Features

चित्रकारांच्या टाळूवरचे लोणी खाणारे चोर!

खरे तर असे शीर्षक देताना मनात खूप चिड आणि संताप आहे. अनेक होतकरू विद्यार्थी, कलाकार आपल्या कलेवर खूप मेहनत घेत असतात. आपली कला प्रगल्भ व्हावी म्हणून वर्षानुवर्षे साधना करतात.यातील कितीतरी विद्यार्थी हे छोट्या छोट्या गावातून येतात. स्वतःचे पैसे खर्च करून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये  भाग घेतात. उन्हात बसून स्पॉट पेंटिंग करतात. त्यातल्या अनेकांना बक्षिसही मिळते. त्यांची कलाकृती स्पर्धा भरवणारे कॉलेज आपल्याकडे ठेवून घेते. इथून आगमन होते चोरांचे. थोडा फार बिझनेस सेन्स असलेला एक चोर येतो आणि ही चित्रे कॉलेजमधून चोरतो किंवा कुणीतरी त्याला ती देते. मग या चित्रांवरचे मूळ चित्रकाराचे नाव हटवून तो स्वतःची सही करतो आणि स्वतःच्या नावाने प्रदर्शनही भरवतो, तेही थेट जहांगीरमध्ये (याच जहांगीरमध्ये प्रदर्शन भरवण्यासाठी कलाकारांना सहा सहा वर्षे वाट बघावी लागते). हा सगळा प्रकारचं भयंकर आहेयामुळे खऱ्या चित्रकारांवर किती अन्याय होतो याचा विचार करूनच संताप येतो.

योगेश वालदे याच्या प्रदर्शनाचे पोस्टर.

रुपेश सोनार या पुणेस्थित चित्रकाराने आम्हाला दिनांक २४ ऑगस्ट रोजी संपर्क साधला.  त्यांनी  २०१७-१८ साली नाशिक कला निकेतन या कॉलेजमध्ये झालेल्या  ‘स्पॉट निसर्ग चित्रण’ स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांना बक्षिसही मिळालं. कॉलेजने त्यांची बक्षिसपात्र कलाकृती आपल्याकडे ठेऊन घेतली. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या बक्षिसपात्र कलाकृती कॉलेजकडे जमा झाल्या तेही नियमानुसारच. खरे तर बक्षीस मिळालेली कलाकृती कॉलेजकडे जमा करण्याचा नियम का आहे, ते माहीत नाही पण इथपर्यंत ठीक आहे. 

चित्रकार रुपेश सोनारचे योगेशच्या प्रदर्शनात मांडलेले चित्र

पुढे २०२२ उजाडले आणि योगेश गोकुळ वालदे  या (चोर) चित्रकाराने या कलाकृती नाशिकच्या या कॉलेजमधून मिळवल्या.खरं तर या चोराला चित्रकार का म्हणायचं हा प्रश्नच आहे, पण कुठल्या तरी कलामहाविद्यालयात त्याने ऍडमिशन घेतले म्हणून चित्रकार म्हणायचं इतकचं. खरा तो चोरच. तो पण साधासुधा नाही तर बिझनेस माईंड असलेला चोर. या महाभागाने काय केले तर नाशिकच्या गंगापूर रोडला आपली गॅलरीच काढलीय. (या लेखासोबतच्या फिचर इमेजमध्ये तुम्ही योगेशच्या शॉपचा फोटो बघू शकता). तिथून तो अशाच चोरलेल्या कलाकृती आपल्या नावाने खपवत असतो. एवढेच नाही तर पठ्ठ्याने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये या कलाकृतींचे प्रदर्शन २३ ते २९ ऑगस्ट २०२२ दरम्यान भरवले आहे. तिथे लोक येतही होते प्रदर्शन बघायला. म्हणजे बघा मूळ आर्टीस्ट जीव ओतून ती कलाकृती बनवतो आणि कोणीतरी भलताच ती कलाकृती आपल्या नावाने तेही स्वतःची सही करून विकतो. पण चोरी जास्त काळ लपून राहत नाही असे म्हणतात ना अगदी तसेच घडले. चित्रकार रुपेश सोनारचा मित्र दर्शन गौपूळे हे प्रदर्शन बघायला जहांगीर आर्ट गॅलरीत गेला आणि तिथे त्याच्या लक्षात आले की प्रदर्शित चित्रांपैकी एक चित्र त्याचा मित्र रुपेश सोनारने काढले आहे. हळूहळू प्रत्येक चित्र गजानन शेळके, रुपेश सोनार, स्वप्नील पाटे, वैभव गायकवाड, अजित राऊत, सुमित ब्राम्हणकर, प्रवीण कारंडे, शुभम तपकिरे अशा अनेक चित्रकारांच्या मूळ कलाकृती आहेत असे लक्षात येऊ लागले आणि ही माहिती मग मूळ चित्रकारांपर्यंत पोहोचली. रुपेशने मग सगळीकडे न्याय मागायला सुरुवात केली.

स्वप्नील पाटे यांचे चित्र

यात जहांगीर आर्ट गॅलरीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचित्र निर्माण होते. जहांगीर आर्ट गॅलरीचे पदाधिकारी कुठलाही शहानिशा न करता कसे काय कोण्यापण सौम्यागोम्याला गॅलरी उपलब्ध करून देतात? 

या सगळया प्रकरणात आश्चर्याचा धक्का कुठे बसतो तो म्हणजे कला महाविद्यालयातून अशी चित्रे गायब कशी होतात? या योगेशच एकवेळ ठीक आहे चोरच तो, पण कला महाविद्यालयाची काही जबाबदारी आहे की नाही? रुपेश सोनार यानेही  कला निकेतनचे प्राचार्य अनिल अभंगे यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितलेली स्टोरी अशी ” चित्रचोर योगेश वालदे हा कला निकेतनचा माजी विद्यार्थी, त्याला आम्ही कला निकेतन कॉलेजची बिल्डिंग रंगवण्याचे कंत्राट दिले होते. याप्रसंगी जुनी अडगळ काढून टाकताना त्याने ही चित्रे पण चोरून नेली.” 

आता यावर अन्यायग्रस्त चित्रकारांनी कसा विश्वास ठेवावा. कॉलेज आपल्या संग्रहातील कलाकृतींबद्दल इतके गाफील कसे राहू शकते? ,का कॉलेजनेच ही चित्रे योगेशला काही रुपयांसाठी विकली. हा आमचा सवाल आहे?

गजानन शेळके यांचे चित्र

योगेश, अभंगे या सर्वांकडून रुपेशला उडवाउडवीची उत्तरे मिळत होती पण या प्रकरणात न्याय कुठे मागावा असा प्रश्न त्याला पडला. मग रुपेशच्या मदतीला मुंबईस्थित आर्टिस्ट आणि कार्यकर्त्या प्रिया पाटील आल्या. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि कलेचे चाहते असलेले आपले पती प्रमोद पाटील यांच्या साहाय्याने हे प्रकरण लावून धरले. जहांगीर आर्ट गॅलरीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी जाब विचारला. जेजेचे डीन विश्वनाथ साबळे यांच्यापर्यंत हे प्रकरण नेले आणि सगळ्यांचाच सूर हे प्रकरणे चर्चेने सोडवावे असा होता. प्रिया पाटील यांनी अनिल अभंगे, योगेश वालदे या सगळ्यांना या घृणास्पद  कृतीचा जाब विचारला. योगेशचे म्हणणे असे आहे की ही चित्रे त्याला प्रा. अनिल अभंगे यांनी दिली. अनिल अभंगे यांनी आमच्याकडे आपली बाजू मांडली.  (हद्द म्हणजे ते या योगेशच्या प्रदर्शनाला उदघाटक म्हणून हजर होते.) तर अभंगे यांचे स्पष्टीकरण, त्यांनी जे रुपेश सोनारला उत्तर दिले साधारण त्याच पद्धतीचे होते. ते म्हणजे  योगेशने ही चित्रे बिल्डिंगचे रंगकाम संपल्यावर इतर अडगळीबरोबर उचलून नेली. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरा जडच जाते. आणि हे खरे असेल तर एका कला महाविद्यालयाचे प्राचार्य (जे स्वत: चित्रकार आहेत )मौल्यवान चित्रे अडगळीबरोबर ठेवूच कसे शकतात? चित्रकलेचे चाहते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांचे तर असे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील कला कॉलेजेस आणि गॅलरीज यांची ही एक भ्रष्ट युती आहे. ज्यात हे सर्व मिळून गरीब, अनुनभवी कॉलेजच्या मुलांची चित्रे स्पर्धेच्या निमित्ताने गोळा करतात आणि परस्पर विकतात. 

सुमित ब्राम्हणकर यांचे चित्र

 

वैभव गायकवाड यांचे चित्र

कला निकेतन कॉलेज ज्यांनी लँडस्केप स्पर्धा आयोजित केली, बक्षीसे दिली आणि कलाकृती आपल्या संग्रहात ठेवल्या त्या कॉलेजकडून काही दाद मिळत नाही असे बघून चित्रकार रुपेश सोनारने जहांगीर गॅलरीशी संपर्क केला आणि घडलेला प्रकार मॅनेजमेंटच्या कानावर घातला.  प्रकरणाची शहानिशा करून जहांगीर आर्ट गॅलरीने हे प्रदर्शन तात्काळ थांबवले आणि चित्रचोर योगेश वालदेला आपल्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकले.

अजित राऊत यांचे चित्र
अन्यायग्रस्त चित्रकार रुपेश सोनार

कला निकेतन ही एक नावाजलेली संस्था आहे. तिथे असा गैरप्रकार कसा घडू शकतो? या अन्यायाबद्ल ‘कला निकेतन’ या कॉलेजने आमची माफी मागावी अशी मागणी रुपेश सोनार यांनी केली आहे. शिवाय या कलाकृतींचे पुढे काय होणार हा प्रश्न आहे. कारण योगेशने त्यावरील मूळ चित्रकारांच्या सह्या खोडून आपले नाव टाकले आणि कलाकृती या अजूनही त्याच्याच ताब्यात आहेत.  तर आता गजानन शेळके, रुपेश सोनार, स्वप्नील पाटे, वैभव गायकवाड, अजित राऊत, सुमित ब्राम्हणकर, प्रवीण कारंडे, शुभम तापकिरे आणि इतर अन्यायग्रस्त चित्रकारांनी ही चित्रे लवकरात लवकर आपल्या ताब्यात मिळावीत अशी मागणी चिन्ह आर्ट न्यूज च्या माध्यमातून केली आहे. असे न केल्यास ते लवकरच योगेश वालदे आणि संबंधितांविरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार आहेत.

या सर्व प्रकरणावर आम्ही ज्येष्ठ चित्रकार आणि जहांगीर आर्ट गॅलरी निवड समितीचे माजी सदस्य अनिल नाईक यांचे मत विचारले. अनिल नाईक यांच्या मते, ” अनेक कला महाविद्यालये ही कलेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करतात, त्यासाठी फी देखील आकारतात, मग त्यांना विद्यार्थ्यांची चित्रे परत करण्यास काय हरकत आहे. मुळात ही चित्रे ताब्यात ठेवण्याचा नियम कुणी बनवला? हीच ठेवलेली चित्रे मग अशी परस्पर विकण्यात येतात का असा त्यांचा सवाल आहे? विद्यार्थ्यांना वाटते की स्पर्धेत भाग घेतले तर आपल्याला एक्सपोजर मिळेल, पण खरी परिस्थिती ही आहे की, त्यांच्या असाहाय्य परिस्थितीचा फायदा घेण्यात येतो. स्पर्धा आयोजकांनीही थोडे जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या कार्यपद्धतीबद्दल अनिल नाईक सांगतात, “जहांगीरच्या निवड प्रक्रियेत कलाकाराचे संपूर्ण काम, बायोडाटा, वगैरे समग्र कारकीर्दीचा आढावा घेऊनच निवड समिती निर्णय देते. समितीने संमत केलेलाच कला प्रकार वा शैलीतील चित्रमालिका प्रत्यक्ष प्रदर्शनात लावणे चित्रकाराची बांधिल असते. थोडेफार बदल मान्य असतात . ही चित्रकाराची नैतिक जबाबदारी आहे की त्याने कुठलेही गैरप्रकार करू नये. असे काही गैरप्रकार आढळल्यास प्रशासन त्या कलाकाराला ब्लॅकलिस्ट करते.”

रुपेश सोनारने फेसबुकवरूनही कलाक्षेत्राला सपोर्ट चे आवाहन केले आहेअनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार विक्रांत शितोळे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून कलाक्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा गंभीर प्रश्न पोहोचवला. ,या प्रकरणावर विक्रांत शितोळे यांची प्रतिक्रीयाहा अतिशय निंदनीय प्रकार आहे.अशा प्रकारची हिम्मत करणे एखाद्याला जमतेच कसे.. स्वतः ला काम येत नसेल तर कलाकार म्हणवून घेणे सोडून द्यावे. खरंतर या लोकांना जहांगीर सारखी गॅलरी मिळते हे खरेच मोठे दुर्दैव.. नाशिकची कला परंपरा ही खूप मोठी आहे. अनेक होतकरु मुले स्वतः पैसे कमवून दूरदूर ठिकाणी स्पर्धेसाठी,काही शिकण्यासाठी  जातात. अशा होतकरु मुलांचे काम त्यावर स्वतःची स्वाक्षरी करून प्रदर्शित करताना लाज कशी वाटली नाही. जहांगीर आर्ट गॅलरी, नाशिक कला निकेतन यांनी यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी. असा प्रकार परत होणार नाही याची दख़ल घ्यावी.”

हे सगळे गंभीर प्रकरण पाहता दोष कुणाचा हे देखील आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला. निश्चितच यात योगेश वालदे याचा दोष आहेच. पण याच बरोबर आपले कलाशिक्षणही तितकेच जबाबदार नाही काआपल्या शिक्षणात कधीच हे शिकवलेच गेले नाही की अशाप्रकारे एखाद्या कलाकाराची वर्षानुवर्षांची तपस्या चोरी करू नये. आणि त्यावर कडी म्हणजे ती चित्रे आपल्या नावावर खपवू नयेत. त्यामुळेच आपली कलाशिक्षणाची पद्धतीचं मुळापासून सुधारणे गरजेचे आहे. आणिचिन्हने हा विषय कायमच लावून धरला आहे. इतकेच नाही तरचिन्हने कला शिक्षणाच्या वाईट अवस्थेची परिस्थिती मांडणारा कालाबाजार हा अंकही काढला आहे. 

जाता जाता

वरील चित्र हे चित्रकार विमल वर्मांचे आहे आणि खालील चित्र मूळ कलाकृतीत थोडे फेरबदल करून केलेलं

योगेश वालदे याने जहांगीरमधील प्रदर्शनासाठी जे पोस्टर तयार करून घेतले त्यावर राधाकृष्णाचे सुंदर पेंटींग आहे. मूळ चित्रकार विमल वर्मा यांच्या चित्रात थोडे फेरफार करून योगेशने हे चित्र आपल्या पोस्टरसाठी वापरलय. आता जर प्रदर्शन लँडस्केप पेंटींगचे आहे तर जाहिरातीच्या पोस्टरवर राधाकृष्ण पेंटिंग का? ग्राहक आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असावा का? असो तर अशी ही चोर आणि चित्रकाराची कहाणी. 

****

कनक वाईकर, डोंबिवली

प्राचार्य अनिल अभंगे यांचा खुलासा !

 

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएपवर लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.

https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.