Features

प्राचार्य अनिल अभंगे यांचा खुलासा !

२५ ऑगस्ट रोजी Chinha Art News ने प्रसिद्ध केलेल्या “चित्रकारांच्या टाळूवरचे लोणी खाणारे चोर!” या स्टोरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मीडिया, ‘चिन्ह’चा व्हाट्सअप नंबर यावर आम्हाला असंख्य प्रतिक्रिया आल्या. या सगळ्या प्रकरणावर नाशिक कला निकेतनचे प्राचार्य अनिल अभंगे यांनी आपला खुलासा ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. तो  खुलासा जसाच्या तसा येथे देत आहोत. या खुलाश्यामध्ये प्राचार्य अभंगे यांनी अन्यायग्रस्त चित्रकारांची माफी मागितली आहे. तसेच सदर घटना कशी घडली याची तपशीलवार माहिती दिली आहे. असे असले तरी या पात्राच्या शेवटी प्राचार्य अभंगे यांनी ही सर्व चित्रे योगेशकडून ताब्यात घेतली आहेत असे म्हटले आहे; पण ही चित्रे कॉलेजच्या मालकीची असल्याने त्यांच्या ताब्यात राहतील असे सांगितले आहे. रुपेश सोनार यांची मागणी ही सर्व चित्रे संबंधित चित्रकारांना परत मिळावी अशी होती. मात्र प्राचार्य अभंगे यांनी ती नाकारली आहे. हा सर्वच संबंधित चित्रकारांवर अन्याय आहे. आधीच्या स्टोरीमध्येही आम्ही अशी मागणी केली होती, की महाविद्यालये जेव्हा कुठल्याही स्पर्धेची फी आकारतात, तेव्हा त्यांना ती चित्रे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा काय अधिकार आहे. ही चित्रे स्पर्धा संपली की चित्रकारांना परत करणे गरजेचे आहे कारण चित्रकार हा जीव तोडून ती चित्रे काढतो. महाविद्यालये कुठल्या नियमानुसार चित्रे आपल्या ताब्यात ठेवतात?

या खुलाश्यानंतर रुपेश सोनारने ‘चिन्ह’ला सविस्तर प्रतिक्रिया दिली, ती अशी –
नाशिकचे कलानिकेतन हे खूप पूर्वीपासून स्पॉट पेंटींग स्पर्धा आयोजित करत आहे. त्यामुळे आम्ही कलाकार विश्वासाने तिथे स्पर्धेत भाग घ्यायला जातो. ह्या प्रकरणामुळे आमचा कॉलेजवरील विश्वासच उडाला आहे. स्पर्धक चित्रकारांची चित्रे कॉलेजने ताब्यात ठेवायचा नियम ताबडतोब हटवला पाहिजे. आधी कॉलेज हे शिक्षणाचे मंदिर आहे असा आम्हाला विश्वास होता. आता मात्र विश्वास संपूर्णपणे उडाला आहे. आमच्या चित्रांचे हे लोक काहीही करू शकतात. परस्पर दुसऱ्यांना विकू शकतात, मर्जीतल्या विद्यार्थ्यांच्या असाइन्मेंट्स पूर्ण करण्यासाठी देऊ शकतात. तेव्हा ही सर्व चित्रे आमच्या ताब्यात तर मिळावीत. इथून पुढे सर्व स्पर्धा आयोजकांनी पेंटिंग आपल्या ताब्यात ठेवण्याचा नियम रद्द करावा. ही मागणी मी (रुपेश सोनार) कला संचालक डीन विश्वनाथ साबळे यांच्याकडेही करणार आहे.

या सर्व प्रकरणावर कलाक्षेत्रातून आलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

“अनिल अभंगे तुम्ही खुलासा दिला हे चांगले केले. असा अनुचित प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी मी पुढील  काही गोष्टी सुचवू इच्छितो.
१) जी संस्था स्पर्धा घेते त्यांनी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांची चित्रे ठेवून घ्यायची का नाही याचा पुनर्विचार करावा. २) आपण सर्वांनीच हे लक्षात घेतले पाहिजे की जर वर्षानुवर्षे जर संस्था अशाप्रकारे स्पर्धा घेणार असेल तर त्या संस्थेकडे भरपूर चित्र जमणार व ती सांभाळणे त्यांना कठीणच होत जाणार .
३) या वर उपाय म्हणजे पारितोषिक विजेते चित्र ठेवून इतर चित्रे चित्रकारांना परत करणे किंवा स्पर्धा घेणाऱ्या संस्थेच्या गावातील व त्या परिसरातील जबाबदार रुग्णालयांना ती सुशोभनासाठी भेट देणे . परंतु त्यापूर्वी ते ती नीट फ्रेम करून लावतील याबाबतचे करार पत्र करणे आवश्यक आहे . याशिवाय इतरही पर्याय सुचू शकतात , त्यांचाही जरूर विचार करावा .
यापूर्वी माझा अनुभव आहे की मध्य प्रदेशातील एका संस्थेने आम्हाला विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आर्टिस्ट कॅम्प ला बोलवून आमच्याकडून केवळ राहायची, जाण्याची, जेवणाची व्यवस्था करून उत्तम चित्र निर्मिती करून घेतली … पण त्यानंतर त्यांनी ती चित्रे विकून पैसा कमावला व त्याची आम्हाला कल्पनाही दिली नाही. हे निश्चितच निंदनीय होते. असे काही घडू नये ही आपण कलावंतांनीच काळजी घ्यावयास हवी.”
– सुहास बहुलकर, ज्येष्ठ चित्रकार

“या घटनेला नाशिक कला निकेतनही जबाबदार आहे. त्यांनी आपल्या संग्रहातील चित्रांची काळजी घ्यावी. जर ते काळजी घेऊ शकत नसतील तर सहभागींना ती चित्र परत द्यावीत. किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ते  चित्र विकू शकतात. अशा प्रकारची वृत्ती भविष्यात खपवून घेतली जाणार नाही. अनिल अभंगे सर चांगले आहेत पण सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेताना योग्य ती शहनिशा करूनच सहभागी व्हावे.”
– शिरीष मिठबावकर, निवृत्त कला शिक्षक

“मला आलेला अनुभव शेअर करतो. सारंगखेडा येथे दरवर्षी घोड्यांचा बाजार भरतो..आणि खूप मोठी स्पर्धा ते आयोजित करतात… अक्षरशः सर्वांना कॉल करतात चित्र पाठवा म्हणून ..नाहीतर आम्ही येतो घ्यायला तुम्ही कलाकृती तयार करून ठेवा असे सांगतात.. मी पण एक पेंटिंग बनवले आणि दिले त्यांना…..खूप महागडी फ्रेम वगैरे करून त्यांना दिले होते…मला अचानक दुपारी ३-४ वाजता कॉल येतो..अभिनंदन सर, तुमच्या चित्राला फर्स्ट प्राईज लागले आहे…बाकी अजून चित्रांचे जजिंग सुरू आहे…मी एकदम खुश झालो…संध्याकाळी मला पुन्हा त्यांचा कॉल येतो आणि म्हणतात…सर सॉरी तुम्हाला उत्तेजनार्थ दिले आहे.. रु ५०००/- बक्षीस दिले आहे पण पेंटिंग आमच्या कडे राहील..आणि खूप मोठा बक्षीस समारंभ होणार आहे अमुक तमुक येणार आहे. काय काय सांगत होते…मी म्हटले साहेब माझ्या पेंटिंग ला ५०००/- रु ची फ्रेम लावली आहे. आणि कलाकृती माझ्यासाठी अमूल्य आहे. मला तुमचा एवॉर्ड नको आहे माझे पेंटिंग नेले तसे नक्की आणून द्याल. समोरची व्यक्ती ऐकून घायला तयार नव्हती. शेवटी २ महिने होऊन गेले तरी पेंटिंग माझ्याकडे आले नाही. मग गाडी करून गेलो पेंटिंग घायला. तिथे असंख्य पेंटिंग  सिमेंटच्या गोडाऊन मध्ये ठेवल्या होत्या.  तिथे सगळीकडे सिमेंट आणि धूळ. उघड्या खिडकीतून कबुतर ये जा करत होते. असा घाणेरडा अनुभव म्हणून फोटो काढून ठेवला.  माझ्या कलाकृती सारख्या कितीतरी कलाकृती त्यांनीं ५०००/- रु. उत्तेजनार्थ प्राईज देऊन खरेदी केल्या होत्या.”
– सचिन मुसळे

याच गोडाऊनमध्ये सचिन मुसळे यांची अमूल्य कलाकृती धूळ खात पडली होती

 

“खुलासा न पटण्यासारखा आहे. खुलासा देणारे प्राध्यापक स्वतः त्याच्याच प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जातात? सर्व प्रकार उघड झाल्यावर स्वतःच्या बचावाचे निरर्थक प्रयत्न आहेत. आपल्या कलाक्षेत्रात घडणारे असे अनेक किस्से आणि चोऱ्या अजूनही होत आहेत. याला आता वाचा फुटली आहे.आपण सर्वांनी याला प्रतिसाद दिल्यामुळे हे प्रकरण आटोक्यात आणता आले. हळूहळू सर्व प्रकार बाहेर येणार आहेत. आणि आपण सर्व कलाकार मंडळींनी एकत्र येऊन यावर लढा द्यायचा आहे.”
– विक्रांत शितोळे, प्रसिद्ध चित्रकार

” हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे . शिवाय जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये प्रदर्शन भरवण्यासाठी साधारण सहा-सात वर्षे वाट बघावी लागते असे ऐकीवात  आहे . २०१७-१८ मध्ये मूळ चित्रकला स्पर्धा झाली , त्याला आता साधारण ५ वर्षे झाली असे गृहीत धरले तरी इतक्या कालावधीत ती मूळ चित्रे अडगळ कशी काय झाली , आणि गहाळ कशी काय झाली आणि याच कालावधीत जहांगीरमध्ये त्यांचे प्रदर्शन भरवण्यासाठी परवानगी केव्हा मिळाली हे सगळेच गणित न सुटणारे आहे . तेही मधली दोन वर्षे कोरोना काळात प्रदर्शने बंदच होती म्हणजे खरंतर तीन वर्षांच्या अल्प कालावधीत हे सगळे घडले / घडवलेले आहे असे वाटते.”
– विनील भुर्के

“आपल्याकडे मुळात चित्रकलेची कदर नाही तर चित्रकारांची कुठून येणार ! लोक जेव्हा प्रदर्शन पाहायला येतात तेव्हा आवडलेल्या पेंटिंग  एक फोटो घेऊ द्या ना, म्हणून हटून बसतात, हे माझ्याही बाबतीत घडले आहे आणि नंतर तो फोटो कुठेतरी जाऊन कोणी त्याची कॉपी करते तर कोणी टीशर्ट, बॅग, कप, उशी वगैरे अशा गोष्टींवर छापते. कलाकाराला मोबदला तर सोडाच पण याचा थांगपत्ताही लागत नाही की त्याचे पेंटिंग इथवर कसे पोहोचले . या अनुभवाच्या निराशेतून मग कलाकार इंटरनेटवर पेंटिंग्स टाकणे टाळतात. आणि त्यांची प्रसिद्धी खुंटते ही या नाण्याची अजून एक बाजू आहे. मान्यवर कलाकारांनी एक फेसबुक पेज उघडावे आणि कॉपी मास्टर्स ची कान उघडणी करावी. फेसबुकचे ते पेज वायरल करावे आणि असा एक प्रयोग करून पहावे या चोरांना आळा बसतो का? कितीतरी नवोदीत कलाकार स्वतःच्या वेबसाईटवर थोरामोठ्याच्या पेंटिंग्ज च्या हुबेहूब कॉपी केलेल्या प्रतिकृती विकायला टाकतात, त्या प्रतिकृती पटापट विकल्या जातात आणि मग या ताईमाई माझे पेंटिंग विकले गेले म्हणूनही फेसबुकवर मिरवतात. सामान्य लोकांना यातलं काही कळत नाही, त्यांना वाटते ताई खूप ग्रेट आर्टिस्ट आहेत. या ताई पकडल्या गेल्या की वेबसाईट बंद करून टाकतात, दुसरी उघडतात.”
– सुमेधा वैद्य, बंगरुळु

“अतिशय निंदनीय प्रकार या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद . अत्यंत क्लेशकारक अनुभव . गंमत म्हणजे उद्घाटन करणारे कला विद्यालयाचे प्राचार्य स्वतः आहेत . बक्षिस मिळालेली चित्रं अडगळीत कशी जाऊ शकतात ? चित्रकारालाच परत करावीत हे उत्तम त्याच्यासाठी तर ती अनमोल असतात . शिवाय प्रत्येक चित्रकाराची शैली वेगळी असते, जहांगीर आर्ट गॅलरीत निवड करणाऱ्या समितीला कळू नये, हे पटत नाही. निषेध करावा तेवढा थोडाच .”
– ज्योती रंजन राऊत

“धान्य ती गॅलरी निवड कमिटी, धन्य ते कला महाविद्यालय.”
सोमनाथ बोठे

“१०० टक्के सहमत. हे सर्व प्रकार माझ्याबाबतीतही घडले. माझेही उत्तम काम ठेऊन घेतले कॉलेजने. खूप वाईट अनुभव आहे कला क्षेत्रातील. आणि हे सर्व गुरु करतात हे किळस आणणारे आहे. ज्या वयात फक्त गुरूंवर विश्वास असतो त्याच वयात जग किती घाणेरडे आहे हे शिकायला मिळते.”
– सुभाष जोशी

“खूप आश्चर्य वाटतंय. नाशिकच्या कलाक्षेत्राबाबत बातमी येऊनसुद्धा अजून कोणाचीच प्रतिक्रिया आलेली नाहीये.”
– दर्शन खेडगावकर

“हा अनुभव मला आला. आमच्याही असाइन्मेंट्स गायब व्हायच्या कॉलेजमधून. ज्याला बक्षीस मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट तर कधीच परत मिळायच्या नाहीत.”
प्रियदर्शनी लोंढे

“ऑन द स्पॉट स्पर्धा असो किवा कुठलीही स्पर्धा असो; त्यात सहभागी चित्रकार विद्यार्थ्यांची चित्रे परितोषिक घोषित केल्यानंतर, संबंधित विद्यार्थ्यांना परत दिली पाहीजे. तसं केलं तरच या चोरीला आळा बसेल. चित्र जाळून टाकली जातात अशी आम्हाला माहिती दिली हे तर किती भयंकर आहे.”
हेमलता पगारे

“किती निंदनीय प्रकार आहे हा, दुसऱ्या कलाकाराची चित्रे स्वतःच्या नावावर, त्याचे सार्वजनिक प्रदर्शन ? निलाजरेपणाचा कळस झाला. निषेध!”
– सुनीती देव

“मला फक्त जाणून घ्यायचे आहे की, वरील प्रकारात जिथे बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी चे अनेक वर्षे प्रदर्शन होतात अणि जिथे बॉम्बे आर्ट सोसायटी चे ऑफिस वर्षानुवर्ष होते. त्या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षांनी फेसबुकवर केवळ एक कोड्यातील लेख लिहून कोड्यातच निषेध केला की प्रत्यक्ष पातळीवर अद्याप काही केले आहे ?”
– संजय लक्ष्मण नोरल

“खूपच दुर्दैवी आहे हे. अशा लोकांना शिक्षा झाल्या पाहिजेत.”
सुरेंद्र सराफ
“भयंकर प्रकार आहे हा. अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल चिन्हचे धन्यवाद!”
– रवींद्र तोटा

“खरंच हा खूप वाईट प्रकार आहे. स्पर्धेतली कलाकृती विद्यार्थ्यांना परत द्यायला हवी. आर्ट कॉलेजेस विद्यार्थ्यांना अंधारात ठेवतात आणि शिक्षणाचा दर्जा ही वाईट असतो.”
– निखिल शांताराम आत्राम

‘चिन्ह’ची भूमिका
चित्रचोरी प्रकरणात चित्रे योगेशला कशी मिळाली ते फक्त योगेश वाल्डे आणि प्राचार्य अनिल अभंगे या दोघांनाच माहिती आहे. घटना घडून दोन दिवस उलटून गेले तरी कॉलेजने अजून कोणतीही कारवाई केली नाही. ना पोलीस कम्प्लेंट केली, ना चित्रे विद्यार्थ्यांना परत दिली. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. कला महाविद्यालये जी कलेची मंदिरे  मानली जातात ती आज खरोखरच एवढी निर्ढावली आहेत का ? की त्यांना याची खात्रीच आहे  की आपले कुणीही काही बिघडवू शकणार नाही. चार दिवस चर्चा होईल आणि लोक विसरून जातील. मुळात कॉलेजला चित्रे ताब्यात का ठेवायची आहेत? हा खरा प्रश्न आहे. कलाक्षेत्रातील सर्वच चित्रकारांनी रुपेशला पाठींबा द्यावा आणि ही चित्रे परत मिळेपर्यंत हा लढा आपण देत राहू.

****

चित्रकारांच्या टाळूवरचे लोणी खाणारे चोर!

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.