Features

चित्र कळणे म्हणजे काय ?

चं. प्र. देशपांडे अर्थात चंद्रकांत प्रभाकर देशपांडे हे मराठीतले विचारवंत लेखक, कवी आणि नाटककार आहेत. त्यांनी फेसबुकवरच्या आपल्या वॉलवर ‘ चित्र कळणे म्हणजे काय ? ‘ या महत्वाच्या विषयावरील चर्चेस प्रारंभ केला आहे.  वास्तववादी, इम्प्रेशनिस्ट, अमूर्त अशा वेगवेगळ्या प्रकारातील चित्र बघताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. अमूर्त कला समजण्यास अवघड असते का ? अमूर्त चित्रात सर्जनशीलता महत्वाची असते का ? वास्तववादी चित्रामध्ये तंत्रशुद्धता महत्वाची असते.? असं असेल तर ते चित्र श्रेष्ठ कसं ठरतं ? अशा बऱ्याच प्रश्नांचा उहापोह या चर्चेत झाला आहे. या चर्चेमध्ये रसिकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या, पण त्यात चित्रकारांच्या प्रतिक्रिया जवळपास नाहीतच. चित्रकारांपर्यंत ही चर्चा पोहोचावी म्हणून ती इथे देत आहोत. जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

मी काही चित्रकलेचे रीतसर प्रशिक्षण वगैरे घेतलेले नाही. थोडेफार वाचन आणि काही ‘ पाहणे ‘ हीच माझी या कलेतली संपर्क-सामुग्री. पण त्यामुळेच मी या विषयावर लिहिले पाहिजे असे वाटले. कोणतीही कला ही काही फक्त प्रशिक्षितांसाठी नसते – ती सर्वच इच्छुकांसाठी आणि उत्सुकांसाठी असते, हे जर खरे असेल तर मीही या विषयावर लिहायला हरकत नाही. काही वेळा, एखादा म्हणतो की अमुक कविता दुर्बोध आहे, तिच्यात काही ऐवजच नाही किंवा अमुक नाटक कितीही प्रामाणिकपणे पाहिले तरी ‘ हाताला काही लागत नाही ‘, म्हणजे काय असते हे हाताला लागणे ? त्यांनाही जेव्हा एखादी कलाकृती आवडते तेव्हा काय घडत असावे ? ते म्हणजे ‘ नको तिथंच पडला अवचित माझा हात ‘ असे काही असेल का ? बऱ्याच लोकांना नाटक पाहिले की ‘ नाट्यात्म विधान ‘ सापडावे लागते, म्हणजे मगच ते नाटक त्यांना समजले, असे वाटते. याचा अर्थ त्यांना त्याची एक वैचारिक कॅप्सूल करता यावी लागते, हे उघड आहे. हे असले सगळे घोळ कोणत्याही कलेच्या संपर्कात येताना असतातच. संगीत ऐकताना मनात वीरभावना निर्माण झाली, दु:ख वा विरह जाणवला म्हणजे ते कळले असे वाटत असावे.

गायतोंडे यांचे एक चित्र.

चित्राच्या बाबतीत, फोटोग्राफिक चित्र काढता येणे हीही काही सोपी गोष्ट नसते, त्यालाही प्रचंड कौशल्य लागतेच. पण तेवढ्याच बाबीला सर्जक कला असे म्हणता येईल का, असा प्रश्न येतो. ज्याला इंप्रेशनिस्टिक किंवा ठसावादी वा प्रभाववादी कला म्हणता येईल तिच्यात आकार ओळखू येतात पण ते ‘ जसेच्या तसे ‘ नसतात. रंग, आकार, पोत, रचना हे सगळेच कॉपिबहाद्दरगिरीपासून लांब असते. हे नव्यानेच पाहणे आणि घडवणे असते. हे नवे काय आहे, वास्तवापासून यात वेगळे काय आहे, त्यामुळे काय घडते आहे – असा विचार करत आणि ‘ पाहात ‘ गेले की त्या चित्रातली सर्जकता उलगडू लागते. कोणत्याही कलेत, तीत अंतर्भूत असलेल्या सर्जकतेबरोबर जाणे म्हणजे ती कळणे, हे इथे लक्षात घ्यावे. यासाठी, अर्थातच, पूर्वग्रहविरहित दृष्टीने चित्र पाहता यायला हवे. कळणे म्हणजे ‘ आपल्या सवयीत बसवणे ‘ हा विचार सोडला पाहिजे. संगीताच्या एखाद्या उत्तुंग आविष्कारात, आपल्याला हा अमुक राग आहे असे कळले नाही तरीही, आपण त्या गायकाच्या सर्जकतेबरोबर राहू शकतो. तसेच चित्रात आहे. चित्र ‘ आवडणे ‘ पासून ते ते ‘ ग्रेट आहे ‘ इथपर्यंत जाणे म्हणजे त्यातल्या सवयबाह्यतेचा, ‘ माहीत नसण्याचा ‘ प्रत्यय येणे.

अमूर्त चित्रकला तर ओळखीचे जग घेतच नाही संदर्भाला. हे अमुक आहे असे म्हणून तिथे काही संपत नाही. सर्जकता असलेली कोणतीही कलाकृती ही ‘ कळून संपली ‘ असे होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक अमूर्त चित्र ग्रेट असते का ? उगीचच काहीही गिचमिड केले तर त्याला अमूर्त चित्र म्हणता येईल का ? या प्रश्नावर विचार करता हे लक्षात येते की प्रथमत: माध्यमावरची हुकूमत जाणवतेच. आणि त्या चित्रात जे काही आहे ते चित्रकाराच्या सखोल चिंतनप्रक्रियेतून आलेले असते. आता हे कशावरून ? तर ते चित्र पाहात राहावे असे आपल्याला वाटते आणि खुल्या मनाने आपण ते पाहात राहिलो तर त्या सर्जकतेच्या प्रक्रियेत आपण जाऊ शकतो. चित्र पाहावेसे वाटणे, आपले पूर्वग्रह सोडावेसे वाटणे आणि सवयबाह्य आशयाची जाणीव होणे ही चांगल्या चित्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

यावरून एक प्रश्न असा येतो की एखादे उत्तम चित्रप्रदर्शन मी पाहिले आणि आता मला त्यावर लिहायचे आहे तर मी काय, कसे लिहिणे अपेक्षित आहे ? तर, थोडक्यात, कोणकोणत्या प्रक्रियांनी ती चित्रे ‘ नवा ‘ म्हणजे सवयबाह्य आशय देत आहेत, हे सांगायला हवे. तेही वैचारिक सारांश न काढता.

*****

(विशेष सूचना : फिचर इमेज मधील दोन चित्रे ही प्रभाकर बरवे यांची आहेत. )

लेखक चं. प्र. देशपांडे यांनी सुरु केलेल्या या चित्रचर्चेवर वाचकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या. त्या पुढील प्रमाणे :
“चित्रे पहात रहाणे, खूप काही पहाणे, दृश्यकलेविषयी, कलावंतांविषयी मिळेल तसे वाचत रहाणे. मग काही काळानंतर स्वत:हूनच त्यातले तर-तम उमगू लागते.”
– जयंत जोशी

“माझे मला कळेना
मज काय कळले नाही!
कळले मला जेव्हा
जे आधी कळले नव्हते!
कळाया लागले मजला
जे कळावयाचे होते!”
– माधव देशपांडे

रूपबंध आणि आशय ( Form and Content )
——————————————————————
कलाक्षेत्रात ( चित्रकला ) रूप आणि आशय हे फार गहन विषय आहेत. चित्रकार हे चांगले निरूपणकार असतातच असे नाही. त्यामुळे चित्रातले आकार/रूप व आशय ह्याविषयी निरनिराळ्या लोकांची मते वाचूनच काही कळले तर कळले.
असेच एक ख्यातनाम चित्र-समीक्षक ( हे अनेक प्रख्यात चित्रकलेच्या म्यूझीयम्सचे संचालक राहिलेले होते ) आहेत श्री. हर्बर्ट रीड नावाचे. ह्यांचे एक पुस्तक “द मीनींग ऑफ आर्ट” हे फार प्रसिद्ध आहे. त्यात अगदी थोडक्यात चित्रकलेच्या अंगांची चर्चा आहे. त्यातल्या रूप आणि आशया संबंधींचे हे टिपण पहा :
Form is the most difficult the four elements which go to the making of a work of art in painting: it involves questions of a metaphysical nature. Plato, for example, distinguishes between relative and absolute form, and I think this distinction must be applied to the analysis of pictorial form. By relative form Plato meant form whose ratio or beauty was inherent in the nature of living things and in imitations of living things : by absolute form he meant a shape or abstraction consisting of straight lines and curves and the surfaces or solid forms produced out of such living things by means of lathes and rulers and squares”, and this immutable, natural and absolute beauty of shape he compared to a single pure and smooth tone of sound, which is not beautiful relatively to anything else, but only in its own proper nature ( cf Phillebus, 51b ). Following this hint of distinction ( it is perhaps no more ), we can , I think, divide the forms which successful works of art achieve in two types, one which may be called architectural, or architectonic, the other symbolic, abstract or absolute. The only trouble is that, when we consider the form of an architectural composition apart from its content, we tend to reduce all form to something abstract or absolute, even symbolic.
( चित्रात जी चार महत्वाची अंगे असतात त्यात रूप हे सगळ्यात कठिण/अवघड अंग आहे. रूपात निसर्गाचे अभौतिक प्रश्न असतात. प्लेटो ने सापेक्ष आणि स्वयंभू रूपांची कल्पना केलेली आहे. ह्या कल्पना आपण जेव्हा एखाद्या चित्राच्या रुपाची चर्चा करतो तेव्हा अंमलात आणायला हव्यात. सापेक्ष रूप म्हणजे असे आकार/ सौंदर्य की जे निसर्गातल्या चराचरात आढळते. स्वयंभू रूप म्हणजे असे आकार जे रेषा, गोलाकार, आणि घन आकारांचे पृष्ठ ह्यांच्यातून तयार होतात आणि जसे संगीतातला एखादा सूर हा सभोवतीच्या सौंदर्यापेक्षा आपल्या स्वत:च्याच नैसर्गिक गुणांनी सुंदर असतो तसेच ह्या स्वयंभू रूपाचे असते. ह्या फरकाच्या जाणिवेने कदाचित्‌ आपण रूपा मध्ये दोन प्रकार कल्पू शकतो. एक स्थापत्यशास्त्रीय आणि दुसरा प्रतीमात्मक किंवा गूढ किंवा स्वयंभू. पण अडचण अशी येते की जेव्हा आपण स्थापत्यशास्त्रीय रूपाला त्याच्या आशयाशिवाय पाहतो तेव्हा आपण सगळ्याच रूपांना प्रतीमात्क, गूढ वा स्वयंभू मानू लागतो. )
– अरुण भालेराव

“सवय बाह्य आशय.. अगदी महत्वाची शब्दयोजना आहे.
दृश्य दिसते…ते पाहत राहावे वाटते आणि परत परत सलग पाहिल्यावर ते एका वेगळ्या,काही वेळा संपूर्ण आशयहीन अशी ( ठोक जगताचे रूढ आशय नव्हेतच, पण अमुक अशी कुठलीच आशय किंवा विचार उत्पत्ति न करता) एक दृश्य अनुभव देते. त्यात पाहणार्‍याला रमावेसे वाटते. आता माध्यम कौशल्य, intense अभिव्यक्ति आणि बघणाऱ्याच्या संवेदना ह्या दोन्ही बाबी तितक्याच प्रामाणिक असतील तर चित्र आनंद देते. ह्या खेरीज तंत्र, उच्च नीच, अभिजात असा भेद असू नये असे वाटते.”
– प्रिया देशपांडे

“पुर्ण सहमत. मला जेव्हा चित्र संगीत कविता कळते तेव्हा त्यातून माझेच संचित मिळते असे नाही. त्याला छेद दिला गेला तरच मला ते उलगडले असे म्हणता येईल. पुन:प्रत्यय नको आहे! ज्ञानी समीक्षक जाणकार लोक हे आस्वाद नीटसा घेऊ शकत नाहीत आणि इतरांना घेऊही देत नाहीत अशी शंका येते. ते त्यांच्या पूर्व संचित संदर्भांच्या वैपुल्यात अडकून अर्थ लावण्यात दंग असतात. राग आणि स्वर , आरोह अवरोह, इतर गायकांशी साधर्म्य, रस निष्पत्ती, कलेचा इतिहास, आणि देशी विदेशी इतिहासातली निर्णायक वळणे यात विद्वत्ता आहे पण ती त्यांच्या आस्वाद प्रक्रियेच्या आड येते असं कधी कधी वाटतं. त्यांनी आस्वादी संवादी बोलावं असं फार वाटतं. इतरांसाठी नाही, स्वतः साठी! फार कमी समीक्षक ज्ञानी लोक असे साधे संवादी असतात.”
– मोहन देस

“छान मांडणी. सारखे निष्कर्ष काढायचे नि ते तपासायचे… ह्यापेक्षा जसं आहे तसं, जे आहे ते… असे पाहता यायला हवे. जसे आपले श्वास… “प्रत्येक गोष्टीचा अन्वय लावायचाच हवा का?” अशी माझी कविता आहे. ती आठवली.”
– पानशेत १९६१ कादंबरीचे लेखक

साल्वाडोर डालीचे ‘द पर्सिस्टंस ऑफ मेमरी’ चित्र.

“अमेरिकेत एक न्यूरोसर्जन आहेत, व्हि. एस्. रामचंद्रन नावाचे. त्यांचे मेंदूवरच्या संशोधनावरचे पुस्तक “ Tell-tale Brain “ फार प्रसिद्ध आहे. त्यांचे म्हणणे की काही काही आकार , हे आपल्याला खूप रुचणारे असतात. जसे: सिमेट्री असलेली नक्षी. सॅल्वोडोर डाली जेव्हा वितळलेली घड्याळे काढतात तेव्हा अर्थातच अशी काही अद्भुत घड्याळे ते दाखवीत नसतात तर ते काळाचे एक रूप दाखवीत असतात, जे ॲब्स्ट्रॅक्ट असते. चित्रकलेच्या व्यवहाराची गंमत म्हणजे जगातली सगळ्यात महाग वस्तु ही पेंटिंग्ज आहे, अजूनही. त्या मानाने दुर्बोध कविता ना कोणी छापतात ना तिची काही किंमत ( मानधन ) मिळते.”
– अरुण भालेराव

” हे उत्तम की कलेच्या दर्शन अनुभूती विषयी शब्दात मते किंवा एकंदर अनुभव / अनुभूती घडताना त्या विवक्षित कलेचे शिक्षण घेणे गरजेचे आहे असे नाही. ह्याचा प्रचार प्रसार होणे गरजेचे. आपले चित्र चांगले आहे हे बरेचदा अनेकांच्या लेखी नसते…रसिक दर्शकाकडून बऱ्याचदा बऱ्याच चित्रकारांना त्यांचे चित्र हे वैश्विक प्रतीचे दृश्य झाले आहे हे समजते. चित्रकार प्रामाण्य आणि समीक्षक प्रतिक्रिया शोधत असतात. तेव्हा ह्या लेखातील तुमचे म्हणणे योग्यच आहे.असे होणे ही सुदृढ सांस्कृतीक आरोग्याची बाब आहे.”

– प्रसन्न घैसास

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.