Features

chinha.com ने मला काय दिलं ?

‘चिन्ह’ची जुनी वेबसाईट जेव्हा आम्ही पूर्ववत सुरु केली तेव्हा अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांच्या छत्रछायेखाली अनेक लेखक लिहिते झाले. आणि वर्तमान काळात चिन्ह आर्ट न्यूजची कार्यकारी संपादक म्हणून मीही लेखन करत आहे. चिन्ह सोबतचा माझा प्रवास सुरु झाला तो एक फॅन आणि वाचक म्हणून. हा प्रवास सुरु झाला तेव्हा मला पुसटशीही कल्पना नव्हती की आगामी काळात मी ‘चिन्ह’चाच भाग होईल. ‘चिन्ह’ या कला चळवळीची मला ओळख झाली ती जुन्या वेबसाईटच्या माध्यमातून. या जुन्या वेबसाइटशी माझ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे वेबसाईटचं पुन्हा एकदा लोकार्पण करताना जुने दिवसही आठवत आहेत. या आठवणींवर आधारित हा लेख. हा पण वाचक म्हणून एक लक्षात ठेवा चिन्ह चा पत्ता आता चिन्ह.कॉम नसून चिन्ह.इन (chinha.in) असा झाला आहे बरं का !

आपल्या सगळ्यांना आवडणारी ‘चिन्ह’ची जुनी वेबसाईट आता पुन्हा कार्यरत झाली आहे. मागील आठवड्यात ‘चिन्ह’च्या वेबसाईटला एक तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे सलग तीन दिवस काहीही अपडेट्स आम्हाला देता आले नाही. पण वाईटातून चांगलं होतं या उक्तीप्रमाणे आपली नवी वेबसाईट तर जोमात सुरु झालीच पण त्याच बरोबर आम्ही ‘चिन्ह’ची जुनी वेबसाईटही कार्यरत केली आहे. ही वेबसाईट पुन्हा कार्यरत व्हावी यासाठी आमचे बरेच दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. आणि ती आता यशस्वीपणे सुरु झाली आहे. वेबसाईटची लिंक जेव्हा मी सर्व वाचकांपर्यंत सोशल मीडिया पर्यंत पोहोचवली तेव्हा अनेक वाचकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद बघून ही वेबसाईट आम्ही पुन्हा सुरु करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच होता हे दिसून आलं.

काही दिवसापूर्वी फेसबुकने माझ्याबरोबर ६ वर्ष जुनी आठवण शेअर केली होती.

ही वेबसाईट अस्तित्वात आली ती २००८ मध्ये. खरं तर भल्या भल्या प्रकाशकांना आणि माध्यम क्षेत्रातील मोठ्या नावांनाही तेव्हा इंटरनेटची ताकद कळली नव्हती. अशा काळात सतीश नाईक यांनी ‘चिन्ह’चा समृद्ध छापील मजकूर इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. खरं तर काळाच्या पुढचा विचार करणारा हा अत्यंत धाडसी निर्णय होता. पदार्पणातच या वेबसाईटवर वाचकांच्या उड्या पडल्या. माझ्यासारख्या गावाकडल्या वाचकांची दृश्यकला विषयक समृद्ध मजकूर वाचण्याची भूक भागवण्याचं काम ‘चिन्ह’नं केलं. अनेक विद्यार्थ्यांनाही ‘चिन्ह’नं एक निश्चित दिशा दाखवण्याचं काम केलं. ज्यांनी ‘चिन्ह’चा हात धरला त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. त्या काळी इंटरनेट आजच्या इतकं फोफावलं नव्हतं. तो काळ फेसबुक फोनवर न पाहता इंटरनेट कॅफेवर जाऊन पाहण्याचा होता. फेसबुकनं आबालवृद्धांना अक्षरश: वेडं केलं होतं. अशाच एका फेसबुक पोस्टमधून माझी ‘चिन्ह’ची ओळख झाली होती. आणि त्या पोस्टपासून सुरु झाला तो ‘चिन्ह’सोबतचा सुखद प्रवास !

काय नाहीये या वेबसाईटमध्ये ? चित्रकलेला अनुरूप अशी संकल्पना, सुंदर डिझाईन आणि या डिझाईनला साजेसा असा ‘चिन्ह’च्या अंकांचा खजिना. सोबत एक दर्जेदार ब्लॉग. या ब्लॉगची मी कित्येक पारायणं केल्याचं मला अजूनही आठवतं. ‘चिन्ह’चे २००५ पासूनचे अंक या वेबसाईटवर वाचकांसाठी मोफत उपलब्ध होते. हे अंक वाचून मी वेडीच झाले होते. सकस, दर्जेदार अंक म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण ‘चिन्ह’नं वाचकांसमोर ठेवलेलं आहे. याआधी मी अनेक दिवाळी अंक वाचले होते. पण कुठल्याच अंकानं मला असं वेड लावलं नाही की एखादा अंक मी पुन्हा पुन्हा वाचावा. दिवाळीच्या सुट्टीपुरतं दिवाळी अंकाचं वाचन व्हायचं आणि तो विषय मागे पडायचा. पण ‘चिन्ह’ म्हणजे वाचकाला फिरवून आपल्याकडे आणण्याची ताकद असणारा दिवाळी अंक.

चिन्हचा ब्लॉग.

‘चिन्ह’चा पहिला अंक आला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. साहजिकच मी ‘चिन्ह’चे छापील अंक वाचलेले नव्हते.त्यामुळे ‘चिन्ह’च्या अंकांशी पहिली भेट झाली ती वेबसाईटच्या माध्यमातूनच. तिथं असलेले अनेक अंक मी अधाशासारखे वाचले. आणि पुढे वेबसाईट बंद होईल किंवा अंक काढून घेतले जातील या भीतीने मी ते माझ्या कम्प्युटरमध्ये सेव्हही केले होते. मला आठवतं त्याप्रमाणे मी रघुवीर चिमुलकरांवरचा लेख, रॉय किणीकर यांच्यावरचा लेख, नागेशकर यांच्यावरचा विशेष अंक पुन्हा पुन्हा वाचला होता. ‘गायतोंडेच्या शोधात’ या अंकाच्या निर्मितीमागची कथाही मी वाचून थक्क झाले होते. त्यांचा शोध घेताना संपादक सतीश नाईक यांना  किती अडचणी आल्या आणि त्यांनी त्या कशा सोडवल्या हे देखील मुळातूनच वाचण्यासारखं आहे. ‘चिन्ह’ची ही निर्मितीमागची कथाही मला प्रचंड आवडायची. २०१४ दरम्यान जेव्हा ही वेबसाईट बंद झाली तेव्हा मी हे अंक माझ्या कम्प्युटरमधून लहर आली की वाचत असे. तेव्हा सतीश सरांची आणि माझी ओळख नव्हती. त्या वेळी मी त्यांच्या फेसबुक पोस्टवर कमेंटही केल्याचं आठवत आहे.  की ‘चिन्ह’चे अंक असलेली वेबसाईट कधी सुरु होणार ?

‘चिन्ह’चे अंक मी वेबसाइटवरून वाचत होते तेव्हा मला दिसली ती ‘चिन्ह’ची आगळी वेगळी शैली. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी ज्या ज्या लेखकांकडून लेख लिहून घेतले त्यांना त्यांनी ‘चिन्ह’च्या लेखनशैलीत फिट्ट बसवून घेतलं. ही शैली नेमकी कशी याचं वर्णन करता येणार नाही, पण जर प्रकाशन आणि अंकाचं नाव न लिहिता फक्त मजकूर वाचकांपुढे ठेवला तर वाचक सहज ओळखेल की हा लेख ‘चिन्ह’च्या अंकांमधलाच ! इतकी ही शैली अभिनव आहे. वाचकाला पुन्हा पुन्हा खेचून आणण्याची ताकद या लेखांमध्ये आहे. त्यामागे संपादकांची अथक मेहनत आहे. एक एक लेख तयार करण्यासाठी प्रत्यक्ष ग्राऊंड रिपोर्टींग करवून घेऊन मजकुराची निर्मिती फक्त सतीश नाईक सरच करू जाणे. त्यासाठी लागणारे पेशन्स सरांकडे होते आणि त्याचा पाठपुरावा करण्याची ताकदही. यामुळेच ‘चिन्ह’चा प्रत्येक अंक हा संदर्भ ग्रंथ म्हणून पुढे येतो.

‘चिन्ह’चा पहिला छापील अंक मी विकत घेतला तो २०१४ चा यत्न प्रयत्न विशेषांक. तेव्हा मी शिक्षण वगैरे संपवून डिझाइनर म्हणून नोकरी करत होते. त्यामुळे मी ‘चिन्ह’चं उच्च निर्मिती मूल्य असलेले किंमती अंक सहज मागवू शकायचे याचा मला आनंद होता. पाठोपाठ ‘नग्नता विशेषांक’, ‘गायतोंडे ग्रंथ’ असे सर्वच मी माझ्या संग्रही जमा केले. मुंबईत पेइंग गेस्ट, मग भाड्याचा फ्लॅट आणि नंतर स्वतः घर अशा केलेल्या प्रवासात मी ते अंक माझ्याकडे जपून ठेवले आहेत. भास्कर कुलकर्णी विशेषांकाची  प्रत तर सरांकडेही नव्हती मग ती मी गोव्याचे पुस्तक संग्राहक विठ्ठल ठाकूर यांच्याकडून घेतली होती. ‘चिन्ह’च्या वाचन प्रवासात ज्या ज्या पुस्तकांची ओळख झाली ती पुस्तके स्वतःच्या संग्रहात जमा करण्याचा प्रयत्न मी केला. त्यात पॉल ब्रँटनचे ‘ इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया’, निसर्गदत्त महाराजांचे ‘आय एम दॅट’. धोंड सरांचं ‘रापण’, बरवे यांचं ‘कोरा कॅनव्हास’ या पुस्तकांचा संग्रह मी केला. ती वाचून समजून घेण्याचा प्रयत्न मी आजही करत आहे. प्रयत्न अशासाठी की रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज हे इतक्या सहजी समजत नाहीत. अजूनही मला समजलं नाहीये पण प्रयत्न चालू आहे.

करिअरच्या वाटेवर ‘चिन्ह’च्या मजकुराचं दिशादर्शक म्हणून मला जितकं मार्गदर्शन झालं तेवढाच नास्तिकतेकडून आस्तिकतेकडचा प्रवासही ‘चिन्ह’मुळेच झाला. मनोहर म्हात्रे यांच्यावरील लेख वाचून मला भविष्यावरही विश्वास बसायला लागला. बरवे सांगतात ती ‘डेस्टिनी’ही समजू लागली. तारुण्यातल्या अल्लड आणि नवथर वागण्याला एक गांभीर्याची किनार ‘चिन्ह’नेच दिली. मी वैचारिक दृष्ट्या परिपक्व  झाले की नाही हे मला सांगता येणार नाही. पण माझ्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात एक गांभीर्य आलं हे निश्चित.  

हल्ली जिकडे तिकडे स्पिरिच्युअल गुरूंची चलती आहे. अनेक जण मीच खरा अध्यात्मिक गुरु म्हणून तरुणाईला गुरुमंत्र देण्यासाठी दुकान उघडून बसले आहेत. पण ‘चिन्ह’चा छापील मजकूर अध्यात्मिक गुरूचं काम पूर्णत्वानं करतो. या अंकांमध्ये आलेली प्रत्येक कथा ही जीवनाचं तत्वज्ञान उलगडून सांगते. गायतोंडे, बरवे असो किंवा चिमूलकर, नागेशकर अगदी सॉलोमन साहेब हे सर्व शापित कलाकार होते. आपलं आयुष्य पणाला लावून त्यांनी कलेची श्रीमंती मिळवली होती. या चित्रकारांनी स्वत: हे केलं की नियतीनं त्यांच्याकडून घडवून आणलं या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर नियतीकडेच बोट जाईल.

‘चिन्ह’चा पहिला लेख वेबसाईटवर वाचला तेव्हा मी विशीतली तरुणी होते. शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छ. संभाजीनगर इथून उपयोजित कलेचं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा कुठलीही दिशा माझ्यासमोर नव्हती. मिळेल ती नोकरी करून गोंधळलेल्या अवस्थेत काम करणं सुरु होतं. अनेकदा नैराश्याचे प्रसंग समोर येत असताना ‘चिन्ह’चे पीडीएफ अंक मला समृद्ध करून गेले. आजूबाजूला निराशेचं दाट सावट असताना एकाच वेळी या अंकांनी मनोरंजनही केलं आणि सकारात्मक दृष्टिकोनही दिला. अनेकदा मी माझ्या डेस्कटॉपवर एका टॅबमध्ये ‘चिन्ह’ची वेबसाईट उघडून ठेवायचे. वेळ मिळाला की वाचन सुरु व्हायचं. आज जे स्पिरिचुअल हिलर वगैरे म्हणतात ना ते हिलिंगच काम ‘चिन्ह’च्या अंकांनी माझ्यासाठी केलं. आजही करत आहेत. वर म्हटल्याप्रमाणे चिन्हचा पहिला छापील अंक मी २०१४ ला घेतला. ‘चिन्ह’चे मोफत उपलब्ध असलेले पीडीएफ अंक ते किंमती छापील अंक हा प्रवासही ‘चिन्ह’चीच देणगी ! पीडीएफ अंक वाचून जी दिशा आयुष्याला मिळाली त्याचं उपयोजन मी प्रत्यक्ष जीवनातही केलं. आणि ‘चिन्ह’चे अंकच काय इतरही महागडी पुस्तक घेण्याची ताकद माझ्याकडे आली.

आज १४ वर्षानंतर काळ प्रचंड बदलला आहे. आजची मुलं वाचन किती करतात हे मला माहित नाही. कारण दोन दिवसापूर्वीच एक प्राध्यापक मला सांगत होते की आजच्या मुलांना मोबाईलनं पूर्णपणे वेडं केलं आहे. इंस्टाग्राम आणि रिल्स त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा वेळ वाया घालवत आहेतच पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे ही मुलं एकाच साच्यात तयार होत आहेत आणि हळूहळू त्यांचं झोंबीकरण होत आहे. हे जर असं असले तर अत्यंत चिंताजनक आहे. पण काल काय किंवा आज काय वाचन करणारे लोक कमीच असतात. तरी देखील हा मोफत उपलब्ध असलेला समृद्ध मजकूर तरुणांनी अवश्य वाचावा असं कळकळीच आवाहन मी त्यांना करेन. कारण १४ वर्षांपूर्वी तरुणांना ज्या समस्या भेडसावत होत्या त्याच्या कित्येक पटीनं जास्त आव्हानं आजच्या पिढीसमोर आहेत. १४ वर्षांपूर्वी कला महाविद्यालयांची जी स्थिती होती त्यापेक्षा कित्येक पटीनं भयंकर स्थिती आज आहे. त्यामुळे या सगळीकडून अंधार दाटून येण्याच्या ( विशेषतः कला क्षेत्रामध्ये) काळात ‘चिन्ह’चे अंक प्रकाश पसरवणाऱ्या दिपकळीच काम करतात. ही दीपकळी प्रत्येक तरुण तरुणीच्या आशेचा किरण होईल हे निश्चित !

********

– कनक वाईकर

‘चिन्ह’च्या जुन्या वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

https://chinha.in/1stsite/

 

 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.