्हाला सतत जेजेचा विषय केंद्रस्थानी ठेवावा लागतो. अर्थात आता ही लढाई जवळ जवळ शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे.

त्यामुळे वाचकांनी तोपर्यंत थोडीशी कळ काढावी. अर्थात चित्रकलेतले वेगवेगळे विषय, ‘न्यूज’ आणि फीचर्सद्वारे आम्ही वरचेवर मांडतोच आहोत. नेहमीप्रमाणे थोडंसं विषयांतर झालंच. सांगायचा मुद्दा असा होता की जेजेच्या कालच्या आणि परवाच्या लेख / पोस्टना प्रचंड विक्रमी प्रतिसाद मिळाला. अजूनही तो मिळतोच आहे.

काल जेजेच्या एका विद्यार्थ्यांचं म्हणणं प्रदीर्घ स्वरुपात आम्ही मांडलं ते देखील अनेकांनी उचलून धरलं आहे. कला संचालनालयाची जेजे कॅम्पसमधून हकालपट्टी करण्याची कल्पना तर अनेकांना आवडली आहे. खरं तर ही मागणी तर फार पूर्वीपासून केली जात होती पण महाराष्ट्र शासनानं याकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलं ही वस्तुस्थिती आहे. त्या विद्यार्थ्यानं दिलेली माहिती देखील अचंबित करणारी होती.

कला संचालनालयाची जागा विक्रोळीला आहे ही माहिती आम्हाला तर नवीनच होती. गेल्या चाळीस वर्षात आधी कधीही ऐकले नव्हते. पण ही अचानक बातमी कशी आली याचे आम्हाला कोडे पडले आहे. या संदर्भात कला संचालनालयानं खुलासा करणं अत्यावश्यक आहे.
समजा तीन चार एकरचा प्लॉट कला संचालनालयानं घेतला असेल तर त्यांनी तो कशासाठी घेतला ? हे कलाविश्वाला विश्वासात घेऊन सांगायलाच हवे. जे कला संचालनालय गेले तीस चाळीस वर्ष १६० पेक्षा अधिक शिक्षकांची नेमणूक करू शकत नाही. त्यांना या नव्या जागेची गरज कशासाठी पडली असावी ? याचा खुलासा त्यांनी करायलाच हवा कारण हा लोकांचा पैसा आहे. त्या विद्यार्थ्यानं अतिशय खवचटपणे काही गोष्टी सुचवल्या आहेत पण त्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्यानं विचार करायलाच हवा. तरच ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ला लागलेलं हे शुक्लकाष्ट दूर होऊ शकेल.

आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तर देतो. कला संचालनालय आणि जेजेचे दोन अधिकारी जेजेतल्या तिसऱ्या वर्षाच्या क्लासमधून ‘न्यूड’ सारखा अतिशय संवेदनशील विषय चालू असताना दोन किंवा तीन शिक्षकांना घेऊन म्हणे थेट बंगळुरूला गेले होते. बंगळुरू मधल्या केंद्र सरकारच्या NATIONAL ACADEMY OF CUSTOMS, INDIRECT TAXES AND NARCOTICS (NACIN) शिक्षण संस्थेच्या नव्याने जवळपास ५०० एकर मध्ये विस्तार होत असलेल्या विस्तीर्ण परिसरात ज्यात ‘ट्रेनिंग सेंटर, अकॅडमी ब्लॉग, रिसेप्शन, हॉस्पीटल, होस्टेल, स्पोट्स, कॉम्लेक्स, रेसीडेंशल कॉम्प्लेक्स, स्कूल’ ( अधिष्ठातानी परिपत्रकात जी भाषा वापरली आहे ती इथे जशीच्या तशी दिली आहे. यावरून अधिष्ठातांच्या मातृभाषा मराठीच्या ज्ञानाची कल्पना सहज येते. ) अशा विविध इमारती असून त्यांना भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यवहार, कर, व्यापार या विषयावर संकल्पना करण्यासाठी ( ‘नार्कोटिक्स’ शब्द कुठे गेला कुणास ठाऊक ? बहुदा त्याचे भाषांतर जमले नसावे. ) म्हणे ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ला निमंत्रित केले आहे. आणि त्यासाठी कला संचालक आणि अधिष्ठाता आपआपली कार्यालयं सोडून आणि दोन का तीन शिक्षक ( त्यात वर्ग शिक्षक देखील आले.) थेट बंगळुरूला विमानाने गेले होते. ना त्यांनी कुणाला सांगितलं ना कुणाला कळवलं. सहशिक्षकांना देखील त्यांनी त्याची कल्पना दिली नव्हती. साहजिकच विद्यार्थ्यांना देखील कळवलं नसणार हे वेगळं सांगायला नकोच. ( काय कळवायचं विद्यार्थ्यांना ? ) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे दोन अधिकारी त्यांच्या सोबत गेले होते त्यांनी कुणालाही चार्ज दिला नव्हता. सरकारी नोकरीत तो द्यावाच लागतो. दिला नसेल तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या प्रकरणाची चौकशी सरकारनं केलीच पाहिजे.

ज्या शिक्षणसंस्थेत गेल्या तीस पस्तीस वर्षात शिक्षक भरतीच झालेली नाहीये आणि ज्या संस्थेचा शैक्षणिक कारभार बहुसंख्य डिप्लोमा होल्डर आणि कंत्राटी आणि हंगामी शिक्षकांवर चालतो. त्या संस्थेतल्या शिक्षकांनी परराज्यात जाऊन सुशोभीकरणाची कामं करणं योग्य आहे का ? या प्रश्नांची उत्तरे वाचकहो आता तुम्हीच द्या.

बरं बहुसंख्य शिक्षक कसे शिकवतात ? कधी येतात ? कधी जातात ? या बद्दल ‘चिन्ह’ने वेळोवेळी लिहिलंच आहे. आतापर्यंत साबळे यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिक कामं ( खरं तर धंदेवाईक हा शब्द इथे योग्य ठरेल ) करण्याचं शिक्षकांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतंच मर्यादित होतं. चांद्यापासून बांद्यापर्यंत कोट्यवधी रुपयांची कामं ते करीत होते, करीत आहेत. जेजेमध्ये शिकवणं हा बहुतेक त्यांचा फावल्या वेळचा उद्योग असावा. अन्यथा अशी कामं करणं कुणाला तरी करता येणं शक्य आहे का ? पण साबळेसाहेबांनी ते करून दाखवलं आहे. साहजिकच जेजेतल्या ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुरती वाताहातच झाली आहे हे वेगळं सांगायला नकोच.

असं असताना आता केंद्र सरकारने बेंगळुरूचं घोंगडं जेजेच्या गळ्यात अडकवलं आहे. जेजेच्या नोकरीत राहून शिक्षण दानाचं काम करीत करीत अक्षरशः हजारो कोटी रुपयांचं हे काम आता कला संचालक, अधिष्ठाता आणि जेजेतले चार पाच शिक्षक मिळून करणार आहेत. किती वर्ष हे काम चालेल कुणास ठाऊक ? कल्पना करा पाचशे एकराचा परिसर आहे. असंख्य इमारती तिथे असणार आहेत. सुशोभीकरणासाठी तिथे कितीशे शिल्पं लागतील ? कितीशा शोभिवंत वस्तू लागतील ? कितीशी म्युरल्स लागतील ? कितीशी पेंटिंग्स लागतील ? ती सारी ही शिक्षक मंडळी जेजेतलं शिक्षण दानाचं पवित्र कार्य करून करणार आहेत. आता सांगा ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ आणि तिथल्या शिक्षणाचं या साऱ्या धंदेवाईक खटाटोपात काय होईल ते वेगळं सांगायला हवंय ?

केंद सरकारच्या किंवा बंगळुरूमधल्या अधिकाऱ्यांना १६६ वर्षाच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चं फक्त नाव आणि त्याची प्रतिष्ठा दिसते आहे. पण तिथं काय जळतं आहे ? शिक्षक / प्राध्यापक किती कमी आहेत ? शैक्षणिक सुविधांचा कसा अभाव आहे हे त्यांना कुठं ठाऊक आहे ? त्यांना वाटत असणार की जेजेत सोनेरी दिवस आहेत आणि त्यामुळे त्यांनी जेजेची निवड केली असणार.

पण जेजेत नेमकं काय चाललं आहे ते फक्त तिथल्या विद्यार्थ्यांना आणि ‘चिन्ह’लाच ठाऊक आहे. म्हणूनच ‘चिन्ह’ सातत्याने हे सारे प्रश्न मांडतो आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शिल्पकार तसेच कलावंतांकडे ‘चिन्ह’ने या बद्दल चौकशी केली पण कुणालाही काहीही ठाऊक नसल्याचे दिसले.

जे जाणवले ते या लेखात लिहिले आहे. खरं तर या घटनेबद्दल शासनाने संबंधितांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. शिक्षकीपेशातले चार पाच जण ( त्यातले एक तर अधिष्ठाता आहेत तर दुसरे प्राचार्य ) कुणालाही न सांगता न सवरता विद्यार्थ्यांना पूर्णपणे अंधारात ठेऊन, इतकंच नाही तर न्यूड सारख्या महत्वाच्या विषयाचा क्लास सोडून विमानात बसून थेट बंगळुरू गाठतात ही शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी गोष्ट आहे. या घटनेचा ‘चिन्ह’ अतिशय तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे. निषेध करीत आहे.

कला संचालनालय आणि ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या अधिकारी- शिक्षकांनी अगदीच ताळतंत्र सोडल्याचे हे लक्षण आहे.त्यांना जनाची तर सोडाच पण मनाचीही लाज वाटेनाशी झाली आहे. त्यांना कुणीतरी वठणीवर आणायलाच हवं आहे.आता त्यांना कुणी वठणीवर आणणार का ? का रजेवर असले तरी नेहेमीप्रमाणे त्यांचा पूर्ण पगार दिला जाणार ? ते आता पाहायचं .त्या बंगरुळुहून आलेल्या मॉडेलचा येण्याजाण्याचा खर्च करायला विद्यार्थ्यांकडून हजार हजाराची वर्गणी काढली गेली, मग प्रश्न असा येतो की हे जे ऑन ड्युटी असलेले पाच सहाजण बंगळुरूला विमानाने गेले त्यांचा खर्च पण विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून केला ? का त्याचा त्यानीच स्वतः केला ? का कला संचालनालयाने केला ? हे आता माहितीच्या अधिकारात कुणी तरी विचारायलाच हवं आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील याकडे आता तरी लक्ष देणार आहेत का ?

(लेखातील छायाचित्रे ही जेजेतील आहेत. न्यूड वर्गाच्या बाहेरील नो एंट्रीचा बोर्ड आहे आणि वर्गातील शिक्षक गायब आहेत हे स्पष्ट दिसते.)

******

– सतीश नाईक
संपादक चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.