Features

‘एअर इंडिया’मधला खरा महाराजा !

‘चिन्ह’ची टीम दर मंगळवारी जहांगीर आर्ट गॅलरीला भेट देत असते. तेव्हा जवळच असलेल्या एनजीएमएच्या महाराजाचा खजिना प्रदर्शनाचं पोस्टर आम्हाला दिसतं. आणि आपसूक आठवण होते ती सच्चिदानंद दाभोळकर यांची. खरं तर हा जो महाराजाचा खजिना एनजीएमएमध्ये उभा आहे त्याच्यामागे दाभोळकर यांची मेहनत आणि व्यासंग आहे. हा एवढा मोठा कलासंग्रह या माणसानं एकट्यानं उभा केला. एअर इंडियाचे पब्लिसिटी डिरेक्टर म्हणून काम करताना  दाभोळकरांनी ज्यांना मदतीचा हात दिला  त्यापैकी  कित्येक चित्रकार आज मोठे झाले आहेत. पण दुर्दैव म्हणजे या प्रदर्शनाच्या उदघाटनाला दाभोळकरांचा यथोचित गौरव करणं सोडा त्यांना साधं आमंत्रणही नव्हतं ! या प्रदर्शनाच्या उदघाटन  कार्यक्रमाला उपस्थित असलेले ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक पूर्ण कार्यक्रमात दाभोळकर यांना शोधत होते पण ते काही शेवटपर्यंत तिथे आलेच नाहीत.  मग खुद्द दाभोळकरांना या संग्रहाबद्दल बोलतं करावं म्हणून आम्ही प्रयत्न सुरु केले. दाभोळकर सरांचं आता वय झालंय खूप. आणि मधल्या काळात घडलेल्या घटनांमुळे ते आता कला क्षेत्रापासून दूरही झाले आहेत. तरी त्यांनी बोलावं म्हणून आमची टीम त्यांच्या मुलीच्या संपर्कात होती. पण शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. अर्थात त्यांच्या मूक नकाराचा आम्ही मान ठेऊन हा विषय तिथंच सोडला. पण पुढे आम्हाला अशी माहिती मिळाली की मूळचे कोल्हापूरचे आणि जेजेमधून पास होऊन एअर इंडियामध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करणारे अच्युत बिडकर हे दाभोळकर सरांचे सहकारी आहेत. मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्यासमोर जुन्या आठवणींचा खजिनाच रिता केला. बिडकरांनी दाभोळकर सरांना जवळून पाहिलं आहे. त्यांच्या हाताखाली बरीच वर्ष कामही केलं आहे. ते असं म्हणतात की मी दाभोळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं हे माझं नशीब आहे. या एका वाक्यातच दाभोळकर सर किती मोठे होते याची प्रचिती येते. 

‘चिन्ह’ला अजूनही असं मनापासून वाटत की सच्चिदानंद दाभोळकरांचा यथोचित गौरव व्हायला हवा. जे प्रदर्शन आज थाटात उभं आहे त्याची वीटच नव्हे तर अख्खी बांधणी दाभोळकरांनी केली आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाहीये. शासन, प्रदर्शनाचे संयोजक यांना हा लेख वाचून जर अशी काही सुबुद्धी झाली तर आम्ही हा दृश्यकलेचाच गौरव समजू. कारण दाभोळकर यश, प्रसिद्धी याच्यापलीकडे केंव्हाच पोहोचलेत. गर्भश्रीमंत घरातून आलेल्या या गृहस्थाने कलेची जी सेवा केली तिचा जर गौरव झाला, तर येणाऱ्या पिढ्यांना कळेल की अशीही माणसं आहेत ज्यांनी केवळ एअर इंडियाचं नाव मोठं केलं नाही तर भारतीय कलेचंही नाव मोठं केलं ! हा प्रस्तुत लेख त्यांचं मोठेपण अधिक ठामपणे अधोरेखित करेल.

इंग्रजीमध्ये ‘थरो जंटलमन’ नावाची एक संज्ञा आहे. याचा अर्थ संपूर्ण सज्जन. अशी व्यक्ती सापडणं फार दुर्मिळ असतं. कारण प्रत्येकाचंच व्यक्तिमत्व गुण दोषांनी भरलेलं असतं. पण दाभोळकर म्हणजे थरो जंटलमन व्यक्ती. त्यांचं वागणं, बोलणं, राहणं सगळं एकदम परफेक्ट होतं. देव एखाद्या व्यक्तीला इतकं परफेक्ट कसं बनवू शकतो याचं मला कायम आश्चर्य वाटत आलं आहे. उंची सूट, बो अशा एकदम इंग्लिश पेहरावात दाभोळकर एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये आले की वातावरण एकदम प्रसन्न होऊन जायचं. त्यांचं व्यक्तिमत्वही अगदी उच्च विद्याविभुषित आणि वागण्यात खानदानी अदब होती. आपण एअर इंडियासारख्या मोठ्या संस्थेत पब्लिसिटी विभागात मोठ्या पदावर आहोत याचा कोणताही गर्व त्यांच्या वागण्यात नसे. चित्रपटामध्ये हिरो जसा परफेक्ट असतो तसेच दाभोळकर एअर इंडियाचे हिरो होते. 

मी मूळचा कोल्हापूरचा. जेजे मध्ये आर्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतर मला काही वर्षात एअर इंडियाच्या इंटेरिअर विभागात नोकरी लागली. दाभोळकर पब्लिसिटी विभागाचे प्रमुख असले तरी आमचा विभागही त्यांच्या हाताखालीच असे. त्यामुळे मी आणि आणखी दोघे आर्किटेक्ट त्यांच्या सूचनेनुसार एअर इंडियाची जी काही लाउंज तयार करण्याची कामं असत ती करत असू. तो काळ वेगळा होता. सर्व काम बहुतांशी हाताने होत असे. माझी निवड प्रत्यक्ष दाभोळकरांनी केली होती. आणि मला कामही प्रचंड आवडलं होतं. एअर इंडियामध्ये रुजू झाल्यावर सुरुवातीलाच आमच्याकडे तीन मोठे कार्यक्रम ज्याला आजच्या भाषेत ‘इव्हेंट’ म्हणतात, त्यांच्या आयोजनाची जबाबदारी आली होती. यातलं सगळ्यात महत्वाचं काम होतं ते एशियाड स्पर्धेच्या आयोजनाचं. त्यामुळे एअर इंडियात रुजू झालो तेव्हा मी भलताच बिझी झालो होतो. 

एक दिवस काम सुरु असताना दाभोळकर माझ्याकडे आले आणि म्हणाले,” काय हो बिडकर तुम्ही घरचे फार श्रीमंत आहात असं दिसतंय!” मला लक्षात नाही आलं सर असं का म्हणत आहेत. मी म्हटलं, “ श्रीमंत वगैरे नाही सर खाऊन पिऊन सुखी आहोत आम्ही. पण तुम्ही असं का विचारताय?” यावर सर म्हणाले, “आहो रुजू होऊन सहा महिने झाले तरी तुम्ही अजून पगार उचलला नाही म्हणून म्हटलं ! तेव्हा जा आणि आपला सहा महिन्याचा पगार घ्या आधी, उगाचच एअर इंडियावर उपकार नको एका श्रीमंत माणसाचे !” अर्थात हे सगळं खेळीमेळीच्या वातावरणात चाललं होतं. 

दाभोळकर गर्भश्रीमंत जमीनदार घराण्यातले होते. त्यांच्या आजोबांची गोव्याला प्रचंड जमीन होती. त्यामुळे त्यांच्या वागण्यात एक खानदानी अदब होती. गिरगावात त्यांचं ऐसपैस असं प्रशस्त घर होतं. घरामध्ये दत्तभक्तीची परंपरा होती. त्यामुळंच त्यांचं नाव सच्चिदानंद असं ठेवलं असावं. ऑफिसमध्ये मात्र ते सचिन दाभोळकर या टोपण नावाने ओळखले जात. मला मात्र सच्चिदानंद दाभोळकर असं भारदस्त  पारंपरिक मराठी नाव असलेल्या व्यक्तीला ब्रिटिश शिष्टाचारात मुरलेलं पाहून फार कौतुकमिश्रित आदर  वाटे. ते अनेक वर्ष इंग्लंडमध्ये जे वॉल्टर थॉम्पसनमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व ब्रिटिश शिष्टाचारांमध्ये मुरलेलं होतं. दाभोळकरांना गाड्यांचा संग्रह करण्याचीही प्रचंड आवड होती. ते कुटुंबासहित रेसिंग स्पर्धेत हजेरी लावत असत. अनेक व्हिन्टेज गाड्या त्यांच्या संग्रहात होत्या. 

जवळपास साडेसहा फूट उंची असलेल्या आणि अभिजात व्यक्तिमत्व लाभलेल्या या अधिकाऱ्याचा आम्हाला दरारा वाटे. पण दाभोळकर मात्र स्वभावाने अतिशय मृदू. खरं तर कुठल्याही ऑफिसमध्ये हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन गुड मॉर्निंग करण्याचा प्रघात असतो. पण दाभोळकर मात्र रोज सगळ्यात आधी ऑफिसला हजर व्हायचे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतः गुड मॉर्निंग करून यायचे ! आपल्या हाताखालच्या कर्मचार्यांवर त्यांचा भारी विश्वास होता. व्यवस्थापनाचे आज जे धडे शिकवले जातात की कर्मचाऱ्यांशी कसं  वागावं? ऑफिसमध्ये अधिकारांच्या उतरंडी न ठेवता ‘ओपन कल्चर’ ठेवावं. हे सर्व ते त्या काळात अंमलात आणत होते. कोणतही मोठं काम आलं की ते आम्हाला निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेत. आम्ही  कुशल कर्मचारी म्हणून तयार व्हावं यासाठी आमच्यावर ते जबाबदाऱ्याही टाकत असतं. इतर अधिकाऱ्यांशी बोलताना ते म्हणत, “ डोन्ट वरी माझी मुलं व्यवस्थित जबाबदारी पार पडतील.” आमचा उल्लेख ते ‘माझी मुलं’ असं करत हे खूप छान वाटत असे. एक भारतीय म्हणून एअर इंडीयाबद्दल असलेला अभिमान आपलेपणात बदलत असे. मी इंटेरिअर डिझाईन विभागात काम करत असल्यामुळे मी अनेक अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केलं. पण दाभोळकर मला लाभलेले सर्वश्रेष्ठ बॉस होते ! त्यांच्या हाताखाली मी काम केलं हे मी माझं नशीब समजतो.  

दाभोळकरांचं सगळ्यात मोठं काम काय असेल तर त्यांनी एअर इंडियासाठी तयार केलेला कला संग्रह. त्या काळात चित्रकारांची चित्रं आजच्यासारखी विकली जात नसतं. अशा वेळी दाभोळकर हे चित्रकारांसाठी मोठाच आधार होते. जहांगीरमध्ये ते आले की सर्व जण अगदी स्तब्ध होऊन पाहत असत. दाभोळकरही सगळ्या चित्रकारांना आपण योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत. दाभोळकरांना कलेची जाण उत्तम होती. अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व आणि जेजेची पार्श्वभूमी, त्यात ते अख्ख  जग फिरून आलेले होते. यामुळे खरा चित्रकार कोण? हे त्यांना बरोब्बर कळत असे. मॉडर्न आर्ट, ऍबस्ट्रॅक्टमध्ये कोण उत्तम काम करतो यावरही त्यांची विशेष मतं होती. अर्थात तो त्यांचा किती तरी वर्षाचा व्यासंग होता हे निश्चित. 

दाभोळकरांनी अनेक चित्रकारांना काम दिलं. त्यावेळी दाभोळकरांनी ज्यांना ज्यांना मदतीचा हात दिला त्यापैकी अनेक जण आज मोठे चित्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत. मला आठवतं त्यापैकी ‘उमराव जान’ चित्रपट  करणारे मुजफ्फर अली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते पब्लिसिटी विभागात. गायतोंडे यांचे तर दाभोळकर मित्रच होते. त्या काळात दाभोळकरांनी गायतोंडे यांच्यामधली प्रतिभा केव्हाच ओळखली होती. आज जो ‘महाराजा ट्रेजर’ एमजीएमएमध्ये उभा आहे ती सगळी दाभोळकरांची एकहाती किमया आहे. बी प्रभा यांना पहिला मोठा ब्रेक दाभोळकरांनीच दिला. बी. विठ्ठल यांचीही चित्रे त्यांनी विकत घेतली. एक गोष्ट मला मात्र जाणवली ती अशी की दाभोळकरांच्या काळात एअर इंडियाने फक्त पेंटिंग्ज  किंवा समकालीन शिल्पांचाच संग्रह केला नाही तर अनेक हेरिटेज वस्तूंचाही संग्रह तयार केला. अनेक हेरिटेज वस्तू, कपड्यांचे प्रकार, शिल्पं अशा कितीतरी गोष्टी एअर इंडियाच्या संग्रहात होत्या. या ऐतिहासिक ठेव्याला  या प्रदर्शनात जागा कशी काय मिळाली नाही? हा मला पडणारा प्रश्न आहे. अनेक जण कुजबुजत असतात की नंतरच्या उतरत्या काळात  एअर इंडियाच्या संग्रहाला पाय फुटले म्हणे! त्याबाबत मला अधिकृत काही माहित नसलं, तरी हे जर असं काही झालं असेल तर ते आपलंच दुर्दैव !

दाभोळकर हे एअर इंडीयामधलं तारांकित व्यक्तिमत्व होतं. त्यांनी केवळ कला संग्रह उभा केला नाही तर चित्रकारांनी काढलेल्या या चित्रांचं योग्य उपयोजनही केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कितीतरी प्रसिद्धी साहित्याला प्रचंड मागणी होती. यात पोस्टर्स, कॅलेंडर, डायरी अशा कितीतरी वस्तू होत्या. दाभोळकरांच्या काळात आम्ही एक ‘ओम’या मंत्रावर आधारित पोस्टर तयार केलं होतं. त्याला एवढी मागणी होती की ते सतत प्रिंट करत राहावं लागे. याशिवाय आमचा जो कला संग्रह होता त्यातील पेंटिंग्स आणि इतर वस्तू यांचं प्रदर्शन एअर इंडियाचं लाऊंजेस आणि बुकिंग सेंटर्स इथं आम्ही करत असू. या वस्तू प्रदर्शित कशा करायच्या याचंही मार्गदर्शन दाभोळकर सर करत. 

प्रत्येक संस्थेचा एक वैभाशाली काळ असतो. तसा तो एअर इंडियाचाही एक काळ होता. भारतीय हवाई विश्वावर तेव्हा एअर इंडियाचं अनभिषिक्त राज्य होतं. एअर इंडियाचं राष्ट्रीयीकरण जरी १९५३ मध्ये झालं असलं तरी १९७७ पर्यंत जेआरडी एअर इंडियाचे प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली तयार झालेली मंडळी जोपर्यंत एअर इंडियात होती तोपर्यंत सगळं आलबेल होतं. पुढे मात्र काय झालं हे आपण सगळेच जाणतो. आता एअर इंडियाला उतरती कळा हूकलेल्या व्यवस्थापनामुळे लागली की ही बदलेल्या काळाची करणी होती ते सांगता नाही येणार. पण तो काळ गेला हे खरं. 

१९९८ मध्ये दाभोळकर सर निवृत्त झाले. यावेळी एक निरोप समारंभही आयोजित झाला होता. आम्ही सगळे तेव्हा भावुक झालो होतो. सरांनी आम्हाला खूप काही शिकवलं. कॉर्पोरेट जगासाठी तयार केलं. ही जी कुजबुज अधून मधून कानावर येते की शेवटच्या काळात दाभोळकर सरांना खूप त्रास झाला, किंवा तुम्ही जे म्हणताय की त्यांचा अपमान वगैरे झाला ते थेटपणे माझ्या कानावर कधी आलं नाही. पण तसं झालंही असेल कदाचित. तो काळचं एअर इंडियाच्या इतिहासातील  काळा काळ होता. एका माजी अधिकाऱ्याने तर एअर इंडियाचा  कसा बट्याबोळ झाला यावर  पुस्तकही लिहिलं आहे. (डिसेंट ऑफ एअर इंडिया असं त्या पुस्तकाचं नाव आहे.) अशा काळात दाभोळकरांसारख्या निष्ठावान आणि तत्ववादी अधिकाऱ्याला त्रास झालाच असणार. पुढे सर कौटुंबिक दु:खालाही सामोरे गेले. सरांच्या तरुण मुलाचं दुबई येथे अपघाती निधन झालं ! देव एवढ्या चांगल्या माणसाला एवढं दुःख कसं देतो हे माहित नाही.  

दाभोळकर सरांचं नाव सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हणजे परम आनंद. अध्यात्मिक प्रवासात ज्या पायऱ्या असतात त्यातली सच्चिदानंद ही  शेवटची पायरी. सरांनी एअर इंडियाचा कलासंग्रह तयार करून हे जे एवढं मोठं काम करून ठेवलंय तो रसिकांना शुद्ध आनंदाची अनुभूतीच देतो. त्यामुळे हा संग्रह जरी एअर इंडियाचा म्हणून ओळखला जात असला तरी खऱ्या अर्थानं तो दाभोळकरांचा ठेवा आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. 

*******

– अच्युत बिडकर 

शब्दांकन: कनक वाईकर

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.