Features

ही ‘डेस्टिनी’ कुणाची ?

मुंबईच्या सांस्कृतिक वर्तुळात ज्यांना मानाचं स्थान होतं अशा वीरचंद धरमसी यांचं काल दि ६ एप्रिल रोजी निधन झालं. चित्रकार प्रभाकर बरवे हे श्री धरमसी यांचे जवळचे स्नेही होते. या वर्षा अखेरीस प्रसिद्ध होणाऱ्या बरवे यांच्यावरील ग्रंथासाठी धरमसी यांची मुलाखत घेण्याचं निश्चित झालं होतं. त्याप्रमाणे चित्रकलेचे अभ्यासक विनील भुर्के यांनी धरमसी भाईंची भेट देखील घेतली होती. धरमसीभाईंनी मुलाखतीसाठी भरपूर वेळ तर दिलाच पण सत्तरच्या दशकात बरवे यांची एका गुजराती नियतकालिकासाठी त्यांनी जी मुलाखत घेतली होती ती मुलाखत देखील ‘चिन्ह’ला उपलब्ध करुन दिली.

जेमतेम महिनाभरातल्या या घडामोडी, आणि काल सकाळी बातमी आली की, धरमसीभाई गेले…
बरवे ग्रंथासाठी त्यांच्या स्नेही ललिता लाजमी यांची मुलाखत लाजमी यांच्या आकस्मिक निधनामुळे राहून गेली. धरमसीभाईंच्या संदर्भात देखील असेच काहीसे घडणार होते, पण सुदैवानं मुलाखतीचा संकल्प पूर्णत्वाला आला. बरवे नेहमी म्हणायचे “त्या त्या माणसाबरोबर त्याची डेस्टिनी चालत असते” ही  कुणाची डेस्टिनी म्हणायचं ?

चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरील ग्रंथाची घोषणा केली आणि लागलीच आम्ही कामाला लागलो. ग्रंथाचा सर्व आराखडा खरं तर खूप आधी तयार झाला होता. दोन वेळा आटोकाट प्रयत्न केले होते. पण दोन्हीही असफल ठरले होते. या वेळचा तिसरा प्रयत्न मात्र प्रकाशनाची तारीख निश्चित करुनच पक्का केला होता.

काम मोठ्या झपाट्यानं सुरु देखील झालं. बरवे यांच्या चित्राच्या इमेजेस हाती येऊ लागल्या. कुणी कुणी त्यांना लिहिलेली पत्र देखील पाठवू लागले. मुख्य म्हणजे ज्यांच्याशी बोलायचं होतं ते बरवे यांच्याशी संबंधित सारेजण संपर्कात आले. शब्दांकन करणारे लेखक कामाला देखील लागले.

बरवे यांच्या संदर्भात ज्यांना ज्यांना बोलतं करायचं होतं त्यातलं, सर्वात महत्वाचं नाव होतं ते म्हणजे धरमसीभाई. बरवे यांचे ते जवळचे मित्र होते. त्यांच्या सोबत माझ्या भेटीचा योग कधी आला नाही. पण त्यांचं नाव मात्र मी ऐकून होतो ते एशियाटिक लायब्ररीच्या संदर्भात. मी देखील काही काळ एशियाटिकचा मेंबर होतो. ज्या क्षेत्रात त्यांनी महत्वाचं काम केलं त्या चित्रपट सोसायटीचा देखील मी काही काळ सदस्य होतो. पण भेट काही जुळून आली नाही हे खरं.

बरवे यांच्या सोबत ते जहांगीर आर्ट गॅलरी समोर असलेल्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये  बसत असेही मला अनेकांनी सांगितलं. मी ही त्या गप्पांमध्ये अनेकवेळा सहभागी होतं असे. पण धरमसीभाईंशी भेट तिथंही कधी झाली नाही हेच खरं.

बरवे ग्रंथाच्या कामाला लागलो आणि पहिलं काम कोणतं केलं असेल तर ते धरमसीभाईंचा फोन नंबर शोधून काढण्याचं. माझा चित्रकार मित्र माधव इमारते यानं ते काम अगदी लागलीच केलं. ज्यांच्याशी परिचय नाही अशा व्यक्तींशी पहिल्यांदा बोलणं मला अतिशय संकोचाचं वाटतं, त्यामुळे त्यांना बरेच दिवस मी काही फोन केलाच नाही. मग माधवनं मला एके दिवशी टोकलं. तेव्हा मात्र लागलीच मी त्यांना फोन केला. ते बहुदा गुजरातमध्ये असावेत. पण बरवे यांचं नाव काढताच ते माझ्याशी उत्साहानं बोलू लागले. बरवे यांच्या ग्रंथाचं संपूर्ण प्लॅनिंग त्यांनी ऐकून घेतलं आणि म्हणाले लवकरच मुंबईला मी येतोय तेव्हा आपण नक्की भेटू. मध्ये परत बरेच दिवस गेले तोपर्यंत नितीन दादरावाला वगैरे मित्रांकडून त्यांची माहिती काढून घेण्याचं माझं काम चालूच होतं.

मग पुन्हा एकदा त्यांना मी फोन केला. ते मुंबईत आले होते. मी नवी मुंबईत राहतो कधीही या असं त्यांनी मोकळेपणानं सांगितलं. पण तेही काही मला जमलं नाही. पण एके दिवशी अचानक गॅलरी केमोल्डमध्ये अतुल डोडीयाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात नितीन दादरावाला एका गृहस्थांना घेऊन माझ्यापाशी आला आणि म्हणाला हे धरमसीभाई. त्यांना पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की, अनेकवेळा एशियाटिकमध्ये कॉफी हाऊसमध्ये किंवा जहांगीरच्या आजूबाजूला मित्र परिवारात मी त्यांना पाहिलं होतं. पण प्रत्यक्ष परिचयाचा योग कधी आला नव्हता.

त्या दिवशी मात्र दहा पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. म्हणाले कधी येताय ? आता करुन टाकू. पण माझ्या काय मनात आलं कुणास ठाऊक माझ्या सोबत विनील भुर्के होते. त्यांच्याकडे पाहिलं आणि धरमसीभाईंना मी सांगून टाकलं की, मी येईन किंवा नाही मला ठाऊक नाही पण हे गृहस्थ मात्र तुमच्याकडे येतील. विनीलने देखील लगेचच होकार दिला मग विनील आणि धरमसीभाई बोलू लागले. तितक्यात कार्यक्रम सुरु झाल्याची घोषणा झाली आणि मी तिथून बाहेर पडलो.

माझा निर्णय अचूक ठरला होता. विनीलनं आपलं काम चोख बजावलं होतं. त्यांनी आठवडाभरातच मुलाखत पक्की करून टाकली होती आणि मला प्रश्नासंदर्भात विचारलं होतं. मी तासाभरातच पन्नास – साठ प्रश्न काढून त्याला मेल केले. आणि त्या सोबत गुगलच्या लिंक्स देखील पाठवल्या त्या वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की, केवढं मोठं काम या माणसानं करुन ठेवलं आहे. चित्रपटसृष्टीचा हा साक्षात चालत बोलता कोशच होता. पण बरवे आणि यांचा परिचय कसा झाला हे गूढ काही मला उकलेना. पण त्याच अनुषंगाने ही प्रश्नावली बनवली आणि विनिलला पाठवली. विनील कॉर्पोरेट कल्चरमध्ये रुळलेला माणूस. त्यानं सारा अभ्यास करुन थेट धरमसीभाईंचं घर गाठलं.

रात्री विनिलचा फोन आला. म्हणाला, खूप छान बोलले धरमसीभाई. गियर पडायला थोडासा वेळ लागला पण नंतर मात्र गाडी सुसाट धावू लागली. खूप छान बोलले धरमसी भाई. बरवे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा धरमसीभाईंनी एका गुजराती वृत्तपत्रासाठी बरवे यांची मुलाखत घेतली होती. तिची आठवण करुन देताच धरमसीभाईंनी त्या वृत्तपत्राचं कात्रणच विनील समोर ठेवलं. आणि मोठ्या उत्साहानं त्यातल्या एक एक वाक्याचा अनुवाद करुन देऊ लागले. विनील देखील मोठा चिवट गडी. त्यानं सारी मुलाखत त्यांच्याकडून समजून घेतली आणि लिहून काढली.

त्या एका भेटीनं बरवे यांच्या ग्रंथाची दोन कामं झाली. एक म्हणजे धरमसीभाईंनी बरवे यांच्या सोबतच्या त्यांच्या स्नेहसंबंधाच्या आठवणींना छान उजाळा दिला. त्यातून बरवे ग्रंथासाठी सुंदर लेख तयार झाला. आणि दुसरं म्हणजे बरवे यांची अतिशय दुर्मिळ अशी मुलाखत अचानकपणे या ग्रंथासाठी मिळून गेली.

हे सर्व वाचत असताना मी अक्षरशः थरारून गेलो होतो. ही गोष्ट मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यातली. खरं तर ती वाचल्या बरोबर मी ठरवलं होतं धरमसीभाईंशी सविस्तर बोलायचं त्यांचे आभार मानायचे. जमलं तर नवी मुंबईत जाऊन त्यांना भेटायचं. त्यांच्या मागे लागून जुने दुर्मिळ फोटो शोधायचे. बरवे यांनी त्यांना दिलेलं पेंटिंग पाहायचं. धरमसीभाईंचे लेटेस्ट फोटो घ्यायचे आणि परतायचं. पण आता यातलं काहीएक करता येणार नाही. कारण धरमसीभाई आता आपल्यातून आजच सकाळी निघून गेले आहेत.
एक गोष्ट मात्र झाली आहे बरवे यांच्या संदर्भातल्या त्यांच्या साऱ्या आठवणी शब्दांकित झाल्या आहेत. फोटो, चित्र, लेख, कात्रणं इत्यादी सर्व त्यांनी ‘चिन्ह’ला देऊन ठेवले आहे. यासाठी विनीलचे आभार आपण मानायला हवेत. त्यानं घाई केली नसती तर ललिता लाजमी यांच्या संदर्भात जे घडलं तेच इथं घडलं असतं.
बरवे यांच्या ग्रंथाचं काम करीत असताना असे जे नानाविध अनुभव येत आहेत त्यानं मी देखील अगदी चक्रावून गेलो आहे. बरवे या साऱ्याला ‘डेस्टिनी’ असा शब्द करायचे तो आज सकाळपासून सारखा मला आठवतो आहे.
******
– सतीश नाईक 
संपादक ‘चिन्ह’ आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.