News

पुण्यात भगवान चव्हाण यांच्याशी गप्पा!

पुणे, २७ नोव्हेंबर

 

पुण्याच्या कॅम्प परिसरात काही महिन्यांपूर्वी ‘वेसावर आर्ट गॅलरी’ नावाची नवी कोरी आर्ट गॅलरी सुरु झाली आहे. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन वास्तूचं नव्या पद्धतीनं पुनरुज्जीवन करुन  ही आर्ट गॅलरी सुरु करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये सध्या चेन्नईच्या चोलामंडलमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळच्या कुर्डुवाडीकर चित्रकार भगवान चव्हाण यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं श्री चव्हाण हे पुण्यात आले असल्यानं सदर गॅलरीनं  भगवान चव्हाण यांच्या सोबतच्या गप्पांचा कार्यक्रम दि २५ नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता. या गप्पांच्या कार्यक्रमाचं संचालन करण्यासाठी  ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक याना  गॅलरीच्या संचालिका  प्रणाली हरपुडे यांनी आमंत्रित केलं होतं.

सायंकाळी वेसावर आर्ट गॅलरीच्या खाली असलेलं छोटंसं सभागृह पुण्यातल्या कलावंत तसेच कलारसिकांनी गच्च भरलं होतं. लॉक डाउनच्या काळात आपण ‘गच्चीवरील गप्पा’ कार्यक्रमात भगवान चव्हाण यांच्याशी अगदी सविस्तर बातचीत केली  असल्यामुळे आजच्या कार्यक्रमात चव्हाण यांच्याशी अगदी अनौपचारिक गप्पा असतील असं सतीश नाईक यांनी कार्यक्रम सुरु होताच जाहीर करुन  टाकलं. आणि पुढं त्या गप्पा तशाच पार पडल्या आणि अतिशय रंगल्यादेखील. या कार्यक्रमात श्री नाईक यांनी श्री चव्हाण याना कुर्डुवाडीपासून ते चोलामंडल पर्यत –  ते त्यांचे दिवंगत चित्रकार मित्र विजय शिंदे यांच्यापासून ते त्यांचे कलाशिक्षक चित्रकार प्रभाकर  कोलते यांच्यापर्यन्त अनेक विषयांवर बोलतं केलं. श्री चव्हाण हे सध्या विजय शिंदे यांच्यावरील एका पुस्तकाच्या निर्मितीत गर्क आहेत. त्या विषयाला नाईक यांनी स्पर्श करताच श्री चव्हाण हे चित्रकार शिंदे  यांच्या बालपणापासूनच्या आठवणी सांगताना अगदी रंगून गेले होते. आणि त्या ऐकताना पुणेकर चित्रकार आणि कलारसिक मंडळी तर अगदी रमून गेली होती.

अशा प्रकारच्या चित्रकार मंडळींसोबतच्या गप्पादेखील पुण्यात सुरु झाल्या तर त्यांना केवळ कलावंतांचाच नाही तर कलारसिकांचा देखील चांगलाच  प्रतिसाद मिळेल अशी कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांमध्ये चर्चा चालली होती.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.