Features

कला तपस्विनी !

ज्येष्ठ चित्रकार आणि कला इतिहास अभ्यासक डॉ. नलिनी भागवत यांचं कोल्हापूरमध्ये वृद्धापकाळाने आज दि १५ सप्टेंबर रोजी निधन झाले. नलिनी भागवत या सर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये विद्यार्थीप्रिय विद्वान प्राध्यापिका म्हणून प्रसिद्ध होत्या.  चित्रकार रवी मंडलिक आणि फिलिप डीमेलो यांच्याशी त्यांचा कौटुंबिक स्नेह होता. या दोघांनी आपल्या आठवणी या लेखातून चिन्हच्या वाचकांसाठी मांडल्या आहेत. 

डॉ. नलिनी भागवत हे खरं तर जेजेच्या विद्यार्थ्यांमध्ये सुपरिचित नाव. त्या केवळ चित्रकारच नव्हत्या तर त्यांचा कलेचा अभ्यास देखील दांडगा होता. कलेचा त्या चालत बोलता इतिहासच होत्या जणु. गुरुवर्य दत्तोबा दळवी यांच्या काळात दळवीज मधील त्या महत्वाच्या  विद्यार्थिनी होत्या. डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या स्त्री चित्रकार म्हणजे डॉ.  नलिनी भागवत. त्यांनी आपली पीएचडी बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून डॉ. रतन परीमू  यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली होती. जे जे स्कुल ऑफ आर्टमध्ये त्यांनी अनेक पिढ्यान कलेचा इतिहास शिकवला. त्यांना २०१५ साली राज्य शासनातर्फे राज्य कला प्रदर्शनात गौरवण्यात आले होते, तसेच नाशिकच्या वा. गो. कुलकर्णी कलानिकेतन महाविद्यालय आणि कोल्हापुरातील रंगबहार या संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. कला इतिहासातील विद्वान म्हणून त्यांना देश पातळीवर मान्यता होती. असे असले तरी त्या स्वभावाने अतिशय विनम्र होत्या. आपल्या विद्वात्तेचा कुठलाही अहंकार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही. कला अभ्यासात त्यांनी स्वतःला  झोकून दिले होते. त्यामुळेच कौटुंबिक जबाबदारीचा व्यत्यय अभ्यासात नको म्हणून त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. 

जेजे मध्ये नलिनी मॅडम खरं तर पेंटिंगच्या प्राध्यापिका. जेजे मध्ये रजनी प्रसन्ना या कला इतिहास प्राध्यापिका होत्या. त्या संपूर्ण इतिहास इंग्रजीत शिकवत. इथे मराठी विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत असे. मग मराठी विद्यार्थी आपल्या शंका घेऊन नलिनी मॅडमकडे जायचे.  आणि मॅडम त्यांना विषय अगदी छान समजावून सांगायच्या. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी कला अभ्यासात मदत केली. मुळातच स्नेहशील स्वभाव असल्याने त्यांची विद्यार्थ्यांशी चटकन मैत्री होत असे. विशेषतः जेजे मधील मुलींना मॅडम अगदी घरच्याच वाटत असत. अनेक विद्यार्थी आपल्या अडचणी नलिनी भागवताना सांगत. आणि नलिनी मॅडम त्या सोडवत असत. 

विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढावा म्हणून  त्या अनेक सहली आयोजित करत असत. डहाणू येथे त्यांनी आयोजित केलेली विद्यार्थ्यांची एकदिवसीय सहल विशेष लक्षात राहण्यासारखी होती. या सहलीतच त्या विद्यार्थिनी प्रिय प्राध्यपिका म्हणून सगळ्यांना परिचित झाल्या. त्यांनी एक सहल कोल्हापूरला आयोजित केली होती. ही शैक्षणिक सहल विशेष आठवणीत राहिली. कारण त्यांनी या सहलीत ऐतिहासिक महत्वाच्या जागांच्या भेटी तर करवल्याच पण विद्यार्थ्यांची  रवींद्र मेस्त्री, चंद्रकांत मांढरे यांच्याशी भेट घडवून आणली होती. प्रसिद्ध चित्रकार आणि अभिनेते चंद्रकांत मांढरे यांच्याशी विद्यार्थांची भेट व्हावी त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे अशी नलिनी मॅडमची तळमळ होती. चंद्रकांत मांढरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, त्यांच्या पत्नी ही भेट नाकारत होत्या. पण जेव्हा मांढरेंनी नलिनी भागवतांचे नाव ऐकले तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांना विद्यार्थ्यांसह घरी बोलावले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सहलीत नलिनी भागवतांनी विद्यार्थ्यांसाठी  पन्हाळ्याची टूरही आयोजित केली होती. विद्यार्थ्यांच्या मुक्कामाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पन्हाळ्याचे नामांकित उद्योजक लोहिया यांनी सर्व विद्यार्थ्यांची सोय नलिनी भागवत यांच्या सांगण्यावरूनच लोहिया बंगल्यावर केली होती . 

नलिनी भागवतांचे एक चित्र

नलिनी भागवतांनी विद्यार्थ्यांची अनेक प्रदर्शने आयोजित केली होती. त्यापैकी एक मोठा शो जहांगीर गॅलरीला झाला होता. नेहरू सेंटरला त्यांनी स्वातंत्र्याची पन्नास वर्षे हा शो क्युरेट केला होता. अशा अनेक प्रदर्शनांबरोबरच त्या कला इतिहासावर अनेक लेख लिहीत असत. नेहरू सेंटरच्या संचालिका नीना रेगे यांनाही त्या अनेक कार्यक्रमात मदत करत असत. मुंबईच्या  नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरीच्या शरयू दोशी  यांनाही त्या अनेक संदर्भांची मदत करत. 

जेजे मध्ये फौंडेशन सेकंड इयरला नलिनी मॅडम इन्चार्ज असताना रवी मंडलिक तेथे  व्याख्याता म्हणून रुजू झाले. त्यावेळी दोघांचा परिचय झाला. रवी मंडलिक यांचे लग्न झाल्यावर, मंडलिकांच्या पत्नींशी भागवत मॅडमचा स्नेह वाढला आणि कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. नलिनी मॅडम मंडलिकांच्या घरी येत असत. बोरिवलीमध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांना दुखापत झाली तेव्हा रवी मंडलिकांच्या कुटुंबाने त्यांची काळजी घेतली. 

चित्रकार फिलिप डीमेलो हे त्यांचे विद्यार्थी. डीमेलोंसाठी नलिनी भागवत या अगदी मोठया बहिणीसारख्या होत्या. नलिनी मॅडमना डीमेलोंचे  काम अतिशय आवडत होते. डीमेलोंशीही त्यांचे घरगुती जिव्हाळयाचे संबंध होते. २००८ मध्ये नलिनी मॅडम आणि फिलिप डीमेलो इतर सात आठ चित्रकारांसह युरोप टूरला गेले होते. या सहलींमध्येही त्यांनी चित्रकारांना अनमोल मार्गदर्शन केले. नलिनी मॅडमची स्मरणशक्तीही अतिशय तल्लख होती. सहलीत अनेक म्युझियम्स बघताना कुठले चित्र, कुठल्या चित्रकाराने कधी काढले याची माहिती त्या न चुकता संदर्भासहित देत असत. 

डॉ. नलिनी भागवत आणि फिलिप डीमेलो (यूरोप सहलीच्या वेळी काढलेला फोटो )

या टूरमधली एक आठवण सांगताना डीमेलो म्हणाले “ नलिनी मॅडमचा मुंबई विमानतळावरच बूट तुटला, अशा मोक्याच्या वेळी काय करायचे तेव्हा मला एक कल्पना सुचली आणि मी माझ्याजवळच्या टेपने त्यांचा बूट जोडला. कामचलाऊ का होईना सोय झाली. माझ्या या प्रसंगावधानावर मॅडम खूश झाल्या आणि त्यांनी नंतर सर्वांना चहा पार्टी दिली.” 

दुसरी एक भयानक आठवण म्हणजे त्यावेळी एस्कलेटर्स अर्थात सरकते जिने भारतात नवीन होते. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांची थोडी भीती होती. मात्र मॅडमना हे सरकते जिने जरा चालण्यातही अवघड वाटत होते. मी मॅडमना म्हटले की,  मॅडम इथे विमानतळावर आपण आधी प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिसनंतरही मॅडमची भीती जात नव्हती, पण  पॅरिसला असा जिना वापरण्यावाचून गत्यंतर नव्हते. तिथेच मॅडमचा एका सरकत्या जिन्यावर कसा तोल गेला माहित नाही मॅडम अक्षरश: एस्कलेटरवरून घरंघळत गेल्या. नशीब बलवत्तर म्हणून मॅडम वाचल्या.”

नलिनी भागवतांचे एक चित्र

आयुष्याच्या उत्तरार्धात नलिनी भागवतांनी  कोल्हापूरला आपल्या मूळ गावी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे फिलिप डीमेलो यांना वाईट वाटले. पण मॅडम त्यांना वारंवार भेटायला मुंबईत येत असत. यावर्षीही पाऊस कमी झाल्यावर त्या डीमेलोंना मुंबईला भेटायला येणार होत्या. पण अचानक  त्या बाथरूममध्ये पडल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या कोमात गेल्या. ही दुर्दैवी बातमी कळल्यानंतर रवी मंडलिक आणि फिलिप डीमेलो काल त्यांना कोल्हापूरला भेटून आज मुंबईत परत आले आणि सकाळी  ही वाईट बातमी त्यांना समजली. 

नलिनी मॅडम या  स्वभावाने अतिशय साध्या आणि सरळमार्गी. त्यांचा ‘भारतीय कला इतिहास’ हा प्रबंध अतिशय महत्वाचा होता. अनेक लोक त्यांना या प्रबंधातील माहिती विचारून लेख लिहीत आणि तो आपल्या नावावर छापून टाकत. एका मुलाने तर हद्दच केली. खूप वर्षांपासून रवी मंडलिक  मॅडमनी हा महत्वाचा  प्रबंध ग्रंथरूपात आणावा म्हणून पाठपुरावा करत होते. पण मॅडमनी हे फारसे मनावर घेतले नाही. काही वर्षापूर्वी एक तरुण  मॅडमना भेटायला गेला. हा प्रबंध ग्रंथरूपात छापतो म्हणून त्याने ही अमूल्य ग्रंथ संपदा स्वतःच्या ताब्यात घेतली आणि गायब झाला. आणि हा बहुमोल प्रबंध त्याने स्वतःच्या नावावर केला की इतर पीएचडी उमेदवाराला विकला हे कधीच कुणाला कळले नाही. ही अत्यंत दुर्देवी घटना या विदुषीच्या बाबतीत घडावी याचे मांडलिकांना अतिशय  दुःख वाटले. 

कलेसाठी आयुष्यभर अविवाहित राहून ज्ञानसाधना करणारे लोक खूप कमी असतात. त्या काळात असा धाडसी निर्णय घेऊन आयुष्यभर कला अभ्यास करणाऱ्या डॉ. नलिनी भागवत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

– रवी मंडलिक आणि फिलिप डीमेलो. 

(शब्दांकन : कनक वाईकर )

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

या लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.