Features

मुख्यमंत्र्यांना अनावृत पत्र !

जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरातील तीन महाविद्यालयांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आता पुन्हा फिरवून ही तीन महाविद्यालये धरून राज्यस्तरीय कला विद्यापीठ स्थापन करण्याचा कुटील डाव टाकला गेला आहे. या डावामागे असलेल्या संबंधितांचे प्रत्येकाचेच वेगवेगळे हेतू आहेत. कुठले ? ते देखील आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत, पण त्याआधी हा प्रस्ताव बारगळण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाऊ नये यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आणि ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनावृत्त पत्र लिहिलं आहे.

 

श्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 

विषय : जे जे अभिमत बिद्यापीठाचा घोळ

 

महोदय,
आपला तसा थेट परिचय नाही, पण आपण जे जे अप्लाइड आर्ट इन्स्टिटयूटचे माजी विद्यार्थी आहात आणि माझं देखील सारं शिक्षण जे जे स्कूल ऑफ आर्टमधूच झालं. एवढ्याच धाग्यावर हे पत्र आपणास लिहीत आहे.

 

खरं तर आपली भेट झाली आहे. १९७६ साली जेजेमध्येच इंटिरिअर डेकोरेशनच्या वर्गात शिकत असताना तिथल्या एका शिक्षकांच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांनी एक आंदोलन सुरु केलं होतं. ज्यात पुढाकार घेतला होता आमच्याच वर्गातल्या विजय पुपाला या विद्यार्थी मित्रानं. हा विजय पुपाला नंतर फिल्म्स डिव्हिजनचा आर्ट डायरेक्टर झाला होता. दुर्दैवानं त्याचा अकाली मृत्यू झाला. आमच्या आंदोलनाची बातमी बाळासाहेबांना कळताच त्यांनी लागलीच आम्हा विद्यार्थ्यांना मातोश्रीवर बोलावून घेतलं. तेव्हाच्या त्या टुमदार मातोश्रीतल्या त्यांच्या भेटीचा प्रसंग आजही आठवतो. जेजेमधून आलो आहोत हे कळताच बाळासाहेबांनी लागलीच आत बोलावून घेतलं होतं. आत बहुदा मनोहर  जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक असावेत. ते सारं कळण्याचं आमचं वय देखील नव्हतं. आणि आतासारखी तेव्हा शिवसेनेला प्रसिद्धी देखील मिळाली नव्हती. पण मातोश्रीत शिरलो तेव्हा जाणवलं की अतिशय घरगुती वातावरणात आपण प्रवेश केला आहे.
आत शिरल्याबरोबर बाळासाहेबांनी जवळ बसवून घेतलं. अतिशय आपुलकीनं आणि ममतेनं त्यांनी विचारपूस केली. आणि जेजेमध्ये शिकताना ज्या प्रसंगांचा आम्हाला सामना करावा लागत होता ते सारे त्यांनी जाणून घेतले. अतिशय हसत-खेळत, विनोद करत, मोठेपणाचा कुठलाही दबाव आमच्यावर येणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला बोलतं केलं होतं. मध्येच माँसाहेब स्वतः पोहे घेऊन आल्या, खाण्याविषयी आग्रह करू लागल्या, मग आग्रहानं चहा देखील घ्यायला लावला. त्यावेळी शेजारच्या सोफ्यावर आपण आणि राज दोघंही बसला होता. तुमची दोघांची ओळख करून देऊन ते म्हणाले होते, ‘या दोघांनाही जेजेतच शिकायचं आहे, येतील तेव्हा काही लागलंच तर त्यांना मदत करा’ वगैरे वगैरे. मातोश्रीत प्रवेश करताना काहीसे घाबरलेलो आम्ही मातोश्रीतुन बाहेर पडताना मात्र एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या घरातून बाहेर पडतो आहोत की काय इतके मोकळे झालो होतो.

 

पुढे बाळासाहेबांनी जेजेच्या संदर्भात एक अफलातून व्यंगचित्र रेखाटलं, त्या व्यंगचित्रासोबत ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध झालेली जेजेवरची ती लेखमाला बरीच गाजली. हे सारं तुम्हाला आठवण्याचं काही कारण नाही. पण आम्ही जे कोणी मातोश्रीत ५-६ जण गेलो होतो त्यांचा स्मरणात मात्र ती भेट अद्यापही आहे. हे सारं सहज आठवलं म्हणून लिहिलं. असो !

 

त्यानंतर तुम्ही जेजेत प्रवेश घेतला, पण तोपर्यंत शिकता शिकताच मी वृत्तपत्रक्षेत्रात प्रवेश केला होता. त्यामुळे सकाळी ८ वाजता जेजेत यायचं आणि जेवणाच्या वेळी ऑफिसला निघून जात असल्यामुळं बहुदा आपली जेजेच्या कॅम्पसमध्ये भेट होऊ शकली नसावी. या एवढ्याच त्रोटक धाग्यांवर तुम्हाला हे अनावृत्त पत्र लिहिण्याचे धाडस करतो आहे.

 

जेजे अभिमत विद्यापीठासंदर्भात वृत्तपत्रांत बातम्या येऊ लागताच आपण जेजेतील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी चौकशी आरंभल्याचे कानी आले, म्हणून देखील हे पत्र लिहिण्यास मी प्रवृत्त झालो. या संदर्भात आपणास सद्य परिस्थिती कळावी जी केवळ मीच आपणास अधिक चांगल्या पद्धतीनं सांगू शकेन, कारण जेजेमधून १९८१ साली बाहेर पडल्यापासून मी सातत्यानं या संदर्भात बातम्या दिल्या होत्या, लेख लिहिले होते. इतकंच नाही तर ‘चिन्ह’चा तब्बल ३५० पानांचा ‘कालाबाजार’ विशेषांक देखील प्रकाशित केला होता. माझी स्वतःची कुठलीही शैक्षणिक संस्था नाही, मी कुठल्याही शिक्षणसंस्थांमध्ये व्याख्यान द्यायला तर सोडा, पण त्या संस्थांच्या वार्षिक प्रदर्शनाला किंवा स्नेहसंमेलनाला देखील फिरकत नाही. केवळ जेजेमध्ये साडे सहा – सात वर्ष शिकलो आणि पुढं जे काही थोडं – बहुत कार्य या क्षेत्रात केलं त्याला जेजेचा तो रम्य परिसर आणि जेजेची ती भव्य वास्तू कारणीभूत आहे अशी माझी श्रद्धा असल्यामुळे हे सारं मी करतो आहे. अन्य कुठलाही व्यक्तिगत अथवा राजकीय उद्देश यामागे नाही.

 

२० मार्च रोजी रत्नागिरीत आपले शिक्षणमंत्री श्री उदय सामंत यांचं भाषण यु ट्यूबवर ऐकलं. या भाषणात त्यांनी जेजेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबतची घोषणा केलेली देखील ऐकली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र कला विद्यापीठ स्थापन करण्याविषयीची त्यांनी केलेली घोषणा देखील ऐकली आणि मी अक्षरशः थक्क झालो. हा काय प्रकार आहे ? महाराष्ट्रासारख्या एखाद्या प्रागतिक राज्याचा शिक्षणमंत्री एखाद्या विषयासंदर्भात अशी २४ तासातच एकदम परस्पर विरोधी विधानं कशी काय करू शकतो याचं मला आश्चर्य वाटलं !

 

या संदर्भात त्यांनी काढलेलं पत्र पाहिल्यावर तर मी चक्रावून गेलो. २१ मार्च २०२२ चं ते पत्र आहे, ज्यात राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समिती नेमत आहोत वगैरे उल्लेख आहे. आता २० मार्च रोजी रत्नागिरीमध्ये जो समारंभ झाला त्या समारंभात उच्चशिक्षण मंत्री जेजेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यासंबंधीची घोषणा करतात आणि २१ मार्चला तेच उच्च शिक्षणमंत्री राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापण्यासंबंधीचा अहवाल मागवण्यासंबंधीची घोषणा करतात. हे योग्य आहे का ?

 

तुमच्या शिक्षणमंत्र्यांचा उत्साह अमाप आहे यात वादच नाही, पण त्याला अभ्यासाची देखील जोड देणं आवश्यक आहे, असं विधान खेदानं करावं लागतं. कारण आपल्या भाषणात ते जेजेचा उल्लेख सतत ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ ऐवजी ‘जे जे स्कूल ऑफ आर्टस्’ असा सर्रास चुकीचा करत होते. जेजे अभिमत विद्यापीठासंबंधीचे काम गेले जवळ जवळ तीन – चार वर्ष चालू आहे. हा दर्जा देण्यासंदर्भातली प्रक्रिया युजीसीसोबत जवळ जवळ दीड वर्ष चालू आहे. यूजीसीच्या रिव्ह्यू कमिटीनं दोन आवर्तनात सुधारित आवृत्त्यांमधून सादरीकरणे देखील करून घेतली आहेत. त्या संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार देखील झाला आहे. इतकंच नाही तर त्या संदर्भातली भली मोठी फी देखील केंद्र सरकारकडे जमा झाली आहे. असं सगळं असताना २० मार्चला रत्नागिरीत तुमचे शिक्षणमंत्री जे जे स्कूल ऑफ आर्टला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याविषयीची घोषणा करतात आणि २१ मार्चला राज्यस्तरीय विद्यापीठाचा अहवाल सादर करण्यासंदर्भात समिती नेमतात. या दोन्हीचा अर्थ कसा लावायचा ?

 

म्हणजे तुम्हाला जे जे स्कूल ऑफ आर्टला अभिमत दर्जा द्यायचा नाहीये का ? मग आजवर तीन चार वर्ष संबंधितांनी जे काम केलं त्याचं काय ? त्या संदर्भात जी भली थोरली फी केंद्र सरकारकडे सुपूर्द केली त्याचं काय ? ही गोंधळ उडवून देणारी परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटत नाही का ? उच्च शिक्षणमंत्री श्री उदय सामंत हे तरुण आहेत, उत्साही आहेत, धडपडणारे आहेत यात शंकाच नाही, पण ते जरा यासंदर्भात अधिकच उत्साह दाखवत आहेत असं तुम्हाला नाही वाटत का ?

 

उदाहरणार्थ हेच पहा, २० मार्चला रत्नागिरीत त्यांनी अभिमत विद्यापीठासंबंधी घोषणा केली, त्याच समारंभात चिपळूण जवळच्या सावर्डे गावातल्या चित्रकार, शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांचा त्यांनी सरकारतर्फे जंगी सत्कार देखील घडवून आणला. त्यांच्या मोठेपणाची थोरवी देखील ते जाहीररीत्या गायले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याच खात्याने म्हणजे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जो शासन निर्णय प्रसिद्ध केला त्यात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरातील तीनही महाविद्यालयांचे मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात जी अभ्यास समिती स्थापन केली त्या समितीत ज्यांचा २० मार्चला सत्कार केला त्या प्रकाश राजेशिर्के यांचं नाव चक्क ‘विजय राजेशिर्के’ असं छापून ते मोकळे झाले. जरी या साऱ्याची जबाबदारी उपसचिव सतीश तिडके यांची असली तरी उच्च शिक्षण मंत्र्यांची यात काहीच जबाबदारी नाही असं समजायचं का ? ज्यांचा सत्कार आपण २० मार्चला करतो, त्यांचं चुकीचं नाव २१ मार्चला सरकारी परिपत्रकात ( ते ही शिक्षणासंबंधीच्या खात्याच्या ) आपण जाहीर करतो याची थोडीही लाज शरम या लोकांना वाटू नये ? माझे शब्द तुम्हाला काहीसे कडक वाटतील, पण ज्या पद्धतीनं जे जे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय यांचा कारभार गेल्या ३० वर्षात चालला आहे, तो पाहता मी वापरलेले शब्द सौम्यच म्हणता येतील इतकं कर्तृत्व या मंडळींनी गाजवलं आहे !

 

२००८ साली या संदर्भात ‘चिन्ह’चा ‘कालाबाजार’ अंक मी प्रसिद्ध केला होता. त्यात हे सारे आलेच होते, पण त्यानंतर मात्र कंटाळून हे सारे लिखाण थांबवले होते. पण आता मात्र सोशल मीडिया, यु ट्यूब यासारखी समाजमाध्यमं माझ्या हाताशी आली आहेत. इतकंच नाही तर ‘चिन्ह’चं डिजिटल स्वरूप ‘Chinha Art News’ हे देखील आता प्रकाशित होऊ लागलं आहे आणि त्याला कलावर्तुळातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत यासंदर्भात लिखाण करायचं ठरवलं आहे. याची नव्यानं सुरुवात नुकतीच झाली आहे. त्याची माहिती आपणास व्हावी हा देखील या पत्राचा हेतू आहे.

 

तुम्ही जेजेचे माजी विद्यार्थी आहात, म्हणूनच हे धारिष्ट करतो आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि परिसर वाचवायचा असेल तर तो आताच वाचेल ! नाहीतर त्याचे काय होईल हे तुमचे सहकारी पक्षच तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील. ते जर होऊ द्यायचं नसेल तर जेजे अभिमत विद्यापीठाच्या प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्या आणि तीन महाविद्यालयांचं मिळून जे कुणी राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापू पाहताहेत त्यांच्या कुटील कारवाया त्वरित हाणून पाडा !

 

साधी गोष्ट आहे, गेल्या ३० वर्षात महाराष्ट्राला सुसंस्कृत कलासंचालक मिळू शकला नाही. राज्यसरकारच्या चार कला महाविद्यालयांना सुशिक्षित अधिष्ठाता मिळू शकले नाहीत ( दोन अधिष्ठाता मिळाले आहेत असं जे तुम्हाला सांगतील, त्यांनाच त्या नेमणूक कशा झाल्या याचं रहस्य विचारा ) प्राध्यापक मिळू शकले नाहीत, लेक्चरर्स मिळू शकले नाही. इतकंच नाही तर कलाशिक्षण बाह्य स्टाफ देखील देता आला नाही. शिपाई, फौजदार, प्युन, माळी इत्यादींची पदं देखील ज्यांना तब्बल ३० वर्षात भरता आली नाहीत, ते राज्यस्तरीय कला विद्यापीठ स्थापन करू शकतील असं तुम्हाला खरोखरच वाटतं का ?

 

हे सारे कुणाचे तरी खेळ चालले आहेत. कला विद्यापीठ हा कावा आहे, त्याच्या आडून कुणाचीतरी नजर जेजेच्या त्या रम्य परिसरावर आहे. एखादं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करायचं असेल तर किमान २५ एकराचा तरी परिसर लागतो, आहे का त्यांच्याकडे तो ? म्हणजे मग मुंबईच्या बाहेरच कला विद्यापीठ काढावे लागणार. ते काढले म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्टदेखील तेथून हलवावे लागणार, ते हलवले की त्या जागेवर हे टॉवर उभे करणार किंवा व्यापारी पद्धतीनं ती जागा फुकून टाकणार ! असा जर कुणी आरोप केला तर आरोप करणाऱ्यांचे काही चुकले असं म्हणता येईल का ? मागे देखील असाच प्रयत्न झाला होता, देवनारच्या खाटीक खान्याशेजारी जे जे स्कूल ऑफ आर्ट हलवणार होते ! कुमार केतकरांनी लोकसत्तेच्या पहिल्या पानावर सणसणीत बातमी दिली आणि तो डाव हाणून पाडला, आठवतंय तुम्हाला ? जेजेचं वाटोळं जेजेचा माजी विद्यार्थीच मुख्यमंत्री पदी असताना केलं गेलं असा इतिहास लिहिला जाऊ नये असं जर वाटत असेल तर उद्धवराव वेळीच सावध व्हा आणि हा डाव हाणून पाडा ! जेजेचे जे काही भले व्हायचे असेल ते आता तुमच्याच हाती आहे. त्वरित निर्णय घ्या आणि अभिमत विद्यापीठाचा प्रस्ताव मार्गी लावून टाका ! या निर्णयास जेजेच्या साऱ्याच माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा आपणासच राहील याची खात्री बाळगा !

 

कळावे,
लोभ असावा !

 

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.