Features

तपस्वी चित्रकार : लक्ष्मण गणपत महाजन

स्वर्गीय कलाशिक्षक लक्ष्मण गणपत महाजन हे पंचक्रोशीत एल.जी. महाजन म्हणून परिचित होते. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल जामनेर जि. जळगाव येथे सलग ४१ वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांना जाऊन बावीस वर्षे झाली. त्यांनी केलेली निवडक निसर्ग चित्रे ” LAXMAN TO LAXMAN ” या नावाने पु.ना.गाडगीळ अँड सन्स गॅलरी जळगाव येथे दि.१६ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहेत. या प्रदर्शनाची संकल्पना चित्रकार पिसुर्वो यांची आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते होत आहे. यानिमित्ताने एल. जी. महाजन यांचा कला प्रवास या विशेष लेखातून राजेंद्र महाजन यांनी मांडला आहे. सोबत एल. जी. महाजन यांची चित्रे चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकनासाठी इथे देत आहोत. 

भारतीय कलेबद्दल आस्था असणारे कॅ.ग्लॅंडस्टन सालोमन हे सन १९१९ ला सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या जगद्विख्यात कला संस्थेचे प्राचार्य झाले. त्यांचा १७ वर्षाचा कार्यकाळ अनेक अंगाने वैभव संपन्न समजला जातो.राजा रविवर्मा यांच्या ॲकॅडमीक शैलीच्या तैलचित्रांचे तत्कालीन पिढीला अप्रूप होते‌. आणि दुसरीकडे ल‌.म.तासकर मास्तर,रावबहादुर धुरंदर, माधवराव परांडेकर,एस. एल. हळदणकर इ. दिग्गज चित्रकारांची जलरंगातील निष्णात चित्रकला खुणावत होती. तैलरंग हाताळण्याची उत्सुकता आणि पारंपारिक जलरंग माध्यमावर प्रभुत्व मिळवण्याची धडपड यांची सरमिसळ करण्याचा तो काळ. या महत्त्वाच्या कालखंडात एल.जी.महाजन यांनी सर जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून सन १९३१ते १९३६ च्या दरम्यान डी.टी.सी.(ड्रॉइंग टीचर्स सर्टिफिकेट), ए.एम.(आर्ट मास्टर), ॲडव्हान्स एक्झामिनेशन ऑफ ड्रॉइंग अँड पेंटिंग हे अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. प्रसिद्ध चित्रकार व माजी कला संचालक माधवराव सातवळेकर, चित्रकार शावक्ष चावडा हे त्यांचे सहाध्यायी होते.ग्लॅडस्टन सालोमन,मारी अँडरसन यांची व्यक्तिचित्रे महाजन यांना आवडायची. या प्रभावात त्यांनी काही पोर्ट्रेट्स केली पण त्यांना फार प्रतिसाद लाभला नाही.

ॲडव्हान्सच्या वर्गात त्यांना तळवडेकरांनी शरीरशास्त्राचा अभ्यास, तैलरंग माध्यमाचे तंत्र समजावून सांगितले. या गुरुप्रती शेवटपर्यंत त्यांना आदर होता. एल.जी.महाजन यांना मुंबई पुण्यासारख्या शहरात स्थिरावण्याची संधी असताना त्यांनी जामनेर या तालुक्याच्या छोट्या गावात चित्रकला शिक्षक होणे पसंत केले. गावाच्या परिसरात असलेल्या पहाडीबुवा,सोनबर्डी,राशीमुशी या टेकड्या व तेथील निसर्ग,गावाबाहेरुन बारमाही वाहणाऱ्या कांग नदीचा वळणदार घाट, नदीच्या अल्याडपल्याडची बायका माणसांची कामाची धावपळ, गावातील नगारखाना चौक,दर्गा,मंदिरे जाहागिरदारवाड्याची जुनी इमारत त्यांच्या निसर्गचित्रांचा विषय होऊ लागला.९४ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी एक हजारांवर निसर्ग चित्रे  रंगविली आहेत. त्यांच्या काही निसर्गचित्रांना बक्षीसेही मिळाली; त्यात शाहू महाराज आर्ट सोसायटी (कोल्हापूर),महाराष्ट्र इंडस्ट्रियल प्रदर्शन(पुणे),पहिले मराठी साहित्य संमेलन(अमळनेर) ही महत्त्वाची आहेत.

स्पर्धांमधून निसर्ग चित्र पाठवावी असा त्यांचा पिंड नव्हता. प्रसिद्धीच्या कोसो दूर राहून निरलसपणे कलाध्यापन करणे,आत्ममग्न होऊन आजूबाजूच्या निसर्गाच्या बदलत्या मूड्स ना चित्रबद्ध करणे, त्यातून आनंद घेणे एवढेच त्यांना जमत असे. ललित कला अकादमी,नवी दिल्लीच्या पहिल्या डिरेक्टरीत त्यांचा परिचय व निसर्ग चित्र छापलेले होते(१९८१), ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस् सोसायटी(आयफेक्स) नवी दिल्ली या संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त एल.जी,सरांना वेटरन आर्टिस्ट म्हणून रौप्यपट्टीका देऊन गौरवलेले होते. ही समाधानची बाब म्हणावी लागेल. 

सन १९८७ मध्ये दिवाळीच्या दिवसात जामनेरच्या सुतार गल्लीतील त्यांच्या घरी मी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी उत्साहाने आपली शेकडो निसर्गचित्रे मला दाखविली होती व त्यांच्याकडून त्या त्या स्थळांची वर्णने ऐकता ऐकता दोन-तीन तास सहज निघून गेल्याचे आज आठवते. गौरवर्णी देखणेपण लाभलेल्या एल.जी. सरांची भाषा सौम्य मृदू, बोलण्याची हळूवार पद्धत मला भारी आवडली होती. मी प्रश्न विचारण्यापूर्वीच ते,”माझ्या आईचे माहेर पिंपळगाव हरेश्वरचे…आजोळी नेहमीच येणे जाणे व्हायचे,जामनेर पाचोरा नॅरो गेज रेल्वेने प्रवास व्हायचा, धुराच्या इंजिनच्या या  रेल्वेचा वेग सावकाश असायचा. दोन्ही बाजूंनी निळ्या डोंगराच्या दूरवरच्या रांगा दिसायच्या, त्यातील लहान मोठ्या टेकड्या सतत बघून मला निसर्गाची ओढ निर्माण झाली आणि वयाच्या १०व्या वर्षीच अजिंठा वेरूळ लेण्यांना भेट दिल्यामुळे तिथला निसर्ग पाहिल्यानंतर तर मी हरखून गेलो होतो. सुरुवातीला झाडांची चित्रे केली.

गोविंद महाराजांच्या मंदिराला रंगवणाऱ्या टेणी नावाच्या पेंटरने पहिल्यांदा माझ्या चित्राची वाहवा केली; त्यामुळे उत्साह दुणावला. मॅट्रिक झाल्यावर प्रांत कार्यालयात नोकरी पण कलेची आवड स्वस्थ बसू देईना,शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण असल्याने अधिकृत चित्रकला शिक्षकाचे शिक्षण नसताना सुद्धा न्यू इंग्लिश स्कूलला नोकरी मिळाली. तिथल्या बेंडाळे सरांनी कलेच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाण्याचा आग्रह केला आणि मी चित्रकला शिक्षक झालो. असे बरेच मला ते सांगत राहिले आणि मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहीलो.

   

 एल.जी. महाजन यांच्या निसर्गचित्रांची धाटणी काहीशी वेगळी होती.त्यांनी ऑईल पेंट, ऑईल पेस्टल्स् या माध्यमातून काही निसर्गचित्रे केलीत पण ते अधिक रमले पारदर्शक अशा जलरंग माध्यमात. त्यांना मुद्दामहून कुलू मनाली सारख्या निसर्गरम्य स्थळांवर निसर्गचित्रणासाठी जावे असे कधी वाटले नाही. त्यांचा निसर्ग आपल्या मातीतला; अनुभवलेला,मनावर कोरला गेलेला होता.जसे कांग नदीचा वळसेदार घाट, तेथील भांडीधुणी करणाऱ्या व डोक्यावर पाणी वाहणाऱ्या बायका, शेताकडे निघालेले कष्टकरी, गांवकरी, हिरव्या छटांनी नटलेली नजिकची शेतीवाडी, नगारखाना चौक;तिथला ऊन सावलीचा खेळ आणि धुक्यात हरवलेला गावगाडा एल.जी. सरांनी सातत्याने वारंवार चित्रबद्ध केला. नगारखान्याची तर अनेक चित्रे त्यांनी केलेली आहेत. 

‌त्यांच्या निसर्गचित्रणात रंगांचा उत्सव नाही,भडकता नाही मात्र आपलेपणा आहे,अनुभवलेला जिवंतपणा आहे तसेच सहज सोप्या जवळजवळच्या रंगछटातून मारलेले फटकारे आहेत.रंगाचा ताजेपणा हा त्यांच्या निसर्गचित्रांचा स्थायीभाव आहे.प्रत्येक निसर्गचित्रणाची मांडणी अगदी साधीच आहे पण लय ही विशेषत्वाने आलेली दिसते.कुठल्याही समकालीन चित्रकारांच्या चित्रांचा प्रभाव त्यांनी टाळलेला दिसतो.

त्यांच्या रंगलेपनातील हळुवारता,नाजूकता आणि काव्यात्मकता रसिक मनाला जिवंत भावबोलका अनुभव देतांना दिसते. रूट ऑफ लव्ह, नगारखान्यात पोहोचलेला महापूर ही निसर्गचित्रे त्यांच्यातील हळवी संवेदनशीलता प्रकट करणारी आहेत. निसर्गाच्या निरव शांततेचा अनुभव देणारी निसर्ग चित्रे महाजन सरांच्या शांत, अबोल व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवून देण्यात यशस्वी ठरते. पाळण्यातील लक्ष्मण म्हणजे युवाचित्रकार पिसुर्वो व जुन्या पिढीतील लक्ष्मण म्हणजेच एल.जी.महाजन; दोघेही एकाच मातीतले….LAXMAN TO LAXMAN हे प्रदर्शन तीन पिढ्यांना जोडणारे असे आहे. पिसुर्वोंकडे काळाच्या गतीशी स्पर्धा करणारे झपाटलेपण आहे तर  एल.जी.महाजन निसर्गांतील नीरव शांततेचा अनुभव देणारे आहेत; दोहोंच्या कलाअनुभवांचा एकत्रित प्रयोग, रसिकांना नक्कीच पर्वणी ठरावी.

*****

– राजेंद्र महाजन

प्राचार्य, ललित कला केंद्र, चोपडा(जळगाव)

मो.९४२३९३६५९७

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.