Features

कलाक्षेत्राला वाचनाचा तिटकारा का?

मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती हे  वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. पण माझ्या बाबतीत सांगायचं तर हे वाक्य अक्षरश: खरं आहे. वाचनाची सवय माणसाला घरात आधीपासून कुणीतरी वाचक असेल तर लागण्याची शक्यता जास्त असते. माझे वडील पट्टीचे वाचक. त्यांचं बघून बघून मला देखील कधीपासून वाचायची सवय लागली तेही आता आठवत नाही. वडिलांनी घरात खूप पुस्तकांचा संग्रह जमा केला होता. आपल्याकडे लग्नामध्ये रोखीत आहेर देण्याची पद्धत असते. वडिलांना त्यांच्या आणि माझ्या बहिणीच्या लग्नात मोठ्या मोठ्या रकमा भेट म्हणून मिळाल्या होत्या. त्यांची त्यांनी पुस्तक खरेदी केली. त्यातला काही हिस्सा मलाही पुस्तक खरेदीसाठी दिला होता. एवढं वडिलांचं वाचनावर प्रेम होतं, आहे. परभणीसारख्या छोट्या गावामध्ये वाचनालयाची वगैरे संख्या कितीशी असणार? काही वर्षांपूर्वी तिथे एक नवीन सरकारी लायब्ररी सुरु झाली होती. आता ती लायब्ररी सुरु आहे पण तिची अवस्था अतिशय वाईट आहे. या सगळ्यातून मार्ग काढत काढत जमेल तसं माझं वाचन सुरु होतं . 

पुढे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद येथे प्रवेश घेतला. तिथे मात्र भव्य लायब्ररी होती. अनेक इंग्रजी, मराठी पुस्तकांचा संग्रह तिथे होता. पण दैव आड आलं. मी प्रवेश घेतल्यांनंतर महिन्याभरातच लायब्ररीयन निवृत्त झाल्यामुळे तिला भलं मोठं कुलूप लागलं! अनेक आंदोलने झाली पण शिक्षण संपेपर्यंत ती लायब्ररी काही सुरु झाली नाही. साहजिकच जिथून मिळेल तिथून वाचन सुरु होत. पुढे आयुष्यात ‘चिन्ह’चा प्रवेश झाला. ‘चिन्ह’मधील अनेक लेखातून कला क्षेत्रातील महत्वाची  पुस्तके कळाली. त्यातून मग ‘रापण’, इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया, कोरा कॅनव्हास अशा पुस्तकांचा संग्रह मी केला. कोरा कॅनव्हास हे काही वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हते तेव्हा गोव्याचे पुस्तक संग्राहक विठ्ठल ठाकूर यांनी त्यांच्याकडची दुर्मिळ प्रत मला दिली. कलाविषयक बहुतांश वाचनाची  गरज ही ‘चिन्ह’नेच भागवली.

‘कोरा कॅनव्हास’च्या या प्रतीवर गोविंद तळवलकर यांची सही आहे.

आपल्याकडे कलाविषयक लेखन अत्यंत कमी उपलब्ध आहे. जे आहे त्याच्या अतिशय कमी आवृत्त्या निघतात. अनेकदा कला विषयक पुस्तकांच्या छापलेल्या प्रतींची संख्या खूप कमी असते त्यामुळे बाजारातून त्या लवकर अदृश्य होतात. त्यामुळे कला महाविद्यालयांनी आपली लायब्ररी अपडेट आणि विविध पुस्तकांनी समृद्ध करणे अतिशय गरजेचे असते. कॉलेज जीवनातच वाचनाची गोडी लागली तर त्याचा करिअरवरही उत्तम प्रभाव पडतो. हल्ली सोशल मीडियामुळे वाचन कमी झाले आहे. नवीन पिढी तर वाचनापेक्षा दृक श्राव्य माध्यमाला जास्त सरावलेली आहे. पण दृक श्राव्य (युट्युब व्हिडीओज) माध्यम कितीही स्मार्ट असले तरी ते युजरला फारसे स्मार्ट बनवत नाही असं माझं मत आहे. स्मार्टनेस आणि जागतिक भान हे वाचनानेच येऊ शकत. कारण कुठल्याही दर्जेदार पुस्तकात एखाद्या विषयाचा समग्र आढावा घेतलेला असतो. ती खोली दृक श्राव्य माध्यमाला नसते. 

सोशल मीडियाने वाचनाला अक्षरश: खाऊन टाकले आहे. ‘चिन्ह’च्या माध्यमातून आम्ही विविध विषयांवर दर्जेदार लेखन प्रकाशित करत असतो. दिवाळी अंकामधील कलाविषयक लेखांवर तर आम्ही स्वतंत्र टिपणे ‘ न्यूज अँड व्ह्यूज’ या सदरात दिली. पण या छोट्या टिपणांनाही वाचकांचा फारसा प्रतिसाद नसतो तर दिवाळी अंकातील लेखन किती लोक वाचत असतील असा प्रश्न आहे. अनेकदा दिवाळी अंकांचे गट्ठे आणले जातात आणि अगदी पुढची दिवाळी येईपर्यंत ते तसेच राहतात असेही काही जणांनी मला सांगितले. अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेतच. फेसबुक सारखं माध्यम तिथे काही प्रमाणात का होईना लोक वाचत होते, पण आतात्यालाही शेवटची घरघर लागली आहे की काय असे वाटू लागले आहे. कारण जमाना रिल्सचा आलाय आणि नवी पिढी ही अक्षरांकडे बघायला ही तयार नाही. 

दृक् चिंतन पुस्तकाचं जेजेमध्ये झालेलं प्रकाशन.

प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांचं उच्च निर्मितीमूल्य असलेलं ‘दृक चिंतन’ हे कला क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. पण अनेक जण किंमतीमुळे हे पुस्तक विकत घेऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्यांना किंवा वाचकांना ते सहज वाचनासाठी उपलब्ध व्हावे म्हणून पुस्तकाचे संपादक रवींद्र जोशी यांनी जास्तीत जास्त सवलतीत हे पुस्तक देण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला. रवींद्र जोशी यांनी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या कला महाविद्यालयांशी हे पुस्तक त्यांच्या लायब्ररीसाठी खरेदी करावे म्हणून पत्र पाठविली. मेल पाठवले. पण आश्चर्य म्हणजे २०० पैकी फक्त ८-१० महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

यावर कडी म्हणजे जेजे स्कूल ऑफ आर्टने सुध्दा हे  पुस्तक आपल्या लायब्ररीसाठी खरेदी केले नाही! कोलते सर ज्या संस्थेमध्ये शिकले आणि जिथे त्यांनी तब्बल २० वर्ष विद्यार्थ्यांच्या असंख्य पिढ्या घडवल्या तीच संस्था हे पुस्तक कसं काय नाकारू शकते? हे पुस्तक विकत घेणं संस्थेला अवघड आहे का? जेजेसारख्या संस्थेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे जेजेसारख्या संस्थेला या पुस्तकाचे मूल्य हे किरकोळ रक्कम असताना ही अनास्था का? गंमत म्हणजे या पुस्तकाचा मुंबईत प्रकाशन समारंभ याच जेजे स्कूलमध्ये प्रख्यात लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते झाला होता. आणि तरी देखील जेजेच्या अधिष्ठात्यांना किंवा लायब्ररियनांना हे पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचू नये असे वाटावे यामागचा कार्यकारण भाव अनाकलनीय आहे. आश्चर्य म्हणजे जेजे कॅम्पसमधील जेजे इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये या पुस्तकाची प्रत आवर्जून घेतली जाते. 

‘चिन्ह’लाही संस्थाचालकांच्या, शिक्षकांच्या या अनास्थेचा प्रचंड त्रास झालाय. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी तब्बल १५ वर्षे ‘चिन्ह’च्या अंकाचं  नेटाने प्रकाशन सुरु ठेवलं. यात अनेक आर्थिक अडचणीही आल्या. पण मुळातच चित्रकार वाचनाविषयी सजग नसल्याने छापील अंकांची ही एकतर्फी लढाई किती काळ सुरु ठेवायची या प्रश्नाचं उत्तर त्यांना प्रकाशन बंद करून मिळवावं लागलं. आम्ही वेळो वेळी हा मुद्दा मांडत असतो की चित्रकाराने एक सुजाण वाचक असणं खूप गरजेचं आहेत तरच तो आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडून जागतिक झेप घेऊ शकेल. आज अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी ‘चिन्ह’च वाचन केलं त्यांनी आपल्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली. हे आम्ही आमचं कौतुक म्हणून नाही सांगत तर वाचनाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी सांगत आहोत. एकतर मराठीत कला विषयक लेखन फार कमी आहे जे आहे त्यालाही मिळणारा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नाही. पुण्यामुंबईपेक्षा जास्त महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून पुस्तक खरेदीला जास्त प्रतिसाद मिळतो याचा अर्थ काय घ्यायचा?

शासकीय कला महाविद्यालयांच्या अनास्थेबद्दल तर बोलायलाच नको. औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाची लायब्ररी तर अनेक वर्ष बंद होती. कारण कॉलेजकडे लायब्ररियनच उपलब्ध नव्हता. आता ती सुरु आहे असे कानावर येते, पण ती सध्या लायब्ररी चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे लायब्ररीची वेळ ठरलेली नसते. कधी चालू कधी बंद! सगळा मनमानी कारभार. खरं तर विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणं हे शिक्षकांचं  काम. पण मुळात त्यांनाच वाचनाची गोडी नसेल तर वाचणारे विद्यार्थी कोण तयार करणार? एका नामवंत कला महाविद्यालयाच्या महाभागाने तर विद्यार्थ्यांना धमकी दिली होती ‘चिन्ह’चे अंक वाचाल तर नापास करेन.  त्यातल्या त्यात नागपूरच्या शासकीय कला महाविद्यालयाच्या लायब्ररीची परिस्थिती थोडी बरी आहे असे म्हणता येईल. 

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक लेखक, प्रकाशकांना हा सगळं उपद्व्याप कशासाठी हा प्रश्न पडत असणार. पण कलेच्या प्रेमापोटी अनेक जण नेटाने पुस्तके प्रकाशित करतात. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी जर प्रकाशनात येणाऱ्या अडचणी मांडायचे ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल! तरी त्यांनी जिद्द सोडलेली नाही. अनेक अडचणीतूनच वाट काढीत त्यांनी नव्या माध्यमाचे स्वागत करत कला विषयक वेब पोर्टल सुरुच ठेवले आहे. हा लेख वाचून काहीजणांना तरी कलाविषयक लेखनाबद्दल आस्था निर्माण झाली तर हे लिखाण सार्थकी लागेल.  

अर्थात सगळंच चित्र नकारात्मक नाहीये हे इथे मी नमूद करते. अनेक तरुण आम्हाला संपर्क करतात. ‘चिन्ह’चे अपडेट्स ग्रुप जॉईन करतात. काल जेव्हा दृक चिंतन पुस्तकाच्या निर्मितीची कथा आम्ही प्रकाशित केली तेव्हाही  हे पुस्तक कुठे मिळेल असा प्रश्न विचारणारे फोन आम्हाला आले. असे फोन्स आम्हाला उत्साहित करतात. आणि ‘चिन्ह’चे काम करायला शक्ती देतात. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून वाचकांना विनंती आहे ‘चिन्ह’चे लेख वाचता तेव्हा आम्हाला प्रतिक्रिया देत जा. ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर युझर लॉगिनचा पर्याय आहे. तिथे लॉगिन करून लेखांना प्रतिक्रिया आवश्य द्या. वाचा, शेअर करा. आणि हा कला यज्ञ पुढच्या पिढीपर्यंत पोचवा. 

*****

– कनक वाईकर

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.