Editorial

‘ कलावंत ‘ कलासंचालकांचे कारनामे ! भाग दोन

प्रभारी कलासंचालकपदी नेमणूक झाल्याबरोबर साबळे यांनी पहिली कामगिरी कोणती केली असेल तर जे जे मध्ये तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्वतःचा सत्कार घडवून आणणे .ज्यांनी तो सत्कार घडवून आणला ( अनुदानित आणि विनाअनुदानित कलामहाविद्यालयांचे संचालक ) ज्यांनी तो सत्कार करवून घेतला ते स्वतः उत्सवमूर्ती साबळे आणि ज्यांच्या हस्ते तो केला गेला ते मंत्री महोदय उदय सामंत यांची खरोखरच धन्य आहे . त्या समारंभात फडात कुस्ती मारल्यानंतर विजयी  कुस्तगीराला जसं उचलून धरलं जातं तसं उपस्थित शिक्षकांनी साबळे याना उचलून धरलं होतं आणि त्याचे फोटो आमच्याकडे कुणीतरी प्रसिद्धीसाठी पाठवले होते ते पाहिल्यावर त्या साऱ्या प्रकारावर हसावं का रडावं का आता कोणे एके काळी आधुनिकतेचा परमोच्च उत्कर्ष बिंदू गाठलेल्या जेजे अप्लाइड परिसराचं आणि पर्यायानं कलासंचालनालयाचं पूर्णपणे गावठीकरण  झाल्याबद्दल दुःख करावं असा  प्रश्न आम्हाला पडला होता. 
 सदर प्रकार होतो न होतो तोच सीईटी परीक्षांची तयारी सुरु झाली . खरं तर ती वेळ प्रा राजीव मिश्रा यांची बदली करण्याची नव्हती . पण स्वतंत्र कला विद्यापीठाच्या संकल्पनेनं भारलेल्या ( ?)  सामंत यांच्यासारख्या तालेवार मंत्र्यांकडे  इतकी संवेदनशीलता  कुठली असायला ? लेखणीच्या एका फाटकाऱ्यानिशी त्यांनी मिश्रा याना माघारी पाठवलं आणि त्यांच्या जागी साबळेंची वर्णी लावली . त्यामुळे सीईटीला बसलेल्या ३००० मुलांची आज जी भयंकर अवस्था झाली आहे तिला एक प्रकारे माजी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हेच जबाबदार आहेत . कारण साबळे यांनी प्रभारी कलासंचालक पदावर आरुढ  होताच पाहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती ही की सीईटी परीक्षेची गेल्या चारपाच वर्षात जी घडी प्रा राजीव मिश्रा यांनी मोठ्या मिनतवारीनं बसवली  होती तिलाच त्यांनी पहिला हात घातला आणि ती विस्कटून टाकली .

राजीव मिश्रा हे जेजेच्या आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य . सरकारनं त्यांना जेजेच्या सर्व परिसराची व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून त्यांना फडणवीस सरकारच्या काळात तिथं नेमलं .  चित्रकला विश्वाशी त्यांचा संबंध दुरान्वयानं देखील नाही. साहजिकच त्यांनी आपला व्यवस्थापन क्षेत्रातला अनुभव पणाला लावून कलासंचालनालयाचं कलेवर सावरण्याचा प्रयत्न केला . अत्यंत निर्हेतुक पद्धतीनं त्यांनी परीक्षांचं वगैरे व्यवस्थापन केलं . पण साबळे यांनी आल्या आल्या ती व्यवस्थाच मोडीत काढली.  तिथं आपल्या  विश्वासातली माणसं भरली . हे करताना त्यांनी परीक्षकपदाला देखील हात घालून तिथली जे जे आणि अन्य दोन शासकीय कलाशिक्षण संस्थामधली ” पदवीप्राप्त” अनुभवी  शिक्षक मंडळी काढून टाकून त्यांच्या जागी अशा स्वरूपाच्या परीक्षांच्या व्यवस्थापनाचा  कुठलाही अनुभव नसलेली अनुदानित आणि विनाअनुदानित कलाशिक्षण संस्थांमधली शिक्षक मंडळी अत्यंत बेमुर्वतखोरपणे निर्णय घेऊन नेमून टाकली . त्यातली बहुसंख्य साबळे साहेबांच्या जेजेमध्ये झालेल्या सत्काराला उपस्थित होतीच हे वेगळे सांगावयास नकोच . महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातल्या ” पदविकाधारक ” शिक्षकांना त्यांनी या कामासाठी नेमून टाकलं .आता उदाहरणार्थ सांगली , सातार , कोल्हापूरकडे पदवी शिक्षण देणारं कला महाविद्यालयच  नाही . पण तिकडच्या ‘ पदविका ‘ म्हणजे ‘ डिप्लोमा ‘ कॉलेजच्या शिक्षकांची नेमणूक देखील मुंबईतल्या  सीईटी परीक्षेच्या पॅनलवर करावयास साबळे यांनी मागे पुढं पाहिलं नाही. परिणामी यंदाच्या सीईटी परीक्षेच्या निकालात महाप्रचंड गोंधळ झाला .

ज्यांना सीईटी परीक्षा म्हणजे काय हे देखील ठाऊक नाही .ज्यांना पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो ते देखील ठाऊक नाही,  ज्यांना तीन तीन हजार उत्तरपत्रिका तपासण्याचा देखील किमान अनुभव नाही , असे सारेच  पदविका ( डिप्लोमा ) प्राप्त प्रभारी कलासंचालकाच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्यावर जे काही व्हायला हवे होते तेच नेमके यंदाच्या सीईटी परीक्षेच्या निकाला संदर्भात घडले आणि महाराष्ट्र्र सरकारची पुरती नाचक्की झाली . सर्व प्रकारच्या  काळ्या कारवायांसंदर्भात कलासंचालनालयाची भरपूर बदनामी या आधी झालेली आहे पण  सीईटी संदर्भात  कलासंचालनालयावर इतकी बेअब्रू होण्याची वेळ या आधी कधीच आली नव्हती . साबळे साहेबांनी आपल्या ‘ कलावंत कलासंचालक पदाच्या पहिल्याच तिमाहीत तो पराक्रम करून दाखवला या बद्दल आता कोणाला जबाबदार धरायचं या प्रश्नाचं उत्तर माजी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत आता तरी  देणार आहेत का ?

– सतीश नाईक 
  संपादक

****

या संपादकीय लेखाचा भाग एक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला  90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्या आम्ही पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करू. लक्षात ठेवा आपल्या प्रतिक्रिया येणे महत्वाचे आहे तेव्हाच एक चळवळ उभी राहील आणि भविष्यात होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 3

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.