No products in the cart.
लिलावातील ‘गायतोंडे’
चित्रकार गायतोंडे यांच्या २ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आयोजित करावयाच्या कार्यक्रमासंदर्भात गायतोंडे यांच्या आजवरच्या कर्तृत्वाबद्दल मित्रमंडळीत सातत्याने चर्चा होतं असते. अशाच एका दूरध्वनीवरील चर्चेत काल गोव्याचे चित्रकार सुहास शिलकर यांच्या सोबत प्रदीर्घ चर्चा झाली.
निमित्त होतं ते सुहासनं फेसबुकवर प्रसारित केलेल्या त्याच्या ३० – ३५ वर्षापूवीच्या चित्रांच्या इमेजेसचं. मी त्याला विचारलं एवढ्या दिवसानं ही चित्रं तू का फेसबुकवर टाकलीस ? तर तो म्हणाला अरे ती अचानक सापडली म्हणून टाकली. आधी मी कशा प्रकारचं काम करत होतो हे माझ्या नव्या मित्रांना कळावं हा त्या मागचा हेतू होता आणि तो सफल झाला. कारण अनेकांनी फोन करुन ती चित्र आवडल्याचं देखील कळवलं.
गंमत म्हणजे ९० च्या दशकात मी जेव्हा दिल्लीला गायतोंडे यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ती चित्रे सोबत घेऊन गेलो होतो. आणि मुख्य म्हणजे गायतोंडे यांना ती चित्रे आवडली देखील होती. त्यांनी मला तसं बोलून देखील दाखवलं होतं. आता गायतोंडे किती स्पष्टवक्ते होते हे तुला ठाऊक आहेच. त्यामुळेच मला त्यावेळी खूप आनंद झाला होता.
पण गंमत म्हणजे ती चित्र नंतर बराच काळ माझ्याकडे पडून होती. पण एका मोठ्या कला संग्राहकानं त्यातली दोन चित्रे घेतली. आणि नंतर मात्र ती चित्रे माझ्याकडे राहिलीच नाहीत. आठवड्यापूर्वी आवराआवरी करत असताना ती माझ्या हाताशी लागली म्हणून फेसबुकवर टाकली. बोलता बोलता विषय गायतोंडे यांच्या लिलावात विकलेल्या चित्रांवर आला. सुहास हा गोव्यात राहून संपूर्ण कलाविश्वावर बारकाईनं लक्ष ठेऊन असतो. त्यामुळे त्याच्या विधानांना मी अतिशय महत्व देतो.
सुहास बोलता बोलता म्हणाला गायतोंडे यांची आजवर जीजी चित्र लिलावांमध्ये झळकली ती सारीच विक्रमी बोली लावून विकली गेली आहेत. अगदी त्यांची आगीत चारी बाजूनी जळलेली चित्रे सुद्धा मोठ्या बोलीला विकली गेली आहेत. त्यातूनच मग सुहास आणि मी मोकळेपणानं याच विषयावर व्हिडीओ गप्पा मारायच्या असं आमचं ठरलं आहे. बहुदा पुढल्या आठवड्यात हा कार्यक्रम रेकॉर्ड होईल पाहायला विसरू नका.
‘चिन्ह’चा ‘गायतोंडे’ ग्रंथ तुम्ही पहायला आहे का नसेल तर अवश्य पहा. त्याच्या डिलक्स आणि जनआवृत्तीच्या मोजक्याच प्रती आता शिल्लक आहेत. जन्मशताब्दी वर्ष जस जसं जवळ येत आहे तशी तशी या दोन्ही आवृत्यांना वाचकांकडून मागणी येऊ लागली आहे. अतिशय वाचनीय असा हा ग्रंथ तुमच्या संग्रहात नसेल तर आजच तो मागवून घ्या. कारण ‘चिन्ह’ आता त्याची पुनः आवृत्ती प्रकाशित करण्याच्या भानगडीत पडण्याची शक्यता नाही आहे. ९००४०३४९०३ या नंबरवर GAI हा मेसेज पाठवून तुम्ही या ग्रंथाची माहिती मागवून घेऊ शकता.
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह
Related
Please login to join discussion