Features

लडाख डायरी ३

चित्रकार शरद तरडे यांचे लडाखच्या दुर्गम वातावरणातील रमणीय निसर्गाचा आणि स्थानिक जनजीवनाचा अनुभव शब्दबद्ध करणारे *लडाख डायरी* भाग १ आणि २ तुम्ही याआधी वाचलेत. याच मालिकेतील हा तिसरा लेख.यामध्ये लेखकाने आपल्याला लेह परिसरातील मनोहारी निसर्गाची सैर घडवून आणली आहे. आणि अर्थातच ते चित्रकार असल्याने कॅनव्हॉसवर रंगांचा कुंचला जितका सहज फिरेल तेवढ्याच कौशल्याने त्यांनी इथला रंगबहार निसर्ग नजराणा शब्दांमधून अलगदपणे आपल्या समोर मांडला आहे.
***

लेखक : शरद तरडे
कालपासून जरा बरे वाटत होते त्याच्यामुळे उद्या पहाटेच साडेपाचला पुन्हा ट्रीपला निघायचे ठरवले. सकाळी बरोबर साडेपाचला ड्रायव्हर होम स्टेला येऊन थांबला.आपल्याकडे सकाळी साडेआठ वाजता जेवढा लख्ख प्रकाश पडतो तसा पडला होता. थंडी थोडीफार होती परंतु तोपर्यंत पोटात दोन-तीन कप गरम चहा जाऊन बसला होता.

गाडी दहा-पंधरा मिनिटात लेहच्या बाहेर आली आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचे रूप वेगवेगळे दिसू लागले. डाव्या हाताला, समोर, उजव्या हाताला तिनही दिशांना वेगवेगळ्या रंगाचे डोंगर थोडीफार शेती किंवा लांबलचक जाणारा रस्ता हे आलटून पालटून दृश्य समोर येत होते आणि या दृश्याला खरोखरच कुठेही सीमा नव्हती. प्रत्येक दृश्य हे दुसऱ्या दृश्यात अलगत सामावले जात होते की डोळ्याला त्याचा थांग पत्ता लागत नव्हता.

नंतर सुरू झाली उंच उंच डोंगरांची रांग आणि शेजारून वाहणारी वळणे, वळणे घेत जाणारी नदी आणि त्यामधून आमचा रस्ता! हा रस्ता सुद्धा जशी नदी वळेल त्या पद्धतीनेच वळत होता. त्यामुळे प्रत्येक वळणावर काय दिसेल याची उत्कंठा लागत असतानाच ते दृश्य डोळ्यासमोरून पसार होत असे. कॅमेरेतून फोटो तरी किती काढणार असे मी सारखा मनाला बजावत होतो शेवटी जे काही असेल ते डोळ्यांमध्ये सामावून घेऊ आणि पुढे जाऊ एवढेच एक लक्षात ठेवले.

रस्त्याच्या कडेला असलेले डोंगर, दऱ्या ,कपारी याच्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रंगसंगती निसर्गाने साधली होती. कधी यलो ऑकर तर कधी किरमिजी तर कधी ऑरेंज तर कधी पिंक असे अनेकविध रंगाचे प्रकार वेगवेगळ्या चित्रासारखे मांडून ठेवल्यासारखे वाटत होते. जसं काही चित्रकारांचे वेगवेगळे कॅनव्हास हे प्रत्येक वळणावर वेगळ्या रीतीने सादर होत होते असेच वाटत होते. कुठेही एकसारखेपणा नव्हता परंतु तरीही ते सर्व एक तालबद्ध वाटत होते. कुठे रुद्र रूप तर कधी एकदम मऊसूत वाळू, तर कधी लांबच लांब पसरलेले डोंगर परंतु निसर्ग या किमयागाराने हे सर्व आपल्या ब्रशने इतके व्यवस्थित मांडून आणि रंगवून ठेवलेले दिसले की आपण चित्रकार म्हणजे खरंच नगण्य आहोत याची जागोजागी जाणीव येथे निसर्ग करून देत होता.

एका छोट्या गावापासून आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आणि आलू पराठा आणि गरमागरम चहा घेऊन हॉटेलचा परिसर न्याहाळला. या हॉटेलच्या मागच्या बाजूचे दृश्य तर इतके अप्रतिम होते की मी तर तेथे दहा-पंधरा मिनिटे बसूनच राहिलो. शेवटी पुन्हा हॉटेल मालकाकडून एक कप चहा घेऊन या जागेकडे बसत हळूहळू एक एक घोट पीत राहिलो त्या मालकालाही त्याचा इतका हेवा तर त्यांनी पूर्ण हॉटेलचा इतिहास मला सांगितला.

तिथून एक तासभर प्रवास केल्यावर आम्ही माही ब्रिजपाशी आलो जिथे आमचे सहकारी आमची वाट बघत बसले होते. सगळे आनंदाने ओरडले आणि एकमेकांचे हात कधी हातात गेले तेही कळले नाही. आम्हा सर्वांनाच पुन्हा भेटल्याचा आनंद झाला होता आणि आम्ही सर्व सामान काढून त्यांच्या गाडीत जाऊन बसलो आणि हळूहळू पुढच्या गावी प्रस्थान ठेवले.

पुढे अर्धा एक तास प्रवास झाल्यानंतर दूरवर डोंगरांच्या मध्ये एक हिरवे निळेशार पाचूचे बेट उमळल्यासारखे भासत आहे असं दृश्य दिसले. मी ओरडून ऐश्वर्याला विचारले की ते काय आहे तर ती म्हणाली की आपल्याला तिथेच जायचे आहे तो क्यागर ( Kyagar lake) लेक आहे आणि संपूर्ण डोंगरांनी घेरला आहे. मला तर तो लेक कधी एकदा जवळून बघतो असं झालं होतं आणि हळूहळू त्याचे रूप ध्यानात येऊ लागले. निळसर, हिरवट पाणी असलेला तो लेक निसर्गाने इतक्या खुबीने, सुंदर रितीने वसविला होता की कुठूनही पाहिले तरी त्या निळ्याशार जलाशयाकडे लक्ष जात असे. हळुवार वाऱ्याने तो स्वतःशी हसत होता असेच मला वाटले. जवळ जाऊन कधी एकदा त्या पाण्याला स्पर्श करतो असे वाटले आणि तो क्षण लगेचच आला. ओंजळभर पाणी पिऊन पिल्यानंतर जरा मन शांत झालं. इतके स्वच्छ, निर्मळ पाणी आणि त्याची चव तर इतकी अप्रतिम होते की ते पाणी पोटात जाऊन आपल्याला नवीन काहीतरी सुचेल, दृष्टी देईल याची खात्री झाली.

त्या तलावाचा आजूबाजूला अथांग पसरलेले डोंगर आणि डोंगराच्या टोकाशी विसावलेला बर्फ हे सर्व चित्र एखाद्या परीकथेतील असावे असेच वाटत होते.


संध्याकाळी पुन्हा आम्ही त्या स्वप्नातील तळ्याकाठी आल्यावर उन्हाची तिरीप लांबवर पडली होती, डोंगर दऱ्यातील प्रकाश सावल्यांचे खेळ सुरू झाले आणि तो पर्वतांच्या शिखरावरील बर्फ चांदीसारखा चमकत होता. सर्व परिसर हलकेच प्रकाशमय होत होता.आम्ही सर्वजण ही किमया डोळ्यात साठवून घेत होतो.
****
या लेखाचे आधीचे २ भाग वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
लडाख डायरी १ – https://chinha.in/features/ladakh-diary-travel-vloggers-sharad-tarde-suchita-tarade/ 
लडाख डायरी २ – https://chinha.in/features/feature-ladakh-diary-2-travel-vlogger-sharad-and-suchita-tarade/ 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.