FeaturesUncategorized

‘व्हॅन गॉग ३६०° – अजरामर कलाकृतींची अद्भुत अनुभूती !’

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईची थंडी जवळपास ओसरली आहे, दिवसातलं कमाल तापमान अनेक डिग्रींनी वाढतंय, असं मुंबईच्या कुलाबा वेधशाळेच्या निरीक्षणात दिसतंय. पण कुलाबा वेधशाळेच्या जवळच असलेल्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ मध्ये मात्र एका वातानुकूलित दालनाच्या जवळ कसल्यातरी डिग्रींचा अगदी कमालच्याही पुढे म्हणजे चक्क ३६०°  असा फलक लागलेला दिसतोय! जागतिक तापमान वाढ तर होत आहे, पण हा फलक अर्थातच तापमानाचा नव्हे! हा आहे, ३६० डिग्री म्हणजे सर्व दिशांचा दर्शक. आणि त्याच्यामागे आहे एक लाडकं नाव! हो, व्हॅन गॉग ! व्हिन्सेंट व्हॅन गॉग!

मुंबईत सध्या व्हॅन गॉग ३६०° नावाचं त्याच्या सुमारे ३०० अजरामर कलाकृती असलेलं हे अद्भुत प्रदर्शन सुरू आहे! जिवंतपणी ज्याला साऱ्या जगाने ठोकरलं, दुर्लक्षित केलं, पण वेळेआधीच या जगातून गेल्यानंतर जगभरातील कलारसिकांच्या हृदयात जो कायमचा वसला, तो व्हिन्सेंट व्हॅन गॉग! अवघ्या ३६ वर्षांच्या आयुष्यात केवळ ९ वर्षे कलासाधना करायला मिळूनही त्या अल्पावधीत २१०० चित्रांची अलोट दौलत जगासाठी सोडून गेलेला, त्यापैकी स्वत:च्या संपूर्ण आयुष्यभरात केवळ एकच चित्र विकले गेलेला, आयुष्याच्या ओढाताणीत मानसिक संतुलन ढासळून मनोरुग्णालयात दाखल झालेला, तिथे असतानाही Starry Night सारखे अजरामर चित्र रंगवणारा, आणि शेवटी स्वतःलाच जीवनाच्या तुरुंगातून मुक्त करणारा व्हिन्सेंट! तो आला आहे आपल्या भेटीला, इथे मुंबईत, २० जानेवारी ते ३ मार्चपर्यंत. दाखवणार आहे आपल्याला त्याच्या चित्रांची ती अद्भुत दुनिया! तीही नुसती कॅनव्हासवर नव्हे, पोस्टरवर किंवा चित्रपटाच्या पडद्यावर नव्हे,  चहूबाजूंना पसरलेल्या स्क्रीनवरील दुनियेत तो आपल्याला ओढून नेणार आहे! 

यात काय बघायला मिळेल? 

या कार्यक्रमात दोन दालने आहेत. पहिल्या दालनात व्हिन्सेंटची चित्रं आणि त्याच्या आयुष्यातील एक एक अध्याय उलगडत नेणारे वर्णन असलेले मोठ्या आकाराचे फलक आहेत. तिथल्या मंद पण उत्कट संगीताच्या साथीने ते वाचताना त्याचा कलाकार म्हणून झालेला प्रवास आणि शेवटी झालेला दुर्दैवी अंत ही कहाणी समजते. दुसऱ्या दालनात ३६० अंशांतला दृश्य-अनुभव मिळतो. दोन्ही दालने बघायला साधारण ४५ मिनिटे ते एक तास लागतो. एरवी आपण व्हिन्सेंटची चित्रं अनुभवतो ते एका मर्यादित आकाराच्या कॅनव्हासवर, मोबाईल किंवा संगणकावर किंवा चित्रपटाच्या पडद्यावर. परंतु इथे एका मोठ्या दालनात  प्रचंड आकाराच्या चार भिंती आणि खालची जमीन यांना व्यापून उरते आहे त्याचे ते चित्र-सौंदर्य! हा अनुभव खरोखर नवीन आहे. व्हॅन गॉगची चित्रं पाहिली नाहीत असा कलारसिक मिळणे अशक्य. सर्वांनीच त्या चित्रांचा आस्वाद घेतला आहे. त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवले आहे. जगविख्यात चित्रपट दिग्दर्शक अकीरा कुरोसवा यांच्या १९९० सालच्या ‘Dreams’ नावाच्या चित्रपटात एक स्वप्न आहे, त्यातला नायक पडद्यावर व्हॅन गॉगच्या चित्रात शिरतो, आणि तिथल्या जगात फिरतो, ते दृश्य पाहिल्यावर अंगावर शहारे येतात. पुढे २०१५ मध्ये आलेल्या ‘Vincent Van Gogh – A new way of seeing’ मध्ये आलेल्या बायोपिकमध्ये Jamie De Courcey या ब्रिटिश अभिनेत्याने हुबेहूब त्याच्यासारखे दिसत त्याच्या निळसर डोळ्यांमधली ती विलक्षण झपाटलेपणाची झाक दाखवली होती, ती हृदयाचा ठाव घेऊन गेली होती. त्यानंतर लगेचच २०१७ मध्ये Loving Vincent हा अॅनिमेशन चित्रपट आला, त्यात शेकडो चित्रकारांनी त्याच्या शैलीत पुन्हा चित्रित केलेल्या हजारो चित्रांनी चालत्याबोलत्या स्वरूपात त्याची जीवनकहाणी उलगडली होती. इतकं झालं तरी व्हिन्सेंटच्या चित्रांची नशा तंत्रज्ञानाची घोडदौड ज्या वेगाने होते आहे, त्या वेगाने चढतेच आहे! म्हणूनच ‘व्हॅन गॉग ३६०°’ हे प्रकरणच वेगळं आहे, कारण इथे आपण समोर एका पडद्यावर चित्रं बघत नाही, प्रचंड आकाराचे चार पडदे किंवा भिंती आणि खालची जमीन यांच्यावर एकाच वेळी ती चित्रं बोलू लागतात, तेव्हा आपण त्या चित्र-अवकाशाच्या आत असतो. ही चित्रं स्थिर बसून राहत नाहीत, हलतात, कुजबुजतात, सुंदर संगीताच्या तालावर हलतात, डोलतात, नाचतात, आंदोळतात आणि आपल्यालाही सोबत फिरवून आणतात! एक तास अगदी गुंग होऊन जायला होते.

अकिरा कुरोसोवा यांचा ‘ड्रीम्स’ चित्रपट.

यामागील तंत्रज्ञान काय आहे? 

Festival House Inc या कॅनडामधील Festivals and Events क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने तयार केलेल्या या ‘दृश्य-अनुभवात बुडवून टाकणाऱ्या’ (Immersive visual experience) या अनोख्या कार्यक्रमाबद्दल कुतूहल वाढले, म्हणून यामागचे तंत्रज्ञान काय आहे, हेही समजून घेण्याचा प्रयत्न केला. ठळकपणे लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, प्रत्येक चित्रात ज्या वस्तू आहेत किंवा छोटे छोटे भाग आहेत त्यांना वेगवेगळे केले आहे आणि त्यांना अॅनिमेशन तंत्राद्वारे हालचाली दिल्या आहेत, आणि अतिशय सुंदर पार्श्वसंगीत दिलेले आहे. ही animated दृश्ये एकामागोमाग एक अशी दिसत राहतात ती छताजवळ असलेल्या अनेक प्रोजेक्टर्समधून. एकाचवेळी चारही बाजूच्या भिंतसदृश प्रचंड आकाराचे screens आणि खालची जमीन यांच्यावर हे दिसत राहतं. यात एकसुरीपणा टाळून अजून गंमत येण्यासाठी की काय, या पाच ठिकाणच्या projections अगदी एकाच क्षणी न होता किंचित अंतराने होतात त्यामुळे नव्या दृष्याची एक लाट आसमंतात पसरली असा भास होत राहतो.  ‘The Starry Night’ चित्राची सुरुवात होते ती संपूर्ण काळोखातून एक पिवळीजर्द चंद्रकोर उगवते त्याने. नंतर आसपास काही तारे लुकलुकू लागतात आणि मग अवघा आसमंत निळ्या प्रकाशात न्हाऊन निघतो, त्यातले ढग फेर धरून गोल घुमायला लागतात, सायप्रस वृक्ष जमिनीतून अलगद उगवून येतात नि डोलायला लागतात! ‘Irises’ चित्रामध्ये त्यातली गर्द निळ्या रंगाची फुले एकएक करत उगवतात ते दृश्य मोहवून टाकते. आणि ‘Almond blossom’ चित्रामधली बदामाची पांढुरकी फुले तर वेडावल्यासारखी आपापली फांदी सोडून हवेत गरागरा फिरायला लागतात. त्यांच्याबरोबर आपणही नकळत नाचायला लागतो. हा सगळा अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा! प्रत्यक्ष विन्सेंटला त्याच्या मनाच्या भावविभोर अवस्थेत ती चित्रं कशी जाणवली असतील याची कल्पना यावरून येते. 

समकालीन कलेच्या प्रवाहात या प्रयोगाचे महत्त्व काय?  

या संकल्पनेला मुळात जन्म देण्याचे आणि ती प्रत्यक्ष साकारण्याचे श्रेय जागतिक स्तरावर नावाजले गेलेले ज्येष्ठ डिजिटल कलाकार Massimilano Siccardi यांना जाते. त्यांनी तयार केलेल्या ‘Imagine Van Gogh: The Immersive Exhibition’ या मूळ कार्यक्रमावरून ‘व्हॅन गॉग ३६०°’ हा कार्यक्रम बेतलेला आहे. Contemporary Art (समकालीन कला) म्हणून या प्रयोगाचे खूप महत्त्व आहे असे मला वाटते. कारण प्रेक्षकांना समुदायाने सहभाग घेण्याची सोय असणे आणि immersive अनुभव घेता येणे, ही समकालीन कलेची वैशिष्ट्ये इथे प्रकर्षाने दिसतात.     

‘Irises’ चित्र अनुभवणारे प्रेक्षक.
‘Sunflowers’ चित्रामध्ये मधमाशीप्रमाणे बुडून आनंद घेणारे प्रेक्षक

काही महत्त्वाचे भारतीय संदर्भ 

Starry night वरून मला आठवले ते ‘नक्षत्रांचे देणे’ हा अप्रतिम कवितासंग्रह आपल्याला देऊन गेलेले मनस्वी कलाकार, कवी चिं त्र्यं खानोलकर तथा ‘आरती प्रभू’! पु ल देशपांडे यांनी ‘मैत्र’ या पुस्तकात ‘खानोलकरचे देणे’ या लेखात खानोलकरांची नाटकं त्यांची प्रतिभा असामान्य असूनही व्यावसायिकरित्या फारशी यशस्वी का झाली नाहीत, याची मीमांसा केली आहे. त्यातून असं लक्षात आलं की खानोलकरांच्या नाटकातील दृश्यांमधील प्रतिमा चित्रवत आणि स्वप्नवत असत. ती दृश्ये पडद्यावर प्रत्यक्षात साकारणे हे आव्हान खूप कठीण होते. शिवाय अश्या स्वप्नवत दृश्यांचा अनुभव आणि पुनरानुभव जसा पुस्तक वाचताना वाचकाला त्याला हवा तेव्हा मागे पुढे जाऊन घेता येतो, तसा तो नाटकाच्या माध्यमात घेता येत नाही, कारण नाटक विशिष्ट गतीने पुढे जात राहते. त्यामुळे असं वाटत राहतं की खानोलकरांना त्यांच्या हयातीत त्यांच्या प्रतिभेला साजेसा न्याय मिळाला नाही. आता व्हॅन गॉगच्या चित्रांच्या दिमतीला जे तंत्रज्ञान आहे, ते खानोलकरांच्या नाटकांना लाभलं तर? भारतीय आणि मराठी डिजिटल कलाकारांनी याचा शोध घेतला तर नवीन काहीतरी गवसू शकेल. जगविख्यात चित्रकार अम्रिता शेरगिलच्या पत्रांवर आधारित ‘तुम्हारी अम्रिता’ नावाचा जावेद सिद्दीकी लिखित कार्यक्रम शबाना आझमी व फारूख शेख यांनी १९९२ मध्ये सादर केला होता. त्यात स्टेजवर अम्रिताच्या पत्रांचं अभिवाचन आणि पत्रातील विषयाच्या अनुषंगाने मागच्या पडद्यावर येत राहणारी तिची चित्रं आणि छायाचित्रं असं स्वरूप होतं. व्हिन्सेंटने त्याचा भाऊ थीओ याला लिहिलेली पत्रंसुद्धा सुप्रसिद्ध आहेत.

Starry night मधील चांदण्याचा आनंद घेणारे प्रेक्षक

प्रत्यक्ष दृश्यानुभव 

मला Van Gogh 360 या शोबद्दल समजलं तेव्हापासून अतिशय उत्सुकता होती. www.vangogh360.in या साइटवर ऑनलाईन बुकिंग करून, मिळाला त्या वेळेचा time slot घेऊन तिकीट बुकिंग केलं तर खरं, पण पोहोचायला थोडा उशीर झाला त्यामुळे धाकधूक होती की आता एक तासाचा हा शो बघायला फक्त अर्धा तास मिळणार! आणि कदाचित यांनी उशीर झाला म्हणून आत प्रवेशच दिला नाही तर? हजार रुपये वाया जाणार! कारण दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे अगोदर पोहोचावे अशी स्पष्ट सूचना आयोजकांनी दिलेली होती. पण तसे काही झाले नाही. तिथे असलेले तरुण अतिशय सौजन्याने सर्वांचे स्वागत करत होते, मुख्य दालनात प्रवेश करताना आपल्या ऑनलाइन तिकिटाला ओटीपीचा टिळा लावण्याचा सोपस्कार करण्यासाठी अगत्याने मदत करत होते, त्यामुळे जिवात जीव आला. मला थोडा वेळ रांगेत थांबून आत जाता आले. मुंबईतील एका सरकारी शाळेची १००-१५० लहानगी मुले माझ्यापुढे रांगेत उभी होती. त्यांच्यासोबत त्यांचे कला-शिक्षक होते त्यांच्याकडून असं समजलं की BookASmile नावाच्या संस्थेने त्या मुलांच्या तिकिटांचा खर्च केला आहे आणि दुसऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना तिथे घेऊन येण्याची सोय केली आहे. सर्व मुलांनी I Love Vincent असे लिहिलेले, व्हिन्सेंटच्या सुप्रसिद्ध ‘Sunflowers’ चित्रमालिकेतील चित्राचे हाताने रंगवून तयार केलेले badges लावले होते. ही कल्पना त्यांच्या शाळेतील कला-शिक्षकांची होती. मुलांनी खूप उत्सुकतेने आणि आनंदाने एक तास धमाल करत शो पाहिला. समोरचं दृश्य बदललं की मुलं जल्लोष करायची. इतरांना तो आरडाओरडा वाटून थोडा त्रास व्हायचा, पण तो तेवढ्यापुरताच.

जगविख्यात चित्रकार अम्रिता शेरगिलच्या पत्रांवर आधारित ‘तुम्हारी अम्रिता’ नावाचा जावेद सिद्दीकी लिखित कार्यक्रम शबाना आझमी व फारूख शेख यांनी १९९२ मध्ये सादर केला होता.

उज्ज्वल कला-भविष्याची आशा

पण जगातील सर्वात सुंदर कलाकृतींमध्ये समावेश असणाऱ्या या कलाकृतींची ओळख त्यांना अगदी लहान वयात होते आहे हे खूपच छान आहे. त्यासाठी काही संस्था आणि कला-शिक्षक उत्साहाने प्रयत्न करत आहेत, ही गोष्ट मला अतिशय आश्वासक वाटली. न जाणो यातूनच उद्याचे काही कलाकार निर्माण होतील! आपल्या भोवती फेर धरून संगीताच्या तालावर नाचणारी व्हिन्सेंटची स्वप्नवत भासणारी चित्रे, त्यातले रंग डोळ्यांमध्ये साठवत मी परतलो, तेव्हा कलेच्या दुनियेत खूप चांगले काही घडण्याची आशासुद्धा वाटू लागली. प्रदर्शनाच्या शेवटी Van Gogh Souvenirs विकत घेण्याचे स्वतंत्र दालन आहे. तिथे त्याची चित्रं असलेले टीशर्ट, मग, कानातली, अश्या १५-१६ प्रकारच्या वस्तू आणि त्याच्या चित्रांची पोस्टर्स विकत मिळतात. आठवण म्हणून, भेटवस्तू म्हणून या वस्तू खूपच सुंदर आहेत पण माझ्यासाठी मात्र डोळे आणि मन थंड, तृप्त होत व्हिन्सेंटच्या चित्रांची मनात केलेली साठवण ही एक सुंदर आणि मौल्यवान आठवण आहे.

व्हॅन गॉग : द वे ऑफ सिईंग चित्रपटाचं ट्रेलर.

जाताजाता..
या शोचे तिकीट www.vangogh360.in या साइटवरून किंवा https://in.bookmyshow.com/activities/van-gogh-360/ET00342027 या साइटवरून किंवा Bookmyshow app वरून काढता येते, ६९९ पासून २५०० रुपयांपर्यंत तिकिटाचे दर आहेत. लहान मुलांसाठी अर्धे तिकीट नाही. २० जानेवारी ते ३ मार्च २०२३ हा शोचा मुंबईतला कालावधी आहे. मुंबईनंतर आता हा शो दिल्लीमध्ये होणार आहे, शिवाय भारतातील अन्य १४ शहरांमध्ये सुद्धा करणार असल्याचे याच वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. असाच शो आता जगप्रसिद्ध चित्रकार Frida Kahlo वर सुद्धा अमेरिकेत येऊ घातला आहे असे अमेरिकेतील एका कला-रसिक मैत्रिणीने कळवले. तो शोसुद्धा लवकरच भारतात येवो आणि Frida च्या चाहत्यांचा जीवसुद्धा थंड होवो ही सदिच्छा!

लविंग व्हिन्सेंट चित्रपटाचं ट्रेलर.

*******

– विनील भुर्के
कृषी-उद्यानविद्या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी – शिक्षण व संशोधन केल्यानंतर, कृषी-व्यापार व ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्रातील २० वर्षांचा कार्यानुभव. त्यापैकी गेली ९-१० वर्षे स्वयंशिक्षित कलाकार म्हणून कलेचा अभ्यास करत आहेत. व्यापार-व्यवस्थापन शिक्षण या क्षेत्रात कार्यरत असतानाच्या सहयोगी अधिष्ठाता या पदाचा त्यांनी स्वेच्छेने त्याग केला असून आता पूर्णवेळ कलेचा विद्यार्थी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

Related Posts

1 of 70

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.