Features

आवारी कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात !

चित्रकार सुरेशचंद्र आवारी घरात एकटेच असतात. दिवसभर संकष्टीचा उपास केलेला असतो. ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांना ते नुकतेच भेटून आलेले असतात. पत्नी योगाच्या क्लासला गेलेली असते. दिवसभरच्या उपासाने भूक लागल्यासारखी वाटते म्हणून स्वयंपाक घरातला आंबा ते उचलतात. आंबा त्यांना जीव की प्राण. तो आणि सूरी हातात घेऊन ते दिवाणखान्यात येतात. तो कापणार इतक्यात आंबा त्यांच्या हातून घरंगळतो…

दीड दोन तासाने त्यांची पत्नी घरी येते. घरात काळोख असतो. लॉक उघडून ती आत येते तेव्हा तिला चित्रकार आवारी जमिनीवर पडलेले दिसतात. शेजारी आंबा आणि सूरी पडलेली आणि भली थोरली उलटी झालेली. ती जिवाच्या आकांताने किंचाळते.

शेजारी पाजारी धावत येतात. त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं. निदान होतं ब्रेन हॅमरेजचं. लवकरात लवकर ऑपरेशन करायचं असतं तरच वाचण्याची शक्यता. एक मुलगी बँगलोरला असते. दुसरी त्यांच्याच शेजारच्या इमारतीत राहते. तिची लेखी परवानगी घेऊन ऑपरेशन केलं जातं. ते चार साडेचार तास चालतं. पुढला महिनाभर त्यांचा मुक्काम हॉस्पिटलमध्येच असतो.

पत्नी, मुलगी, नातेवाईक आणि डॉक्टर ते कधी डोळे उघडतात याची वाट बघत असतात. महिना झाला तरी ते डोळे उघडतच नाहीत. तोपर्यंत ऑपरेशन आणि औषध उपचारात दहा बारा लाख रुपये झालेले असतात. डॉक्टर शेवटी कुटुंबियांना सांगतात की यांना आता घरी घेऊन जा. घरातल्या एका रूमचं रूपांतर आता हॉस्पिटलच्या रुममध्येच होतं. बारा बारा तासाच्या अंतरानं दोन नर्स त्यांची शुश्रुषा करतात.

परवाच्या १७ जूनला या घटनेला बरोबर एक वर्ष झालं. चित्रकार सुरेशचंद्र आवारी यांनी अद्यापही डोळे उघडलेले नाहीत. या संदर्भातला एक विशेष लेख काल ‘https://chinha.in/’ या ‘चिन्ह’च्या वेबसाईटवरील ‘chinha art news’ या ‘चिन्ह’च्या ऑनलाईन पेपरवर प्रसिद्ध झाला. हा मजकूर लिहीत असेपर्यंत फेसबुक वर ३४४१ लोकांनी सदर पोस्ट वाचली असावी तर इन्स्टाग्राम वर ३६६.

सकाळीच बडोद्याहून डॉ दीपक कन्नल यांनी ऑडिओ मेसेज पाठवला. त्यात ते म्हणाले ‘खूप वाईट वाटलं हे वाचून. म्हणाले बडोद्यात आम्ही असं काही झालं की त्या चित्रकाराला मदत व्हावी यासाठी प्रत्येक चित्रकाराकडून एक एक चित्र घेतो आणि त्याची विक्री करुन आलेले पैसे त्या चित्रकाराला साहाय्य म्हणून निधीत गोळा करतो. खूप मोठ्या चित्रकारांकडून आम्ही पन्नास टक्के रक्कम घेतो. कारण प्रत्येक चित्रकाराला मनात असलं तरी आर्थिक मदत करणं अशक्य असतं. म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो.’ सर पुढं म्हणाले तुम्ही असा उपक्रम नक्कीच करु शकाल. मी मनातल्या मनात म्हटलं सरांना बहुदा मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या चित्रकारांविषयी फारसं माहिती नसावं असं दिसतंय.

असं मी म्हटलं आणि शिल्पकार मधुकर वंजारी यांचा मेसेज येऊन धडकला. त्यांनी लिहिलं होतं ‘अजिबात माहिती नव्हतं. बरं झालं आपण सविस्तर बातमी दिलीत. खूप खूप धन्यवाद !’ जेजेतली आमची सहाध्यायी गीता कॅस्टीलीनो हिनं देखील दुःख वाटून आवर्जून मेसेज पाठवला. तिला बिचारीला नुकताच एक छोटासा अपघात झाला. पण त्यातही तिनं आवर्जून व्हाट्सअप वर मला एक मेसेज पाठवलाच. गीता कॅस्टीलीनोला जे ओळखतात त्यांना तिनं आपल्या अपंगत्वाशी जन्मभर कशी लढाई केली ते चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तिच्या व्हाट्सअप मेसेजचं महत्व मला खूप वाटलं. चित्रकार शार्दूल कदम यानं देखील आवर्जून एक मेसेज पाठवला. रात्री उशिरा चित्रकार आशुतोष आपटेचा फोन आला. ‘अरे , आवारी सरांना नेमकं काय झालं ?’ चित्रकार आवारी जेजेमध्ये एक वर्ष आशुतोषच्या वर्गावर शिकवत होते. बस इतकंच. एवढ्या चार प्रतिक्रिया दिवसाभरात चित्रकला वर्तुळातून माझ्यापाशी आल्या. अर्थात मला या प्रकारची चांगलीच सवय असल्यामुळे फारसं वाईट वाटलं नाही. पण मनात कुठंतरी खट्टू झाल्यासारखं वाटलंच.

‘चिन्ह’ तर्फे जे व्हाट्सअप ग्रुप चालवले जातात त्या द्वारे तब्बल सहा सात हजार चित्रकार आणि चित्रकलेशी संबंधित व्यक्ती यांना मेसेज जातात. या खेरीज ‘चिन्ह’चे वीस ब्रॉडकास्ट ग्रुप आहेत. त्या द्वारे आणखीन सुमारे पाच हजार चित्रकार आणि कलारसिक यांना नियमितपणे मेसेज जातात. कालही ते तसेच गेले होते. पण अवघ्या पाच प्रतिक्रिया आमच्यापाशी आल्या.

महाराष्ट्राच्या चित्रकला शिक्षणावर भाषेचा कुठलाच प्रभाव नसल्यामुळं कोणे एके काळी भारतात सर्वोच्च स्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या चित्रकला शिक्षण परंपरेला अलीकडच्या काळात संपूर्णतः अवकळा आली आहे हे माझं स्पष्ट मत आहे. आणि हे मत गेली चाळीस वर्ष मी स्पष्टपणे बोलून दाखवत आहे. जिथं जिथं म्हणून मला हा विषय मांडता येईल तिथं तिथं मी कधी कधी तर चक्क अतिरेकी पद्धतीनं मांडत असतो. माझ्या स्पष्टवक्तेपणाचा किंवा फटकळपणाचा अनेकांना राग येतो, संताप येतो, पण मी त्यांना न जुमानता माझं व्रत तसंच चालू ठेवलं आहे. आधी ‘चिन्ह दिवाळी अंक’ मग ‘चिन्ह आर्ट मॅगझीन’ आणि आता सरते शेवटी ‘चिन्ह आर्ट न्यूज’ याद्वारे माझं काम मी चालूच ठेवलं आहे. भले मला त्यात व्यावसायिक यश मिळालं नसलं तरी मी करीत असलेल्या कामाचा मला प्रचंड अभिमान आहे.

मागच्याच महिन्यात आम्ही ‘चिन्ह आर्ट न्यूज’ची इंग्रजी आवृत्ती सुरु केली. पण त्या दिवशी ‘चिन्ह’च्या दोन अडीचशे कलावंत असलेल्या आर्टिस्ट व्हाट्सअप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टला मला फक्त एक प्रतिक्रिया मिळाली. शुभेच्छांचा साधा इमोजी देखील कुणाला पाठवावासा वाटला नाही. म्हणून सुमारे पाच सहा वर्ष खपून उभा केलेला आर्टिस्ट ग्रुप मी एका मिनिटात सोडून दिला.

आवारी यांच्या संदर्भात जे झालं त्याचं मला आश्चर्य मुळीच वाटलं नाही. या अशा उदासीन वृत्तीमुळेच कला संचालनालय, जेजे स्कूल ऑफ आर्ट, महाराष्ट्रातली अनुदानित किंवा विना अनुदानित कला महाविद्यालयं यांची पुरती वाताहत झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या प्रकारामुळे मला अनेकदा नैराश्य येतं. पण कसं कुणास ठाऊक त्यावर मात करुन मी पुन्हा नव्या जोमानं नवं काहीतरी करायला उभा राहतो.

काल मात्र आक्रितच घडलं.

सायंकाळी आठ वाजल्याच्या सुमारास माझा मोबाईल वाजू लागला. पाहिलं तर दीपालीचा फोन होता. दीपाली म्हणजे सुरेश आवारींची लेक. म्हटलं यावेळी हिनं कशासाठी फोन केला ? फोन उचलला तर दीपाली म्हणाली ‘काका थोड्याच वेळापूर्वी मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला होता. अरविंद मांडवकर बहुदा सचिव असावेत त्यांचे. ते आस्थेनं विचारत होते की आम्ही सारं वाचलं आहे. आम्ही कशा प्रकारची मदत करु शकू ? आम्हाला जरुर सांगा.

हे सारं ऐकलं आणि अक्षरशः थक्क झालो. दिवसाभरात हजारो कलावंताना लिंक्स आणि मेसेजेस पाठवून अवघ्या पाच जणांच्या प्रतिक्रिया माझ्यापाशी आल्या होत्या. कोणाही कलावंताला प्रतिक्रिया देणं अगत्याचं वाटलं नाही. मग मदत वगैरे करणं तर दुरचंच. आणि दुसरीकडे मात्र ज्यांच्याकडून स्वप्नांतही अपेक्षा केली नव्हती असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून मात्र कुठलाही अर्ज न करता केवळ ‘चिन्ह आर्ट न्यूज’ मधला लेख वाचून आपणहून मदतीचा हात पुढं केला जातो. या अभूतपूर्व घटनेबाबत काय म्हणावं हेच मला कळेना. मी या घटनेनं काहीसा भारावून गेलो आहे. या संदर्भात भावना कशा व्यक्त कराव्या हेच मला कळेनासं झालं आहे. पण या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना उद्या सविस्तर पत्र लिहिणार आहे.

तुम्हाला जर हा लेख आवडला तर अवश्य तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया पाठवायला विसरु नका.

– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
https://chinha.in/

हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला जर सुरेश आवारी यांच्या संदर्भात मी लिहिलेला लेख वाचावासा वाटला तर कृपया पुढील लिंकवर क्लीक करा.
https://chinha.in/features/injustist-iwth-artist-awari/

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.