Features

तुम्ही कुठली भारतमाता मानता?

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘हर घर तिरंगाच्या माध्यमातून देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात आहे. लहान मुले शाळेत भारतमातेचं रूप घेऊन स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहेत. पण भारतमाता ही कल्पना नक्की आली कुठून? अवनिंद्रनाथ टागोरांनी आपल्या कुंचल्यातून सर्वप्रथम भारतमातेला मूर्त रूप दिले. त्यानंतर अनेक चित्रकारांना तिचे रूप आपल्या नजरेतून साकारण्याचा प्रयत्न केला. एम. एफ. हुसेन सारख्या कलाकाराला तर भारतमातेच्या चित्रावरून प्रचंड टीका आणि धमक्यांना सामोरे जावे लागले. तर वेगवेगळ्या चित्रकारांनी साकारलेल्या भारतमातेच्या विविध चित्ररूपांचा हा नजराणा खास chinha Art News च्या वाचकांसाठी.

अवनिंद्रनाथ टागोरांची भारतमाता

१९०५  मध्ये चित्रकार अवनिंद्रनाथनी साकारलेली ही भारतमाता. ही भारतमाता साध्वीच्या रुपात आहे. हातात जपमाळ, रुद्राक्षांच्या माळा आणि डाव्या हातात तांदळाची रोपे अशा स्वरूपातली ही भारतमाता धैर्यवान रूपात दिसते. तिच्या साध्वी रूपाबद्दल अनेकांना आक्षेप होते, आहेत. मात्र कलाकृती म्हणून ही अतिशय उच्च दर्जाची आहे यात वादच नाही.

प्रभू दयाल यांची भारतमाता

१९३० साली राष्ट्रीय चित्र प्रसारक कार्यालयाने प्रकाशित केले प्रभू दयाल यांचे चित्र. यात भारतमातेच्या मांडीवर महात्मा गांधी बसले आहेत. मागे समुद्र आणि हिमालय आहे. गांधीजींच्या हातात चरखा आहे. या चित्रातले गांधीजी काहीसे थकले आहेत किंवा विचारात मग्न आहेत.

डी बॅनर्जी यांची भारतमाता

१९३०४० च्या दरम्यान डी बॅनर्जी यांनी काढलेली भारतमाता नऊवारी साडी नेसते तर डोक्यावर बंगाली मुकुट चढवते. खऱ्या अर्थाने दक्षिणोत्तर भारताचा विचार या चित्रात आहे. भारतमातेच्या हातात त्रिशूल आहे. तिरंग्याचे जे आद्य स्वरूप होते ते या त्रिशूळवर आहे. काहीशी उदास असलेल्या या भारतमातेचे हात बांधलेले आहेत. स्वातंत्र्य अजून मिळाले नाही या दुःखाचे ते प्रतीक आहे. या चित्रात अखंड भारत पार्श्वभूमीवर असून लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन राय वरच्या बाजूला चित्रित केले आहेत. आश्चर्य म्हणजे या चित्रात गांधीजींना स्थान नाही.

नागपूर सिटी प्रेसने प्रकाशित केलेली भारतमाता

या चित्रात भारतमाता सिंह आणि हत्ती सोबत उभी आहे. जे शक्ती आणि शौर्य यांचे प्रतीक आहे.

डी बॅनर्जी यांची अनोखी भारतमाता

या चित्रात भारतमातेच्या गळ्यात महापुरुषांच्या डोक्याचा हार दाखवला आहे. स्वातंत्र्यापूर्वी जनता खूप लिबरल असावी तेव्हाच त्यांनी हे चित्र स्वीकारले. आजच्या काळात असे चित्र काढायचे धाडस कोणीच करणार नाही. यात गांधीजींना सगळ्यांपेक्षा वेगळे मध्यभागी स्थान दिले आहे.

राजा रविवर्मा यांची भारत माता.(1920-30)

या लिथोग्राफला हिंददेवी असे नाव असले तरी हे भारतमातेचे एक रूप म्हणता येईल. दुर्गेच्या रूपातील या भारतमातेच्या हातात तिरंगा आहे आणि पार्श्वभूमीला हिमालय. या चित्रातही आद्य स्वरूपातील तिरंगा दिसतो. ,

एम. एफ. हुसेन यांची भारतमाता
भारतमातेचे सगळ्यात वादग्रस्त असलेले हे रूप. यात लाल रंग प्रामुख्याने वापरला आहे. अनेक शतकांची परकीय आक्रमणे, त्रास यामुळे दुःखी झालेली ही भारतमाता. पार्श्वभूमीवर हिमालय आणि खालच्या बाजूला निळा समुद्र! हिमालयाच्या मागून दिसणारा सूर्य आशेचे प्रतीक आहे. भारतमातेच्या शरीरावर वेगवेगळ्या राज्यांची नावे आहेत. तर शिडाची होडी हे बंगालच्या उपसागरातून होणाऱ्या व्यापाराचे प्रतीक आहे. या समुद्री व्यापारामुळेही जी सांस्कृतिक घुसळण झाली ती या होडीतून प्रतीत होते. ध्यानस्थ बसलेला पुरुष हजारो वर्षांची समृद्ध संस्कृती दाखवतो. भारतमातेच्या हाताजवळ १४ अऱ्याचे चक्र आहे जे काळाचे प्रतीक आहे. खूप मोठा आशय या चित्रात एम. एफ. हुसेन यांनी चितारला आहे. मात्र नग्न अशा स्त्रीदेहामुळे हे पेंटींग वादग्रस्त ठरले. 

अवनिंद्रनाथांच्या भारतमातेपासून एम. एफ. हुसेनच्या भारतमातेपर्यंत कलेचा खूप मोठा प्रवास आहे. अनेक प्रयोग आणि स्थित्यंतरातून चित्रकला बदलत गेली. आज मात्र भारतमातेच्या चित्रणात कुठलेही प्रयोग होत नाहीत. अनेक बॅनर, टीव्ही आणि सर्व माध्यमे यातून एकाच प्रकारची भारतमाता दिसते. यापार्श्वभूमीवर वेगवेगळ्या स्वरूपात चितारलेली ह्या काही भारतमाता आपले लक्ष वेधून घेतात. तुम्ही ही चित्रे बघा आणि ठरवा तुमचं मत!

सर्व चित्रे इंटरनेटवरून साभार.

– कनक वाईकर, डोंबिवली 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.