Features

वारी एका रंगयात्रीची

जेजे स्कूल ऑफ आर्ट ला व्यक्तिचित्रणाची मोठी परंपरा आहे. ही परंपरा चालवणाऱ्यांच्या यादीत महिला चित्रकारांची संख्या फारच कमी आहे. या परंपरेतल एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे उषा फेणाणी पाठक. देशविदेशातील अनेक नामांकीत मान्यवरांची व्यक्तिचित्रे त्यांनी साकारली आहेत. गेली पाच दशके रंगोत्सवसाकारणारा त्यांचा कुंचला आजही तितक्याच समर्थपणे चालतो. या लेखामध्ये त्यांनी कलासाधनेमध्ये गवसलेल्या आत्मानंदाचा आणि जीवन साफल्याचा अविष्कार शब्दबद्ध केला आहे.

  Chinha Art News च्या ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमाच्या ९७ व्या भागात आज सायंकाळी ५.३० वाजता  उषा फेणाणी पाठक आपल्या भेटीला येत आहेत. ‘चिन्ह’ चे संपादक सतीश नाईक सर त्यांची कलात्मक कारकिर्द समजून घेण्यासाठी त्यांना बोलत करणार आहेत.  यानिमित्ताने उषा फेणाणी पाठक यांनी मांडलेल्या या ह्रदग्तातून  त्यांची मुलाखत ऐकण्यास तुम्ही नक्कीच उद्युक्त व्हाल.

****

लेखिका : उषा फेणाणी पाठक

‘पंढरी’ नगरीच्या इतिहासात २०२० च्या आषाढी एकादशीला प्रथमच पायी वारी स्थगित झाल्याचं कळलं आणि मनःचक्षूंसमोर उभी राहिली ती माझी वारी…..’चित्र’ नगरीची. समज आल्यापासून याच वारीचं अभंग स्वप्न पाहीलं आणि ‘रंग शारदेची’ प्राणप्रतिष्ठा ह्रदयात केली. तिची उपासना अखंडीत-अबाधित राहीली… तर तो ‘अमृतानुभवच’ ठरावा.

माझं ‘रंगमंदिर’ म्हणजे माझा ‘स्टुडीओ’! ‘सकारात्मक’ ऊर्जेनं भारलेलं हे एक देवालय!

एखाद्या मंदिरातल्या सारखा पवित्र भाव इथे प्रवेश करताक्षणी मला वेढून टाकतो आणि सामान्य जगापासून दूर.. त्याचे बंध तोडत एका अनोख्या विश्वात अलवार घेऊन जातो. मनाचे एक नवे कवाड उघडते. रंग, कुंचला, कॅनव्हास आणि चित्रनिर्मितीसाठीची तत्सम बरीच सामग्री इथे माझ्या आगमनाची जणू वाट पहात असते.. एखाद्या जिवाभावाच्या मैत्रासारखी. त्यांचे माझ्या भावविश्वाशी बंध जुळले की मग एका नव्या पर्वाची सुरुवात होते.

संगीतात सुरांना त्याची ‘आस’ जशी सौंदर्याचे कोंदण देते, तशी या वास्तूत माझ्या रंगांना प्रकाशाच्या तेजाची झळाळी येते. आकारांचे अनेक विभ्रम त्याला सार्थ साथ देतात आणि माझ्या मनःपटलावर रोज उमटणार्‍या नवनवोन्मेषी कल्पना मग कॅनव्हासवर मूर्त रूप घेत ‘रंगोत्सव’ साजरा करतात. यातून मिळणाऱ्या आनंदाची गोडी काही अवीटच!

एक मात्र खरं.. निर्मितीची ही ऊर्मी जाणतेपणी घडत नाही तशी जाणीवपूर्वक टाळताही येत नाही. आजवरच्या चित्र प्रवासात मला अनेक माणसंं भेटली.. वेगवेगळ्या संस्कृतीची, वेगळ्या  जडणघडणीची आणि मनोवृत्तीची. त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेताना, ‘प्रतिमा’ आधी मनामध्ये अन् मग चित्र फलकावर उमटत गेल्या.

समोरच्या निःशब्द मॉडेलचा ‘आतला आवाज’ ऐकू येणं ही माझ्यासाठी नेहमीच एक विलक्षण उत्कट अनुभुती ठरली आहे. चिंतन-मननातून जसजसा मानवी आत्म्याच्या चैतन्याचा, वैश्विक चैतन्याशी असलेल्या सूक्ष्म नात्याचा मला बोध होत गेला, तसतसा पटावरील व्यक्ति आणि अवकाश यांचा परस्परांमधील गोफही दृढ होत गेला.

‘व्यक्तिला’ अवकाशाच्या संदर्भात एक वेगळं परिमाण मिळालं आणि अवकाशही ‘आशयघन’ बनला. ‘स्पेस विदिन’ या शीर्षकांतर्गत चित्र मालिकेची निर्मिती हे त्याचंच फलित.

यातलं पहिलं वहिलं चित्र होतं, ते आफ्रिकन वंशाच्या एका कृष्णवर्णी व्यक्तिचं. रंगीबेरंगी मण्यांच्या आभूषणांनी अलंकृत असं तिचं आगळं रूप उत्स्फूर्तपणे, मूर्त आणि केवलाकारांच्या मिश्र रचनेतून अगदी सहजरीत्या साकार झालं. या आणि अशा चित्रांमधून व्यक्त होताना, सृजनाचे अनेक साक्षात्कारी क्षण मी जगले..

त्या नंतरची वाटचाल सुरु झाली ती सर्वस्वी अमूर्ताच्या दिशेने!

माझ्या वाचनात आलेल्या संत कबीराच्या एका दोह्याचे सार मनाच्या गाभार्‍यात खोलवर जाऊन भिडले होते. ब्रम्हांडातील ‘चेतनेच्या’ महासागरात आपलं अस्तित्वच जणू विलीन झाल्याची जाणीव झालेला एक इवलासा ‘दवबिंदू’ आणि कालांतराने आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर स्वतःच्या ‘अंतर्गतच’ संपूर्ण महासागर सामावलेला आहे याचे त्याला आलेले भान! या दवबिंदूच्या भावजाणीवेवर माझी एक अखंड चित्र मालिका समर्पित झाली. एकदा का ‘सर्जनाचा’ अमृत डंख नसा नसात भिनला की मग स्थल काल परिस्थीतीच्याही पल्याडचं काहीतरी जन्माला येतं याची साक्ष पटत गेली… ‘प्रतिभेचं  पसायदान’ हे कलावंताला लाभलेलं एक ‘दिव्य’ लेणं आहे, हे किती खरंय!

इ. स.२००९ मध्ये मुंबईच्या म्युझियम गॅलरीत प्रदर्शित झालेल्या या चित्रांना रसिकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

सोबतीनं माझी व्यक्तीचित्रां मधूनही मुशाफिरी चालूच होती. माणसाचं केवळ बाह्यरूपच नव्हे तर त्याच्या आत्म्याचा, म्हणजे पर्यायाने ‘अमूर्त’ शक्तीचाच शोध घेताना काही गमतीशीर अनुभव गाठी आले, जे माझ्या चिरकाल स्मरणात राहीले.

विश्वविख्यात अमेरिकन म्युझिक कंपोझर, कंडक्टर, लिओनार्ड बर्नस्टाइन यांच्या पश्चात न्यूयॉर्क फिलहार्मोनिकचे म्युझिक कंडक्टर म्हणून अतिशय प्रतिभाशाली अशा, नव्या दमाच्या सॅम्युअल वॉंग यांनी सूत्र हाती घेतली. त्याचप्रमाणे वॉशिंग्टन डी. सी. मध्येही जगप्रसिद्ध म्युझिक कंडक्टर झुबीन मेहतांच्या नंतर रिक्त जागी वॉंग यांची नेमणूक करण्यात आली. या अत्यंत मानाच्या पदांमुळे ‘टाइम्स’ मॅगेझिनमध्ये त्यांच्या कार्याचा गौरव होऊन मुखपृष्ठावर त्यांची छबी झळकली आणि ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. याच दरम्यान वॉंग यांचे परम मित्र डॉक्टर अलेक्झांडर हिंडेनबर्ग आणि मरिया गवरिलोवा या दांपत्याने, वॉंग व त्यांची पत्नी (न्यूयॉर्क फिलहार्मोनिकची सेकंड व्हायोलिनीस्ट) यांचे एकत्रीत पोर्ट्रेट करण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मीही मनःपूर्वक अभ्यासानंतर एक उत्तम कलाकृती त्यांना सादर केली. माझ्या स्टुडीओत येवून पेंटिंग स्विकारताना मरियाने त्याचे तोंड भरून कौतुक केले, मात्र दोन दिवस झाले तरी अलेक्स यांची काहीच प्रतिक्रिया आली नाही. मी थोडी साशंक होऊन त्यांच्याशी संपर्क साधला तेंव्हा काहीशा नाराजीच्या सुरांत ते म्हणाले, “you know, Usha, you have captured the character of Mrs. Wong so perfectly… Infact, it’s marvelous, but I am bit concerned about Sam. Although you have rightly caught his essence and spirit as a musician, I think he looks much older/aged in this portrait.” असं म्हणत त्यांनी नकारार्थी मान हलवून आपली नापसंती व्यक्त केली.

झालं… आता माझ्या पोर्ट्रेटच्या परीक्षेची वेळ आली. दोनच दिवसांनी न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध ‘कार्नगी’ हॉल मधील कॉन्सर्टसाठी सॅम यांचं आम्हा तिघांना खास निमंत्रण होतं, तिथंच पेंटिंग न्यायचं ठरलं. नेमकं त्याच दिवशी धुंवाधार पाऊस आणि वादळामुळे हॉलवर पोहोचायला उशीर झाला आणि आम्हाला सॅम यांचं स्टेजवरचं आगमन आणि कॉन्सर्टची सुरवात हुकली…तरीही प्रवेश करताक्षणी सुरांच्या विश्वात आम्ही पुरतेच हरवून गेलो. कॉन्सर्ट अफलातूनच झाली. हर्षभरीत रसिक प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात, सॅम आणि त्यांच्या वाद्यवृंदाला मानवंदना दिली. आतापर्यंत ताफ्याला कंडक्ट करत पाठमोरे उभे असलेले सॅम, प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारण्यासाठी वळून प्रेक्षकांना सामोरे झाले……. आणि तत्क्षणी माझ्या शेजारी उभे असलेले अलेक्स, वीजेचा जोरदार झटका लागल्यागत बेभान होऊन अनपेक्षितपणे मोठयाने ओरडलेच …. “hey, look…. Sam looks exactly like the portrait”…

भोवतालच्या मंडळीचं आमच्याकडे लक्ष वेधल्याचं पहाताच ते ओशाळले.

मला हसूं आवरेना… अलेक्सनी ‘सॅम’ चित्रातल्या सारखा दिसतो म्हटल्यावर मला खरंतर गम्मतच वाटली. सर्वसाधारणपणे ‘चित्र’ माणसासारखं दिसतं असं म्हणणं अपेक्षीत असतं.

कॉन्सर्ट संपल्यावर माझं अभिनंदन करत अलेक्स अगदी भावूक होऊन मला म्हणाले.. कसं इतकं अचूक परिक्षण आहे हो तुमचं ! किती हुबेहुब साकारलय तुम्ही सॅमला ! sorry, आधी मी चुकलो होतो. माझे शब्द मी मागे घेतो.

स्टेजच्या मागे अंतःकक्षात सॅमना भेटायला जाताना मनात विचार आले..आपल्या अतीव्यस्त कार्य बाहुल्यामुळे बर्‍याच काळात अलेक्स आणि सॅम यांची गाठ भेट झाली नव्हती. संगीतात जरी सॅम यांचा जीव गुंतला होता तरी कामाच्या प्रचंड दबावाखाली, तणावामुळे मधल्या काळात त्यांचं वय मात्र पुढं सरकलं होतं आणि ते पोक्त, प्रौढ व काहीसे वयस्कर वाटायला लागले होते. (जसे मी चितारले होते.) अर्थातच अलेक्सना हे अनपेक्षित होतं. मी त्यांचा आधीचा आक्षेप फारसा मनावर घेतला नव्हता तो याच कारणामुळे.

सॅमना आत कक्षात भेटताच पेंटिंग पाहून ते अक्षरशः हरखून गेले.भारावून जात म्हणाले, “Good Lord, this is so amazing!… fabulous! truly out of the world”!

“किती बोलकी आणि जिवंत भासतायत ही  पोर्ट्रेटस ! खरंच सांगा, काय जादू केलीय हो तुम्ही?”

मी पट्कन बोलून गेले…. ‘ती जिवंत वाटतायत कारण मी त्यात माझे प्राण फुंकले आहेत.’

यावर दिलखुलास दाद देत त्या तिघांनीही प्रेमभराने आणि आदरपूर्वक मला आलिंगन देत पेंटिंगचा स्वीकार केला. एका असामान्य कलाकाराकडून आलेली ही रसभरित दाद मला खचितच अपूर्व अंतःसुख देती झाली.

‌न्यूयॉर्क मधील माझ्या वास्तव्यात घडलेला आणखी असाच एक रसिकतेचा विलक्षण किस्सा ..

‘घाना’ मधून श्री.नाझारेथ यांचा मला एके दिवशी अचानक फोन आला.भारताचे न्यूयॉर्क मधील ‘कॉन्सुल जनरल’ हे पद भूषवून नुकतीच त्यांची रिपब्लिक ऑफ घानाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.

माझी विचारपूस करून झाल्यावर ते म्हणाले, मी तुला फोन केलाय तो इथे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेविषयी सांगण्यासाठी.

‌”माझ्या रहात्या घरी चोरी झालीय आणि घरातल्या इतर कोणत्याही मौल्यवान      वस्तूला हात न लावता चोराने फक्त तुझं पेंटिंग उचलून नेलंय. मला रहावलं नाही म्हणून तुला फोन केला. हे पेंटिंग मला फार प्रिय होतं. त्याचा तासनतास आस्वाद घेऊनही मन तृप्त व्हायचं नाही. ते पाहताना माझा सगळा शीण नाहीसा होत असे. आजवर तुझ्या या पेंटिंगने मला भर भरून आनंद दिला…. या बद्दल मी तुझा ऋणी आहे.” त्यांनी एका दमात सांगितलं.

‌’अरेरे, मिसेस नाझारेथचं पोर्ट्रेट नेलं की काय या चोराने?’ मी न रहावून विचारलं.

‌काही वर्षांपूर्वी लंडन मध्ये भारताचे कार्यवाहक उपायुक्त असताना नाझारेथांच्या सौंदर्यवती पत्नीचं मी केलेलं पोर्ट्रेट माझ्या डोळ्यासमोर तरळलं.

‌ छे, छे, ते चित्र नाही गेलं, त्याची डुप्लिकेट (पत्नी) तर घरातच वावरते. एकवेळ ते चित्र गेलं असतं तरी ठीक होतं पण दुर्दैवाने तो चोर ‘crucifixion’ हे माझं magnificent पेंटिंग  घेऊन गेला… त्यांनी स्पष्ट केलं.

‌‌रेनेसान्स शैलीच्या प्रेरणेतून मी साकारलेलं,     ‘crucifixion’ हे एकल रंगातलं तैलचित्र,

‌लंडनच्या चित्र प्रदर्शनात जाणकार आणि रसिकांकडून एक अप्रतिम कलाकृती म्हणून वाखाणलं गेलं होतं. “ते पाहताक्षणी विशेष असे काही सात्विक, शांत-उदात्त भाव मनात जागृत होतात”, असं पूर्वी एकदा नाझारेथ मला म्हणाल्याचं स्मरलं.”

‌‌फोनवर पुढे ते म्हणाले,

‌”खरंतर या शर्विलकाच्या रसिकतेला मी दाद द्यायला हवी….पठ्ठ्या भलताच चोखंदळ निघाला. माझ्या संग्रहातल्या एवढ्या सर्व उत्तमोत्तम पेंटिग्स मधून त्यानं नेमकं हेच चित्र उचललं.

कदाचित… जगातल्या कुठल्यातरी म्युझिअमच्या भिंतीवर दिमाखात विराजमान होत, माझ्यासारख्या असंख्य चित्र प्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडण्यासाठीच कोण्या शर्विलकाने माझ्या घरून तुझ्या या पेंटिंगची उचलबांगडी केली असावी, अशी आता मी माझ्या मनाची समजूत काढतो”..असं म्हणत त्यांनी एक दीर्घ उसासा टाकला.

स्वतः जवळची एक ‘मौल्यवान’ ठेव गमावूनही कुठेतरी आपल्या आंत…. आशावादाच्या रुपानं त्यांनी एक ‘मौलिक’ ठेवाच जपला होता याची मला त्याक्षणी जाणीव झाली.

देश विदेशातल्या, राष्ट्र प्रमुखांसहीत अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांची चित्रं मी साकारली.

शिक्षण महर्षी पूज्य दादासाहेब रेगे यांचं केलेलं पोर्ट्रेट, हाही माझ्यासाठी असाच एक आनंदाचा ठेवा आहे. चित्र स्वीकारताना, “बाळा, मला आरशात पाहिल्यासारखं वाटतयं गं” हे त्यांचे उद्गार आठवले तरी माझी ‘कला’ सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं. माझं कौतुक करण्यासाठी दादा सहकुटुंब आमच्या घरी आले आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.

“माझी बाळं” या त्यांच्या पुस्तकात ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेचे कर्तबगार विद्यार्थी म्हणून माझा आणि माझी धाकटी बहीण पद्मजा हिचा त्यांनी  कौतुकानं केलेला उल्लेख, आम्हाला आमच्या क्षेत्रात अधिकाधिक उत्साहाने कार्यरत होण्याची प्रेरणा देत, उत्तुंग भरारी घ्यायला उभारी देतो.

माझ्या ‘चित्र वारी’ च्या निमित्ताने, चित्र-नृत्य-नाट्य आणि संगीत साहित्यादी कला, तसंच शिक्षण ते राजकारण अशा विविध क्षेत्रांतल्या जगभरातल्या अनेक कीर्तीवंत, अनन्यसाधारण व अद्भुत विभूतींचा स्नेह, सहवास आणि आशीर्वाद मला लाभत असतो हे माझे परमभाग्यच!

त्यायोगे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेले संस्कार माझ्या विचारधनाला अधिकाधिक विशाल आणि समृद्ध करत मला असीम अशा जीवन साफल्याचा आनंद देत रहातात…

***

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.