No products in the cart.
‘दृश्यकला’साठी अरुणा जोशी यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार’ बडोदा येथील भाषांतरकार अरुणा जोशी यांना जाहीर झाला आहे. नामवंत चित्रकार आणि कला अभ्यासक गुलाम मोहमद शेख यांनी संपादीत केलेल्या ‘दृश्यकला’ या गुजराती ग्रंथाचा मराठी अनुवाद अरुणा जोशी यांनी केला आहे. मुंबई येथील पॉप्युलर प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. मराठी पत्रकार-अनुवादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा अत्यंत कृतकृत्य करणारा क्षण असल्याची भावना अरुणा जोशी यांनी व्यक्त केली. तसेच या कामासाठी कलाविषयक संकल्पना समजून घेण्यासाठी ज्येष्ठ शिल्पकार आणि कला इतिहासतज्ज्ञ दीपक कन्नल यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याने हा ग्रंथ अनुवाद आस्वाद्य होऊ शकला, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे.
दृश्यकला’ या ग्रंथाविषयी
- अनेक कला आणि ज्ञानशाखा यांचा परिचय सर्वसामान्य वाचकांना करून द्यावा या उद्देशाने वल्लभ विद्यानगरच्या सरदार पटेल विद्यापीठाने ‘ज्ञानगंगोत्री’ या मालिकेअंतर्गत विविध विषयांवरच्या अनेक उत्तम ग्रंथांचं प्रकाशन केलं. त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी या ग्रंथांचं लेखन केलं असून ‘दृश्यकला’ हा या मालिकेतला तिसावा ग्रंथ आहे.
- जागतिक चित्र, शिल्प आणि स्थापत्य या कलांचा इतिहास या ग्रंथात वाचायला मिळतो. गुलाम मोहम्मद शेख हे या ग्रंथाचे प्रमुख संपादक असून कला-समीक्षक आणि अध्यापक असलेले शिरीष पंचाल हे सहसंपादक आहेत.
- एकूण 512 पृष्ठांच्या 7” x 9.5” आकाराच्या पुठ्ठा बांधणी असलेल्या या ग्रंथात देश-विदेशातली महत्त्वाची पेंटिंग्ज, शिल्पाकृती, इमारती, लोककलाकृती यांच्या 350 छायाचित्रांचा समावेश केला आहे. स्वतः गुलाम मोहम्मद शेख यांनी खास या ग्रंथासाठी तयार केलेलं कलात्मक मुखपृष्ठ या पुस्तकाला खास सौंदर्य प्राप्त करून देतं.
- जयदेव शुक्ल, उषाकांत मेहता, गौरी पारिमु, ज्योति भट्ट, दीपक कन्नल, रतन पारिमु, शिरीष पंचाल, सुरेश शेठ, नयना दलाल व भारती दलाल या दृश्यकला क्षेत्रातील मान्यवरांनी या ग्रंथासाठी लेखन केलं आहे.
दृश्यकला ग्रंथ नोंदणीसाठी संपर्क – पॉप्युलर प्रकाशन : 022 -23530303, +91 98672 42407, +91 90298 93938
- चिन्हचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP - चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion