Features

सीईटी घोटाळा उघड झाला, सरकार काय करणार?

काल आम्ही जी ‘कला संचालनालयाची सीईटी संशयास्पद’ ही  स्टोरी लावली तिला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. व्हाट्सएप मेसेजेस, फोन यांच्या माध्यमातून इतक्या प्रतिक्रिया आल्या की अख्खी रात्र लोकांना उत्तरे देण्यात गेली. सीईटी देणाऱ्या मुलांनी जो व्हाटसअप ग्रुप बनवला तिथे त्यांनी मला ऍड केलं आणि माझ्याकडे विचारणा होऊ लागली की मॅडम आता पुढे आम्ही काय करावं? खरं तर कलेचं भविष्य असलेल्या या मुलांना काय उत्तर द्यावं हा प्रश्न मला पडला. या भाबड्या (ते जरी स्वतःला खूप स्मार्ट समजत असले तरी) मुलांना असं वाटतं  की मुख्य प्रवाहातील माध्यमांना ते निवेदन देतील आणि ते लगेच त्यांची स्टोरी लावतील. मग सगळीकडे बोंबाबोंब होईल आणि त्यांना न्याय मिळेल. त्यांचा हा भाबडा आशावाद पाहून मला त्यांना कसं सांगावं हे मला कळेना. मेन स्ट्रीम मीडियात चित्रकलेला जागा देणं केव्हाच बंद झालं. कधी दिली चुकूनच तर ती एखाद्या कोपऱ्यात दिली जाते. आता जर एवढासा कोपरा अशा महत्वाच्या बातम्यांना दिला जाणार असेल तर इतका महत्वाचा प्रश्न सरकारपर्यंत कसा पोचणार?

यावर उपाय म्हणून मी या मुलांना आपले निवेदन घेऊन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील आमदार, खासदार किंवा स्थानिक नेते यांच्या माध्यमातून निवेदन सरकार आणि उच्च शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोचवण्याचा सल्ला दिला. आजच्या दिवसात ही बातमी जर जबाबदार मंत्र्यांपर्यंत पोचली तर काही तरी घडू शकेल. तेव्हा तुम्ही ही स्टोरी वाचत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा, संबंधित विभागांना सोशल मीडियावर टॅग करून स्टोरी त्यांच्यापर्यंत पोचवा. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रभारी कला संचालक  विश्वनाथ साबळे यांच्यापर्यंत पोचणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला तेच दूर करू शकतात. 

या सगळ्या प्रकरणात आम्हाला अरेबियन नाइट्सपेक्षाही सुरस ठरतील अशा कथा समजल्या. त्या आम्ही देत राहूच. पण एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर जी काही माहिती दिली ती कला शिक्षणावरून आमचा विश्वासच उडवणारी होती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे रिझल्ट हा खरा प्रश्न नाहीच आहे. खरे गैरव्यवहार तर क्लासेसच्या माध्यमातून होतात. विशेषतः नागपूर एरियातील क्लासेस यात आघाडीवर आहेत. वीस ते पंचवीस हजार रुपये दिले की अख्खा पेपरच विद्यार्थ्याला आधी मिळतो. विशेष म्हणजे सगळ्यांना सगळं माहित असतं  पण कोणीच या गैरव्यवहारावर काही बोलत नाही. तो जेव्हा ही माहिती देत होता तेव्हा मला माझ्या बालपणाचे दिवस आठवले. कंधारकर सर या शिक्षकांकडे मी क्लासला जायचे चित्रकलेच्या. सर अगदी तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत. कोणी फी देत असे तर कोणी देत नसे. पण सर कुठलीच तक्रार न करता शिकवत. सरांची आर्थिक स्थितीही बेताचीच होती. आज जेव्हा मी काही क्लासेसचा थाट बघते तेव्हा एवढी माया कुठून येते असा प्रश्न पडायचा. त्याचं उत्तर असं या नागपूरच्या मुलाकडून मिळालं. 

सीईटी परीक्षेत एकूण तीन पेपर असतात. डिझाईन प्रॅक्टिकल, ऑब्जेक्ट ड्रॉईंग आणि मेमरी ड्रॉईंग.  ज्यात विद्यार्थ्यांची  पहिली १५ मिनिटं ही कंपोझिशन, अरेंजमेंट, कलर स्कीम या सगळ्यांचा विचार करण्यात जातात. ज्या विद्यार्थ्यांना पेपर आधी मिळतो त्यांचा विचार करण्यात वेळ जात नाही मग ते फटाफट उत्तम पेपर सोडवून मोकळे होतात. ही  पेपरफुटी दरवर्षी नेमाने होत असते, यात महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांचा हात असतो. पण कोणीच यावर काही बोलत नाही अशी माहिती नागपूरच्या विद्यार्थ्याने दिली. 

कालची कला संचालनालयाची सीईटी संशयास्पद ही स्टोरी खूप वाचली गेली. या स्टोरीवर भरपूर प्रतिक्रिया आल्या. निवडक प्रतिक्रिया येथे देत आहोत. 

“आजच्या शिक्षक दिनी हे ऐकायला मिळते आहे. .. सीईटीचा रिझल्ट रद्द करुन नवे परिक्षक नेमून पुन्हा फेर तपासणी व्हायला हवी.

ही वशिलेबाजी स्पष्ट दिसते आहे.आपल्याच ओळखीतले, जे क्लास चालवतात ते परिक्षक न नेमता तटस्थ परिक्षक नेमायला हवेत. त्यावर डीग्री कॉलेजसचे ( ज्यांच्या कॉलेजसाठी एडमिशन होणार) त्यांचे प्रत्येकाचे प्राचार्य, किंवा किमान परमनंट असलेला सिनियर शिक्षक मॉडरेटर म्हणून असायला हवा. जाहिरात, शिल्पकला, चित्रकला, आर्ट्स एण्ड क्राफ्ट मधले व्यावसायिक तज्ञही नेमायला हवेत.

ऐनवेळी डिप्लोमाचे आपल्या मर्जीतले शिक्षक डीग्री कॉलेजच्या प्रवेश परिक्षेसाठी नेमण्याचे गौडबंगाल काय आहे? जर हे शिक्षक कला संचालकांच्या अखत्यारीतून नेमलेले असतील तर कला संचालकांवर कडक कारवाई व्हायलाच हवी. 

मुख्य म्हणजे निकाल रद्द करून पुन्हा नवे तटस्थ परिक्षक नेमून फेरतपासणी व्हायलाच हवी.

जेजेच नाही तर सगळ्याच डिग्री कॉलेजच्या प्रवेशाचा हा घोटाळा आहे, आणि हा गुणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या घोटाळ्यातील घोटाळेबाजांना शिक्षा झालीच पाहिजे.”

– आशुतोष आपटे, माजी विद्यार्थी, जेजे स्कूल ऑफ आर्ट.

“नमस्कार !! मी रसिका मनीष शाह. मी आताच तुम्ही प्रकाशित केलेली सीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्यांबाबतचा लेख पाहिला.  मी मागील वर्षी सीईटी दिली होती आणि मागील वर्षी देखील असाच काहीसा  प्रकार मला आढळून आला होता. माझ्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत. त्या दर्जाचे काम नसताना काही विद्यार्थी आता अशा घोटाळ्या मुळे जेजे महाविद्यालयात शिकत आहेत आणि ज्यांची पात्रता आहे त्यांना प्रवेश मिळाला नाही. मला याचे खूप वाईट वाटले . मी सोबत मागील वर्षी झालेल्या सीईटी परीक्षेतील काही पुरावे जोडत आहे.”

– रसिका शाह, विद्यार्थी. 

“मी एक कला शिक्षक, मी काही वर्षे एलिमेंटरी , इंटर्मिजीएट परीक्षा पेपर तपासणीसाठी जात असे , पेपर तपासताना महाराष्ट्राबाहेरील ग्रेड परीक्षेचे पेपर्स माझ्याकडे तपासणीसाठी आले होते , त्यात इतका सावळा गोंधळ होता की एका सेंटरचे सगळे पेपर एकाच माणसाने केले असावेत असे दिसत होते. सगळ्या चित्रातील स्ट्रोक्स सारखेच, आणि एवढंच नव्हे तर कित्येक पेपर कलर प्रिंट होते.  त्यावर पाणी टाकून खात्री केली की हे प्रिंट आहे की नाही, तर त्या प्रिंट होत्या ही बाब कला संचालनालयाच्या  निदर्शनास आणली पण काही उपयोग झाला नाही.  तुम्ही तुमचे काम करा ज्या ग्रेड चे पेपर आहेत ती द्या असे सांगण्यात आले.  पाणी कुठे मुरते हे मी सांगायला नको”

– संतोष

या असल्या दुर्दैवी प्रकारामुळे अनेक चांगले कलाकार शिक्षणापासून वंचित राहतात आणि गरम खिसेवाली पोरं मोठ्या कॉलेजची CET आपल्या दमावर आणि कामावर पास झाल्याच्या अविर्भावात फिरतात.  शेवटी ‘ बळी तो कान पिळी ‘ हेच खरं , या CET मध्ये पेपर रिचेक करण्याच्या नावाखाली सुद्धा सेटलमेंट करण्याचा प्रकार सुरू असतो ही सुद्धा चर्चा दबक्या आवाजात सुरू असते. पण या वाळवी यंत्रणेला सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालक जाब विचारत नाहीत. बहुदा त्यांची या अन्यायाला तोंड देण्याची आर्थिक तसेच मानसिक तयारी नसल्याने ते गप्प राहणे पसंत करतात. अगदी बरोबर लेख मुद्देसूद पणे मांडलाय या सर्व यंत्रणेवर कारवाई झालीच पाहिजे.”

– गजानन पाटील, औरंगाबाद. 

“कुठेतरी नक्कीच सुचवावेसे वाटते , ज्याप्रमाणे सीईटी एक्झामचा रिझल्ट संशयास्पद वाटला, त्यापेक्षाही भयानक प्रकार एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षांच्या ग्रेड ( खैरात वाटणे ) देण्यावर होत असतात . परीक्षा सेंटरवर चालणारा गोंधळ न बोलण्याइतका संशयास्पद असतो. यावरही आपण उघड उघड विरोध दर्शवल्यास खरंच अनेक आदर्श विद्यार्थ्यांचे कल्याण होईल.”

उन्नती राऊत

“खूपच छान विषयात हात घातला आहे सर , हे कित्येक वर्षा पासून मी एकत आलो आहे की जे जे मध्ये असेच चालते ऍडमिशन प्रोसेस . जर असे चालत असेल तर चांगल्या मुलांवर हा अन्यायचं आहे . हे थांबायलाच हवे .”

– विनोद शिरबावीकर 

“हे माझं ऑब्जेक्ट ड्रॉईंग या विषयाचं काम. मला फक्त २९ मार्क्स पडलेत.”
– विवेक पवार, सीईटीचा विद्यार्थी

विवेक पवारचं काम

“नमस्कार, माझं नाव जकीर आहे, सीईटीमध्ये मला फक्त ११२ मार्क्स पडले आहेत. इथे मी माझे पेपर देत आहे. माझ्यावरील अन्याय दूर होईल का?”

जकीर, सीईटीचा विद्यार्थी 

जकिरची उत्तरपत्रिका

“भयंकर आहे हे, दरवर्षी असे कितीतरी विद्यार्थी पुढे जातात. यावर्षी हा विषय गंभीरपणे घेतला जातोय कारण काम चांगलं नसलेली विद्यार्थिनी थेट पहिली आलीय”

– विश्वनाथ शिंदे 

“सर्व परिचित आर्टिस्ट मंडळींना आपली ही व्यथा मांडणारी पोस्ट शेअर केली. आपल्याकडे देखील लेखणी चालवणारे , लेखणीला दाद देणारे व एकत्रितपणे येऊन लढणारे आर्टिस्ट पण मुळात कमीच. आपल्याकडे समाजात कला साक्षरता नाही असे म्हणतात ते खरे आहे. आणि स्वतः आर्टिस्ट असणारे लोकही या विषयांवर बोलत नाहीत हे बघून वाईट वाटते. आपली पोस्ट इंस्टाग्राम , ट्विटर आणि फेसबुक वर आवर्जून शेअर केली आहे.”

– अनिश दाते. 

“परखड लेख. हे सर्व वाचून धक्का बसला. जिथे ज्ञान घ्यायचे अशा पवित्र जागी जर असे घोटाळे होत असतील तर होतकरू विद्यार्थ्यांनी काय करायचे?”

– नीलेश ठोकळे, माजी विद्यार्थी, 

शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद.

महत्वाचे:
आमच्यावर अन्याय झाला या स्वरूपाचे अनेक मेसेज विद्यार्थ्यांकडून ‘चिन्ह’ला मिळाले. त्यातील जकिर आणि विवेकची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही इथे दिली. इथे प्रत्येकाचे काम वेगवेगळ्या दर्जाचे असू शकते. पण अनेक विद्यार्थी जेव्हा अन्याय झाला असे म्हणत आहेत तेव्हा पाणी नक्कीच कुठेतरी मुरत असणार. सुमार काम असणारा पेपर जेव्हा यादीत पहिल्या क्रमांकावर येतो तेव्हा संबंधितांनी यावर विचार करणे महत्वाचे आहे. आम्ही फक्त विद्यार्थ्यांचं म्हणणं मांडत आहोत. त्यांच्यावर अन्याय झाला आहे की नाही हे संबंधित यंत्रणा आणि सरकारने तपासावे.

*****

कला संचालनालयाची सीईटी संशयास्पद?

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.