Features

तेव्हा कुठं गेला होता तुमचा धर्म! (उत्तरार्ध)

आमचा प्रश्न हाच आहे की पवारसाहेब आज जो कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा प्रश्न सरकारसमोर उपस्थित करत आहेत तो त्यांनी दिलीप वळसे पाटील हे शिक्षणमंत्री असताना त्यांनी का नाही विचारला? जेजे आणि अन्य तीन कला महाविद्यालयातील सुमारे पावणेदोनशे प्राध्यापकांपैकी दीडशे  पदं रिक्त असताना हाच प्रश्न त्यांना दिलीप वळसे पाटलांनादेखील विचारता आला असता. नसता का? त्यांनी तो तेव्हा विचारला असता तर कंत्राटी शिक्षकांची ही कीड इतकी फोफावली नसती. शरद पवार यांच्या जाहीर विधानांचा परामर्श घेणारा हा दुसरा लेख. 

शिक्षक नाहीत, कायमस्वरूपी शिक्षक नेमा. कंत्राटी शिक्षक नकोत. या संदर्भात मी सातत्यानं लिहिलं. त्याचे फायदे-तोटे दाखवून दिले. या अशा कारभारामुळं कोणे एके काळी भारतातील सर्व राज्यात सर्वोच्च स्थानावर असलेली चित्रकला महाराष्ट्रातून हद्दपार होणार आहे. याकडेदेखील मी लक्ष वेधलं होतं. या साऱ्याचे पुढे शैक्षणिक पातळीवर काय परिणाम होतील हेदेखील मी दाखवून दिलं होतं. महाराष्ट्राला कला संचालक हे पद भरणंदेखील अवघड होईल. शासकीय कला महाविद्यालयांना अधिष्ठातादेखील मिळू शकणार नाहीत. कलेचा इतिहास, सौन्दर्यशास्त्र यासारख्या विषयाचे प्राध्यापकदेखील मिळू शकणार नाहीत. हेसुद्धा मी वेळोवेळी आणि कळकळीनं मांडलं होतं. पण ना उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं याची दखल घेतली ना वळसे पाटलांनी याकडं ढुंकून पाहिलं.

मी लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी झाली. महाराष्ट्राला आज कला संचालक हे पद भरता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. कोण कुठले आचरट आणि उडाणटप्पू लोकं त्या पदावर आणून बसवावे लागत आहेत. दादा आडारकर, धोंड मास्तर, माधव सातवळेकर, बाबुराव सडवेलकर यांच्या नखांचीदेखील सर येणार नाही असे एकाहून एक दिवटे लोकं या पदावर आणून बसवावे लागत आहेत. हे सारं घडलं ते कायमस्वरूपी शिक्षकांच्या नेमणुका थांबवल्यामुळंच. या साऱ्याची मी जाणीव मी वेळोवेळी करून देत होतो. पण वळसे पाटलांनी कधीही त्याची दखल घेतली नाही.

शरद पवार यांच्याशीदेखील मी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मला मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. २००८ साली ‘चिन्ह’चा ‘कालाबाजार’ विशेष अंक मी प्रसिद्ध केला होता. पत्रकार संघात झालेल्या या अंकाच्या प्रकाशन समारंभास भानू अथैया उपस्थित होत्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण या देखील उपस्थित होत्या. (विद्या चव्हाण या तर आमच्या जेजेच्या माजी विद्यार्थिनी) आणि त्याचबरोबर मी सुप्रिया सुळे यांनादेखील या समारंभाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पण आयत्या वेळी त्या समारंभाला उपस्थित राहिल्याच नाहीत. नंतर कळलं ते असं की त्यांनी या समारंभाला उपस्थित राहू नये म्हणून दिलीप वळसे पाटील यांनीच त्यांच्यावर दबाव आणला होता.

दिलीप वळसे पाटील यांचे वडील पवारांचे सहकारी. साहजिकच दिलीप वळसे पाटील हे राजकारणात आले नसते तर नवलच ठरलं असतं. आधी ते पवारांचे स्वीय सचिव झाले. आणि नंतर राजकारणात येऊन ते थेट मंत्रीच झाले. तब्बल दहा वर्ष ते शिक्षण खात्याचे मंत्री होते. या काळात त्यांनी कधी कुणाला जुमानलं नाही. त्यांच्या या वृत्तीमुळेच महाराष्ट्राचं शिक्षण रसातळाला जात राहिलं. त्यांच्याच काळात जे जे स्कूल ऑफ आर्टला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा झाला. पण त्या खात्याचे मंत्री असूनसुद्धा वळसे पाटील समारंभाकडे फिरकलेदेखील नाहीत.

मुंबई विद्यापीठाचा दीडशे वर्षपूर्ती सोहळादेखील नंतरच्या काही दिवसात साजरा झाला. पण त्याला मात्र ते उपस्थित राहिले. कारण त्या समारंभाला ग्लॅमर होतं. मला वाटतं राष्ट्रपतींसारखे मान्यवरदेखील त्या समारंभाला येणार होते. साहजिकच त्यांना तिथं उपस्थित राहावंच लागलं असणार असंही असू शकेल. पण जे जे स्कूल ऑफ आर्ट विषयीची त्यांची नावड पूर्णपणे दिसून आली. कदाचित असंही असू शकेल की जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या एका अत्यंत डचरु आणि फेक प्राध्यापकानं तयार केलेला जे जे स्कूल ऑफ आर्ट रिडेव्हलपमेंटचा प्लॅन मी दिलेल्या एका बातमीमुळे उधळून लावल्यामुळं ते जेजेवर नाराज असतील. टोलेजंग टॉवर बांधायला निघाले होते साहेब. ‘ऐराचं’ ऑफिस ऐतिहासिक डीन बंगलोमध्ये थाटायचा पासलकर साहेबांचा प्लॅनदेखील मी दिलेल्या एका बातमीमुळं ओम्फस झाला होता. मुहूर्तासाठी आणलेले हारतुरे, फुलं, पेढे मिठाई अक्षरशः तिथंच टाकून संबंधितांना डीन बंगलोतून पोबारा करावा लागला होता.

हे सगळं मी अगदी तळतळून मोठ्या वृत्तपत्रातून मांडत होतो. एक एक पुराव्यानिशी मी सर्व प्रकरणं मांडली होती. पण कुठलीही चौकशी झाली नाही. झालीच असेल तर ती दाबून ठेवली गेली. तीन-चार अधिकारी तर या प्रकरणात नक्कीच तुरुंगात जाऊ शकले असते इतके त्यांचे गुन्हे गंभीर होते. आता ते सारे छानपैकी पेन्शन घेऊन कला संचालनालयातल्या घडामोडी एन्जॉय करतायेत. या साऱ्यांनी मिळून कला संचालनालयाचं आणि पर्यायानं १६६ वर्षांचं जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयं आणि दीडदोनशे अनुदानित आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयांचं अक्षरशः वाटोळं केलं.

शरद पवार साहेबानी त्यावेळी जर या प्रकरणात लक्ष घातलं असतं तर आज त्यांच्यावर जी अन्य सरकारवर टीका करण्याची वेळ आली आहे ती आली नसती. ज्यांना त्यांनी राजकारणात उभं केलं पुढं आणलं त्यांनी आज प्रत्यक्ष पवार साहेबांकडेच पाठ फिरवली आहे ही कुणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. काय वाटत असेल त्यांना याची कल्पना आपण करू शकतो. पण १६६ वर्षाच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेची वाताहत झालेली पाहताना आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना त्याचा किती मनस्ताप झाला असेल याची कल्पना मात्र ना वळसे पाटील कधी करू शकले, ना पवार साहेबही कधीच करू शकले ही वस्तुस्थिती आहे.

पण शेवटी सत्याचाच विजय झाला आहे. आमची लढाई आम्ही जिंकली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत पत्रकार सुहास फडके यांच्या सूचनेवरून या प्रश्नाला स्पर्श केला आणि तो थेट दिल्लीत नेऊन ठेवला. इथल्या लोकांना नसेल ठाऊक जेजेचं महत्व पण दिल्लीत राज्य करणाऱ्या लोकांना मात्र जेजे महिमा पूर्णपणे ठाऊक होता. त्यांनी शांतपणे पावलं  उचलली आणि जेजेला डिनोव्हो दर्जा प्रदान केला. आता कुठल्याच जन्मात कुणीच जेजेकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, तिथल्या जागेवर टॉवर बांधायची स्वप्नं रचणार नाहीत हे निश्चित. पवार साहेबांच्याच छत्रछायेखाली ‘उदयाला’ आलेल्या एका नेत्यानं ‘जेजे केंद्र सरकारच्या हाती जाईल, बीजेपीवाल्यांच्या हाती जाईल, मोदींच्या हाताखाली जाईल’ असे कांगावे करून पाहण्याचा प्रयत्न केला खरा पण यशस्वी झाला नाही. जेजे आहे तिथंच राहिलंय, तिथंच राहणार आहे. तो नेता मात्र पवार साहेबांची छत्रछाया सोडून मोदी साहेबांच्या छत्रछायेखाली नांदू लागला आहे. आहे की नाही गंमत!

सतीश नाईक 

संपादक, ‘चिन्ह आर्ट न्यूज’

 

संबंधित बातम्या

Chinh editor promises another issue on JJ malpractices

https://www.dnaindia.com/mumbai/report-chinh-editor-promises-another-issue-on-jj-malpractices-1206812

Special issue on JJ ‘Scams’

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/special-issue-on-jj-scams/articleshow/15869756.cms

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.