News

गायतोंडे : आणखी एक विक्रम

चित्रकार गायतोंडे यांच्या खात्यावर नुकताच आणखीन एक विक्रम जमा झाला. सॅफ्रन आर्ट इंडियाच्या शुक्रवारी झालेल्या लिलावात गायतोंडे यांच्या एका पेंटिंगला ४७.५ करोड इतकी विक्रमी बोली लागली. गायतोंडे यांनी आजवरचे स्वतःचेच असंख्य विक्रम या बोलीने मोडून टाकले आहे.

पुढल्या वर्षी गायतोंडे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. सरकारतर्फे ते कशा पद्धतीनं साजरं केलं जाणार आहे याची काही कल्पना नाही. पण ‘चिन्ह’नं मात्र मूळ मराठी ‘गायतोंडे’ ग्रंथ इंग्रजीतून प्रकाशित करण्याची घोषणा केली आहे आणि त्याचं काम देखील सुरु केलं आहे.  २ नोव्हेंबर रोजी तो ग्रंथ प्रकाशित करायची योजना आखली आहे. जन्मशताब्दी वर्ष जसं जसं पुढं येईल तसं तशा गायतोंडे यांच्या चित्रांच्या किंमती लिलावात वाढतच जातील असं या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे.

गायतोंडे यांच्या लिलावात वाढत जाणाऱ्या किंमतींवर बारकाईनं लक्ष ठेऊन असलेले गोव्याचे चित्रकार सुहास शिलकर सांगत होते की, या चित्राला एवढी किंमत मिळेल असं मला देखील वाटलं नव्हतं. पण आता बहुदा जन्मशताब्दी वर्ष जवळ आल्यामुळं लिलावातल्या बोलींच्या किंमती वाढू लागल्या असाव्यात असं सुहास म्हणत होता.
सुहास हा माझा चांगला मित्र आहे. पण गंमत म्हणजे आम्ही एकदा देखील एकमेकांना भेटलेलो नाहीत. पण फोनवरुन मात्र तासन तास गप्पा मारत असतो. गायतोंडे हा आम्हा दोघांना जोडणारा दुवा आहे. किंबहुना गायतोंडे ग्रंथामुळेच त्याची माझी छान मैत्री झाली आहे. त्याची आई आजारी असल्यामुळं तो काही मुंबईत येऊ शकत नाही. आणि गोव्यात काही काम नसल्यामुळं मी देखील गोव्यात जाऊ शकत नाही. मी सतत मालवणला जात असतो. अनेक चित्रकार मित्र माझ्यासोबत असतातच. तिथून गोवा खूप जवळ असल्यामुळं प्रत्येक वेळी आम्ही ठरवतो या खेपेत तरी सुहासला गोव्यात जाऊन भेटायचं पण काहींना काही कारणामुळं ते राहूनच जातं आहे.
सुहासनं गायतोंडे यांच्या चित्रांचा खूप अभ्यास केला आहे. तो त्यांना खूप मानतो. तो दिल्लीला जाऊन गायतोंडे यांना भेटून देखील आला आहे. दोन आठवड्यापूर्वी मी त्याला सुचवलं की गायतोंडे यांच्या वाढत्या किंमतीवर आपण एक व्हिडीओ करुया त्यालाही ती कल्पना खूप आवडली.
दोन दिवसानंतर तर त्यानं गायतोंडे यांच्या चित्रांच्या किंमती कशा कशा वाढत गेल्या याचा तक्ता करण्यासाठी सगळा तपशीलच पाठवून दिला. त्यानं दिलेल्या माहितीनुसार आता कनक तो तक्ता बनवते आहे. पुढल्या आठवड्यात बुधवारी किंवा गुरुवारी आम्ही तो व्हिडीओ रेकॉर्ड करु. पुढल्या शनिवारी तो आपल्याला पाहावयास मिळेल.
हे सारं वाचून गायतोंडे यांच्या विषयी कुतूहल जागृत झालं असेल तर त्यांनी गायतोंडे ग्रंथ अवश्य वाचावा. खूप काहीतरी तो देऊन जाईल. ‘गायतोंडे’ ग्रंथ, डिलक्स आणि जनआवृत्ती अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत. ‘नग्नता चित्रातली आणि मनातली’ या ‘चिन्ह’च्या अतिशय गाजलेल्या अंकासोबत आम्ही जनआवृत्ती भेट देखील देत आहोत. त्याचे माहिती पत्रक फोटोंमध्ये शेवटी जोडले आहे. अवश्य पाहा आणि या सवलतीचा फायदा करुन घ्या. कारण ‘नग्नता’ अंकाच्या आता शेवटच्याच शंभर – सव्वाशे प्रती उरल्या आहेत. आणखीन काही वर्षानं फोन करुन तो अंक किंवा तो ग्रंथ यांची एकतरी प्रत आहे का ? फाटकी तुटकी सुद्धा चालेल अशा विनवण्या करण्यात काय हशील आहे ? आज संधी आहे तर तिचा फायदा अवश्य घ्या. ‘चिन्ह’नं आजवर जे जे काही प्रसिद्ध केलं आहे ते सारं आता पाहण्यास देखील दुर्मिळ झालं आहे. याची कृपया नोंद घ्या.
****
– सतीश नाईक 
संपादक चिन्ह आर्ट न्युज

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.