Features

‘कृत्रिम बुद्धिमत्ता: कलेचा कर्दनकाळ?’

चित्रकलेच्या जागतिक इतिहासाचा अभ्यास करताना सहज माझ्या मनात एक विचार चमकून गेला की, चित्रकलेमध्ये गेल्या काहीशे वर्षांमध्ये जी महत्त्वाची स्थित्यंतरे येऊन गेली, त्यांचा अभ्यास ग्रंथ, लेख वाचून आणि व्हिडिओ बघून करण्यासोबतच, हाच आढावा घेणारा एखादा लहानसा व्हिडिओ बघायला मिळाला तर? त्यात कुठलेही भाष्य नको, चर्चा नको, फक्त दृश्ये असावीत, आणि ती बघताबघता चित्रकला कशी बदलत गेली, याचे संपूर्ण भान यावे. हा विचार मनात अगदी ताजा असतानाच, तसा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर आलादेखील! ‘The Evolution of Visual Expression – A Tale of Art and Technology’ नावाचा सगळीकडे व्हायरल झालेला हा व्हिडिओ वाचकांपैकी अनेकांनी बघितला असेल. यात अवघ्या एका मिनिटात कलेच्या प्रवाहातील गेल्या ३०,००० वर्षांमधील मुख्य स्थित्यंतरांची झलक बघायला मिळते. हा व्हिडिओ Fabio Comparelli नावाच्या जिनिव्हामधील कलाकाराने बनवला आहे. असे व्हिडिओ बनवण्यासाठी तो Stable diffusion, Midjourney, Deforum, Dall E2 अशी वेगवेगळी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने (Artificial Intelligence Tools) वापरतो. 

‘The Evolution of Visual Expression – A Tale of Art and Technology’ मधील दृश्ये.  Fabio Comparelli च्या youtube वरून साभार 

या अगोदर त्याचा मानवी उत्क्रांतीसंबंधीचा एक व्हिडिओ वादग्रस्त ठरला होता. प्राचीन काळापासून होत गेलेल्या मानवी उत्क्रांतीमधील टप्पे, माणसाची सद्यस्थिती आणि भविष्यात माणूस कसा असेल याचे विज्ञानकथा-सदृश कल्पनाचित्र असे त्याचे स्वरूप होते. त्यात भविष्यात माणूस हात-पाय नसलेल्या एखाद्या अळीसारखा होईल आणि सर्वच गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून करेल, असे दृश्य आहे. बहुसंख्य प्रेक्षकांना ते दृश्य पचवणे जड गेले. त्याच्यावर खूप टीकासुद्धा झाली. तंत्रज्ञानाचा अतिवापर केला तर असे परावलंबित्व येईल आणि ते घातक आहे असे अनेकांना वाटले. परंतु Fabio ने मात्र या टीकेला तोंड देत पुढचे व्हिडिओ बनवणे चालूच ठेवले. कलेचा इतिहास दर्शवणाऱ्या त्याच्या व्हिडिओचे मात्र जगभर खूप कौतुक झाले. त्याच्या या दोन व्हिडिओंना मिळालेल्या परस्परविरोधी प्रतिसादांकडे पाहून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे दृश्य-माध्यमात काम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने अतिशय प्रभावी आहेत. प्रेक्षक त्यात इतके गुंग होऊन जातात की त्या दृश्यांवर नकळतपणे विश्वास ठेवू लागतात. त्या दृश्यांबद्दल त्यांच्या मनात तीव्र भावनांचे पडसाद उमटतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये आहे. हे करू शकणारा Fabio हा एकच कलाकार नाही आणि पहिलाही नाही. असाच अजून एक अत्यंत गुणवान लंडनमधील कलाकार आहे Markos Kay. “शारीरिक अपंगत्वामुळे मा‍झ्या हालचालींवर प्रचंड बंधने आलेली आहेत परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मला मा‍झ्या कल्पनाशक्तीला, सर्जनक्षमतेला पंख देता येतात” असे त्याने म्हटले आहे. त्याने ज्या वेगवेगळ्या काल्पनिक जीवांची निर्मिती केली आहे ते बघून त्याची ही कल्पनेची भरारी खरंच किती उत्तुंग आहे याची कल्पना येते. वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी अश्या विविध जीवांची वेगवेगळी शारीरिक अंगे एकत्र बांधून त्याने अद्भुत सुंदर वाटणारे काल्पनिक जीवच नव्हे, एक प्रतिसृष्टीच निर्माण केली आहे. लवकरच त्याने निर्माण केलेल्या या जीवांची विज्ञानकथा असलेला पूर्ण लांबीचा व्यावसायिक चित्रपट प्रदर्शित होवो, अशी शुभेच्छा मी व्यक्त केली, तेव्हा साहजिकच त्याला खूप आनंद झाला.

FLORA/FAUNA by Markos Kay – Tim Meijer यांच्या वरून साभार.

याच सुमारास म्हणजे २०२२ वर्ष सरतासरता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कलेच्या क्षेत्रात नको तेवढा हस्तक्षेप करायला लागले आहे, असा आरोप करत कलाकार विरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता (No to AI generated images) अशी युद्धघोषणा समाजमाध्यमांवर होऊ घातली होती.

याच तापलेल्या पार्श्वभूमीवर २०२३ च्या सुरुवातीलाच एक बातमी आली. संगणकप्रणाली व सल्लागार व्यवसायातील Accenture या जगविख्यात कंपनीच्या तंत्रज्ञान विभागाचे ऑस्ट्रियाचे राष्ट्रीय प्रमुख Helmut Schindlwick यांनी एक सनसनाटी घोषणा केली – “मी नुकतीच ‘Luna The Astronaut Girl’ नावाची विज्ञानकथा पुस्तकरुपाने प्रसिद्ध केली आहे. यात कथेचा विषय ठरवण्यापासून त्यातील कथानक साकारणे, त्याला साजेशी व्यक्तिमत्त्वे घडवणे, इतकेच नव्हे तर त्यांची चित्रे काढणे हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेची विविध साधने वापरून केले आहे. हे करायला मला केवळ ११ तास लागले. एका वीकएंडला मी सहज गंमत म्हणून हे करून पहिले आणि आता ते पुस्तक Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.” हे त्यांचे विधान जगभरात खळबळ माजवणारे ठरले. नव्हे, तशी खळबळ माजवून देण्यासाठीच ते केलेले होते. यात अनेक सूक्ष्म मुद्दे आहेत. त्यात संगणकप्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून आपण काहीही करू शकतो हा संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञाचा आत्मविश्वास तर आहेच, पण त्याचबरोबर – पुस्तक लिहिणे या कृतीला काही किमान वेळ देणे आवश्यक असते, विशिष्ट कौशल्य लागते, त्यासाठी लेखकाचे बौद्धिक आणि वैचारिक परिश्रम असतात, जगाकडे बघण्याची दृष्टी असते, भाषेवरील प्रभुत्व असते, चित्रकाराला कथेच्या गरजेनुसार चपखल चित्रे काढायला खूप परिश्रम घ्यावे लागतात – या सगळ्याला अगदी हलक्यात घेण्याची भावनादेखील या सद्गृहस्थांनी उघडपणे तसे म्हटले नसले, तरी स्पष्टपणे जाणवत होती. तरीही विज्ञानकथा हा मा‍झ्या आवडीचा विषय असल्यामुळे आणि कथा व चित्रे संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केल्याचे जगजाहीर केल्याचा मा‍झ्या माहितीत हा पहिलाच प्रकार असल्यामुळे अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. लेखकमहोदयांना माझा पहिला प्रश्न थेट होता, “तुमचे हे पुस्तक वाङमयचौर्य चाचणी (Plagiarism test) मध्ये उत्तीर्ण होते का? तुम्ही पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी तशी चाचणी केली होती का?” त्याचे उत्तर त्यांनी बरेचसे समाधानकारक दिले, तश्या काही चाचण्या त्यांनी केल्या होत्या आणि त्यात ते पुस्तक सहीसलामत उत्तीर्ण झाले, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या मनात सुरुवातीला या प्रकाराबद्दल जो विरोध निर्माण झाला होता तो काहीसा सौम्य झाला. तरीही माझे प्रश्न संपले नव्हते. “लिखाणाचे ठीक आहे, पण चित्रांचे काय?” असे मी विचारले, त्यावर त्यांनी सांगितले की, या विज्ञानकथेत अंतराळात सफर करायला जाणाऱ्या लहान मुलीचे Luna नावाचे जे मुख्य पात्र आहे आणि इतर महत्त्वाची पात्रे आहेत त्यांची कल्पनाचित्रे अगोदर अस्तित्वात असलेल्या इतर कुठल्याही चित्रांशी जुळत नाहीत, त्यामुळे ही चित्रे ही एक स्वतंत्र निर्मिती आहेत, आणि हे त्यांनी चित्रांचा उलट-तपास (Reverse Image Search) करून तपासून बघितले आहे. हेही उत्तर पटण्यासारखं होतं. पण तरीही काहीतरी चुकतंय, असं वाटत होतं, पण काय ते उमगत नव्हतं. त्यामुळे अजून खोलात जाऊन शोध घेतला. त्यात मला असं लक्षात आलं की या पुस्तकात जी लहान मुलीची छबी आहे ती आणि Disney Pixar या जगप्रसिद्ध अमेरिकन अॅनिमेशन चित्रपटनिर्मिती कंपनीने २०१२ साली प्रदर्शित केलेल्या Brave नावाच्या अॅनिमेशनपटामधील Merida नावाच्या मुलीची छबी यांच्यामध्ये साम्य आहे. चित्रपटात वावरताना तिच्या लाल-कुरळ्या केसांचे वर्तन (की नर्तन?!) चितारण्यासाठी Pixar ने स्वतःचे नवे सॉफ्टवेअर तयार करून घेतले आणि त्या व्यापात तब्बल तीन वर्षे खर्ची घातली होती म्हणे! इथे तर ११ तासांमध्ये संपूर्ण पुस्तक तयार झाले आहे! याचा अर्थ हा नक्कीच आयत्या बिळावर नागोबा असा काहीतरी प्रकार आहे, असं मला वाटत होतं.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन निर्माण केलेल्या कलाकृतींचा निषेध करणारे पोस्टर छायाचित्र: Artstation वरून साभार

इथे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की, वर उल्लेख केलेल्या तीनही उदाहरणांमध्ये तयार झालेल्या कलाकृतींचा निर्माता कोण? आपल्या समोर जी कलाकृती सादर झाली ती कृत्रिम बुद्धिमत्ता साधने वापरुन तयार करणारा कलाकार, की ती कृत्रिम बुद्धिमत्ता साधने ज्यांनी विकसित केली ते तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ, की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रशिक्षण देताना ज्या कलाकारांची मूळ कलाकृती उदाहरण म्हणून वापरली ते? याचे निश्चित उत्तर देता येणे कठीण आहे.

अगदी मुळाशी जाऊन विचार करू लागलो तेव्हा असं लक्षात आलं की, कृत्रिम बुद्धिमत्ता कसे काम करते? मुळात इतर कोणीतरी निर्माण केलेला माहितीचा प्रचंड मोठा साठा (Data set) कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला प्रशिक्षण देण्यासाठी (Machine learning) वापरला जातो. त्यातून काय चूक, काय बरोबर हे शिकत शिकत ती प्रणाली शहाणी बनत जाते. हा माहितीचा साठा येतो कुठून? तर तो कोणीतरी नकळत किंवा मुद्दाम तयार केलेला असू शकतो. हे प्रशिक्षण देण्यासाठी हा साठा वापरताना त्या माहितीच्या मूळ निर्मात्यांची परवानगी घेतली जाते का? हा कळीचा मुद्दा अजूनही गुलदस्त्यात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींना प्रशिक्षण देताना लिखित मजकुराच्या बाबतीत सांगायचे तर हा माहितीचा साठा म्हणजे गेल्या दोनेकशे वर्षांमध्ये लिहिले गेलेले सर्व प्रमुख साहित्य आणि चित्रांच्या बाबतीत आजवरच्या सर्व महत्त्वाच्या कलाकारांची चित्रं इतका प्रचंड साठा प्रशिक्षणासाठी पुरवला गेलेला आहे, हे तथ्य ढोबळ मानाने समजून घेतलं की लक्षात येतं की हे प्रकरण किती खोल आहे. इतकंच नव्हे, तर हे सगळं प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या १५-२० वर्षांमध्ये सुरुवातीला आंतरजालावर आणि नंतर विविध समाजमाध्यमांच्या मार्फत जो माहितीचा प्रचंड साठा निर्माण झाला आहे, तोही कोणीतरी कोणताही मोबदला न देता वापरत आहे. सर्वसामान्य लोक विनामूल्य सेवा मिळते आहे असे समजून आपले लिखाण, छायाचित्रे, व्हिडिओ, विविध विषयावरील आपली मते, हे सगळे साहित्य फुकाचे ओरबाडून घेण्यासाठी समाजमाध्यमांच्या घशात घालत आहोत, याचे जराही भान त्यांना आलेले दिसत नाही.

२०२२ मधली Luna आणि २०१२ मधली Merida. छायाचित्रे: अनुक्रमे Amazon Kindle आणि IMDb वरून साभार.

याच दरम्यान योगायोगाने जर्मनीमधील कला-इतिहास संशोधन संस्थेत काम करणाऱ्या प्राध्यापिका Dr Eva Wattolik यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. “कृत्रिम बुद्धिमत्ता कलेच्या आणि पर्यायाने कलाकारांच्या जि‍वावर उठणार का?” हा अनेक कलाकारांच्या मनात खदखदत असलेला प्रश्न मी त्यांना विचारला, त्याचं त्यांनी अगदी सविस्तर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, “साधारण २००१ सालादरम्यान युरोपात ‘व्हिडिओ आर्ट’ नावाचा कला-प्रकार सर्रास दिसू लागला. त्यावेळी चित्रकार, कलाकार खूप अस्वस्थ झाले, हाताने चित्रं काढण्याची कला संपुष्टात येणार की काय असं त्यांना वाटत होतं, त्यामुळे त्यांनी या नव्या कला-प्रकाराला विरोध करायला सुरुवात केली. परंतु काही काळानंतर व्हिडिओ किंवा इतर संगणकीय साधने कलानिर्मितीसाठी वापरून पाहिल्यावर त्यांना असं लक्षात आलं की यामधून जे दाखवता येतं ते आणि हाताने चित्रं काढून जे दाखवता येतं ते, या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती असतात. दोन्ही आपापल्या जागी सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. त्यानंतर दोन्ही प्रकारे काम करणारे कलाकार आपापली साधने वापरून काम करत राहिले. आता युरोपातील कलाकार नवीन तंत्रज्ञानाकडे संशयी दृष्टीने बघत नाहीत. तसेच ते सध्या आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तथाकथित संकटाकडे बघतात तेव्हा त्यांना त्यात आपली हाताने केलेली चित्रकला धोक्यात येत आहे, असे वाटत नाही”. असेच एक जुन्या काळातील उदाहरणसुद्धा त्यांनी दिले. “१८३९ मध्ये छायाचित्रण कलेचा शोध लागला तेव्हा सुरुवातीला हाताने केलेली चित्रकला आता मृत होणार, असे वाटू लागले होते. परंतु तसे काही झाले नाही. कालांतराने युरोपात अनेक फिरते छायाचित्रकार तयार झाले. त्या काळी दळणवळणाची सुलभ साधने नसल्यामुळे दूर राहणार्‍या आप्तांना भेटायला जाणे सहज शक्य नव्हते. तेव्हा फिरता छायाचित्रकार आपल्या आप्तांकडे पाठवून त्याच्यामार्फत त्यांची छायाचित्रे काढवून घेतली जायची आणि हाताने लिहिलेल्या पत्राच्या जोडीला ती छायाचित्रे आपल्या माणसांची खुशाली जाणून घेण्याचे साधन झाले होते. म्हणजेच नवीन तंत्रज्ञान आणि जुनी पद्धत यांचा सुरेख संगम झाला होता”, असा ऐतिहासिक दाखला प्राध्यापक इव्हा यांनी दिला.

हे सगळे खरे असले, तरी एक प्रश्न उरतोच. समाजमाध्यमांवर तयार झालेला माहितीचा साठा असा ओरबाडून (Data scraping) परस्पर वापरणे कायदेशीर आहे का? बहुधा नाही! आता या प्रकरणात एक नवीन भर पडली आहे. Getty Images या आंतरजालावर अधिकृतरित्या छायाचित्रे विकणाऱ्या सुप्रसिद्ध कंपनीने Stability AI या कृत्रिम बुद्धिमत्ता साधने विकसित करणाऱ्या कंपनीवर Getty Images च्या संग्रहातील मूळ छायाचित्रकारांचे कॉपीराइट असलेल्या असंख्य छायाचित्रांची अनधिकृतरित्या नक्कल करून आपल्या Stable Diffusion या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचा वापर केल्याचा आरोप करत, कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा खटला लंडन व अमेरिकेतील कोर्टात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात असेही म्हटले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांना आमचा विरोध नाही, कॉपीराइट असलेली छायाचित्रे मूळ कलाकाराला कुठलाही मोबदला न देता अनधिकृतरित्या वापरण्याला आमचा विरोध आहे. तर या प्रकरणात कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, असे प्रतिवादींचे म्हणणे आहे. साहजिकच, या खटल्याचा निकाल ऐतिहासिक ठरणार हे नक्की. म्हणूनच जगभरातील छायाचित्रकार, चित्रकार, लेखक आणि इतर सर्वच सर्जक क्षेत्रांमधील कलाकार त्याकडे लक्ष ठेवून आहेत.  

कृत्रिम बुद्धिमत्ता हा कलेचा आणि कलाकारांचा कर्दनकाळ ठरणार की नाही, हे नजीकच्या भविष्यात मनुष्यरूपी कलाकार म्हणून आपण सगळे किती सकस, स्वतंत्र आणि नवसर्जक काम करू शकतो, यावर अवलंबून असेल. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने कलेची नवनिर्मिती करू शकत नाही, दिलेल्या आदेशांनुसार अगोदर उपलब्ध असलेल्या कलाकृतींची सरमिसळ करू शकते. मानवी सर्जनशीलतेची जपणूक करायची असेल तर इथून पुढे आपली प्रत्येक नवनिर्मिती आपल्याला सुरक्षित ठेवावी लागेल. कलाकार, कला-विद्यार्थी, कला-रसिक म्हणून आपण सर्वांनी या विषयाबाबत सजग असावे आणि डोळसपणे हे सगळे समजून घ्यावे, यासाठी हा लेखन-प्रपंच.

*******
– विनील भुर्के,

लेखक स्वयंशिक्षित चित्रकार आहेत.

टीप: हा लेख विश्वासार्ह होण्यासाठी लेखकाने या लेखात वैयक्तिक नामनिर्देश केलेले कलाकार आणि तज्ञ यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. इतर माहिती आंतरजालावरून घेतली आहे.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.